back to top
Thursday, October 3, 2024
Google search engine
Homeताज्या बातम्यातुळजाभवानी मंदिर संस्थान कार्यालयातून महत्त्वाच्या संचिकांना फुटले पाय,दिलीप नाईकवाडी, राज्य गुन्हे अन्वेषण...

तुळजाभवानी मंदिर संस्थान कार्यालयातून महत्त्वाच्या संचिकांना फुटले पाय,दिलीप नाईकवाडी, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, मंदिर सुरक्षा संदर्भातील महत्त्वाची कागदपत्रे गायब

मागील दोन वर्षापासून संचिका गायब झाल्याचा अहवाल ठेवला दडवून

धाराशिव -महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या मंदिर संस्थान कार्यालयातून महत्त्वाच्या संचिकांना पाय फुटले असून त्या गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबतचा अहवाल दैनिक जनमत च्या हाती लागला असून मंदिरातील सुरक्षेच्या आणि गैरव्यवहाराच्या अशा महत्त्वाच्या 50 पेक्षा अधिक संचिका गायब झाल्याचे प्रकरण उघड झाले आहे.

तुळजाभवानी मंदिर संस्थान हे नेहमीच वादाच्या भोवऱ्यात अडकलेले पाहायला मिळतं. भ्रष्टाचाराचे कुरण बनलेल्या तुळजाभवानी मंदिरात यापूर्वी सोने-चांदीचे मौल्यवान पुरातन दागिने गायब झाल्याचा प्रकार समोर आला होता. त्यासोबतच दानपेटी घोटाळा उघडकीस आला. दोन्ही प्रकरणे न्यायालयात सुरू असून मंदिर संस्थान मध्ये कार्यरत असलेल्या तत्कालीन उच्च पदस्थ अधिकाऱ्यांवरती नेहमीच भ्रष्टाचार आरोप केले गेले आहेत. एवढेच नाही तर आता तुळजाभवानी मंदिर संस्थान कार्यालयातून महत्त्वाच्या संचिकाच गायब झाल्याचा प्रकार दैनिक जनमत ने समोर आणला आहे.

यात मोठी धक्कादायक माहिती समोर आली असून तुळजाभवानी देवीच्या प्राचीन खजिन्यावर आणि मौल्यवान दागिन्यांवर डल्ला मारणाऱ्या तत्कालीन धार्मिक व्यवस्थापक दिलीप नाईकवाडी याच्या संदर्भातील महत्त्वाची संचिकाच गायब असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर जून 2013 मधील राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे दस्तावेज, श्री तुळजाभवानी मंदिरातील गैर कारभाराची चौकशी संदर्भातील सप्टेंबर 2012 मधील संचिका,  तुळजापूर दानपेटी मोजणी संदर्भातील तहसील कार्यालयाची संचिका, मंदिरातील भरती प्रक्रियेतील महत्त्वाची दस्त गायब झाले आहेत. मे 2022 मध्ये संचिका गायब प्रकरणी 3 सदस्य समिती स्थापन करून याची चौकशी करण्यात आली होती. मागील दोन वर्ष हा अहवाल गुपित ठेवण्यात आला होता. लेखाधिकारी यांच्या मार्फत चौकशी केल्यानंतर विविध विषयांच्या महत्त्वाच्या 50 पेक्षा अधिक संचिका गायब असल्याचा अहवाल देण्यात आला होता.

मौल्यवान दागिने प्रकरण नेमकं काय आहे?

तुळजाभवानी मंदिर संस्थानातील तत्कालीन धार्मिक व्यवस्थापक दिलीप नाईकवाडी याने तुळजाभवानी देवीच्या प्राचीन खजिन्यावर डल्ला मारला. जवळपास 35 तोळे सोने, 71 किलो चांदी, 71 प्राचीन नाणी, गायब केली. या प्रकरणी 13 सप्टेंबर 2020 रोजी याच्यावर गुन्हा दाखल झाला होता. तसेच दिलीप नाईकवाडी याला अटकही करण्यात आली. नाईकवाडी याने 17 वर्षाच्या कालावधीत टप्प्याटप्प्याने पुरातन नाणी गायब केली. तुळजाभवानी देवीला अनेक राजेराजवाडे यांनी अर्पण केलेले बहुतांश मौल्यवान व प्राचीन दागिने तिजोरीतून गायब करून गैर व्यवहार केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले होते त्याचा ठपका नाईकवाडी याच्यावर ठेवत नाईकवाडी याच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली होती मात्र आता याच तत्कालीन धार्मिक व्यवस्थापक दिलीप नाईकवाडी संदर्भातील महत्त्वाचे कागदपत्र मंदिर संस्थान कार्यालयातून गायब झाले आहेत.

संचिका गायब प्रकरणी या समितीने केली चौकशी

मंदिर संस्थान लेखाधिकारी सिद्धेश्वर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली 3 सदस्य समिती स्थापन करण्यात आली होती. समितीमध्ये लेखापाल सिद्धेश्वर इंतुले, सहाय्यक व्यवस्थापक स्थापत्य राजकुमार भोसले या समितीने 29 एप्रिल 2022 रोजी अभिलेख कक्षामध्ये प्रत्यक्ष तपासणी केली. दरम्यान समितीला 50 पेक्षा अधिक महत्त्वाच्या संचिका गायब असल्याचे लक्षात आले. त्या अनुषंगाने या समितीने 4 मे 2022 रोजी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान तहसीलदार तथा व्यवस्थापक प्रशासनाकडे संचिका गायब असल्याचा अहवाल बनवून सुपूर्द केला. यावर मंदिर प्रशासनाने नेमकी काय भूमिका घेतली हे अद्याप समोर आले नसले तरी तरी अहवालातून उघड झालेल्या प्रकारावर मंदिर प्रशासन काय भूमिका घेते याकडे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments