Home Blog Page 8

गाडीचा हप्ता भरण्यासाठी साथीदारासह केली तारेची चोरी; स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई

धाराशिव, दि.22 ऑगस्ट :
धाराशिव जिल्ह्यातील वाशी आणि कळंब तालुक्यात पवनचक्कीवरून ॲल्युमिनियमच्या तारांच्या चोरीचे सहा गुन्हे उघडकीस आणण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. या कारवाईत पोलिसांनी तब्बल ७ लाख ६९ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि सुदर्शन कासार आणि पथक हे गस्त घालत असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार विशाल रामा काळे (वय २१, रा. पारधी पिढी, भुम) हा संशयित चोरीचा मुद्देमाल घेऊन विक्रीसाठी जाणार असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी त्याला सिताफिनेजवळ पकडले. त्याच्या पिकअप वाहनातून पोलिसांना ॲल्युमिनियम तारेची बंडले आढळली.

चौकशीअंती काळे याने कळंब व वाशी तालुक्यातील बावी, सरमकुंडी व मस्सा शिवारातील पवनचक्की खांबांवरून तारा चोरी केल्याची कबुली दिली. तपासात त्याच्या विरोधात अशाच प्रकारच्या सहा गुन्ह्यांची नोंद असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी पंचनामा करून ८९८ मीटर लांबीचे २ लाख ६९ हजार ४०० रुपयांचे ॲल्युमिनियम तारे व पाच लाख रुपये किमतीचे पिकअप वाहन असा एकूण ७ लाख ६९ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

तपासात आरोपीने अन्य साथीदारांची नावेही सांगितली असून त्यांच्या सहभागाबाबतही पोलिस तपास करत आहेत. आरोपीला वैद्यकीय तपासणीनंतर पुढील कारवाईसाठी वाशी पोलिस ठाण्यात हजर केले आहे.

ही कारवाई अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार, पोलीस हवालदार शौकत पठाण, प्रकाश औताडे, फराहान पठाण, चालक पोलीस अंमलदार रत्नदीप डोंगरेनागनाथ गुरव यांच्या पथकाने केली.

श्री सिद्धिविनायक परिवाराकडून शेतकऱ्यांना अंतिम 200 रुपयांचा हप्ता जमा

धाराशिव- तुळजापूर तालुक्यातील देवकुरुळी येथील श्री सिद्धिविनायक ॲग्रीटेक युनिट क्र. 1 व खामसवाडी येथील श्री सिद्धिविनायक ग्रीनटेक युनिट क्र. 2 या दोन्ही गुळ कारखान्यांकडून हंगाम 2024-25 मधील ऊस बिलाचा 200 रुपयांचा अंतिम हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आला आहे. संस्थापक अध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली नेहमीच शेतकरीहिताला प्राधान्य देत पारदर्शक कारभार राबविला जातो. हंगामातील उर्वरित हप्ता बैलपोळ्याच्या पार्श्वभूमीवर वेळेत देण्याचे आश्वासन यापूर्वी दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी दिले होते. त्यानुसार प्रत्यक्ष अंमलबजावणी करत शेतकऱ्यांच्या खात्यावर अंतिम 200 रुपयांचा हप्ता जमा झाल्याने परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी जलद पेमेंट व्यवस्था हीच आमची ताकद आहे.मागील हंगामात सव्वादोन लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप करण्या आले होते. याचा अंतिम हफ्ता जमा केला आहे तर पुढील हंगामातही पारदर्शक व विश्वासार्ह कारभार ठेवून आगामी काळात शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे हेच उद्दिष्ट असून श्री सिद्धिविनायक परिवाराकडून विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याचे दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी व्यक्त केला.

गणपती बाप्पाचे आगमन शासकीय कर्मचाऱ्यांसाठी आनंददायी होणार या महिन्याचा पगार २६ ऑगस्टला

मुंबई, दि. २१ ऑगस्ट :
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील शासकीय अधिकारी-कर्मचारी तसेच निवृत्तिवेतनधारक आणि कुटुंब निवृत्तिवेतनधारक यांना १ सप्टेंबर २०२५ रोजी देय होणारे माहे ऑगस्टचे वेतन / निवृत्तिवेतन / कुटुंब निवृत्तिवेतन यावेळी गणेशोत्सवापूर्वीच, म्हणजे दि. २६ ऑगस्ट २०२५ रोजी देण्यात येणार आहे.

वित्त विभागाच्या मते, यंदा गणेशोत्सवाची सुरुवात २७ ऑगस्टपासून होत आहे. त्यादृष्टीने कर्मचाऱ्यांना सण साजरा करताना आर्थिक अडचणी जाणवू नयेत म्हणून ही विशेष मुभा देण्यात आली आहे. शासनाने यासाठी मुंबई वित्तीय नियम, १९५९ व महाराष्ट्र कोषागार नियम, १९६८ मधील संबंधित तरतुदी तात्पुरत्या स्वरूपात शिथिल केल्या आहेत.

शासन निर्णयानुसार –

  • वेतन व निवृत्तिवेतन देयके २६ ऑगस्ट २०२५ रोजी वितरित केली जातील.
  • सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांनी परिपूर्ण वेतन व निवृत्तिवेतन देयके तत्काळ उपकोषागार/जिल्हा कोषागार/अधिदान व लेखा कार्यालय मुंबई येथे सादर करणे आवश्यक आहे.
  • या निर्णयाचा लाभ जिल्हा परिषदांचे अधिकारी-कर्मचारी, मान्यताप्राप्त व अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था, कृषी व अकृषी विद्यापीठे तसेच त्यांच्याशी संलग्न महाविद्यालयांतील कर्मचारी व निवृत्तिवेतनधारकांनाही मिळणार आहे.

या संदर्भात राज्यातील सर्व जिल्हा कोषागार व उपकोषागार कार्यालयांना तातडीने सूचना देण्यात आल्या आहेत.

👉 यामुळे लाखो सरकारी अधिकारी-कर्मचारी आणि निवृत्तिवेतनधारकांना गणेशोत्सवात दिलासा मिळणार आहे.

धाराशिव पोलीसांनी ५ लाख किंमतीचे हरवलेले ३३ मोबाईल केले परत

धाराशिव, दि. २१ ऑगस्ट :
धाराशिव जिल्ह्यातील सायबर पोलीसांनी तांत्रिक कौशल्याचा वापर करून तब्बल ५ लाख ३ हजार ४३१ रुपयांच्या किंमतीचे ३३ हरवलेले व चोरीस गेलेले मोबाईल शोधून काढण्यात यश मिळवले आहे. हे मोबाईल आज छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे मा. विशेष पोलीस महानिरीक्षक श्री. वीरेंद्र मिश्र यांच्या हस्ते, मा. पोलीस अधीक्षक धाराशिव यांच्या उपस्थितीत संबंधित फिर्यादींना परत करण्यात आले.

केंद्र सरकारच्या दूरसंचार व दळणवळण विभागाने हरवलेल्या / चोरीस गेलेल्या मोबाईल शोधासाठी सीईआयआर (Central Equipment Identity Register – CEIR) हे ऑनलाईन पोर्टल सुरू केले आहे. हे पोर्टल धाराशिव जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांमार्फत कार्यान्वित करण्यात आले असून, नागरिकांना आपला मोबाईल हरवल्यास किंवा चोरीस गेल्यास तक्रार थेट या पोर्टलवर नोंदवण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

सन २०२४ व २०२५ मध्ये धाराशिव जिल्ह्यात दाखल झालेल्या हरवलेल्या व चोरीस गेलेल्या मोबाईलच्या तक्रारी सीईआयआर पोर्टलवर अपलोड करण्यात आल्या होत्या. त्यापैकी ३३ मोबाईल शोधून काढण्यात आले असून, त्यांची एकूण किंमत ५,०३,४३१ रुपये इतकी आहे.

मोबाईल परत मिळाल्यामुळे उपस्थित फिर्यादींनी पोलीसांचे आभार मानले व समाधान व्यक्त केले.

ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाण्याचे पोनि शेख, पोशि ६४० सुर्यवंशी, पोशि १८९४ अंगुले, कळंब ठाण्याचे पोशि ९७६ नारळकर, नळदुर्ग ठाण्याचे पोशि ३४५ दांडेकर व शहर पोलीस ठाण्याचे पोशि १८७१ क्षिरसागर यांनी केली.

धाराशिव जिल्ह्यात 9 पोलिस ठाण्यांकडून जुगारविरोधी धडक कारवाई; 25 जणांविरुद्ध 14 गुन्हे नोंद, 44,760 रुपये जप्त

धाराशिव, दि. 21 ऑगस्ट 2025: धाराशिव जिल्ह्यात जुगाराच्या विळख्याने अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होत असताना, पोलिसांनी या सामाजिक दुष्टचक्राविरुद्ध कठोर पाऊल उचलले आहे. काल, दि. 20 ऑगस्ट 2025 रोजी जिल्ह्यातील 9 पोलिस ठाण्यांनी एकाच दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून जुगाराच्या जाळ्याला मोठा धक्का दिला. या कारवाईत कल्याण मटका, तिरट मटका, मिलन नाईट मटका आणि मुंबई मेन बाजार मटका यासारख्या जुगाराच्या प्रकारांशी संबंधित साहित्य आणि एकूण 44,760 रुपये जप्त करण्यात आले. या प्रकरणी 25 व्यक्तींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा, कलम 12(अ) अंतर्गत 14 स्वतंत्र गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

पोलिस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सकाळपासून रात्री उशिरापर्यंत राबवलेल्या या धडक मोहिमेने जुगाराच्या गुप्त अड्ड्यांना उघडे केले. मटका चिठ्ठ्या, पेन, कागद आणि रोकड यासारखे जुगाराचे साहित्य जप्त करून पोलिसांनी या अवैध व्यवसायाला आळा घालण्याचे ठोस पाऊल उचलले आहे. ही कारवाई केवळ कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांना धडा शिकवणारी नाही, तर जुगारामुळे होणाऱ्या सामाजिक आणि आर्थिक हानीबाबत जनजागृती करणारी ठरली आहे.

उमरगा: दोन ठिकाणी छापे, 1,940 रुपये जप्त

उमरगा पोलिसांनी दुपारी 1.10 ते 2.45 या वेळेत दोन ठिकाणी छापे टाकले. नारंगवाडी पाटीजवळ संजय धनराज पवार (वय 40, रा. नारंगवाडी पश्चिम) याच्याकडून कल्याण मटका साहित्यासह 1,180 रुपये जप्त करण्यात आले. दुसऱ्या छाप्यात, महाराष्ट्र बँकेजवळील शिवाजी चौकात संतोष संभाजी गायकवाड (वय 28, रा. कुंभारपट्टी) याच्याकडून 760 रुपये आणि जुगार साहित्य हस्तगत झाले. दोन्ही प्रकरणांत स्वतंत्र गुन्हे नोंदवण्यात आले. उमरगा पोलिसांची ही तत्परता स्थानिक जुगार अड्ड्यांना धक्का देणारी ठरली.

भूम: चार ठिकाणी कारवाई, सर्वाधिक 22,090 रुपये जप्त

भूम पोलिसांनी सर्वात मोठी कारवाई करत दुपारी 4.35 ते सायंकाळी 6.25 या वेळेत चार ठिकाणी छापे टाकले. बसस्थानकाजवळील पत्र्याच्या टपरीत साबीर अब्दुल सौदागर (वय 28, रा. फ्लोरा चौक) याच्याकडून 3,020 रुपये, ओंकार चौकात देविदास नारायण गावडे (वय 42, रा. शिवाजीनगर) याच्याकडून 6,550 रुपये, नगर परिषदेसमोरील साईनाथ पानशॉपमध्ये औंदुबर वसंत सावंत (वय 33, रा. कसबा गल्ली) याच्याकडून 9,370 रुपये आणि गोलाई चौकाजवळ रामेश्वर मंगेश असलकर (वय 25, रा. लक्ष्मीनगर) याच्याकडून 3,150 रुपये जप्त करण्यात आले. सर्व प्रकरणे कल्याण मटकाशी संबंधित असून, चार स्वतंत्र गुन्हे नोंदवले गेले. भूम पोलिसांची ही कामगिरी जिल्ह्यातील सर्वात प्रभावी ठरली.

लोहारा: दोन छापे, 4,340 रुपये जप्त

लोहारा पोलिसांनी दुपारी 1.00 ते रात्री 8.10 या वेळेत दोन ठिकाणी कारवाई केली. राजेगाव वेशीजवळ नोताजी सिताराम चव्हाण (वय 42, रा. राजेगाव) याच्याकडून 740 रुपये आणि कल्याण मटका साहित्य जप्त झाले. दुसऱ्या छाप्यात, कास्ती नागुर रस्त्यावरील पत्र्याच्या शेडसमोर तात्याराव उमाजी राठोड (वय 40), मधुकर रावसाहेब राठोड (वय 30), महादेव इंद्रजीत गायकवाड (वय 52), गौतम तात्याराव भंडारे (वय 65), शाहुराज दगडू वाघ (वय 50), कल्याण पणु वाळके (वय 60) आणि विशाल गोविंद आबेकर (वय 30, सर्व रा. कास्ती) यांच्याकडून तिरट मटका साहित्यासह 3,600 रुपये जप्त. दोन गुन्हे नोंदवले गेले.

कळंब: एक ठिकाणी छापा, 850 रुपये जप्त

कळंब पोलिसांनी दुपारी 1.01 वाजता ओम मसाले दुकानाशेजारील मोकळ्या जागेत छापा टाकला. रणजित एकनाथ हारकर (वय 40, रा. शिवाजी नगर) याच्याकडून कल्याण मटका साहित्य आणि 850 रुपये जप्त. एक गुन्हा नोंद.

येरमाळा: एक ठिकाणी छापा, 10,240 रुपये जप्त

येरमाळा पोलिसांनी दुपारी 4.55 वाजता सिद्धार्थ नगरात कारवाई करत महेश राजू कांबळे (वय 22, रा. सिद्धार्थ नगर) याच्याकडून कल्याण मटका साहित्य आणि 10,240 रुपये जप्त केले. हा जिल्ह्यातील सर्वात मोठ्या रकमेच्या जप्तींपैकी एक प्रकरण आहे. एक गुन्हा नोंद.

तुळजापूर: मिलन नाईट मटक्यावर कारवाई, 1,470 रुपये जप्त

तुळजापूर पोलिसांनी रात्री 7.50 वाजता मलबा हॉस्पिटलसमोर छापा टाकला. बालाजी गणेश पवार (वय 36, रा. वासुदेव गल्ली) याच्याकडून मिलन नाईट मटका साहित्य आणि 1,470 रुपये जप्त. एक गुन्हा नोंद.

नळदुर्ग: तिरट मटक्यावर पकड, 2,300 रुपये जप्त

नळदुर्ग पोलिसांनी दुपारी 4.00 वाजता इटकळ ते बाभळगाव रोडवरील नागोबा मंदिरामागे छापा टाकला. हरी धोळोबा लकडे (वय 50), राजू नेहरु महानुरे (वय 50), विजय जीवन माशाळकर (वय 48), मुसा बंदेनवाज शेख (वय 50), अहमद जहांगीर मकानदार (वय 46) आणि अमीर गफुर मुजावर (वय 47, सर्व रा. इटकळ) यांच्याकडून तिरट मटका साहित्य आणि 2,300 रुपये जप्त. एक गुन्हा नोंद.

मुरुम: एक ठिकाणी छापा, 870 रुपये जप्त

मुरुम पोलिसांनी सायंकाळी 6.30 वाजता काळा लिंबाळा येथे पत्र्याच्या शेडसमोर संजय नारायण बिराजदार (वय 58) याच्याकडून कल्याण मटका साहित्य आणि 870 रुपये जप्त. एक गुन्हा नोंद.

धाराशिव शहर: मुंबई मेन बाजार मटक्यावर कारवाई, 660 रुपये जप्त

धाराशिव शहर पोलिसांनी रात्री 8.30 वाजता धाराशिव ते सांजा रोडवरील प्रकाश किरणा स्टोअर्ससमोर छापा टाकला. श्रीकांत भिमराव गायकवाड (वय 32, रा. राघुचीवाडी) याच्याकडून मुंबई मेन बाजार मटका साहित्य आणि 660 रुपये जप्त. एक गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

ही कारवाई जुगारविरोधी मोहिमेतील एक महत्त्वाचा टप्पा ठरली असून, स्थानिक नागरिकांनीही पोलिसांच्या या प्रयत्नांचे स्वागत केले आहे. जुगाराच्या जाळ्याला खीळ घालण्यासाठी पोलिस आणि समाजाने एकत्र येण्याची गरज आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे.


धाराशिव जिल्ह्यात युवक महोत्सव ८ व ९ सप्टेंबर रोजी जवाहर महाविद्यालयात

धाराशिव, दि. २१ ऑगस्ट: डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जिल्हानिहाय युवक महोत्सव यंदापासून धाराशिवसह चारही जिल्ह्यात आयोजित केला जाणार आहे. धाराशिव जिल्ह्यात हा महोत्सव ८ व ९ सप्टेंबर रोजी अणदूर येथील जवाहर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात होणार आहे.

युवक महोत्सवाच्या तयारीसाठी कुलगुरु डॉ. विजय फुलारी यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच सल्लागार समितीची बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीस कुलसचिव डॉ. प्रशांत अमृतकर, संचालक डॉ. वैशाली अंभुरे तसेच सल्लागार समितीचे सदस्य उपस्थित होते. बैठकीत महोत्सवाच्या आयोजनाबाबत सर्व मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी ठरवण्यात आले की, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि धाराशिव जिल्ह्यातील युवक महोत्सव संपल्यानंतर लगेच केंद्रीय युवक महोत्सव विद्यापीठाच्या मुख्य कॅम्पसमध्ये घेण्यात येईल. जिल्हास्तरीय महोत्सवात गुणानुक्रमे पहिले तीन संघ केंद्रीय महोत्सवात सहभागी होतील.

जिल्हानिहाय वेळापत्रकानुसार, धाराशिव जिल्ह्यातील ९२ महाविद्यालयांचे संघ जवाहर महाविद्यालय, अणदूर येथे सहभागी होतील. महोत्सवाचे आयोजन सहा गटांत करण्यात येईल, ज्यात एकूण २८ कलाप्रकार सादर केले जातील. यामध्ये शोभायात्रा हा स्वतंत्र कलाप्रकारही समाविष्ट आहे.

कलाप्रकाराचे विभागवार वितरण पुढीलप्रमाणे आहे:

  • संगीत विभाग (१० प्रकार): भारतीय शास्त्रीय गायन, भारतीय शास्त्रीय वाद्य संगीत, भारतीय शास्त्रीय वाद्य संगीत (स्वरवाद्य), नाटयसंगीत, भारतीय सुगम संगीत, भारतीय समूहगान, भारतीय लोकसंगीत वाद्यावृंद, पाश्चिमात्य गायन, पाश्चिमात्य वाद्य संगीत, पाश्चिमात्य समूहगाय.
  • नृत्य विभाग: भारतीय शास्त्रीय नृत्य, भारतीय लोकसमूह नृत्य.
  • नाट्य विभाग: एकांकिका, प्रहसन, नक्कल, मूक अभिनय.
  • वाङ्मय विभाग: वादविवाद, प्रश्नमंजूषा, वक्तृत्व.
  • ललित कला विभाग: स्थळचित्र, चिकटकला, पोस्टर मेकिंग, मातीकला, व्यंगचित्रे, रांगोळी, स्थळ छायाचित्रण, इंस्टालेशन, लघुचित्रपट.

युवक महोत्सवानंतर लोककला महोत्सव जानेवारीत घेण्याचा निर्णय घेतला आहे. या महोत्सवात पोवाडा, भारुड, वासुदेव, गोधळ, भजन, लोकगीत, लोकनाट्य, जलसा, कव्वाली, लावणी, कवितावाचन, शोभायात्रा या १२ कलाप्रकार सादर होतील.

नोंदणी प्रक्रिया:
शैक्षणिक वर्ष २०२५-२६ चा जिल्हा युवक महोत्सव ८ ते ३० सप्टेंबर दरम्यान आयोजित केला जाईल. सर्व विद्यार्थी, कलावंत, साथीदार व संघप्रमुखांनी २१ ते ३१ ऑगस्ट २०२५ दरम्यान ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणीसह सर्व कागदपत्रे जोडून ३ सप्टेंबरपर्यंत हार्ड कॉपी हरिश्चंद्र साठे, विद्यार्थी विकास विभाग यांच्याकडे जमा करावी, असे संचालक डॉ. वैशाली अंभुरे यांनी स्पष्ट केले.

या महोत्सवातून युवकांमध्ये कला, संस्कृती व सृजनशीलतेचा प्रसार होईल, तसेच विद्यापीठस्तरीय व केंद्रीय स्तरावरील स्पर्धात्मक संधी मिळणार आहेत.

उपस्थित महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व:

  • जवाहर महाविद्यालयाचे प्राचार्य: डॉ. उमाकांत चन्नशेड्डी
  • व्यवस्थापन परिषद सदस्य: डॉ. अंकुश कदम

करजखेडा दुहेरी हत्याकांड: मृतांचे नातेवाईक आणि 18 ग्रामपंचायतींनी आरोपीला फाशीच्या शिक्षेची केली मागणी

धाराशिव, 21 ऑगस्ट 2025:
मौजे करजखेडा ता. धाराशिव येथील दि. 13/08/2025 रोजी घडलेल्या दुहेरी हत्याकांडामुळे परिसरात मोठा आक्रोश आहे. या घटनेत मौजे धानुरी येथील मुलगी प्रियंका सहदेव पवार व जावई सहदेव पवार यांची क्रूर हत्या करण्यात आली होती. मृतांचे नातेवाईक आणि स्थानिक नागरिकांनी आरोपींवर कडक कारवाईची मागणी करत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली.

या प्रकरणी 18 ग्रामपंचायतींच्या कार्यालयांनी ठराव घेऊन, आरोपीला फाशीची शिक्षा लागू करण्यासाठी आणि महत्त्वपूर्ण मकोका लागू करण्यासाठी जेष्ठ विधिज्ञ उज्वल निकम यांची नियुक्ती करण्याची विनंती जिल्हाधिकारी कार्यालयास केली आहे.

ठराव देणाऱ्या ग्रामपंचायतींच्या यादीत धानोरी, माकणी, काटी चिचोली, तोरंबा, करवंजी, राजेगाव, एकोंडी लो., कोंडजीगड, मुर्शदपुर, चिंचोली रेबी, होळी, सालेगाव, सास्तुर, खेड, हराळी, हिप्परगा सय्यद, लोहारा खुर्द, तावशीगड या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

सदर ठराव व मागणीची माहिती मुख्यमंत्री , गृहमंत्री, पोलीस महासंचालक, विशेष पोलीस महानिरीक्षक औरंगाबाद परिक्षेत्र, जिल्हा पोलीस अधिक्षक धाराशिव, पोलीस उपअधिक्षक धाराशिव, तहसिलदार साहेब यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे.

ग्रामस्थांचे आणि मृतांचे नातेवाईकांचे म्हणणे आहे की, या घटनेत आरोपींविरोधात तातडीने फास्ट ट्रॅक कोर्टात सुनावणी व्हावी आणि योग्य ती कठोर शिक्षा देण्यात यावी.

राष्ट्रीय आरोग्य अभियान एकत्रीकरण समितीचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

धाराशिव :
दि. १९ ऑगस्ट २०२५ पासून राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) एकत्रीकरण समितीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

दि. १४ मार्च २०२४ रोजी शासनाने NHM अंतर्गत कार्यरत कंत्राटी अधिकारी व कर्मचारी यांना नियमित सेवेत समाविष्ट करण्याचा शासन निर्णय काढला होता. मात्र या निर्णयाची अंमलबजावणी न झाल्याने व मानधनवाढ, लॉयल्टी बोनस, ईपीएफ, विमा संरक्षण, बदली धोरण या महत्त्वाच्या मागण्या अद्याप प्रलंबित असल्याने हा संप पुकारण्यात आला आहे.

आंदोलनामुळे बंद राहणाऱ्या सेवा

या आंदोलनादरम्यान जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्थांतर्गत JSSK, DEIC, RBSK, SNCU, NBSU, रक्तपेढी, डायलेसिस, लसीकरण सत्र, ऑनलाईन व ऑफलाईन अहवाल कार्य पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार असल्याचे समितीने स्पष्ट केले आहे.

मुख्य मागण्या

  • १० वर्षे सेवा पूर्ण झाल्यानंतर नियमित सेवेत समावेश.
  • दरवर्षी सरसकट ८% मानधनवाढ व २०२५-२६ मध्ये १०% वाढ.
  • ३ व ५ वर्ष सेवा पूर्ण झालेल्यांना लॉयल्टी बोनस.
  • १५,५००/- पेक्षा अधिक मानधन असणाऱ्यांसाठी EPF व ग्रॅज्युटी.
  • अपघाती मृत्यू – ५० लाख, अपंगत्व – २५ लाख, औषधोपचार – २ ते ५ लाख इतका विमा संरक्षण.
  • जुन्या व नव्या कर्मचाऱ्यांच्या वेतनातील तफावत दूर करणे.
  • CHO चे मानधन ४०,०००/- करणे.
  • क्षेत्रभेटीच्या कर्मचाऱ्यांना बायोमेट्रिक/फेस रिकग्निशन हजेरीतून सूट.
  • बदली धोरण सर्व NHM कर्मचाऱ्यांना लागू करणे.
  • Hardship Allowance व नक्षलग्रस्त भत्ते लागू करणे.
  • Pay Protection नियमांची अंमलबजावणी.

कर्मचारी संघटनेने स्पष्ट केले की, शासनाने त्वरित कार्यवाही करून निर्णयाची अंमलबजावणी केली नाही, तर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल.

अतिवृष्टीग्रस्त शेती पिकांचे सरसकट पंचनामे करा – आमदार तानाजीराव सावंत यांचे महसूल प्रशासनाला निर्देश

परंडा (दि. २० ऑगस्ट) :
गेल्या काही दिवसांपासून धाराशिव जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात शेतीपिकांचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या या गंभीर परिस्थितीची दखल घेत माजी आरोग्य मंत्री तथा परंडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांनी महसूल प्रशासनाला तात्काळ सरसकट पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.

आमदार सावंत यांनी महसूल प्रशासन तसेच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनीद्वारे संवाद साधत जिल्ह्यातील प्रत्येक महसुली मंडळातील शेतकऱ्यांचे नुकसान नोंदवले जाईल, याची काटेकोरपणे दक्षता घ्यावी, असे स्पष्ट केले. “एकही शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहणार नाही,” असा ठाम इशारा देत त्यांनी महसूल प्रशासनाला कार्यतत्परतेने काम करण्याचे आदेश दिले.

युवासेना तालुका प्रमुख तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आणि कंडारी ग्रामपंचायतीचे सरपंच राहुल डोके यांच्याशी संवाद साधताना आमदार सावंत यांनी कार्यकर्त्यांना शेतकऱ्यांच्या पाठीशी राहण्याचे निर्देश दिले. तसेच जवळा गावातील रस्ता दुरुस्तीची कामे तातडीने करण्याचे आदेशही त्यांनी दिले.

त्यांच्या आदेशानुसार शिवसेना तालुका प्रमुख आण्णासाहेब जाधव, शिवसेना जिल्हा संघटक गौतम लटके, युवासेना तालुका प्रमुख राहुल डोके, शिवसेना तालुका संघटक जयदेव गोफणी यांच्यासह पक्षाचे इतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गावोगावी भेट देऊन पिकांच्या नुकसानीची पाहाणी केली आणि संबंधित माहिती आमदार सावंत यांच्यापर्यंत पोहोचवली.

या पार्श्वभूमीवर बोलताना सावंत म्हणाले, “निवडणुकीपुरते काम न करता आताही तेवढ्याच ताकदीने करा. मतदारसंघातील सर्व रस्ते जे खराब झाले आहेत, ते तातडीने दुरुस्त करा. सरकारकडून निधी मिळेल किंवा नाही, पण आपल्या हातात जे आहे ते काम पूर्ण करा. एकही गट किंवा गण कामाविना राहू नये, याची कार्यकर्त्यांनी खबरदारी घ्यावी.”

तसेच त्यांनी पुढे सांगितले की, “मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून शेतकऱ्यांना मदतीचा निर्णय आम्ही घेऊ. मात्र, आत्ता तुम्ही फक्त पंचनाम्यांची प्रक्रिया वेळेत आणि काटेकोर करा. तलाठी आणि मंडळ अधिकारी प्रत्यक्ष पंचनामे करत आहेत का, याचा आढावा घ्या,” असे त्यांनी महसूल प्रशासनाला बजावले.

धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी अतिवृष्टीच्या फटक्यामुळे संकटात सापडलेले असतानाच, आमदार सावंत यांच्या तातडीच्या आदेशामुळे महसूल प्रशासन आणि शिवसेना कार्यकर्त्यांची हालचाल वाढली आहे. पंचनामे तातडीने पार पडल्यास शेतकऱ्यांना लवकर मदतीचा मार्ग मोकळा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

डॉ. नरेंद्र दाभोळकरांच्या खुनाचे सूत्रधार अद्याप मोकाट,‘अंनिस’च्यावतीने जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

 धाराशिव, दि. 20 –
महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे संस्थापक कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या खुनाला बारा वर्षे पूर्ण झाली, तरी अद्यापि त्यांच्या मारेकर्‍यांना अटक करण्यात आलेले नाही. डॉ. दाभोळकरांच्या खुनाचा तपास सीबीआयकडे होता. सीबीआयने तपासाअंती पुणे येथील विशेष सत्र न्यायालयात दोघांविरूध्द दाखल केलेल्या खटल्यात गुन्हेगारांना शिक्षा ठोठावली. परंतु मुख्य सूत्रधार अद्यापि पकडण्यात आलेले नाहीत. त्यामुळे या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधाराचा शोध घेवून कडक कारवाई करावी, अशी मागणी अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्यावतीने जिल्हाधिकार्‍यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
डॉ. नरेंद्र दाभोळकरांचा खून हा त्यांचे विचार संपविण्यासाठी केलेला एक सुनियोजित कट होता, असे निरीक्षण पुणे येथील सत्र न्यायालयाने नोंदविले आहे. असे असताना देखील त्यामागचे सूत्रधार शोधण्यासाठी शासन कांहीही प्रयत्न करत नाही, ही अत्यंत खेदाची बाब आहे. कॉम्रेड गोविंद पानसरे, प्रा. एम. एम. कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांचे खून खटले देखील अजून सुरू असल्याने या चारही खुनांमागील सूत्रधारांवर कारवाई होऊ शकलेली नाही. जोपर्यंत हे सूत्रधार पकडले जात नाहीत, तोपर्यंत विवेकावादी कार्यकर्त्यांना असलेला धोका कायम आहे. दाभोळकरांच्या खून खटल्यामध्ये वीरेंद्रसिंह तावडे, संजीव पुनाळेकर व विक्रम भावे यांची जी सुटका झाली आहे, त्याविषयी सीबीआय ने उच्च न्यायालयामध्ये दाद मागितली नाही, ही अक्षम्य दिरंगाई आहे. सीबीआयने तातडीने उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करावी, अशी मागणी देखील या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. देशभरातील  वाढत्या बुवाबाजीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर जादूटोणाविरोधी कायदा देशभरात लागू करावा, अशीही मागणी समितीच्यावतीने करण्यात आली आहे. यावेळी अ‍ॅड. देवीदास वडगावकर, रवींद्र केसकर, शितल वाघमारे आदी उपस्थित होते.