उस्मानाबाद (प्रतिनिधी) उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या दैनंदिन कामकाजाची सुरुवात आता राष्ट्रगीताने होणार आहे. यासंबंधीचे आदेश जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाने तातडीने जारी करावेत असे आदेश जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा स्मिता कांबळे यांनी दिले आहेत.
जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृह मध्ये राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेस अध्यक्षा अस्मिता कांबळे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी पी. एम.राऊत,पाणी पुरवठा व स्वच्छता मिशनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनंत कुंभार,ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन दाताळ, जलसंधारण विभागाचे वि. वि. जोशी आणि समाज कल्याण अधिकारी चौगुले यांची यावेळी उपस्थिती होती. राजे उमाजी नाईक यांनी क्रांतिकारकांच्या भूमिकेतून दिलेले योगदान महत्त्वाचे आहे. त्याचप्रमाणे सामान्य जनतेसाठी काम करणाऱ्या जिल्हा परिषदेच्या सर्व अधिकारी- कर्मचाऱ्यांनी देखील ठरवून दिलेल्या वेळेचे बंधन पाळणे आवश्यक असल्याचे कांबळे यांनी नमूद केले.
सकाळी 9:45 ही कर्मचारी अधिकाऱ्यांच्या कार्यालयीन कामकाजाची वेळ आहे. आपण स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करत आहोत. त्या अनुषंगाने दररोज सकाळी 10:00 वाजता यशवंतराव चव्हाण सभागृह मध्ये राष्ट्रगीताने जिल्हा परिषदेच्या दैनंदिन कामकाजाची सुरुवात व्हावी. यासंबंधी अंमलबजावणी व्हावी याकरिता सामान्य प्रशासन विभागाने सर्व विभागाला आदेश द्यावेत अशा सूचना अध्यक्ष अस्मिता कांबळे यांनी यावेळी दिले.
राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त यशवंतराव चव्हाण सभागृहांमध्ये आयोजित कार्यक्रमाला अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.