कोतवाल संवर्गाच्या पदभरती संदर्भात सुधारीत मार्गदर्शन

0
70

 



राज्यातील महसूल विभागाच्या अखत्यारीत कार्यरत असलेला कोतवाल संवर्ग हा अवर्गीकृत मानधन तत्वावरील पद असून शासकीय कर्मचारी नाही. कोतवाल संवर्गाकरीता दिनांक ०७ मे, १९५९ च्या शासन निर्णयान्वये स्वतंत्र सेवाप्रवेश नियम विहित करण्यात आलेले आहेत. तसेच कोतवाल संवर्गाची पदे भरतांना राज्यात सर्व ठिकाणी समानता येण्यासाठी महसूल व वन विभागाच्या दिनांक ०५ सप्टेंबर, २०१३ च्या शासन निर्णयान्वये सुधारीत नियम व मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत. तथापि, आता शासनाने भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील नामनिर्देशनाच्या कोट्यातील पदे भरतांना मौखिक परीक्षा / मुलाखत न घेण्याबाबतचे धोरण ठरविले आहे. तसेच शासनाने सरळसेवा भरतीसाठी नामनिर्देशनाव्दारे पदभरती करताना वेळोवेळी सुधारित केलेल्या बिंदुनामावलीची अंमलबजावणी व आरक्षण कायद्यातील तरतुदींचे पालन करणे आवश्यक आहे. सबब, सदरच्या बाबी विचारात घेता, कोतवाल संवर्गाच्या पदभरतीसंदर्भात महसूल व वन विभागाच्या दिनांक ०५ सप्टेंबर, २०१३ च्या शासन निर्णयातील सुधारित नियम व मार्गदर्शक तत्वांमधील अनुक्रमांक (४) व (५) मध्ये योग्य त्या सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यास अनुसरुन निर्णय घेतला आहे.

कोतवाल संवर्गाची पदे नामनिर्देशनाने भरतांना १०० गुणांची लेखी परीक्षा घेण्यात यावी. लेखी परीक्षेसाठी वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाचे ५० प्रश्न असावेत. त्यानुसार सदर लेखी परीक्षेमध्ये उमेदवारांनी प्राप्त केलेल्या गुणांच्या आधारे निवडसूची तयार करुन निवडसूचीतील पात्र उमेदवारांची गुणवत्तेनुसार निवड करण्यात यावी.

नामनिर्देशनाव्दारे पदभरती करतांना बिंदुनामावलीची अंमलबजावणी संदर्भात शासनाकडून वेळोवेळी निर्गमित करण्यात येणाऱ्या प्रचलित शासन निर्णयातील तरतूदींची अंमलबजावणी करावी व आरक्षण कायद्यातील तरतुदींचे पालन करावे.

महसूल व वन विभागाच्या संदर्भीय शासन निर्णय दिनांक ०५ सप्टेंबर, २०१३ च्या शासन निर्णयातील उर्वरित तरतूदींमध्ये कोणताही फेरबदल केला नसून सदरच्या तरतूदी जशाच्या तशाच लागू राहतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here