आटपाडी पोलिसांनी उंबरगाव चेक नाक्यावर पकडला गुटख्याचा टेम्पो

0
48

 आटपाडी दि.12 (प्रतिनिधी):

आटपाडी पोलिसांनी सांगली-सोलापूर जिल्हा सरहद्दीच्या उंबरगाव चेक पोस्ट नाक्यावर सोलापूरहून चिपळूणला जाणारा बादशहा गुटख्याची 29 पोती असलेला आयशर टेम्पो पकडून कारवाई केली. 7 मे रोजी पोलिसांनी अशीच कारवाई केली होती. एकाच आठवड्यात ही दुसरी कारवाई आहे.
सोमवार  दि.11 मे रोजी पहाटे 5.45 वाजता सांगली -सोलापूर जिल्हा सरहद्दीतील आटपाडी पोलीस ठाण्याच्या अखत्यारीतील उंबरगाव चेक पोस्ट नाक्यावरील पथकाने सोलापूरहुन चिपळूणला जाणारा एमएच 12 एचडी 5284 या क्रमांकाचा आयशर टेम्पो अडविला. काचेवर अत्यावश्यक सेवा, पशुखाद्य असे कागदी स्टिकर चिटकवला होता, परंतु अधिकृत परवाना काचेवर नव्हता. बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी तपासणी केली. त्यांना पशुखाद्यऐवजी गुटख्याची पोती आढळून आली. 14 लाख रुपये किमतीच्या बादशाह गुटख्याची 29 पोती होती.
पोलीस पथकाने वाहन चालक खाजेभाई लाडलेसाहेब (वय 60, लोहगाव, पुणे )व बाबू मोमीन लाडलेसाहेब (वय 60 ,इंदिरानगर, मंद्रूप, सोलापूर) यांच्यासह आयशर टेम्पो व गुटख्याची पोती ताब्यात घेतली आहेत. या घटनेची माहिती  सांगली जिल्हा अन्न व सुरक्षा अधिकारी यांना कळवून आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
 आटपाडी ठाण्याचे पोलीस निरीक्षक बजरंग कांबळे,सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, पोलीस उपनिरीक्षक अजित पाटील, उपनिरीक्षक कनकवाडी, पोलीस हवालदार नंदकुमार पवार, पोलीस नाईक रामचंद्र खाडे, पोलीस हवलदार दिग्विजय कराळे, परशराम देशमुखे ,अतुल माने, नितीन मोरे यांच्या पथकाने ही कारवाई केली. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अजित पाटील करीत आहेत. आटपाडी पोलिसांनी आठवड्याभरात दोन वेळा अशी कारवाई करून 48 लाख रुपयांचा गुटख्यासह मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here