तासगाव शहरासह तालुका,आज बंद
आठवडा बाजार ब़ंद ठेवून व्यापारी व भाजीपाला विक्रेते यांनी सहकार्य करण्याचे आवाहन
हजारो मराठा बांधव रॅलीमध्ये सहभागी होणार
जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथील मराठा बांधवांवरील लाठीमार हल्ल्याचा निषेध
तासगाव ( राहुल कांबळे)
जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी या गावात मराठा आरक्षणासाठी उपोषणास बसलेल्या आंदोलनकर्त्यांवर पोलिसांनी अमानुष लाठीहल्ला चढवला. या निर्दयी हल्ल्याचे पडसाद राज्यभरात उमटत आहेत. या हल्ल्याचा निषेध म्हणून आज (गुरुवार) तासगाव शहरासह तालुका बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच गुरुवारी तासगाव येथे भरणारा आठवडा बाजारही बंद राहणार आहे, अशी माहिती मराठा बांधवांच्या वतीने देण्यात आली.
तासगाव येथील समृद्धी मल्टीपर्पज हॉल येथे आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी या गावात मनोज जरांगे – पाटील यांनी गेल्या काही दिवसांपासून मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी आमरण उपोषणास सुरुवात केली आहे. या उपोषणास जालना जिल्ह्यासह राज्यभरातून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. हा प्रतिसाद पाहून सरकार हादरले आहे.
त्यामुळे येनकेन प्रकारे हे आंदोलन चिरडून टाकण्यासाठी सरकारने उचल खाल्ली आहे. त्याचाच भाग म्हणून चार दिवसांपूर्वी या आंदोलनकर्त्यांवर जालना पोलिसांकरवी लाठीहल्ला करण्यात आला. या हल्ल्यात शेकडो आंदोलनकर्ते गंभीर जखमी झाले आहेत. या निर्दयी हल्ल्यामुळे राज्यभरात संतप्त पडसाद उमटले. या हल्ल्यानंतर मराठा समाजाच्या आंदोलनाची ठिणगी राज्यभर पोहोचली आहे.
राज्यभर रास्ता रोको, बंद, आमरण उपोषणाची मालिका सुरू झाली आहे. याचाच भाग म्हणून उद्या तासगाव तालुका बंद ठेवण्यात येणार आहे. अत्यावश्यक सेवा वगळून सर्व आस्थापना बंद ठेवण्याचा निर्णय मराठी बांधवांनी घेतला आहे. मराठा बांधवांना कुणबी या कॅटेगरीतून आरक्षण द्यावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. सर्व मराठा बांधवांनी उद्याचा बंद यशस्वी करून सरकारला आपली ताकद दाखवून द्यावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले. बंदच्या पार्श्वभूमीवर उद्या तासगाव येथे होणारा आठवडा बाजारही रद्द करण्यात आला आहे. शिवाय शाळा महाविद्यालयाला उद्या गोकुळाष्टमीची सुट्टी असली तरी विद्यार्थ्यांनी ज्यादा क्लासेसच्या निमित्ताने तासगावला येऊ नये. जेणेकरून विद्यार्थ्यांचे हाल होणार नाही, असे आवाहन मराठा बांधवांनी केले आहे.
गुरुवारी आज सकाळी नऊ वाजता जिजाऊ चौकात सर्व मराठा बांधव एकत्रित येणार आहेत. त्यानंतर रॅलीने सर्व मराठा बांधव एसटी स्टँड चौकाकडे जाणार आहेत. तेथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून एसटी स्टँड चौकात रास्ता रोको करण्यात येणार आहे, अशीही माहिती यावेळी देण्यात आली.
यावेळी ऍड. कृष्णा पाटील, अजय पाटील,अमोल शिंदे, अविनाश पाटील, महादेव पाटील, बाबुराव जाधव, सुनील जाधव, प्रदीप थोरबोले, सचिन चव्हाण, बाळासाहेब सावंत,अभिजीत पवार, शरद शेळके, शशिकांत डांगे, अभिजीत पाटील, ज्योतीराम जाधव,खंडू कदम, सुदर्शन पवार, बाबुराव जाधव, पांडुरंग जाधव, लालासाहेब पाटील ,अमोल कदम,यांच्यासह मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
…तर आमदार – खासदारांच्या घरावर मोर्चा काढू : अमोल शिंदे यांचा इशारा
राज्यातील मराठा आमदार खासदारांनी मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी अपेक्षित प्रयत्न केले नाहीत. राज्यात मराठा आमदार, खासदारांची संख्या अधिक असतानाही आजपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही, ही शोकांतिका आहे. जर या पुढील काळात लोकप्रतिनिधींनी मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले नाहीत तर त्यांच्या घरांवर मोर्चा काढून आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा अमोल शिंदे यांनी यावेळी पत्रकार परिषदेत दिला आहे.