कर्नाटक राज्य परिवहन सेवेची लांब पल्ल्याची ” प्रतिष्ठित सेवा ” अतिशय लोकप्रिय असून आदरातिथ्य व्यवस्थापनाचा उत्कृष्ट नमुना असलेल्या या सेवेला प्रवाशांची चांगली पसंती आहे. अशाच प्रकारचा प्रयोग महाराष्ट्र देखील करणे शक्य आहे! असे कौतुकोद्गार राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी काढले ते कर्नाटक दौऱ्यावर असताना बंगळुरू येथील कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या मुख्यालयाच्या भेटी दरम्यान बोलत होते.
महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे १ व २ फेब्रुवारी रोजी दोन दिवसाच्या कर्नाटक दौऱ्यावर होते. आज बंगळुरू येथे त्यांनी कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या मुख्यालयाला भेट दिली, त्यावेळी त्यांच्यासोबत कर्नाटक राज्याचे परिवहन मंत्री डॉ . रामलिंगा रेड्डी यांच्या सह राज्याचे परिवहन सचिव डॉ.एन.व्ही. प्रसाद व कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष रिझवान नवाब तसेच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर, श्री.नितीन मैद (महाव्यवस्थापक वाहतूक) व नंदकुमार कोलारकर (महाव्यवस्थापक यंत्र ) हे अधिकारी उपस्थित होते.
या वेळी मंत्री सरनाईक यांनी कर्नाटक राज्य परिवहन सेवेद्वारे चालवल्या जाणाऱ्या अंबारी, ऐरावत, राजहंस यासारख्या प्रीमियम सेवेच्या बसेस बरोबर इतर बसेस ची पहाणी केली, तसेच या बसेस कशा पद्धतीने चालवल्या जातात याची माहिती घेतली. ” आदरातिथ्य व्यवस्थापनाचा उत्कृष्ट नमुना असलेल्या या बस सेवेला प्रवाशांची चांगली पसंती आहे. खाजगी बसेसच्या तुलनेमध्ये सुरक्षित आणि वेळेवर सेवा देण्यासाठी या बस सेवा अतिशय प्रसिद्ध आहे.” अशा प्रकारे बस सेवेचे कौतुक केले .
या वेळी कर्नाटक परिवहन सेवेच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या राज्यात सध्या चालवल्या जात असलेल्या सर्व प्रकारच्या बसेस मंत्री सरनाईक यांना दाखविल्या. त्यामध्ये ९ मीटर पासून १५ मीटर पर्यंतच्या वेगवेगळ्या प्रकारच्या बसेस उभ्या करण्यात आल्या होत्या. अगदी डोंगरी भागापासून हम रस्त्यावर धावतील अशा वेगवेगळ्या इंजिन आणि आसन क्षमतेच्या, विविध सोयी -सुविधा असलेल्या बसेस कशाप्रकारे गरजेनुसार प्रवाशांसाठी उपलब्ध केले जातात, याची माहिती यावेळी त्यांना देण्यात आली. तसेच लांब पल्ल्याची सेवा देणाऱ्या बसेस मध्ये “वायफाय ” पासून ” युरिनल ” पर्यंत सोयीसुविधा प्रवाशांसाठी कशा प्राप्त करून दिले जातात. तसेच ई-तिकीट आणि ऑनलाईन तिकीट बुकिंग ची सेवा देखील प्रवाशांना उपलब्ध करून दिली आहे, हे देखील यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी मंत्री सरनाईक यांना सांगितले. दरम्यान परिवहन सेवेच्या सादरीकरणात माहिती देताना,संपूर्ण राज्याचे व्यवस्थापन वेगवेगळ्या चार प्रादेशिक विभागांमध्ये विभागण्यात आले असून त्यासाठी प्रत्येक विभागाला आय.ए.एस.(I.A.S.) दर्जाचे एक अधिकारी नेमण्यात आलेले आहेत. तसेच राज्यस्तरावर या सर्वांचे संचालन करण्यासाठी वरिष्ठ आय.ए.एस.दर्जाचे अधिकारी नेमण्यात आले आहेत .त्यामुळे एकूण राज्याच्या परिवहन सेवेमध्ये सुसूत्रता आणणे आणि प्रवाशांना चांगल्या सुविधा प्राप्त करून देणे यासाठी प्रशासकीय रचनेमध्ये केलेले सकारात्मक बदल महत्वाची भूमिका बजावतात यांची माहिती देखील मंत्री महोदयांच्या देण्यात आली.
आपल्या मनोगतात मंत्री सरनाईक पुढे म्हणाले की,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व लोकप्रतिनिधींना मार्गदर्शन करताना सांगितले होते की,इतर राज्यात ज्या चांगल्या गोष्टी घडत आहेत, त्यांना भेट देऊन त्या आपल्या राज्यात कशा अमलात आणता येतील याचा अभ्यास करावा! जेणेकरून विविध ठिकाणच्या नाविन्यपूर्ण योजना आपल्या राज्यातील सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठी उपलब्ध होतील.याचाच एक भाग म्हणून कर्नाटक राज्य मार्ग परिवहन सेवेमार्फत चालवल्या जाणाऱ्या ऐरावत,अंबारी,राजहंस यासारख्या प्रतिष्ठित लांब पल्ल्याच्या सेवेची माहिती करून घेणे,तसेच त्यांच्या प्रादेशिक परिवहन व्यवस्थापनाचा अभ्यास करणे, त्याबरोबर त्यांनी कर्मचाऱ्यांसाठी राबवत असलेल्या प्रोत्साहन योजना जाणून घेण्यासाठी या दौऱ्याची आखणी केली होती.यावेळी बंगळुरू येथील कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या मुख्यालयात कर्नाटक परिवहन सेवेचे सादरीकरण करण्यात आले.
या निमित्ताने कर्नाटक राज्यातील परिवहन सेवांचा अभ्यास करून त्यांच्या चांगल्या कल्पना, नाविन्यपूर्ण योजना आपल्या एसटी महामंडळामध्ये राबवणे शक्य आहे का ! याची देखील चाचपणी या दौऱ्याच्या निमित्ताने करण्यात आली.