धाराशिव : पुढील महिन्यात म्हणजेच २४ सप्टेंबर २०२५ पासून जिल्ह्यात शासकीय रेखाकला परीक्षा सुरू होणार आहेत. मात्र जिल्ह्यात कला शिक्षकांचा तीव्र अभाव असल्याने विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत असून, या विषयाचे अध्यापनच कोंडीत सापडले आहे.
धाराशिव जिल्ह्यात एकूण १७ परीक्षा केंद्र आहेत. त्यापैकी १६ केंद्रे कार्यरत असून, यातील १० परीक्षा केंद्रांवर कायमस्वरूपी कला शिक्षक पदच अस्तित्वात नाही. उर्वरित सात केंद्रांवर केवळ काहीच कला शिक्षक कार्यरत आहेत. परिणामी, “परीक्षा चित्रकलेची आणि चित्रकलेचे गुरुजीच नाहीत” अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
कला शिक्षक नसल्याने काही परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांचा सहभाग जवळजवळ शून्य आहे. उदाहरणार्थ, जि. प. मंगरूळ (ता. तुळजापूर) परीक्षा केंद्रावर गेल्या दोन वर्षांपासून एकही विद्यार्थी रेखाकला परीक्षेस प्रविष्ट झालेला नाही. केंद्रप्रमुख आणि मुख्याध्यापकांसाठीही हे मोठे संकट ठरत आहे.
दरवर्षी धाराशिव जिल्ह्यातील परीक्षा केंद्रांवरून १५ ते १७ हजार विद्यार्थी रेखाकला परीक्षा देतात, तर राज्यातील एकूण परीक्षार्थ्यांची संख्या तब्बल सात ते आठ लाख इतकी आहे. अशा वेळी “हायस्कूल तेथे कलाशिक्षक” हे धोरण राबवून कला शिक्षकांची तत्काळ भरती करण्याची मागणी शिक्षण क्षेत्रातून होत आहे.
या परीक्षा म्हणजे इलेमेंटरी व इंटरमिजिएट विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनातील आवडीचा, स्मरणीय टप्पा मानल्या जातात. शिवाय, या परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांना दहावी बोर्ड परीक्षेत ग्रेडनुसार अतिरिक्त गुणांची सवलत मिळते—ग्रेड A साठी ७ गुण, ग्रेड B साठी ५ गुण तर ग्रेड C साठी ३ गुण.
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात कलाशिक्षणाला विशेष महत्त्व दिले असून, दहावी इयत्तेसाठी कला विषय अनिवार्य करण्यात आला आहे. त्यामुळे शासनाने कला शिक्षक नेमणूक धोरणावर ठोस पावले उचलल्यास विद्यार्थ्यांचे भवितव्य उज्वल होईल, असे शिक्षक व शिक्षणतज्ज्ञांचे मत आहे.