उमरगा (अमोल पाटील) :- भारतातच नव्हे तर सबंध जगामध्ये कोरोना विषाणूने मानव या प्राण्यालाच लक्ष केल्याने हजारो लाखो माणसे कीड्या-मुंगी प्रमाणे मरण पावली . हे सबंध जगाविरुद्ध आ वासून उभा टाकलेलं महाभयंकर संकट. साक्षात मरण समोर दिसत असतानाही जातीय ,धार्मिक ,दैवीक, कर्मकांडाच्या भावना संवेदना बोथट होत जाव्यात असे वाटते . किमान जाता जाता माणुस म्हणून काहीकाळ जगण्याची संधी आपणास मिळाल्यास आपण ती स्विकारणार की उन्मत्त होऊन धर्माधंतेची दुधारी तलवार उराशी कवटाळनार हा प्रत्येकाच्या जागृत विवेकाचा भाग आहे .
जागतिक स्तरावर पूर्वीपासूनच निरक्षर, गरीबी ,अप्रगत देशाची , पाटी आजही गळ्यात बांधलेल्या मटक्या सारखी लटकत आहे .भारतातील पारतंत्र्य ,अस्पृश्यता जरी नष्ट झाली असली तरी जागतिक स्तरावर आपल फारसं नावलौकिक झालेला नाही . अमेरिका, इटली ,चायना , रशीया सारख्या कित्येक बलाढय देशांनी या लहानशा विषाणू समोर गुडघे टेकले आहेत. लहान थोर आबालवृद्ध माणसे जिवाच्या आकांताने शेवटची घटका मोजत असताना कुठल्याच मंदिर, मस्जित, चर्च, गुरुद्वारातून कसलीही दैवीशक्ती बाहेर पडली नाही जी त्या विषाणूंचा नायनाट करेल .
आजही विज्ञान ,विवेक ,वास्तव या त्रिसूत्री वरच संबंध जगाने लक्ष केंद्रित केल्याचे दिसते . प्रत्येक जीव वाचवण्यासाठी केली जाणारी धडपड त्यासाठी उभारण्यात येणारी यंत्रणा आणि परिस्थितीचे भान ओळखून राखलेला संयम आपणास पहावयास मिळतो. किमान या संकटामुळे तरी सबंध जगात विषाणू विरुद्ध माणूस असा लढा उभारल्याचे चित्र दिसत आहे .
आज तरी जगाला फक्त अध्ययावत उपचार पद्धती, प्रगत तंत्रज्ञान, उत्कृष्ट सोई, सवोत्कृष्ट वैज्ञानिक, तज्ञ डॉक्टर, निर्भिड आरोग्य कर्मचारी ,कर्तव्यनिष्ठ सुरक्षा यंत्रणा यावरच माणसाचे भविष्य अवलंबून असल्याचे दिसते . आज पणत्या विझल्यानंतर तरी आपण आपली सदसद्विवेकबुद्धी जागृत ठेवून माणूस म्हणून माणसासाठी जगण्याची गरज वाटते.
—————-
मा. प्रधानमंत्री यांनी दोन्ही वेळेला केलेल्या आवाहना नंतर बाबा वाक्य प्रमाणम वृत्ती जोपासत अनेकांनी उत्सवी गोंधळ घातल्याचे चित्र अनेक ठिकाणी दिसले.देश अभूतपूर्व अशा आव्हानात्मक परिस्थितितून जात असताना विज्ञान तंत्रज्ञानावर स्वार होऊन हे सार घड़ल, घडवल गेल. हे क्लेशकारक आहे.समाजातील विवेकवादी लोकांनी आपल्या साइलेंट मेजॉरिटीचे रूपांतर लाऊड मेजॉरिटीत करणे आवश्यक आहे.
जनतेला या प्रसंगी भौतिक मदत व भावनिक मदत या दोहोंची गरज आहे. भावनिक आधार हा आपल्या आश्वासक,संयमित व विवेकी बोलण्यातून देता येणे शक्य आहे. शिवाय त्यासाठी प्रशिक्षित समुपदेशकांची मदत घेता येऊ शकते.
त्यामुळे राज्यकर्त्यानी आपला सदसदविवेक आणि राज्य घटना समोर ठेऊन प्राधान्यक्रम ठरवायला हवा.शासनाच्या प्रत्येक कृतीतून जनसामान्याना हे लोक कल्याणकारी राज्य असून आम्ही सर्वजण एक आहोत ,सुरक्षित आहोत ही भावना वाढीस लागली पाहिजे.
— सुधिर कांबळे (सामाजिक शैक्षणिक अभ्यासक )
—————
थाळ्या वाजवणे, दिवे लावणे हा शुद्ध मूर्खपणा आहे… आणि पंतप्रधान सारख्या व्यक्तीने याबाबत लोकांना आवाहन करणे हा पंतप्रधानाच्या पदाला न शोभणारे व त्यांच्या वैचारिक दिवाळखोरीचे लक्षण आहे…. एवढा पोरकट पंतप्रधान यापूर्वी झाला नाही…. या काळात लोकांना सरकारच्या सज्जते बाबत व लोकांनी घ्यायच्या काळजी बाबत बोलून लोकांचे मनोधैर्य वाढवणे व जबाबदारीची जाणीव करून देणे हि अपेक्षा असताना, आपले पंतप्रधान असे हास्यास्पद आवाहन करून, लोकांच्या मनातील भीतीचा गैरफायदा घेऊन स्वतःचा इव्हेंट साजरा करणे हे शोभत नाही
मरकज प्रकरणावरून मुस्लिम समाजा बाबत द्वेष निर्माण करण्याचा प्रकार म्हणजे मड्याच्या टाळूवरील लोणी खाण्याचा प्रकार आहे… या बाबत मुख्यंत्र्यांनी केलेले आवाहन हे कितीतरी पोक्त व समंजस वाटले…
मुस्लिम समाजातील पुरोगामी लोकांनी पुढे येऊन याबाबत ठोस भूमिका घेऊन पुढे यावे व इतरांनी त्यांना साथ देवून समाजात दुही पसरवणाऱ्या प्रवृतिविरुद्ध आवाज उठवला पाहिजे.
– अॅड. सयाजी शिंदे , ( आपलघर सचिव नळदुर्ग )
————
पोलीस व आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांच्या सन्मानार्थ थाळ्या वाजविणे व दिवे लावण्यापेक्षा त्यांना या संकट समयी सुरक्षा कवच व अत्याधुनिक उपकरणे पुरविणे व त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी शासनाने घ्यावे हाच त्यांचा सन्मान असेल .
करोना संसर्गामुळे समाजातील काही घटकानी धार्मिक तेढ निर्माण केली आहे, अशा संकट समयी इतके खालचे विचार या लोकांच्या मनात आलेच कसे, खोटे व्हिडीओ पोस्ट केल्याने सामाजिक वातावरण तात्पुरते दूषित झाले होते, परंतु भारतातील सर्वसाधारण जनता आजपर्यंत अशा लोकांना कधीही बळी पडली नाही व पडणार पण नाही सदर प्रकाराला मरकज चे आयोजक व त्यांना परवानगी देणारे पोलीस प्रशासन, गैरसमज पसरवनाऱ्या खोट्या बातम्या दाखवणाऱ्या वाहिन्या जबाबदार आहेत
टी व्ही पाहणं सोडलं तर आपल्या भागात सामाजिक सलोखा आहे आणि पुढेही राहणार आहेच यात दुमत नाही आणि सर्वजण मिळून करोनावर मात मिळविण्यात यशस्वी होऊ यात शंका नाही, प्रत्येक समाजाच्या अध्यक्षांची व नगरसेवकांची मिळून एक मध्यवर्ती दक्षता समिती स्थापन केली तर प्रशासनाला मदतच होईल.
— बी .एम. मुजावर (सेवानिवृत्त शिक्षक उमरगा )
———–
अवघें जगाला करोना व्हायरसच्या प्रकोपामुळे संकटाशी सामना करावा लागत आहे. तज्ज्ञ शास्त्रज्ञांनी यावर उपाय शोधून काढण्याचे प्रयत्न चालविले आहेत. आपल्या देशात ही वैद्यकीय यंत्रना विविध आघाड्यांवर करोना बाधितांना दुरुस्त करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. लाॅकडाऊन मध्ये आणि कर्फ्यू मध्ये विनाकारण लोकांनी घराबाहेर पडू नये म्हणून पोलिस,होमगार्ड,सैन्यदल कार्यरत आहे. मेडिकल ,अन्नधान्य आणि अन्य जीवनावश्यक वस्तूंचे वितरण व्यवस्थापन योग्य पध्दतीने व्हावे यासाठी राज्य सरकारे प्रयत्नशील आहेत.हे सारं होत असतानाच देशातील काहीं मंडळी सोशल मीडियाचा उपयोग करून आणि काहीं नेते मंडळी विविध विधाने करीत दुही निर्माण करीत आहेत. लातूर जिल्ह्यातील राठोडा येथे मुक्कामी हजार चे आसपास संख्येने उपस्थित राहून परिस्थिती धोक्यात आणली. उत्तरेत एका मुख्यमंत्र्यांनी रामनवमीला जमावबंदी १४४ कलम लागू असताना ही हजारोंच्या संख्येने सहभागी होऊन मिरवणूकीने रामलल्ला ची पूजा पार पाडली. तिकडे तबलीकी मुस्लिम दिल्लीमध्ये मरकस मज्जीदीत हजारोंच्या संख्येने जगातून आणि देशभरातून जमून धार्मिक कार्यक्रम केला. नांदेड मध्ये शीख धर्मियांच्या मंडळींनी बंदी काळात गुरुद्वारात हजारोंच्या गर्दीने गुरुबानीचे पठण केले. पोलीसांकडून गुरुद्वारा प्रबंधक आणि कमिटीवर गुन्हे दाखल करण्यात आले. उपरोक्त तीन धर्म समुदाय यातून सुटले.
साधारणपणे हे दोषी असतानां देशातील काहीं पक्ष आणि त्यांच्या समर्थक संघटना विशिष्ट पद्धतीने समाजमाध्यमाचा वापर करीत तसेच प्रभाव आणि मालकीच्या प्रसार प्रचार माध्यमाव्दारे या करोनाच्या आणिबाणीच्या काळात ही धार्मिक ध्रुवीकरण करण्याच्या कामी लागलेले आहेत अशी शंका येते. या अशा प्रसंगी विविध क्षेत्रात नकळतपणे बहुसंख्यांना आवडतील आणि सहज सोपे कार्यक्रम हाती देऊन अल्पसंख्य समाजावर धाक- दबाव – दडपण वाढविण्यासाठी प्रयत्न केला जात आहे असे दिसते.
देशावर जेव्हां संकट येते तेव्हां देश सर्व जाती धर्मासह प्रांतासह एकजूट असला पाहिजे आणि तसाच दिसलाही पाहिजे. भारतीय संविधाना प्रमाणे हा देश कुठल्याही एका धर्माचा कधी नव्हता आणि भविष्यात असणार ही नाही.
*विसरा सारे भेदाभेद एकच असती कुराण-वेद*
या महात्मा गांधींच्या घोषणेप्रमाणे संख्येने बहुल असलेल्या समुहाने जातीभेद ,धर्म आणि वर्ण-वर्ग भेद न करता गुण्यागोविंदाने नांदता आले पाहिजे. असे मला अहिंसेचा मंत्र देणारे शांतीचा संदेश देणारे भगवान महावीर जयंतीनिमित्त नम्रपणे आणि कळकळीने सांगावे वाटते.
— प्रा . किरण सगर (उपाध्यक्ष मराठवाडा साहित्य परिषद )
———–
देशातील नागरिक एकसंघ असल्याचे व कोरोनाच्या कामी कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढविणे यासाठी दिवे लावणे हा एकमेव पर्याय आहे असे मला वाटत नाही.दिवे लावण्याचा इव्हेंट म्हणजे केंद्र सरकारची ढिलाई,यंत्रणांतील त्रुटी आणि निष्काळजीपणा होय. देशात कोरोना उपचारासाठी पुरेशी साधन सामुग्रीचा अभाव,सुरक्षित साधनाची कमतरता,आर्थिक नियोजनाचा अभाव याकडे जाणीवपूर्वक लोकांचे लक्ष जाऊ नये त्यांचे लक्ष भलतीकडे वळविण्याचा हा खरा प्रयत्न आहे.
आपला देशात विविध जाती धर्मांचे लोक गुणा गोविंदाने राहातात.कोरोनाच्या पा२र्वभूमीवर दिल्लीमध्ये ‘तबलीग जमात’ यांच्या इस्तेमा पार पडला.या दरम्यान कोरोनामुळे संपूर्ण देश लॉकडाऊन असताना या जमातीतील काही लोक देशभर फिरले यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढला हे खरे आहे.यातील काहीनी वेगळीच कृत्य केली. धर्मप्रसारक म्हणायचे की रोगप्रसारक म्हणायचे असा प्रश्न निर्माण होणे सहाजिकच आहे.परंतु या प्रकरणाला हिंदू-मुस्लीम रंग देऊन धार्मिक ध्रुवीकरण करण्याचा काही मंडळी प्रयत्न करीत असल्याचे सोशेल मिडीयावरुन जाणवते.परंतु या गोष्टीचा संबंध धर्माशी न जोडता.आपला देश धर्मनिरपेक्ष आहे.अशावेळी धर्मापेक्षाही देशाचा कायदा मोठा असतो हे समजून घेणे महत्वाचे आहे.या एका घटनेमुळे समाजात धार्मिक तेढ निर्माण होणे हे खरे नाही.
धार्मिक ध्रुवीकरणाचे राजकारण करण्यापेक्षा धर्मनिरपेक्ष तत्वाचे पालन करुन एकात्मता निर्माण करुन जातीय सलोखा राखणे. देशातील सर्व नागरिकांनी केंद्रसरकार व राज्यसरकारच्या आदेशाचे पालन करुन संपूर्ण यंत्रणांना सहकार्य करुन त्यांचे मनोबल वाढविणे. कोरोनामुळे घाबरलेल्या जनतेला मानसिक दृष्टया सक्षम करुन प्रथमोपचार मिळवून देणे. कुठल्याही अंधश्रध्दा पसरविणाऱ्या अफवानवार विश्वास ठेवता कामा नये. विवेकाची साथ धरुन विज्ञाननिष्ठ बनावे.
आपण भारतीय आहोत. संविधान हा आमचा आधार आहे.तेव्हा देशावर आलेल्या कोरोना संकटाचा मुकाबला सर्वांनी मिळून करु या.कुठलाही भेदभाव नकरता माणूस म्हणून माणसाने माणसाला वाचवले पाहिजे हा माणूसकीचा धर्म पाळू या.द्वेष,मत्सर,कलह याला तिलांजली देवू या.सर्वांनी स्वयम् शिस्त व सुरक्षित अंतर ठेवून,शासन व प्रशासनाच्या आदेशाचे पालन करुन घरीच बसू या,मीच माझा रक्षक! या भावनेतून काम करुन जे प्रत्यक्ष कामात आहेत त्यांच्या प्रती कृतज्ञता बाळगू या.मी देशाच्या कामी येणार अशी भूमिका घेऊ आणि सहकार्य करु या!
—प्रा.डॉ.महेश मोटे , ( जिल्हा कार्याध्यक्ष महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मुलन समिती,उस्मानाबाद).