नवी दिल्ली:- देशभरात कोविड-19 आजाराचे आतापर्यंत एकूण 43 रुग्ण सापडले आहेत. त्यातले 40 रुग्ण उपचाराधीन असून, त्यात केरळमधल्या 3 घरी पाठविलेल्या रुग्णांचा समावेश आहे. कालच्या बातमीनंतर आतापर्यंत 4 नवीन रुग्ण सापडले असून, त्यात एक रुग्ण केरळ (एर्नाकुलम), एक दिल्ली, एक उत्तर प्रदेश आणि एक रुग्ण जम्मूमध्ये आढळला आहे.
काल आढळलेल्या केरळमधल्या 5 रुग्णांपैकी 3 जण एकाच कुटुंबातील असून, ते नुकतेच इटलीहून परतले होते. उरलेले 2 रुग्ण त्यांचेच नातेवाईक असून, ते या बाधित कुटुंबियांना भेटले होते. बाधित कुटुंबियांनी इटलीहून परतल्यानंतर काही नातेवाईकांना भेट दिली होती आणि काही समारंभांनाही हजेरी लावली होती. त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्व जणांना शोधून त्यांची चाचणी करण्याचे काम सध्या सुरु आहे.
देशभरातून एकूण 3003 नमुन्यांची कोविड-19 साठी चाचणी करण्यात आली होती, त्यातील 2,694 नमुने विषाणूमुक्त असल्याचे सिद्ध झाले होते. त्यामुळे एकूण 43 नमुनेच विषाणूबाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे.
आतापर्यंत परेदशातून आलेल्या एकूण 8 लाख 74 हजार 708 प्रवाशांची विषाणू चाचणी विमानतळांवरच करण्यात आली असून, त्यातील 1 हजार 921 प्रवाशांमध्ये विषाणूंची लक्षणे दिसून आली होती. त्यातील 177 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 33 हजार 599 प्रवासी निरीक्षणाखाली असून, 21 हजार 867 प्रवाशांचा निरिक्षण कालावधी पूर्ण झाला आहे.
परदेशातून प्रवास करुन आलेल्या प्रवाशांनी त्यांना भरण्यासाठी दिलेल्या स्व-घोषणा (self-declaration) पत्रिका योग्य रीतीने भराव्यात, तसेच आपण कोणकोणत्या ठिकाणांना भेट देऊन आलो आहोत, त्याची पूर्ण माहिती अधिकाऱ्यांना द्यावी, असे आवाहन शासनाने केले आहे.
पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद इथल्या रुग्णाची कोविड-19 साठी केलेली चाचणी नकारात्मक आली आहे. त्यामुळे देशात आतापर्यंत कोविड-19 आजाराने एकही मृत्यू झाला नसल्याचे विशेष आरोग्य सचिवांनी स्पष्ट केले आहे.
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्षवर्धन कोविड-19 बद्दलच्या चालू परिस्थितीचा, केलेल्या कार्यवाहीचा आणि राज्यांच्या याबद्दलच्या तयारीचा आढावा सतत घेत आहेत. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाचे सचिव याबद्दलच्या परिस्थितीचा आढावा राज्य तसेच केंद्रशासित प्रदेशांबरोबर सतत घेत आहेत.
आरोग्य मंत्रालयाने जनतेला आवाहन केले आहे, की या आजाराचा प्रतिबंध करण्यासाठी सर्व उपाययोजनांचा, खोकतांना घेण्याच्या काळजीचा आणि हात वारंवार धुण्याच्या सवयीचा अवलंब करावा, तसेच गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे.