धाराशिव | प्रतिनिधी
धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस निरीक्षक आणि महिला पोलीस कर्मचाऱ्याविरोधात लाच मागणीप्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाने (लाप्रवि) सापळा कारवाई करत ठोस पावले उचलली आहेत. एका ४८ वर्षीय महिलेकडून त्यांच्या मुलाच्या गुन्ह्यात मदत करण्याच्या मोबदल्यात एकूण १ लाख रुपयांची लाच मागितल्याचे उघड झाले आहे.
याप्रकरणी आरोपींमध्ये
- मारोती निवृत्ती शेळके (वय ५४ वर्षे), पोलीस निरीक्षक, पो.स्टे. धाराशिव ग्रामीण
- मुक्ता प्रकाश लोखंडे (वय ३४ वर्षे), महिला पोलीस नाईक, पो.स्टे. धाराशिव ग्रामीण
यांचा समावेश आहे.
तक्रारीची खातरजमा झाल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धाराशिव यांनी पोलीस उपअधीक्षक श्री. योगेश वेळापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली आज दिनांक २५ जून २०२५ रोजी शासकीय विश्रामगृहाजवळ सापळा कारवाई केली.
तक्रारदाराने सुमारे ९५,००० रुपयांची रक्कम दिली असता, ती महिला पोलीस नाईक मुक्ता लोखंडे हिने स्वीकारली. पंचासमक्ष झालेल्या या कारवाईत ती रंगेहाथ पकडली गेली. यानंतर दोघा आरोपींची अंगझडती घेण्यात आली असून, त्यांच्याकडून मोबाईल फोन्स, मोटारसायकल, ओळखपत्र इत्यादी साहित्य जप्त करण्यात आले आहे. या सापळ्यात अद्याप कोणतीही अटक करण्यात आलेली नसून, फौजदारी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ अंतर्गत
- मुक्ता लोखंडे यांच्याविरोधात कलम ७ व ७अ
- तर मारोती शेळके यांच्याविरोधात कलम १२ नुसार कारवाई प्रस्तावित आहे.

सदर कारवाईत सहाय्यक सापळा अधिकारी पो.नि. बाळासाहेब नरवटे, मार्गदर्शक पोलीस अधीक्षक संदीप आटोळे व अपर पोलीस अधीक्षक मुकुंद अघाव यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. सापळा पथकात पोलीस अंमलदार नागेश शेरकर आणि शशीकांत हजारे सहभागी होते.
नागरिकांना आवाहन
कोणताही शासकीय अधिकारी किंवा त्यांच्या वतीने खाजगी व्यक्ती शासकीय कामासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त लाचेची मागणी करत असल्यास नागरिकांनी खालील क्रमांकांवर तात्काळ संपर्क साधावा:
📞 टोल फ्री क्रमांक: 1064
📞 पोलीस उपअधीक्षक, लाप्रवि, धाराशिव: 02472-222879
- “धाराशिव जिल्ह्यात रेखाकला परीक्षेला चित्रकलेचे गुरुजीच नाहीत; विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान”
- धाराशिव जिल्ह्यात पावसाचा जोर; तर काही मंडळांमध्ये चिंताजनक कमतरता
- मंत्रिमंडळ बैठकीत आरोग्य, उद्योग व महसूल विषयक निर्णयांना मंजुरी
- जिल्हा परिषदेतील ११८३ अधिकारी-कर्मचाऱ्यांनी उचलला “लाडकी बहीण” योजनेचा लाभ, आता कारवाई होणार
- तुळजाभवानी मंदिर शिखराचा अहवाल होता तर मंत्र्यांचे पुन्हा अहवालाचे आदेश कशासाठी?