कळंब :– येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत दि २९ पासून चालू असलेले राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचा आज महिला दिनाचा कार्यक्रम आयोजित करून समारोप करण्यात आला.
औदयोगिक प्रशिक्षण संस्थेत दरवर्षी राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे आयोजन करण्यात येते. यामध्ये राष्ट्रसेवेसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व जबाबदाऱ्या आणि कौशल्याची जाणीव प्रशिक्षणार्थ्यांना करून देण्यात येत असते. यानुसार दि ०४ रोजी सकाळच्या सत्रात “घनकचरा व्यवस्थापन” या विषयावर विक्रम समुद्रे सहायक प्रकल्प अधिकारी नगर परिषद कळंब यांचे मार्गदर्शन झाले. त्याच दिवशी दुपारच्या सत्रात “आजची सामाजिक स्थिती आणि युवक” या विषयावर कळंब पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अशोक पवार यांचे मार्गदर्शन झाले. दि ०५ रोजी सकाळच्या सत्रात “बदलते पर्यावरण आणि आपली भूमिका” या विषयावर मोहेंकर महाविद्यालयाचे माजी प्राध्यापक डॉ बी वाय पाटील यांचे मार्गदर्शन झाले. त्याच दिवशी दुपारच्या सत्रात “व्यक्तिमत्त्व विकास” या विषयावर मोहा येथील उद्योजक बालाजी मडके यांचे मार्गदर्शन झाले. दि ०६ रोजी संस्थेतील प्रशिक्षणार्थ्यांची “आरोग्य तपासणी आणि रक्तदान शिबिराचे” आयोजण करण्यात आले होते. यामध्ये १७७ जणांची आरोग्य तपासणी केली असून १८ कर्मचारी आणि प्रशिक्षणार्थीनी रक्तदान शिबिरात उस्फुर्त सहभाग नोंदवला होता. यासाठी जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद आणि उपजिल्हा रुग्णालय कळंब यांची सर्व टीमचे विशेष सहकार्य लाभले.
राष्ट्रीय सेवा योजनांतर्गत दि ०७ रोजी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात होते. दि ०८ रोजी महिला दिन असल्याकारणाने आयोजक टीमने वक्तृत्व स्पर्धेचे सर्व नियोजन संस्थेतील महिला कर्मचारी आणि मुलींच्या ताब्यात देण्याचे ठरवले. त्यानुसार प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजिका ज्योतीताई सपाटे आणि मोहेंकर महाविद्यालयाच्या माजी प्राध्यापिका मंगलताई ढेंगळे या उपस्थित होत्या. त्यांनीही महिला दिन, उद्योग आणि समाज याविषयी विस्तृत मार्गदर्शन केले. त्यानंतर संस्थेतील प्रशिक्षणार्थी यांनी महापुरुषांविषयी विचार मांडले. राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिराच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य सचिन सूर्यवंशी, गटनिदेशक अनिल आहेर, कार्यक्रम अधिकारी एस पी डोंगे, मुख्य लिपिक रवीचंद्र जगदाळे, शिल्पनिदेशक सचिन डोंगरे, शिल्पनिदेशिका कल्पना जाधवर, सर्व निदेशकवर्ग तसेच संस्थेतील चतुर्थ श्रेणी कर्मचारी आणि सर्व प्रशिक्षणार्थी स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.