धाराशिव | प्रतिनिधी
येडशी अभयारण्यात नुकताच टिपेश्वर अभयारण्यातून स्थलांतरित झालेल्या वाघाने धुमाकूळ घातलेला असतानाच, आता धाराशिव जिल्ह्यात दुसऱ्या वाघाच्या उपस्थितीची जोरदार चर्चा सुरू आहे. तुळजापूर तालुक्यातील नंदगाव आणि धाराशिव तालुक्यातील सांगवी परिसरात दिसलेला वाघ हा आधीच ओळखलेला वाघ आहे की दुसरा नवा वाघ आहे, याबाबत वनविभागात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.
वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, सांगवी आणि नंदगाव परिसरात दिसलेला वाघ हा टिपेश्वर येथून आलेलाच आहे. मात्र, बार्शी वनविभागाचे अधिकारी म्हणतात की टिपेश्वरचा वाघ सध्या बार्शी तालुक्यातच आहे. त्यामुळे धाराशिव जिल्ह्यात दिसलेला वाघ हा दुसरा असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
वनविभाग माहिती लपवत आहे का?
येडशी अभयारण्यात स्थायिक झालेला वाघ, अचानक तुळजापूर तालुक्यात कसा गेला, हा मोठा प्रश्न आहे. कारण, यामध्ये नागरी वस्त्या, ग्रामीण भाग तसेच दोन राष्ट्रीय महामार्ग पार करावे लागतात. ही हालचाल शक्य नसल्याने नागरिकांत संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे वनविभाग माहिती लपवत असल्याचा आरोप देखील होत आहे. नागरिकांनी वनविभागाने यासंदर्भात अधिकृत आणि स्पष्ट माहिती देण्याची मागणी केली आहे.
प्रत्यक्षदर्शी व्यक्तीची तब्येत बिघडली
१६ जून रोजी सांगवी शिवारात वाघाचे प्रत्यक्ष दर्शन झाल्याचे काही नागरिकांनी सांगितले. भक्तराज दहीभाते या नागरिकाने वाघ पाहिल्यानंतर प्रचंड घाबराटीतून त्यांची तब्येत बिघडली असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे वनविभागासोबतच आरोग्य विभागानेही समुपदेशन आणि उपचार करण्याची गरज आहे, अशी मागणी होत आहे.
वाघ जागजी परिसरात शिरला, शिकार केल्याची शंका
वाघ सांगवी परिसरातून रेल्वे लाइन ओलांडून जागजी भागात शिरल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे. तेथील काही लोकांनी त्या परिसरात वाघाने एका प्राण्याची शिकार केल्याचेही सांगितले. या वाघाची वस्तीतील हालचाल पाहता तो मॅनहिटर असण्याची शंका व्यक्त केली जात असून, संभाव्य धोका लक्षात घेता वनविभागाने तातडीने योग्य त्या उपाययोजना करण्याची गरज आहे.
सामाजिक कार्यकर्त्यांचा आंदोलनाचा इशारा
शेतीचा हंगाम सुरू असून शेतकरी रात्री शेतात मुक्काम करत आहेत. अशा वेळी वाघ मोकाट फिरत असल्यामुळे त्याच्या हल्ल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे वनविभागाने त्वरीत वाघाचा बंदोबस्त करावा, अन्यथा मागील काळात स्थगित केलेले आंदोलन कोणतीही पूर्वसूचना न देता पुन्हा सुरू करण्यात येईल, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते मनोज जाधव यांनी दिला आहे.
धाराशिव जिल्ह्यात वाघाच्या वाढत्या हालचालींमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वनविभागाने पारदर्शकता ठेवून जनतेच्या सुरक्षेसाठी तातडीने ठोस पावले उचलावीत, हीच वेळेची गरज आहे.
- आंदोलनाची स्टंटबाजी, कालच तयार होते पत्र तरीही आज आंदोलनाचा हट्ट !पहिल्याच दिवशी संपले महिलांचे साखळी उपोषण
- उल्फा/दुधना नदीवरील पुल धोकादायक! लोखंडी कठडे महापुरात वाहून गेले, अपघात होण्याची शक्यता
- सोन्नेवाडीतील अकरा वर्षीय मुलाचा तलावात बुडून मृत्यू
- कामांना स्थगिती मिळाली, यात विरोधकांना ‘आसुरी आनंद’ – भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राहुल काकडे
- मोटारसायकल चोर टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात – चार चोरीच्या मोटारसायकलींसह दोन आरोपी पकडले
