तासगाव प्रतिनिधी (राहुल कांबळे)
कोरोना पार्श्वभूमीवर लागू असणाऱ्या लॉकडाऊनमध्ये नागरिकांची आर्थिक कोंडी होऊ नये तसेच बँकांमधील गर्दी टाळण्यासाठी पोस्टामार्फत तसेच पोस्टमन मार्फत घरपोच लोकांना बँक खात्यावरील पैसे काढण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. सुविधेचा उपयोग करण्यात येत असून दिनांक २ ते २१ एप्रिल या कालावधीत जिल्ह्यातील १० हजार १५१ नागरिकांनी या योजनेचा लाभ घेऊन आधार एनेब्लड पेमेंट सिस्टीमद्वारे १ कोटी ४१ लाख ५८ हजार १३६ रुपये खात्यावरुन काढली आहे. अशी माहिती देऊन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी पोस्ट विभागाचे कौतुक केले आहे.
बँकामधून रक्कम काढण्यासाठी लोक गर्दी करत होते त्यातच प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत लाभार्थ्यांच्या खात्यावर रक्कम जमा होताच ती काढण्यासाठी बँकांमध्ये लोक रांगालावून गर्दी करत असल्याचे निदर्शनास येताच पोस्ट ऑफिसच्या इंडिया पोस्ट पेमेंट बँक मार्फत AEPS सुविधेद्वारे नागरिकांना स्वत:च्या कोणत्याही बँक खात्यावरील रक्कम गावातील पोस्ट ऑफिस तसेच पोस्टमन मार्फत पैसे काढण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
या योजनेचा लाभ घेणाऱ्या अश्विनी संतोष शिर्के, रा. संजयनगर, सांगली म्हणाल्या, माझ्या खात्यामध्ये प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेची रक्कम जनधन खात्यात रुपये 500/- जमा झाले होते. लॉकडाऊनमुळे सदरची रक्कम मला काढता येत नव्हती. पैशांची अत्यंत आवश्यकता होती. परंतु पैसे मिळत नव्हते, त्यावेळी मला माहिती मिळाली की पोस्टाद्वारे पोस्टमन पैसे घरपोच करतात. माझे पैसे बँक ऑफ इंडियामध्ये पैसे जमा झाले होते. पोस्टमनकडे मी तशी मागणी केल्यानंतर मला पोस्टाद्वारे घरपोच पैसे मिळाले. या योजनेचा इतरांनीही लाभ घ्यावा. शासन जी मदत करीत आहे त्याचा सर्वांना फायदा होत आहे.
या योजनेचा यासाठी बँक खात्याला आधारकार्ड सिडींग असणे आवश्यक आहे. सदर नागरिक पोस्ट पेमेंट बँकचा ग्राहक असला किंवा नसला तरी त्याला त्याचा लाभ घेता येईल. पैसे काढण्यासाठी फक्त आधार आणि मोबाईल क्रमांक आवश्यक आहे. ग्राहकांचा फक्त आधार क्रमांक व बोटांच्या ठशांचा वापर करुन ते पैसे काढू शकतात. गावातील पोस्टमन त्याच्याजवळ उपलब्ध असणाऱ्या रक्कमेनुसार ही सुविधा देऊ शकेल त्यासाठी फोनवरुन त्यांना संपर्क करुन त्यांना संपर्क करुन त्यांना आपल्या घरी बोलवू शकता किंवा शक्य असल्यास पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन व्यवहार करु शकता.