महामार्ग रद्द करावा या मागणीसाठी एकदिवसीय धरणे आंदोलन
महाविकास आघाडीच्या नेत्यांची उपस्थिती
धाराशिव- नागपूर ते गोवा या प्रस्तावित असणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात धाराशिव जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांनी शुक्रवारी (दि.२४) एकदिवसीय धरणे आंदोलन करून महामार्ग कायमचा रद्द करावा अशी मागणी केली. यावेळी बाधित शेतकऱ्यांसह महाविकास आघाडीच्या घटक पक्षातील नेत्यांनी उपस्थित राहून या आंदोलनाला पाठींबा दिला.
शक्तिपीठ महामार्ग पवनार ते पत्रादेवी (नागपूर – गोवा) महाराष्ट्र द्रुतगती महामार्ग धाराशिव जिल्ह्यातून नेऊ नये, कोल्हापूर जिल्हा ज्याप्रमाणे या प्रकल्पातून वगळला त्याप्रमाणे धाराशिव जिल्हादेखील वगळण्यात यावा, जिल्ह्यातील बागायती जमिनी कवडीमोल किंमतीत अधिग्रहित केल्यास इथला शेतकरी देशोधडीला लागेल त्यामुळे कुणीही मागणी न केलेला हा महामार्ग कायमचा रद्द करावा अशी मागणी आंदोलनातून करण्यात आली. यावेळी बाधित शेतकऱ्यांनी आमच्या जमिनी अधिग्रहण करण्याचा प्रयत्न केला तर प्राण पणाला लावून त्याला विरोध केला जाईल असा इशारा दिला.
यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऍड. धीरज पाटील, राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर, शिवसेना (उबाठा) पक्षाचे नेते माजी नगराध्यक्ष नंदुराजे निंबाळकर या नेत्यांनी भाषणे केली. शक्तीपीठ महामार्ग जोपर्यंत रद्द होत नाही तोपर्यंत आम्ही शेतकऱ्यांसोबत आहोत, हा महामार्ग रेटण्याचा प्रयत्न केल्यास त्याला तीव्र विरोध केला जाईल, शासनाने शेतकऱ्यांच्या घरावर नांगर फिरवू नये अन्यथा त्याची किंमत शासनाला मोजावी लागेल असा इशारा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी यावेळी भाषणातून दिला. शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव यांना दिले. यावेळी शोभा जाधव यांच्यासमोर बाधित शेतकरी महिलांनी कैफियत मांडली. धीरज पाटील यांनी यावेळी शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधातील शेतकऱ्यांच्या तीव्र भावना शासनापर्यंत पोहोचवा आणि महामार्ग रद्द करण्याचा अहवाल शासनाला पाठवा अशी विनंती जाधव यांना केली. या आंदोलनात शक्तीपीठ महामार्गात जाणाऱ्या नितळी, घूगी लासोना, सांगवी, कामेगाव, चिखली, माळंगी, बरमगाव बु. मेडसिंगा, धाराशिव ग्रामीण, देवळाली, शेकापूर, गावसुद, वरवंटी, पोहनेर, बेगडा, सुर्डी, खुंटेवाडी या 19 गावातील बाधित शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.