सलगरा,दि.७(प्रतिक भोसले)
तुळजापूर तालुक्यातील सलगरा (दि.) परिसरातील किलज, गंधोरा, वडगाव (देव) आणि वाणेगाव आदी गावांमध्ये दि.६ सप्टेंबर रोजी बैलपोळा सण उत्साहात साजरा करण्यात आला. शेती व्यवसायात वर्षभर मदत करणाऱ्या सर्जा राजाच्या सन्मानाचा दिवस म्हणून बैलपोळा साजरा करतात. शेतकऱ्यांचा सखा, सोबती, प्रत्येक सुख दुःखात सहभागी असणारा, धन्यासाठी वर्षभर राबणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पोळा सण साजरा केला जातो. श्रावण अमावस्येला पोळा साजरा करण्याची पद्धत महाराष्ट्रात आहे.
बैल पोळ्याच्या आदल्या दिवशी बैलांना आमंत्रण (आवतण) दिले जाते. बैलाला अंघोळ घातली जाते, बैलाचे खांदे हळद, तेल, तूपाने शेखतात, त्याला झूल घातली जाते, त्यांच्या अंगावर विविध रंगाचे ठिपके उठवले जातात, नक्षीकाम केलेली झूल, कपाळावर बाशींग आणि गळ्यात कवड्याच्या-घुंगराच्या माळा घातल्या जातात. नवीन वेसण, कासरा घातला जातो, पुरणपोळीचा व सुग्रास अन्नाचा नैव्येद्य दाखवला जातो. बैल पोळ्याच्या सणाला पंचक्रोशीतील शेतकरी आणि गावकऱ्यांमध्ये एक वेगळाच उत्साह बघायला मिळाला.