क्रेडिट कार्डमधून १.९९ लाखांची ऑनलाईन खरेदी रद्द करून तक्रारदाराला पूर्ण रक्कम परत
धाराशिव, दि. २ ऑगस्ट –
सायबर गुन्हेगाराने ऑनलाईन फसवणुकीतून चोरट्या पद्धतीने घेतलेल्या १,९९,०००/- रुपयांची संपूर्ण रक्कम परत मिळवण्यात धाराशिव सायबर पोलिसांनी मोठे यश मिळवले आहे. सायबर पोलिसांनी तांत्रिक कौशल्य आणि तात्काळ कारवाई करत आरोपीने ऑनलाईन खरेदीसाठी वापरलेली ऑर्डर रद्द करून ही रक्कम तक्रारदाराच्या खात्यात परत पाठवण्यात यश मिळवले.
फसवणुकीची घटना
कळंब तालुक्यातील रहिवासी श्रीमती रिया निखिल अंधारे (वय २१), व्यवसायाने गृहिणी, यांना दिनांक २३ जुलै २०२५ रोजी व्हॉट्सअॅप ग्रुपवर ‘आरटीओ चलन’ या नावाची एक APK फाईल प्राप्त झाली. ही फाईल त्यांनी डाऊनलोड केल्यानंतर त्यांच्या मोबाईलवर ओटीपीचे मेसेज येऊ लागले आणि काही क्षणांतच त्यांच्या क्रेडिट कार्डमधून १,९९,०००/- रुपये विथड्रॉल झाल्याचे मेसेज प्राप्त झाले.
सदर प्रकार लक्षात येताच त्यांनी तात्काळ हेल्पलाइन क्रमांक १९३० वर कॉल करून NCCR पोर्टलवर क्र. ३१९०७२५०१२७२५३ अंतर्गत तक्रार दाखल केली.
सायबर पोलिसांची तत्पर कारवाई
तक्रार प्राप्त होताच धाराशिव सायबर पोलिसांनी तांत्रिक तपासाला सुरुवात केली. फसवणूक झालेली रक्कम इन्फीबीम ॲव्हेन्यू या पेमेंट गेटवेमार्फत ड्राईव्ह ट्रॅक प्लस – HPCL या कंपनीकडे वर्ग झाल्याचे निष्पन्न झाले. तपासादरम्यान पोलिसांनी संबंधित नोडल अधिकाऱ्यांशी ईमेल व दूरध्वनीद्वारे तात्काळ संपर्क साधला.
तपासात उघड झाले की, आरोपीने या रकमेचा वापर करून ऑनलाईन शॉपिंग केली होती. सायबर पोलिसांनी ती खरेदी थांबवण्याचा आणि ऑर्डर रद्द करून रक्कम परत मिळवण्याचा प्रयत्न सुरू केला. अखेर सायबर पोलिसांच्या सततच्या पाठपुराव्याने संबंधित ऑनलाईन खरेदीची ऑर्डर रद्द करण्यात आली आणि संपूर्ण रक्कम तक्रारदाराच्या खात्यात परत केली गेली.
पोलिसांची टीम आणि मार्गदर्शन
ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि चोरमले, सपोनि कामुळे, पोउनि सर्जे, सफौ कुलकर्णी, पोहक. हालसे, मपोना पौळ, पोशि सुर्यवंशी, मोरे, तिळगुळे, कदम, काझी, शेख, खांडेकर, शिंदे, पुरी, अंगुळे, बिराजदार, गाडे, जाधवर आणि भोसले यांनी संयुक्तपणे केली.