Home Blog Page 9

गणेश विसर्जन मार्गाची जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी

आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे दिले निर्देश

 धाराशिव दि.२० ऑगस्ट (प्रतिनिधी) येत्या २७ ऑगस्ट रोजी गणरायाचे आगमन होणार आहे.धाराशिव शहरात विविध गणेश मंडळाकडून गणेश मूर्तीची विविध ठिकाणी स्थापना करण्यात येणार आहे.गणेश उत्सवादरम्यान आनंदाचे व भक्तिमय वातावरण राहणार आहे. गणेशोत्सवादरम्यान गणेश मंडळांना तसेच भाविकांना अडचणीचा सामना करण्याची वेळ येऊ नये,यासाठी संबंधित विभागांनी आतापासूनच नियोजन करून आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात.असे निर्देश जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी संबंधित विभागांना दिले.

जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार व पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना यांनी आज धाराशिव शहरातील गणेश स्थापना व विसर्जन मार्गाची पाहणी केली. गणेश मूर्त्यांचे विसर्जन करण्यात येणाऱ्या हातलाई देवी मंदिर परिसरातील तलाव व समता चौकातील सार्वजनिक विहिरीला भेट देऊन पाहणी केली.यावेळी उपविभागीय अधिकारी ओंकार देशमुख, पोलीस उपअधीक्षक सुरेशकुमार राऊत, तहसीलदार डॉ.मृणाल जाधव,पोलीस निरीक्षक कुमार दराडे व संबंधित विभागाचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

श्री.पुजार म्हणाले की,विविध गणेश मंडळाकडून ज्या ज्या ठिकाणी गणरायाची स्थापना होणार आहे,त्या ठिकाणी गणेश मंडळाला कोणत्याही अडचणी येणार नाही याकडे लक्ष द्यावे.गणरायाची स्थापना होणाऱ्या ठिकाणी स्वच्छता असावी.गणेश मंडळांना व मिरवणुकीला अडथळा येणारे व अतिक्रमण केलेले असल्यास ते तातडीने हटविण्यात यावे.आवश्यक त्या ठिकाणी वाहन पार्किंगची व्यवस्था करण्यात यावी. त्यामुळे दर्शनाला येणाऱ्या भाविकांची गैरसोय होणार नाही व रस्त्यांमध्ये अडथळा येणार नाही याकडे लक्ष द्यावे.गणेश मंडळांनी पुरेशी प्रकाश व्यवस्था करावी. वीज वितरण विभागाने विद्युत तारा ह्या व्यवस्थित असल्याची खात्री करून आवश्यक त्या ठिकाणी दुरुस्ती करावी. गणेश मंडळांनी भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची आणि कचरा टाकण्यासाठी कचरापेटीची व्यवस्था करावी.असे त्यांनी सांगितले.

ज्या मार्गाने गणेश विसर्जनाची मिरवणूक निघणार आहे त्या मार्गावरील खड्डे बुजवण्याची कामे तातडीने सुरू करावी असे सांगून श्री.पुजार म्हणाले की,विसर्जन मिरवणुकीला अडथळा ठरणारी रस्त्यावरील अतिक्रमणे तातडीने हटविण्यात यावी.चौका चौकात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था गणेश मंडळांनी तसेच सेवाभावी संस्थांनी करावी.मिरवणुकीमध्ये कोणीही मद्यप्राशन करून असणार नाही याकडे विशेष लक्ष द्यावे.हातलाई देवी मंदिर परिसरातील तलाव येथे गणेश मूर्तींचे विसर्जन होणार असल्यामुळे मोठ्या मूर्तींची विसर्जन करण्याची करण्यासाठी क्रेनची व्यवस्था करावी.पोलिसांनी मिरवणूक व विसर्जन ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवावा. विसर्जन ठिकाणी घरगुती मूर्तींना एकत्र करून नगरपालिका व पोलीस विभागाने गणरायांचे विसर्जन करावे.तलावात जीवनरक्षक तैनात करावे.कोणालाही पाण्यात उतरू देऊ नये.कोणीही नशा करून पाण्यात उतरणार असेल तर त्याचा त्वरित बंदोबस्त करावा.असे ते म्हणाले.

विसर्जन ठिकाणी येणाऱ्या गणरायाच्या मूर्ती येण्याचा मार्ग व गणेश मंडळांना गणेश विसर्जन केल्यानंतर जाण्याचा मार्ग निश्चित करावा.निर्माल्य कोणीही तलावात टाकणार नाही,यासाठी तलाव व विहीर परिसरात कृत्रिम हौद तयार करावे,म्हणजे पूजेचे साहित्य व निर्माल्य एकाच ठिकाणी जमा करता येईल असे श्री पुजार यांनी यावेळी सांगितले.

गणेश विसर्जनासाठी ज्या मार्गाने गणरायाची मिरवणूक जाणार आहे,त्या छत्रपती शिवाजी महाराज चौक, बाबासाहेब आंबेडकर चौक,संत गाडगेबाबा चौक,जिल्हाधिकारी निवासस्थान,काळा मारुती चौक,लेडीज क्लब व बार्शी नाका जिजाऊ चौक तेथून पुढे बार्शी मार्गावरील हातलाई देवी तलाव आणि परत समता कॉलोनी या मार्गाची जिल्हाधिकारी श्री.पुजार व पोलीस अधीक्षक शफकत आमना यांनी पाहणी करून आवश्यक त्या सूचना संबंधित विभागाच्या उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिल्या.

तुळजापुरात मराठा आरक्षण रथयात्रेचे उत्स्फूर्त स्वागत

तुळजाभवानीच्या चरणी नतमस्तक होऊन समाज एकजुटीचा संकल्प

तुळजापूर –
मराठा समाजाच्या न्याय्य आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभर काढण्यात आलेल्या मराठा आरक्षण रथयात्रेचा आज तुळजापूर येथे उत्स्फूर्त स्वागत सोहळा पार पडला. मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक श्री. रामभाऊ गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेली ही रथयात्रा पंढरपूर व सोलापूर मार्गे  श्री क्षेत्र तुळजापुरात दाखल झाली.

 श्री तुळजाभवानी देवीच्या चरणी नतमस्तक होऊन रथयात्रेच्या यशस्वीतेसाठी प्रार्थना करण्यात आली. मंदिर परिसरात हर हर महादेव, जय भवानी, जय शिवराय च्या घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले. समाजबांधव, कार्यकर्ते व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून रथयात्रेचे स्वागत केले.

प्रसार माध्यमांशी बोलताना श्री. रामभाऊ गायकवाड म्हणाले, “मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी २०१८ साली आम्ही आझाद मैदानावर लढा दिला. आज पुन्हा एकदा सरकारला जाग आणण्यासाठी रथयात्रेच्या माध्यमातून आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत. आरक्षण हा आमचा हक्क आहे, तो मिळेपर्यंत ही लढाई थांबणार नाही.”

तुळजापूरनंतर रथयात्रा लातूरकडे मार्गस्थ झाली असून, प्रत्येक ठिकाणी होणाऱ्या स्वागत व सभा यामुळे जनतेमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह पाहायला मिळत आहे. समाजातील तरुणाई, महिला व ज्येष्ठ नागरिक यांचा सक्रिय सहभाग रथयात्रेला बळ देत असून, राज्यव्यापी ही चळवळ आता निर्णायक टप्प्याकडे वाटचाल करत आहे.

धाराशिव जिल्ह्यात चोरीच्या तीन घटना


धाराशिव दि. 20 : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत चोरीच्या मालमत्तेच्या तीन वेगवेगळ्या घटना घडल्या असून, तब्बल साडेचार लाख रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लंपास केला आहे.

ढोकी पोलीस ठाण्यातील घटना :
फिर्यादी मंगेश भारत मुळे (वय 32, रा. तांबरी विभाग धाराशिव) यांच्या किणी येथील शेतामधील वरद विनायक ॲग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनी लि. च्या वेअरहाऊस शेटरमधील 70 हरभऱ्याचे कट्टे, अंदाजे 2 लाख 10 हजार रुपये किंमतीचा माल दि. 16 ऑगस्ट रोजी रात्री 8 ते दि. 17 ऑगस्ट सकाळी 9.15 वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. या प्रकरणी ढोकी पोलिसांनी भा.न्या.सं. कलम 305(ए), 334(1) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

कळंब पोलीस ठाण्यातील घटना:
फिर्यादी बिभीषण पांडुरंग कोल्हे (वय 38, रा. हावरगाव ता. कळंब) यांच्या शेत गट नं. 139 व 145 मधून तसेच इतर 11 शेतकऱ्यांच्या शेतातून केबल वायर, मोटार असे मिळून 53 हजार 80 रुपयांचे साहित्य दि. 11 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 6 ते दि. 12 ऑगस्ट रोजी रात्री 10 या वेळेत अज्ञात चोरट्यांनी लंपास केले. या घटनेवरून कळंब पोलिसांनी भा.न्या.सं. कलम 303(2) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

ढोकी पोलीस ठाण्यातील घटना :
फिर्यादी प्रियांका दत्तात्रय ढवरे (वय 30, रा. दाउतपूर, ह.मु. समता नगर धाराशिव) या माहेरी कोळेकरवाडी येथे वास्तव्याला असताना दि. 13 ऑगस्ट रोजी रात्री 11 ते दि. 14 ऑगस्ट रोजी सकाळी 6 या वेळेत घराचा दरवाजा उघडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने (94 ग्रॅम) व रोख 3 हजार रुपये, असा मिळून 2 लाख 81 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. या प्रकरणीही ढोकी पोलिसांनी भा.न्या.सं. कलम 305(ए) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

या तिन्ही घटनांनंतर जिल्ह्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांनी चोरट्यांचा माग काढण्यासाठी तपास सुरू केला आहे.

महाराष्ट्रात गणेशोत्सव ‘राज्य महोत्सव’ म्हणून साजरा होणार,उत्कृष्ट सार्वजनिक मंडळांसाठी तालुका ते राज्य स्तरावर स्पर्धा, १.५० कोटींची पारितोषिके

मुंबई, २० ऑगस्ट २०२५: महाराष्ट्र शासनाने गणेशोत्सवाला ‘राज्य महोत्सव’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला असून, त्याअंतर्गत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी उत्कृष्टता स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागाने २० ऑगस्ट २०२५ रोजी जारी केलेल्या शासन निर्णय क्रमांक पुलदे-२०२५/प्र.क्र.११५/सां.का.२ नुसार, ही स्पर्धा तालुका, जिल्हा आणि राज्य स्तरावर राबवली जाईल. पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या वतीने आयोजित होणाऱ्या या स्पर्धेत सुमारे ४६८ मंडळांना १.५० कोटी रुपयांची पारितोषिके वितरित केली जाणार आहेत. यापूर्वी २० जून २०२५ रोजी जारी शासन निर्णय क्रमांक पुलदे-२०२५/प्र.क्र.७४ नुसार स्पर्धेची रूपरेषा ठरवली गेली होती, जी आता तालुका स्तरापर्यंत विस्तारित करण्यात आली आहे.

या स्पर्धेचा उद्देश गणेशोत्सवाच्या माध्यमातून सांस्कृतिक जतन, सामाजिक कार्य, पर्यावरण संरक्षण आणि नवीनता यांना प्रोत्साहन देणे आहे. लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या या परंपरेला नवे रूप देण्यासाठी शासनाने ही योजना आखली आहे. स्पर्धेचे निकष, नियम आणि पारितोषिके याबाबत सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे.

स्पर्धेचे निकष: १०० गुणांची पारदर्शक मूल्यमापन पद्धती

स्पर्धेत सहभागी मंडळांचे मूल्यमापन १०० गुणांच्या निकषांवर आधारित असेल. हे निकष सांस्कृतिक, सामाजिक आणि पर्यावरणीय पैलूंवर आधारित आहेत. प्रत्येक मंडळाने वर्षभरात केलेल्या कार्याचा कालावधी मागील वर्षाच्या अनंत चतुर्दशीपासून चालू वर्षाच्या अनंत चतुर्दशीपर्यंतचा असेल. मुख्य निकष खालीलप्रमाणे:

  1. कलांचे जतन व संवर्धन (२० गुण): गायन, वादन, नृत्य, नाट्य, दशावतार, पोवाडा, लावणी, झाडीपट्टी, खंडगम्मत, विहिगायन, चित्रकला, चित्रपट, शिल्पकला, मूर्तीकला इत्यादी विविध कलांवर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम, स्पर्धा आयोजन आणि लुप्त होणाऱ्या कलांचे संवर्धन.
  2. संस्कृतीचे जतन व संवर्धन (२० गुण): दुर्मीळ नाणी, शस्त्र, भांडी इत्यादी विषयक प्रदर्शने, कवी संमेलन, पुस्तक मेळा, अनुभवचन, वक्तृत्व, निबंध लेखन स्पर्धा इत्यादी साहित्य विषयक उपक्रम, लुप्त होणाऱ्या कलाविष्कारांचे संवर्धन, पारंपारिक व देशी खेळांच्या स्पर्धा, मंडळाचे व संस्थांचे ग्रंथालय इत्यादी.
  3. निसर्ग आणि सार्वजनिक संपत्तीचे जतन व संवर्धन (२० गुण): वने, निसर्ग, गडकिल्ले, राष्ट्रीय व राज्य स्मारके यांचे जतन-संवर्धन, जनजागृती, स्वच्छता, पर्यटन व सामाजिक-आर्थिक सक्षमीकरणासाठी केलेले जनजागृतीपर कार्य.
  4. सामाजिक कार्य (२० गुण): महिला, ज्येष्ठ नागरिक, वंचित घटक, दिव्यांग इत्यादी समाजघटकांसाठी आयोजित उपक्रम. शासनाच्या विविध लोकोपयोगी योजना (उदा. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव) वर आधारित उपक्रम. आधुनिक तंत्रज्ञान, गाव दत्तक योजना, आरोग्य, शिक्षण, क्रीडा, कृषी, विज्ञान, समाज सुधारणा विषयक उपक्रम, अंधश्रद्धा व अनिष्ट रूढींवर प्रबोधन.
  5. गणेशोत्सव आयोजनातील नवीनता (२० गुण): पर्यावरणपूरक मूर्ती, सजावट व विद्युत रोषणाई, ध्वनी-वायू-जल प्रदूषण विरहित परिसर, उत्सव काळात गणेशभक्तांसाठी प्राथमिक सुविधा (प्रथमोपचार पेटी, पाणी इत्यादी), ‘एक गाव एक गणपती’ सारखे नवीन उपक्रम, मंडळाच्या कार्यकारिणीत महिलांची संख्या एकूण पदांच्या किमान ३०% असणे इत्यादी.

एकूण १०० गुणांवर मूल्यमापन होईल, आणि समान गुण मिळाल्यास ज्या मंडळाच्या स्थापनेला जास्त वर्षे झाली आहेत त्याला प्राधान्य दिले जाईल.

स्पर्धेचे नियम: पात्रता, अर्ज प्रक्रिया आणि प्रतिबंध

स्पर्धेत भाग घेण्यासाठी काही कठोर नियम लागू आहेत, जेणेकरून पारदर्शकता आणि न्याय राहील:

  • पात्रता: केवळ नोंदणीकृत संस्था किंवा परवानाधारक मंडळे (धर्मादाय आयुक्त, स्थानिक पोलीस किंवा स्वराज्य संस्था यांच्याकडून परवानगी घेतलेली) सहभागी होऊ शकतात. मंडळांनी वर्षभरातील कार्याचा पुरावा (कागदपत्रे, छायाचित्रे, व्हीडिओ) सादर करणे आवश्यक.
  • अर्ज प्रक्रिया: अकादमीच्या संकेतस्थळावर उपलब्ध पोर्टलद्वारे निर्धारित वेळेत अर्ज सादर करावा. अर्ज २० जुलै ते गणेश चतुर्थीच्या एक दिवस आधीपर्यंत ऑनलाइन स्वीकारले जातील. प्रत्येक जिल्हाधिकाऱ्याने स्वतंत्र ईमेल आयडी तयार करून अकादमीला कळवावी.
  • प्रतिबंध: ज्या मंडळांना मागील सलग दोन वर्षे राज्य/जिल्हा स्तरावर पुरस्कार मिळाले आहेत, ते अपात्र ठरतील. पुरस्काराचे विभाजन करता येणार नाही. निवड समितीच्या निर्णयावर आक्षेप घेता येणार नाही. परीक्षणासाठी समितीला सर्व कागदपत्रे उपलब्ध करणे बंधनकारक.
  • निवड प्रक्रिया: तालुका स्तरावर ७ सदस्यांची समिती (५ शासकीय + २ अशासकीय कलाकार). जिल्हा स्तरावरही ७ सदस्यांची समिती. राज्य स्तरावर ३ सदस्यांची समिती (सर जे.जे. कला महाविद्यालयाचे अधिष्ठाता, पर्यावरण अधिकारी, NSS जनसंपर्क अधिकारी). समित्या प्रत्यक्ष भेट देऊन परीक्षण करतील.

पारितोषिके: तालुका ते राज्य स्तरावर १.५० कोटींचे वितरण

स्पर्धेत विविध स्तरांवर पारितोषिके दिली जातील. एकूण ४६८ मंडळांना लाभ होईल:

  • तालुका स्तर (मुंबई शहर वगळता): ३५७ विजेते, प्रत्येकी २५,००० रुपये (एकूण ८९.२५ लाख).
  • जिल्हा स्तर (३६ जिल्हे): पहिला क्रमांक ५०,००० रुपये (१८ लाख), दुसरा ४०,००० रुपये (१४.४० लाख), तिसरा ३०,००० रुपये (१०.८० लाख). एकूण ४३.२० लाख.
  • राज्य स्तर: पहिला क्रमांक ७.५० लाख, दुसरा ५ लाख, तिसरा २.५० लाख (एकूण १५ लाख). याशिवाय जिल्हा स्तरावरील ३३ इतर विजेत्यांना प्रत्येकी ५०,००० रुपये.

पुरस्कार वितरण समारंभ अकादमीद्वारे आयोजित केला जाईल. तालुका आणि जिल्हा स्तरावरील पुरस्कार जिल्हाधिकाऱ्यांमार्फत वितरित होतील.

या स्पर्धेमुळे गणेशोत्सव अधिक सांस्कृतिक आणि सामाजिकदृष्ट्या समृद्ध होईल, असा विश्वास शासनाने व्यक्त केला आहे. इच्छुक मंडळांनी अकादमीच्या पोर्टलवर अर्ज करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

उपराष्ट्रपती निवडणूक 2025: “बहुमत असताना विरोधकांना फोन का?” संजय राऊत यांचा भाजपवर हल्लाबोल

मुंबई, 20 ऑगस्ट 2025: शिवसेनेचे (उद्धव ठाकरे गट) खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकार, महाराष्ट्र सरकार आणि भाजपवर जोरदार टीका केली. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीपासून ते नव्या कायद्यापर्यंत आणि मुंबईतील पूरपरिस्थितीपर्यंत विविध मुद्द्यांवर त्यांनी सरकारची पोलखोल केली. राऊत म्हणाले की, मोदी सरकार विरोधी पक्षांना दाबण्यासाठी नवे कायदे आणत आहे, तर महाराष्ट्रातील पूरासाठी राज्य सरकार जबाबदार आहे.

उपराष्ट्रपती निवडणुकीवरून बहुमताचा मुद्दा

राऊत यांनी उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत इंडिया आघाडीकडे बहुमत असल्याचा दावा केला. ते म्हणाले, “आज तरी इंडिया आघाडीकडे बहुमताचा आकडा आहे. पण केंद्र सरकारने विरोधी पक्षांच्या नेत्यांना फोन करून समर्थन मागितले, याचा अर्थ त्यांचे बहुमत अस्थिर आहे.” त्यांनी भाजपचे उमेदवार सीपी राधाकृष्णन यांच्यावर टीका करत म्हटले की, ते झारखंडचे राज्यपाल असताना मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची ईडीने राजभवनात अटक केली, जे घटनाबाह्य आहे.

इंडिया आघाडीचे उमेदवार सुदर्शन रेड्डी यांचा उल्लेख करत राऊत म्हणाले, “सुदर्शन रेड्डी हे सुप्रीम कोर्टचे माजी न्यायमूर्ती आणि हायकोर्टचे माजी मुख्य न्यायमूर्ती आहेत. ते देशातील समस्यांवर नेहमी बोलतात. आज सेंट्रल हॉलमध्ये इंडिया ब्लॉकचे सर्व खासदार त्यांच्याशी संवाद साधणार आहेत आणि उद्या 21 ऑगस्टला नामांकन दाखल करणार आहोत.” त्यांनी चंद्राबाबू नायडू यांना आवाहन करत म्हटले की, मोदी-शहांच्या दबावाशिवाय रेड्डींना समर्थन द्या.

नव्या कायद्यावर हल्लाबोल

राऊत यांनी घटनादुरुस्तीच्या माध्यमातून येणाऱ्या नव्या कायद्यावर टीका केली. ते म्हणाले, “घटनेच्या कलम 45 मध्ये बदल करून, अटक झालेल्या मुख्यमंत्र्याला किंवा मंत्र्याला 30 दिवसांत राजीनामा द्यावा लागेल असा कायदा आणला जात आहे. हा कायदा विरोधी पक्षांच्या सरकारांना दहशत निर्माण करण्यासाठी आहे.” त्यांनी भाजपचे नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे, संजय राठोड, गिरीश महाजन यांच्यावर गुन्हे असल्याचे सांगत म्हटले, “तुमच्या सरकारचे मंत्री धुतलेल्या आंधळ्यासारखे आहेत. अमित शहा, संजय शिरसाट यांना तुरुंगात टाका आणि बरखास्त करा.”

राऊत पुढे म्हणाले, “हा कायदा विरोधी पक्षांना घाबरवण्यासाठी आहे. राहुल गांधींनी मतचोरीवरून निवडणूक आयोगाविरुद्ध वणवा पेटवला, त्यामुळे आता राज्यांत विरोधी सरकारे येणार आणि त्यांना पक्षांतर करून भाजपमध्ये आणण्यासाठी हा कायदा आहे. हुकुमशाहीची शिखर आहे.” त्यांनी पंतप्रधान मोदींवरही आरोप करत म्हटले, “पंतप्रधानांवर देश लुटल्याचा आरोप आहे, त्यांना अटक करा.”

मुंबई पूर आणि सरकारची अपयश

मुंबईतील कालच्या मुसळधार पावसावर बोलताना राऊत म्हणाले, “मुंबई ठाणा संपूर्ण बंद झाले, राज्य सरकार हतबल झाले. काल अमित शहांसमोर मी हा मुद्दा उपस्थित केला. मुंबईसारखे शहर पाण्यात गेले, मराठवाड्यात लष्कर बोलवावे लागले, वायनाडात 65 लोक मृत्यूमुखी पडले. सरकारची यंत्रणा अपघातानंतर जाते, पण अपघात टाळण्यासाठी काय करतात?”

त्यांनी महाराष्ट्र सरकारवर टीका करत म्हटले, “मुंबई महानगरपालिकेला तीन वर्षांपासून नेतृत्व नाही, भ्रष्टाचार वाढला. देवेंद्र फडणवीस छत्री घेऊन फिरत होते, शेंगदाणे खात फिरत होते. मोनोरेल बंद पडली, लोक अडकले. याला जबाबदार देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अमित शहांचा पाठिंबा आहे.” अजित पवारांच्या प्रतिक्रियेवर ते म्हणाले, “अजित पवार मोठे तज्ञ आहेत, पण मोनोरेलमध्ये जास्त लोक घुसले असतील तर त्यांची यंत्रणा काय करत होती?”

एकनाथ शिंदेंच्या अनुपस्थितीवर बोलताना राऊत म्हणाले, “शिंदे छत्री घेऊन कॅमेरे घेऊन फिरत होते. मुंबई बुडाली तेव्हा ते बुडणारे भाग बघायला गेले.” ठाकरे गटावर टीकेच्या उत्तरात ते म्हणाले, “काल अख्खी शिवसेना रस्त्यावर होती. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यंत्रणा राबवत होते. ठाकरेंचा संबंध काय? सरकार शिंदे-फडणवीस-पवारांचे आहे.”

नागरिकांच्या आंदोलनाला यश; सोलापूर–धुळे राष्ट्रीय महामार्गावर अंडरपासच्या कामास सुरुवात – सोमनाथ गुरव यांची माहिती

धाराशिव -: सोलापूर–धुळे राष्ट्रीय महामार्गावर पथदिवे, अंडरपास आणि सर्विस रोडची मागणी नागरिकांकडून गेल्या अनेक वर्षांपासून होत होती. या मार्गावर वाढत्या वाहतुकीमुळे अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत होते. अखेर सातत्यपूर्ण पाठपुराव्यास यश आले असून प्रत्यक्षात काम सुरु झाले आहे. केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी, खासदार ओमराजे निंबाळकर, कैलास पाटील, मकरंद राजेंनिंबाळकर यांचे नागरिकांतून आभार व्यक्त होत असल्याच ठाकरे पक्षाचे शहरप्रमुख सोमनाथ गुरव यांनी म्हटले आहे.
राष्ट्रीय महामार्ग होऊनही अनेक कामे झालेली नव्हती. त्यामुळे जनतेला वाहतुकीची मोठी समस्या निर्माण झाली होती. या मागणीनुसार खासदार ओमराजे निंबाळकर यांनी लोकसभेच्या अधिवेशनात, दिशा समितीच्या बैठकीत त्यांनी अनेकदा या प्रश्नाकडे लक्ष वेधले. केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे हा प्रश्न सोडविण्यासाठी वारंवार भेटी घेतल्या. तसेच आमदार कैलास पाटील यांनीही याबाबत सर्व पातळीवर पाठपुरावा केला. माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांनी हा प्रश्न लावून धरला होता. याचबरोबर नागरिकांनीही वेगवेगळ्या प्रकारे आंदोलन करून या कामाची गरज दाखवून दिली. अखेर लोकप्रतिनिधींचे प्रयत्न आणि नागरिकांच्या आंदोलनानंतर या सर्व कामाना मंजुरी मिळाली पण कामे काही होत नव्हती. वाढते अपघात पाहता पुन्हा हे काम होण्यासाठी प्रयत्न करावे लागले. सर्विस रोड, पथदिवे व अंडरपास आदी कामे न झाल्याने काही महिन्यांपूर्वी अपघातात एका शाळकरी मुलाचा मृत्यू झाला. तेव्हा नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त झाला त्यांनी मोठं आंदोलन करून प्रशासनावर दबाव वाढविला. शिवाय लोकसभेच्या अधिवेशनात खासदार ओमराजे यांनी व आमदार कैलास पाटील यांनीही विधानसभेच्या अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित केला. साहजिक तेव्हापासून त्या अनुषंगाने कामे हाती घेतली गेली आता अंडरपासच्या कामास प्रत्यक्ष सुरवात झाली आहे. सध्या मार्गावर सर्विस रोड व पथदिवे बसविण्यात आले असून अंडरपासच्या कामालाही सुरुवात झाल्याने नागरिकांतुन समाधान व्यक्त होत आहे.जुना उपळा रोड या ठिकाणी अंडरपास ची मागणी प्रस्तावित असून त्यासाठीही पाठपुरावा सुरु असल्याची माहिती सोमनाथ गुरव यांनी दिली आहे. नागरिकांच्यावतीने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील व माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांचे आभार सोमनाथ गुरव यांनी व्यक्त केले आहेत.

“धाराशिव जिल्ह्यात रेखाकला परीक्षेला चित्रकलेचे गुरुजीच नाहीत; विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान”

धाराशिव : पुढील महिन्यात म्हणजेच २४ सप्टेंबर २०२५ पासून जिल्ह्यात शासकीय रेखाकला परीक्षा सुरू होणार आहेत. मात्र जिल्ह्यात कला शिक्षकांचा तीव्र अभाव असल्याने विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत असून, या विषयाचे अध्यापनच कोंडीत सापडले आहे.

धाराशिव जिल्ह्यात एकूण १७ परीक्षा केंद्र आहेत. त्यापैकी १६ केंद्रे कार्यरत असून, यातील १० परीक्षा केंद्रांवर कायमस्वरूपी कला शिक्षक पदच अस्तित्वात नाही. उर्वरित सात केंद्रांवर केवळ काहीच कला शिक्षक कार्यरत आहेत. परिणामी, “परीक्षा चित्रकलेची आणि चित्रकलेचे गुरुजीच नाहीत” अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

कला शिक्षक नसल्याने काही परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांचा सहभाग जवळजवळ शून्य आहे. उदाहरणार्थ, जि. प. मंगरूळ (ता. तुळजापूर) परीक्षा केंद्रावर गेल्या दोन वर्षांपासून एकही विद्यार्थी रेखाकला परीक्षेस प्रविष्ट झालेला नाही. केंद्रप्रमुख आणि मुख्याध्यापकांसाठीही हे मोठे संकट ठरत आहे.

दरवर्षी धाराशिव जिल्ह्यातील परीक्षा केंद्रांवरून १५ ते १७ हजार विद्यार्थी रेखाकला परीक्षा देतात, तर राज्यातील एकूण परीक्षार्थ्यांची संख्या तब्बल सात ते आठ लाख इतकी आहे. अशा वेळी “हायस्कूल तेथे कलाशिक्षक” हे धोरण राबवून कला शिक्षकांची तत्काळ भरती करण्याची मागणी शिक्षण क्षेत्रातून होत आहे.

या परीक्षा म्हणजे इलेमेंटरी व इंटरमिजिएट विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनातील आवडीचा, स्मरणीय टप्पा मानल्या जातात. शिवाय, या परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांना दहावी बोर्ड परीक्षेत ग्रेडनुसार अतिरिक्त गुणांची सवलत मिळते—ग्रेड A साठी ७ गुण, ग्रेड B साठी ५ गुण तर ग्रेड C साठी ३ गुण.

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात कलाशिक्षणाला विशेष महत्त्व दिले असून, दहावी इयत्तेसाठी कला विषय अनिवार्य करण्यात आला आहे. त्यामुळे शासनाने कला शिक्षक नेमणूक धोरणावर ठोस पावले उचलल्यास विद्यार्थ्यांचे भवितव्य उज्वल होईल, असे शिक्षक व शिक्षणतज्ज्ञांचे मत आहे.

धाराशिव जिल्ह्यात पावसाचा जोर; तर काही मंडळांमध्ये चिंताजनक कमतरता

दिनांक: १९ ऑगस्ट २०२५, धाराशिव

धाराशिव जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात (जून ते ऑगस्ट २०२५) पावसाने चांगली हजेरी लावली असून, जिल्ह्याचा एकूण पाऊस सामान्यपेक्षा २०% जास्त आहे. १९ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी १०:३२/१०:३३ वाजता जाहीर झालेल्या पावसाच्या आकडेवारीनुसार, जून ते आतापर्यंत जिल्ह्यात ४३०.२ मिमी पाऊस झाला आहे, जो सामान्य ३५८.६ मिमीच्या तुलनेत १२०.०% आहे. विशेषतः ऑगस्ट महिन्यात पावसाने जोर धरला असून, सामान्य ९४.६ मिमीच्या तुलनेत १८९.९ मिमी पाऊस (२००.७%) नोंदवला गेला आहे. मात्र, काही मंडळांमध्ये पाऊस सामान्यपेक्षा खूपच कमी आहे, ज्यामुळे शेती आणि पाणीपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

जिल्हा स्तरावरील आकडेवारी:

  • जून-जुलै:
  • सामान्य पाऊस: २६४.० मिमी
  • प्रत्यक्ष पाऊस: २४०.३ मिमी
  • सामान्यच्या तुलनेत: ९१.०% (सामान्यपेक्षा ९% कमी)
  • ऑगस्ट:
  • सामान्य पाऊस: ९४.६ मिमी
  • मागील दिवसापर्यंत: १७७.४ मिमी
  • अहवालाच्या दिवशी: १२.५ मिमी
  • प्रगतीशील एकूण: १८९.९ मिमी
  • सामान्यच्या तुलनेत: २००.७% (सामान्यपेक्षा दुप्पट)
  • जून ते आतापर्यंत:
  • सामान्य पाऊस: ३५८.६ मिमी
  • प्रत्यक्ष पाऊस: ४३०.२ मिमी
  • सामान्यच्या तुलनेत: १२०.०%
  • पूर्ण हंगाम (जून-सप्टेंबर):
  • सामान्य पाऊस: ६०३.१ मिमी
  • आतापर्यंत %: ७१.३%
  • मागील वर्षाशी तुलना:
  • मागील वर्षी (२०२४) आतापर्यंत: ४५६.७ मिमी (१२७.४%)
  • यंदा पावसाचे प्रमाण मागील वर्षापेक्षा किंचित कमी आहे, परंतु ऑगस्टमधील जोरदार पावसाने एकूण परिस्थिती सुधारली आहे.

तहसीलनिहाय पाऊस:

जिल्ह्यातील आठ तहसीलांपैकी बहुतांश ठिकाणी पाऊस सामान्यपेक्षा जास्त आहे. खाली तहसीलनिहाय जून ते आतापर्यंतच्या पावसाचे तपशील (सामान्यच्या तुलनेत %) दिले आहेत:

  • वाशी: ५३८.३ मिमी (१४७.४%) – सर्वाधिक पाऊस, खरीप पिकांना मोठा आधार.
  • लोहारा: ४८३.८ मिमी (१४६.४%) – जोरदार पाऊस, शेतीसाठी अनुकूल.
  • उमरगा: ४४४.२ मिमी (१३१.४%) – सामान्यपेक्षा ३१% जास्त.
  • तुळजापूर: ४८७.० मिमी (१२८.१%) – पाण्याची उपलब्धता चांगली.
  • भूम: ४१५.५ मिमी (१२३.३%) – शेतीसाठी समाधानकारक.
  • परांडा: ३२९.७ मिमी (१२१.३%) – सामान्यपेक्षा चांगला पाऊस.
  • कळंब: ४४३.० मिमी (११९.०%) – स्थिर परिस्थिती.
  • धाराशिव: ३७५.६ मिमी (९६.६%) – सामान्यपेक्षा किंचित कमी, चिंतेचे कारण नाही.

मंडळनिहाय ठळक बाबी:

प्रत्येक तालुक्याअंतर्गत मंडळांमध्ये (प्रशासकीय एकक) पावसाचे प्रमाण भिन्न आहे. खाली तालुका आणि त्याअंतर्गत मंडळांचा जून ते आतापर्यंतचा पाऊस (सामान्यच्या तुलनेत %) दिला आहे:

  1. धाराशिव तालुका (सरासरी ९६.६%, ३७५.६ मिमी):
  • धाराशिव-शहर: ३८४.० मिमी (९८.७%) – जवळपास सामान्य.
  • ढोकी: ३८२.३ मिमी (९८.३%) – स्थिर.
  • तेर: ३८२.९ मिमी (९८.५%) – चांगला पाऊस.
  • धाराशिव-ग्रामीण: ३७७.७ मिमी (९७.१%) – सामान्य जवळपास.
  • बेंबळी: ३७१.४ मिमी (९५.५%) – किंचित कमी.
  • केशेगाव: ३६९.६ मिमी (९५.०%) – सामान्यपेक्षा कमी.
  • पडोली: ३५०.८ मिमी (९०.२%) – कमी पाऊस.
  • जागजी: ३१७.९ मिमी (८१.7%) – तालुक्यातील सर्वात कमी, शेतीवर परिणाम शक्य.
  1. तुळजापूर तालुका (सरासरी १२८.१%, ४८७.० मिमी):
  • इटकळ: ६९९.३ मिमी (१८३.९%) – जिल्ह्यातील सर्वाधिक पाऊस, पाण्याची मुबलकता.
  • नळदुर्ग: ५०२.० मिमी (१३२.०%) – जोरदार पाऊस.
  • मंगरूळ: ४७३.२ मिमी (१२४.४%) – चांगला पाऊस.
  • सलगरा: ४६३.७ मिमी (१२१.९%) – शेतीसाठी अनुकूल.
  • तुळजापूर: ४२७.६ मिमी (११२.४%) – समाधानकारक.
  • जळकोट: ३९८.६ मिमी (१०४.८%) – सामान्यपेक्षा जास्त.
  • सावरगाव: १९६.८ मिमी (५१.७%) – तालुक्यातील सर्वात कमी, चिंताजनक.
  1. परांडा तालुका (सरासरी १२१.३%, ३२९.७ मिमी):
  • जवळा: ३८८.२ मिमी (१४२.८%) – सर्वाधिक पाऊस.
  • परांडा: ३७४.९ मिमी (१३७.९%) – चांगला पाऊस.
  • आसू: ३४४.६ मिमी (१२६.८%) – समाधानकारक.
  • अनाळा: ३०९.३ मिमी (११३.८%) – स्थिर.
  • सोनारी: १३४.० मिमी (४९.३%) – जिल्ह्यातील सर्वात कमी, शेतीवर मोठा परिणाम शक्य.
  1. भूम तालुका (सरासरी १२३.३%, ४१५.५ मिमी):
  • भूम: ५७३.५ मिमी (१७०.२%) – तालुक्यातील सर्वाधिक, शेतीसाठी उत्तम.
  • ईट: ४६३.६ मिमी (१३७.६%) – चांगला पाऊस.
  • अंभी: ३६१.० मिमी (१०७.२%) – सामान्यपेक्षा जास्त.
  • माणकेश्वर: ३४६.७ मिमी (१०२.९%) – स्थिर.
  • ालवड: ३२९.५ मिमी (९७.८%) – सामान्य जवळपास.
  1. कळंब तालुका (सरासरी ११९.०%, ४४३.० मिमी):
  • गोविंदपूर: ५३६.० मिमी (१४४.०%) – सर्वाधिक पाऊस.
  • इटकूर: ४९२.७ मिमी (१३२.४%) – चांगला पाऊस.
  • मोहा: ४१२.६ मिमी (११०.९%) – समाधानकारक.
  • शिराढोण: ४०९.० मिमी (१०९.९%) – स्थिर.
  • कळंब: ४०५.२ मिमी (१०८.९%) – सामान्यपेक्षा जास्त.
  • येरमाळा: २३०.४ मिमी (६१.९%) – तालुक्यातील सर्वात कमी, चिंता वाढवणारा.
  1. उमरगा तालुका (सरासरी १३१.४%, ४४४.२ मिमी):
  • मुरूम: ४५६.२ मिमी (१३४.९%) – सर्वाधिक पाऊस.
  • उमरगा: ४४४.४ मिमी (१३१.४%) – चांगला पाऊस.
  • नारंगवाडी: ४०१.२ मिमी (११८.७%) – समाधानकारक.
  • मुळज: ३९७.९ मिमी (११७.७%) – स्थिर.
  • डाळींब: ३६६.४ मिमी (१०८.४%) – सामान्यपेक्षा जास्त.
  1. लोहारा तालुका (सरासरी १४६.४%, ४८३.८ मिमी):
  • लोहारा: ५५५.७ मिमी (१६८.२%) – तालुक्यातील सर्वाधिक.
  • जेवली: ४८९.१ मिमी (१४८.०%) – चांगला पाऊस.
  • माकणी: ४०६.३ मिमी (१२३.०%) – समाधानकारक.
  1. वाशी तालुका (सरासरी १४७.४%, ५३८.३ मिमी):
  • वाशी: ६६३.९ मिमी (१८१.८%) – तालुक्यातील सर्वाधिक, जिल्ह्यात दुसऱ्या क्रमांकाचा पाऊस.
  • परगाव: ४७५.३ मिमी (१३०.१%) – चांगला पाऊस.
  • तेरखेडा: ४७४.१ मिमी (१२९.८%) – समाधानकारक.

सर्वाधिक आणि कमी पावसाची मंडळे:

  • सर्वाधिक पाऊस:
  1. इटकळ (१८३.९%, ६९९.३ मिमी)
  2. वाशी (१८१.८%, ६६३.९ मिमी)
  3. भूम (१७०.२%, ५७३.५ मिमी)
  • जून ते आतापर्यंत: ४७१.९ मिमी (सामान्य ४३८.७ मिमी, १०७.६%).
  • पूर्ण हंगाम (जून-सप्टेंबर): सामान्य ६७९.५ मिमी, आतापर्यंत ६९.४%.
  • मागील वर्ष: ४७९.८ मिमी (१०९.४%) – यंदा विभागातही पाऊस सामान्यपेक्षा जास्त आहे.
  • कमी पाऊस:
  1. सोनारी (४९.३%, १३४.० मिमी) – चिंताजनक, शेतीवर मोठा परिणाम शक्य.
  2. सावरगाव (५१.७%, १९६.८ मिमी) – पाण्याची कमतरता.
  3. येरमाळा (६१.९%, २३०.४ मिमी) – शेतीसाठी अडचणी.
  4. जागजी (८१.७%, ३१७.९ मिमी) – सामान्यपेक्षा कमी.

  • जिल्ह्यातील बहुतांश मंडळांमध्ये पाऊस सामान्यपेक्षा जास्त आहे, विशेषतः ऑगस्टमधील जोरदार पावसाने (२००.७%) खरीप हंगामासाठी आशा निर्माण केली आहे. इटकळ, वाशी, आणि भूम यांसारख्या मंडळांमध्ये पाण्याची मुबलकता आहे, ज्यामुळे सोयाबीन, कापूस, आणि तूर यांसारख्या पिकांना फायदा होईल.
  • सोनारी, सावरगाव, आणि येरमाळा यांसारख्या मंडळांमध्ये पाऊस ५०-६०% पेक्षा कमी आहे, ज्यामुळे पिकांचे नुकसान आणि पाण्याची टंचाई निर्माण होऊ शकते. या भागात शेतकऱ्यांना पाण्याचा काटकसरीने वापर आणि पर्यायी उपाययोजनांची गरज आहे.

मंत्रिमंडळ बैठकीत आरोग्य, उद्योग व महसूल विषयक निर्णयांना मंजुरी

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंगळवारी (दि. १९ ऑगस्ट २०२५) आरोग्य, औद्योगिक वसाहत, महसूल व कर्मचारी हिताचे अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.

टाटा मेमोरिअल सेंटरला दिलासा
मुंबईतील टाटा मेमोरिअल सेंटरच्या एकात्मिक आयुर्वेदिक कर्करोग दवाखाना व संशोधन केंद्रासाठी उभारण्यात येणाऱ्या १०० खाटांच्या रुग्णालयावरचा मुद्रांक शुल्क माफ करण्यास मान्यता देण्यात आली. या निर्णयामुळे रुग्णालयाच्या उभारणीला गती मिळून कर्करोगग्रस्त रुग्णांना अत्याधुनिक व पर्यायी उपचार उपलब्ध होणार आहेत.

कोल्हापूरमध्ये महिलांसाठी औद्योगिक वसाहत
महिला उद्योजकतेला चालना देण्यासाठी कोल्हापूर येथील सावित्रीबाई फुले महिला सहकारी औद्योगिक वसाहत लि. संस्थेसाठी कसबा करवीर, बी वॉर्ड येथील गट क्रमांक ६९७/३/६ मधील २ हेक्टर ५० आर जमीन देण्याचा निर्णय घेण्यात आला.

सिंधुदुर्गमध्ये अतिक्रमणांना नियमबद्धता
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मौजे वेंगुर्ला – कॅम्प गवळीवाडा येथील शासकीय जमिनीवरील अतिक्रमणांना नियमांनुसार वैध करण्याचा निर्णयही मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

वैद्यकीय शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांना स्थैर्य
राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयांमधील गट-क (तांत्रिक) संवर्गातील विविध पदांवर २९ दिवस तत्त्वावर कार्यरत असलेल्या १७ कर्मचाऱ्यांची सेवा नियमित करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली. या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना नोकरीत स्थैर्य मिळेल व रुग्णालयीन सेवा अधिक प्रभावी होतील.

जिल्हा परिषदेतील ११८३ अधिकारी-कर्मचाऱ्यांनी उचलला “लाडकी बहीण” योजनेचा लाभ, आता कारवाई होणार

मुंबई – राज्यातील महिलांच्या आर्थिक सबलीकरणासाठी सुरू करण्यात आलेल्या “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” या महत्वाकांक्षी योजनेत जिल्हा परिषदेत कार्यरत असलेल्या तब्बल ११८३ अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अपात्र असूनही लाभ घेतल्याचा मोठा प्रकार उघडकीस आला आहे.

महिला व बाल विकास विभागाने माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून प्राप्त झालेल्या डेटावर आधारित तपासणी केली असता हा गैरप्रकार समोर आला. शासनाने दिलेल्या अपात्रतेच्या अटी स्पष्ट असूनही त्याकडे दुर्लक्ष करून या कर्मचाऱ्यांनी जाणीवपूर्वक लाभ घेतल्याचे निष्पन्न झाले आहे.


योजनेचे नियम आणि अपात्रतेच्या अटी

“मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेअंतर्गत पात्र महिलेला दरमहा आर्थिक मदत थेट बँक खात्यात दिली जाते. मात्र, या योजनेच्या अपात्रतेच्या अटींनुसार –

  • कुटुंबातील सदस्य जर नियमित सरकारी सेवेत कार्यरत असतील किंवा पेन्शनधारक असतील, तर त्या कुटुंबातील महिला या योजनेस पात्र ठरत नाहीत.
  • फक्त कंत्राटी, स्वयंसेवी किंवा बाह्य यंत्रणेद्वारे काम करणारे कर्मचारी (वार्षिक उत्पन्न २.५ लाखांपर्यंत) यांच्या कुटुंबातील महिला पात्र ठरतात.

योजनेत अगदी सुरुवातीपासून हे नियम स्पष्ट करण्यात आले होते. तरीदेखील जिल्हा परिषदेतील अनेक अधिकारी-कर्मचाऱ्यांनी हे नियम मोडत लाभ घेतला.


जिल्हा परिषदांवरच जबाबदारी

जिल्हा परिषद ही स्वायत्त संस्था असून तिच्या कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती व शिस्तभंग विषयक अधिकार थेट मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे (CEO ZP) असतात. त्यामुळे महिला व बाल विकास विभागाने संबंधित सर्व जिल्हा परिषद सीईओंना पत्र पाठवून पुढील निर्देश दिले आहेत –

  1. दोषींवर महाराष्ट्र नागरी सेवा नियमांनुसार शिस्तभंगात्मक कारवाई करावी.
  2. केलेल्या कारवाईचा तपशीलवार अहवाल महिला व बाल विकास विभागाकडे तातडीने सादर करावा.
  3. त्याची प्रत ग्रामविकास विभागालाही उपलब्ध करून द्यावी.

शासनाचा इशारा – “गैरवापर सहन केला जाणार नाही”

महिला व बाल विकास विभागाचे सचिव डॉ. अनुप कुमार यादव यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले आहे की,

“जिल्हा परिषद कर्मचारी अपात्र असूनही लाभ घेत असल्याचे स्पष्ट झाले आहे. हे म्हणजे शासनाची दिशाभूल असून गंभीर शिस्तभंगाची बाब आहे. अशा गैरप्रकाराला शासन अजिबात सहन करणार नाही. दोषींवर कडक कारवाई केली जाईल.”


जिल्हा परिषदेची प्रतिमा धोक्यात

जिल्हा परिषद ही ग्रामीण विकासाची प्रमुख यंत्रणा मानली जाते. आरोग्य, शिक्षण, ग्रामविकास अशा अनेक योजना याच संस्थेतून राबवल्या जातात. अशा वेळी जिल्हा परिषदेत कार्यरत असलेले कर्मचारीच शासनाची महत्त्वाकांक्षी योजना गैरमार्गाने वापरत असल्याचे समोर आल्याने जिल्हा परिषदेची प्रतिमा डागाळली आहे.

तब्बल ११८३ कर्मचाऱ्यांचा सहभाग हा आकडा अत्यंत चिंताजनक आहे. शासनाने त्वरित कारवाई केली नाही तर या यंत्रणेबद्दल जनतेचा विश्वास डळमळीत होईल, अशी भीती व्यक्त होत आहे.

महिलांच्या सबलीकरणासाठी सुरू झालेली “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजना राज्यातील ग्रामीण भागासाठी आशेचा किरण होती. मात्र, या योजनेतच जिल्हा परिषदेत कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांनी गैरप्रकार करून लाभ घेतल्याचे उघड झाल्याने शासनाची प्रतिमा मलिन झाली आहे.
आता सर्वांचे लक्ष जिल्हा परिषद सीईओंकडून होणाऱ्या कारवाईकडे लागले आहे.