धाराशिव: शहरातील देशपांडे स्टँडजवळील नगरपरिषदेच्या कचरा डेपोमधून सतत निघणाऱ्या धुरामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. याविरोधात संतप्त नागरिकांनी १० फेब्रुवारी रोजी रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. यासंदर्भात ५ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे.
धुरामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात
नगरपरिषद कचरा डेपोमधून सातत्याने निघणाऱ्या धुरामुळे उमर मोहल्ला, ख्वाजा नगर, गणेश नगर, दरगाह रोड, तालिम गल्ली, बस डेपो परिसर, आयुर्वेदिक महाविद्यालय परिसर, अहिल्याबाई होळकर चौक, आगड़ गल्ली आणि परिसरातील नागरिकांना श्वास घेण्यास त्रास होत आहे. लहान मुले, वृद्ध आणि शारीरिकदृष्ट्या कमजोर असलेल्या व्यक्तींना खोकला, श्वसनाचे त्रास, डोळ्यांची जळजळ, त्वचेचे आजार आणि इतर शारीरिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
कचरा डेपोचे तातडीने स्थलांतर करण्याची मागणी
नागरिकांनी प्रशासनाकडे कचरा डेपोचा धूर तातडीने थांबवावा आणि शहराच्या किमान १० किमी अंतरावर त्याचे स्थलांतर करावे, अशी मागणी केली आहे. जर प्रशासनाने योग्य ती उपाययोजना केली नाही, तर १० फेब्रुवारी रोजी धाराशिव मर्दिनी मंदिर कमान येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
नगरपरिषद प्रशासनावर निष्क्रियतेचा आरोप
निवेदनाद्वारे नगरपरिषद प्रशासनाच्या हलगर्जीपणावर नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. नागरिकांचे आरोग्य धोक्यात घालणाऱ्या या गलथान कारभाराची जबाबदारी प्रशासनावर टाकण्यात आली असून, जर त्वरित उपाययोजना न केल्यास मोठे जनआंदोलन उभे राहील, असा इशारा देण्यात आला आहे.
या नागरिकांनी निवेदनावर स्वाक्षऱ्या केल्या:
शेख आयाज, अभय इंगळे, कादर खान पठाण, गणेश खोचरे, रवी वाघमारे, खलिफा कुरेशी, वाजिद पठाण, इस्माईल शेख, काझी एजाज, बाबा मुजावर, बिलाल तांबोळी, अनवर शेख, शेख इब्राहिम, भारत कोकाटे, फरमान काझी, गयास मुल्ला, शेख आतिक, संकेत साळुंखे, इस्माईल काझी, हसीब काझी, मोहसीन सय्यद, इम्रान खान, मुजीब काझी आदींसह अनेक प्रतिष्ठित नागरिकांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत.
प्रशासनाची पुढील भूमिका महत्त्वाची
नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर असल्याने प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी, अन्यथा नागरिकांच्या संतापाचा मोठा उद्रेक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आता प्रशासन काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.