Home धाराशिव ३२ मजुरांना बेकायदेशीरपणे कामासाठी आणून ठेवण्यात ओलीस, धाराशिवमध्ये उसतोड मजुरांची जबरदस्तीने काम...

३२ मजुरांना बेकायदेशीरपणे कामासाठी आणून ठेवण्यात ओलीस, धाराशिवमध्ये उसतोड मजुरांची जबरदस्तीने काम करवून घेण्याचा प्रकार उघडकीस, दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल

0
22

धाराशिव (वाशी): वाशी तालुक्यातील मौजे पिंपळगाव कोठावळा येथील रमाकांत लाड यांच्या शेतात उसतोड मजुरांकडून जबरदस्तीने काम करून घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींमध्ये श्री. माखन (गाव – बिजपुरी, सागर, मध्यप्रदेश) आणि श्री. अनिल जाधव यांचा समावेश आहे.

फिर्यादी सुधाकर गुणवंतराव कोनाळे (वय 56), सरकारी कामगार अधिकारी, धाराशिव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, या मजुरांकडून जबरदस्तीने काम करून घेतले जात होते. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 126(2), 351(2), 351(3), 3(5) तसेच बंदबिगार पद्धती (उच्चाटन) अधिनियम 1976 व सुधारणा अधिनियम 1985 च्या कलम 2 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रकरणाचा उलगडा:
मा. जिल्हाधिकारी ललितपूर (उत्तरप्रदेश) व धाराशिव यांच्या सूचनेनुसार, दिनांक 4 फेब्रुवारी 2025 रोजी कामगार अधिकारी, तहसीलदार वाशी, ग्राम महसूल अधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी, मंडळ अधिकारी, पोलीस अधिकारी व जनसाहस फाउंडेशनचे प्रतिनिधी यांनी एकत्रित पाहणी केली. या वेळी शेतात उत्तरप्रदेशमधील ललितपूर जिल्ह्यातील पिसनारी गावचे 11 पुरुष, 8 महिला व 15 बालके असे एकूण 34 उसतोड मजूर काम करत असल्याचे आढळले.

या मजुरांना दररोज 400 रुपये मजुरी व 2000 रुपये अँडव्हान्स दिले असल्याचे सांगण्यात आले. परंतु, मजुरांनी काम करण्याची इच्छा नसल्याचे स्पष्ट करत मूळ गावी जाण्याची परवानगी मागितली. मात्र ठेकेदाराने त्यांना परत जाण्याची परवानगी नाकारली, पगार न देणे, सुट्टी न देणे, व धमकावणे असे प्रकार घडल्याचे निष्पन्न झाले.

कायद्याचा कठोर बडगा:
या प्रकरणात आरोपींविरुद्ध जबरदस्तीने काम करवून घेणे, वेतन न देणे, धमकी देणे यासारख्या गंभीर आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक थोरात यांच्या आदेशानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस नाईक यादव करत आहेत.

प्रशासनाची तत्परता:
या कारवाईदरम्यान पोलीस अधिकारी, महसूल विभाग, कामगार अधिकारी तसेच जनसाहस फाउंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते. समितीच्या तपासात मजुरांच्या तक्रारी खरी असल्याचे निष्पन्न झाले असून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here