धाराशिव, — धाराशिव जिल्ह्यातील महसूल विभागात नुकत्याच पार पडलेल्या बदल्या प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणावर पक्षपात झाल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते अमोल शिवाजीराव जाधव यांनी केला आहे. त्यांनी राज्याचे महसूल व वन विभागाचे प्रधान सचिव यांच्याकडे लेखी तक्रार दाखल करून बदल्यांमध्ये पारदर्शकता न राखल्याचा मुद्दा उपस्थित केला आहे.
जाधव यांच्या म्हणण्यानुसार, धाराशिव जिल्ह्यातील काही कर्मचारी लिपिक वर्गीय पदावरून पदोन्नती मिळूनही तब्बल १० वर्षांहून अधिक काळ एकाच मुख्यालयात, तेही विविध पदांवर कार्यरत आहेत. शासनाच्या नियमानुसार कोणत्याही कर्मचाऱ्याची सेवा एका मुख्यालयात सहा वर्षांपेक्षा अधिक ठेवता येत नाही. मात्र, या नियमाला डावलून काही निवडक कर्मचाऱ्यांना ‘ओव्हरस्टे’ असूनही बदल्यांतून वगळण्यात आले आहे.
तक्रारीत असे नमूद करण्यात आले आहे की, संबंधित कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीनंतरही त्यांचा ‘ओव्हरस्टे’ विचारात घेतला गेला नाही. उलट, जिल्हाधिकारी कार्यालयातील काही अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना चुकीची माहिती देऊन, आपल्या निकटवर्तीय कर्मचाऱ्यांना बदल्यांपासून सूट मिळवून दिली आहे. ही बाब गंभीर असून, यामध्ये बदल्यांचे निकष पायदळी तुडवले गेल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
अमोल जाधव यांची मागणी:
- बदल्यांमध्ये पारदर्शकता न राखल्यामुळे संबंधित प्रक्रियेची तात्काळ चौकशी करण्यात यावी.
- जे कर्मचारी १० वर्षांहून अधिक कालावधीपासून एकाच मुख्यालयात कार्यरत आहेत, त्यांची तातडीने इतरत्र बदली करण्यात यावी.
- बदल्यांची प्रक्रिया चुकीच्या पद्धतीने राबविणारे अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी.
या तक्रारीमुळे जिल्ह्यातील महसूल प्रशासनात खळबळ उडाली असून, संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. या प्रकरणाची चौकशी होऊन योग्य ती कारवाई होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
- दरोड्याच्या तयारीत असलेले तीन आरोपी अटकेत; गावठी पिस्तूल व पाच लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त
- येत्या नवरात्र उत्सवात तुळजापूर विकास प्रकल्पाचे भूमिपूजन -परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
- महाळुंग येथील अपघातात हुंडाई कंपनीच्या वेणीव गाडीचा चक्काचूर
- बोंबला!! लोकसेवक बनले मालक
- मुंबईकडे नेत असलेला ८.२७ किलो गांजा येडशी येथे जप्त