तासगाव (राहुल कांबळे)
सांगली जिल्ह्यामध्ये अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत प्राधान्य कुटुंब योजनेचे ३ लाख ६२ हजार ३३३ व अंत्योदय योजनेचे ३२ हजार ०१४ असे एकूण ३ लाख ९४ हजार ३४७ शिधापत्रिकाधारक आहेत. यामध्ये एप्रिल २०२९ साठी ३ लाख ९१ हजार १२१ म्हणजेच ९९ टक्के शिधापत्रिकाधारकांना ९३१६ मे. टन धान्याचे वाटप करणेत आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.
जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी म्हणाले, कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासनाने प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजने अंतर्गत माहे एप्रिल ते जून २०२० या कालावधीसाठी अन्नसुरक्षा योजने अंतर्गत येणाऱ्या सर्व शिधापत्रिकेमधील प्रत्येक व्यक्तीस ५ किलो तांदूळ मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. सदर योजनेअंतर्गत आज अखेर एप्रिल २०२० साठी ८ हजार ५५१ मे. टन तांदूळ वाटप करणेत आलेला असून त्याचा ३ लाख ७५ हजार २५६ शिधापत्रिकांमधील १७ लाख १० हजार २०० इतक्या व्यक्तींनी म्हणजेच ९५.१६ % इतक्या लाभार्थ्यांनी लाभ घेतला आहे. अन्नसुरक्षा योजना व प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजने अंतर्गत सर्व धान्य POS मशीनेद्वारे वाटप करणेत येत आहे.
त्याचप्रमाणे कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अन्नसुरक्षा योजनेत समाविष्ठ न झालेल्या APL केशरी शिधापत्रिकाधारकांना माहे मे व जून २०२० या कालावधीसाठी प्रतिमाह प्रत्येक व्यक्तीला ३ किलो गहू रु. ८/- प्रति किलो दराने व २ किलो तांदूळ रु. १२/- प्रति किलो दराने वाटप करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. केशरी शिधापत्रिका धारकांना माहे मे व जून या दोन महिन्यासाठी धान्य वाटप करण्याचा निर्णय झालेला आहे. तथापी केशरी शिधापत्रिकाधारकांना अन्य कोणत्याही योजनेमधून धान्य मिळत नसलेने संचारबंदीच्या काळामध्ये त्यांची अन्नधान्याची गरज लक्षात घेता माहे मे २०२० साठीचे धान्याचे वाटप एप्रिल महिन्यात सुरु करण्यात आले आहे. सदर योजनेमध्ये जिल्ह्यामध्ये सुमारे २ लाख १८ हजार ५३४ इतक्या शिधापत्रिका समाविष्ठ होत असून त्याचा लाभ सुमारे १० लाख २६ हजार ६१९ इतक्या लोकांना होणार आहे. सदर योजनेचा दि. २६ एप्रिल २०२० अखेर ७१ हजार ८३८ शिधापत्रिकांमधील ३ लाख ४७ हजार १६० इतक्या लोकांनी लाभ घेतलेला असून सांगली जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये ४० ते ५५ % व शहरी भागामध्ये १८ ते २२ % इतके वाटप लाभार्थ्यांना करण्यात आले असल्याचेही जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी असे सांगून APL केशरी शिधापत्रिका धारकांना वाटप करणेसाठी आवश्यक असणारे अन्नधान्य सर्व ग्रामीण व शहरी रास्तभाव दुकानांमध्ये पोहोच झालेले असून त्याचे वाटप सुरु आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी सदर धान्याचा लवकरात लवकर लाभ घेऊन प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.