Home Blog Page 47

एनव्हीपी शुगर कारखान्याने शेतकऱ्यांचे पेमेंट १६ व्या दिवशी देण्याचे सातत्य ठेवून आदर्श निर्माण केला – खा. राजेनिंबाळकर

धाराशिव दि.१ (प्रतिनिधी) – तालुक्यातील जागजी येथील एन.व्ही.पी. शुगर प्रा. लि. या कारखान्यास गळपासाठी ऊस दिलेल्या शेतकऱ्यांचे बील दर १६ व्या दिवशी त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येते. तर ऊस तोडणी ठेकेदार व मजुर, कर्मचारी यांचे पेमेंट देखील नियमितपणे त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्याचे काम कारखाना सुरू केल्यापासून पहिल्या १६ व्या दिवसांपासून चालू केले आहे. ते बिल व पेमेंट देण्याचे सातत्य कायम ठेवून शेतकऱ्यांना भरोसा व विश्वास देण्याचे महत्त्वाचे काम करण्याबरोबरच इतर कारखान्यांसमोर आदर्श निर्माण केला असल्याचे प्रतिपादन खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी दि.१ मार्च रोजी केले.

धाराशिव तालुक्यातील जागजी शिवारामध्ये असलेल्या एनव्हीपी शुगर प्रा. लि., या कारखान्याने आजपर्यंत १ लाख १ टन उसाचे गाळप केले आहे. तर त्यापासून ३० किलो वजनाच्या ४ लाख ९१ हजार गुळ पावडर पोत्यांचे पूजन खा राजेनिंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आप्पासाहेब पाटील, कारखान्याचे अध्यक्ष नानासाहेब उर्फ बालाजी पाटील, सी.ए. सचिन शिंदे, तेली समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवि कोरे आळणीकर, राजाभाऊ देशमुख, अक्षय पाटील, प्रशासकीय अधिकारी सुनिल लोमटे, चिफ इंजिनिअर अविनाश समुद्रे, मुख्य शेतकी अधिकारी जयवंत रोहिले, मे.चिफ केमिस्ट बिक्कड, पॅन इन्चार्ज राजेंद्र शिंदे, नरसिंह मोरे, समाधान शिंदे आदी उपस्थित होते. पुढे बोलताना खा. राजेनिंबाळकर म्हणाले की, एनव्हीपी शुगर कारखान्याच्या माध्यमातून आजपर्यंत १ लाख १ टन शेतकऱ्यांच्या उसाचे यशस्वी गाळप करण्याचे काम झाले आहे. त्याच्यामध्ये आनंदाची दुसरी गोष्ट अशी की ज्या शेतकऱ्यांनी ऊस गळपास घातला. त्या शेतकऱ्यांच्या उसाचे बिल पवनराजे लोकसमृद्धी मल्टीस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी लि., धाराशिव या बँकेतील शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जात आहे. विशेष म्हणजे काल दि.२९ फेब्रुवारीपर्यंत जो
ऊस गाळप करण्यात आला. त्या उसाचे बिलाची रक्कम देखील संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर दुसऱ्या दिवशीच जमा झाली असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. तसेच पेमेंट देण्याचा देखील या कारखान्याने क्रम ठरविला असून प्रथम क्रम ऊस उत्पादक शेतकरी तर दुसरा क्रम ऊस तोडणी करणारे ठेकेदार व ऊस तोड मजूर तसेच तिसरा क्रम सर्व कामगारांचा ठेवला असून चौथा क्रम कारखानदाराचा असल्याचा त्यांनी सांगितले. यावेळी खा राजेनिंबाळकर यांनी कारखान्यातील वेगवेगळ्या प्लांटची प्रत्यक्ष पत्रकारांसमवेत पाहणी केली.‌ यावेळी कारखान्याचे सभासद, ऊस उत्पादक शेतकरी, कामगार यांच्यासह जागजी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

……………………………

२८ ऑक्टोबर २०२३ पासून कारखान्याचे गाळप सुरू केले असून आजपर्यंत १ लाख २ टन उसाचे गाळप या कारखान्याच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी या कारखान्यास गाळपासाठी दिलेल्या उसाचे बिल १६ व्या दिवशी संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्याचे काम सातत्याने केले जात आहे. पहिल्यापासून शेतकऱ्यांना प्राधान्य दिले असून उसास २ हजार ८०० रुपये दर दिला असून शेतकऱ्यांनी देखील या कारखान्यास ऊस देऊन चांगले सहकार्य केले असल्याचे कारखान्याचे चेअरमन नानासाहेब उर्फ बालाजी पाटील यांनी सांगितले. तसेच २५ मार्चपर्यंत कारखाना पूर्ण क्षमतेने चालणार आहे. विशेष ज्या कालपर्यंत गळपासाठी ऊस दिलेला आहे, त्या सर्व शेतकऱ्यांचे बिल पवनराजे लोकसमृद्धी मल्टीस्टेट को- ऑफ सोसायटी लि., या बँकेमध्ये जमा करण्यात आले असून त्या बँकेत जाऊन शेतकऱ्यांनी ती रक्कम उचलावी. तसेच शेतकऱ्यांनी देखील आपला ऊस या कारखान्यास गाळपासाठी देऊन सहकार्य करावे, असे आवाहन देखील पाटील यांनी केले

रेल्वे मार्गाच्या भुसंपादनातील चुकीचे निवाडे दुरुस्त करुन सबंधितावर कारवाई करण्याची आमदार कैलास पाटील यांची महसुलमंत्र्यांकडे मागणी


धाराशिव – धाराशिव तुळजापुर-सोलापुर रेल्वे प्रकल्पा अंतर्गत मार्गातील भुसंपादनाचे चुकीचे निवाडे करणाऱ्या अधिकार्‍यावर निलंबनाची कारवाई करावी तसेच चुकीच्या पध्दतीने केलेले निवाडयाची दुरुस्ती करुन सुधारीत निवाडा करण्याची मागणी आमदार कैलास पाटील यांनी महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेऊन त्यांच्याकडे केली आहे. यावर मंत्रीमहोदय त्यावर विभागीय आयुक्त यांना अहवाल देण्याचे लेखी आदेश दिले आहेत.
धाराशिव-तुळजापुर-सोलापुर रेल्वे प्रकल्पासाठी बांधीत शेतकऱ्यांच्या (धाराशिव व तुळजापुर तालुक्यातील) गावाचे निवाडे जाहिर करण्यात आले आहेत. त्यात गावातील २०१८ ते २०२१ मधिल जमिन खरेदी विक्री व्यवहार ग्रहित धरताना फक्त उच्चतम रकमेचे व्यवहार हे अवाजवी दर व ४० गुंठयापेक्ष कमी या कारणामुळे वगळण्यात आले आहेत. वगळण्यात आलेले व्यवहार हे भुसंपादन अणि पुनर्वसन कायद्यामधील नियमांच्या तरतुदीचे उल्लंघन ठरत आहे.जमिनीचे सरासरी मुल्यांकन फारच कमी झाले असुन एकुण द्यायचा मावेजा जमिनीच्या चालु बाजार भावापेक्षा कितीतरी कमी झाला आहे. जाहीर केलेले अंतिम निवाडे यांच्यातील मोबदला व प्रारुप निवाडे यामध्ये बराच मोठी तफावत असुन परिणामी शेतकऱ्यांना मोबदला खुपच कमी मिळत आहे. या निवाडयामध्ये बागायत जमिनीस जिरायती जमिनीचे दर दिलेआहेत. जमिनीतील पाईपलाईन, विहिर, विंधन विहीर, फळबाग, पत्रा शेड यांचेही मुल्यांकन कमी केलेले आहे. या अन्यायकारक व बेकायदेशिर निवाडयाची चौकशी करावी, निवाडयामध्ये करण्यात आलेल्या गंभीर चुकांची दुरुस्ती करुन सुधारीत निवाडे करावेत अशी मागणी केली आहे. तसेच अशी बेकायदेशीर व चुकीचे निवाडे करणार्‍या अधिकार्‍यांना शासन होण्याची अपेक्षा आमदार कैलास पाटील यांनी केली आहे. यापुढेही जिल्ह्यातुन मोठे प्रकल्प तसेच मार्ग जाणार आहेत. त्यांच्यावर आताच कारवाईचा बडगा उगारला तर भविष्यात या यंत्रणेकडून अशी बेकायदेशीर प्रक्रीया होणार नाही त्यामुळे या अधिकार्‍यांचे तात्काळ निलंबन करावे अशी आग्रही मागणी आमदार पाटील यांनी महसुलमंत्री विखे पाटील यांच्याकडे केली आहे.

बेछूट आरोप करायचे बंद करा अन्यथा जशास तसे उत्तर देऊ, टेबल लावून टक्केवारी गोळा करतानाचा व्हिडिओ योग्य वेळ आल्यावर दाखवू – सतिषकुमार सोमाणी

धाराशिव – भाजप आणि शिवसेनेतील(उबाठा)१७४ कोटींच्या विकासकामांच्या उद्घटनावरून सुरू झालेल्या आरोपांच्या फैरी अद्याप थांबलेल्या नाहीत त्याचा पुढचा अंक आज तालुकाप्रमुख सतिषकुमार सोमाणी यांनी केलेल्या टिकेवरून दिसून आला त्यालाही भाजपकडून लागलीच प्रत्युत्तर दिल्याने हा सिलसिला निवडणुका होईपर्यंत थांबणार नसल्याचे चित्र आहे. दरम्यान भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केलेल्या आरोपांवर बेछूट आरोप करायचे बंद करा अन्यथा जशास तसे उत्तर देऊ असा इशारा सतिषकुमार सोमाणी यांनी दिला. तसेच येत्या काळात योग्य वेळ आल्यानंतर टेबल लावून टक्केवारी गोळा करतानाचे व्हिडिओ देखील दाखवू असे सोमाणी यावेळी म्हणाले.
धाराशिव जिल्ह्याच्या विकासाच्या नावाखाली डॉ.पद्मसिंह पाटील हे अब्जाधीश खासदारांच्या यादीत तिसर्‍या क्रमांकावर आले, परंतु धाराशिव जिल्हा आकांक्षित जिल्ह्याच्या यादीत तिसर्‍या क्रमांकावर आला. अशा कर्तृत्त्ववान नेत्याचे लांगूलचालन करण्याचे काम भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे हे करत आहेत. डॉ.पद्मसिंह पाटील यांनी धाराशिव येथे मंजूर  झालेले वैद्यकीय महाविद्यालय स्वतःच्या संस्थेच्या घशात घातले. सुतगिरणी, कुकुट्टपालन उद्योगही बुडविले. हजारो बेरोजगारांचा रोजगार बुडवून विकासाची भाषा करणार्‍या आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी जनाची नाही तरी मनाची लाज बाळगावी, त्यांच्या या कामाची कीव येत असल्याचेही  सोमाणी म्हणाले.

सोमनाथ गुरव यांनी लावला तो व्हिडिओ

भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी एका सभेत बोलताना आ. पाटील यांच्यावर टीका करताना मोठ्या आवेशात भाषण करताना फाईव फाईव वन वन या क्रमांकावरून खिल्ली उडवली होती. तोच व्हिडिओ सोमनाथ गुरव यांनी दाखवला. तसेच नगर पालिकेच्या माध्यमातून, आंदोलनाच्या माध्यमातून धाराशिव शहरातील बायपास रोडवरील पर्यायी रस्ता व पथदिवे यासाठी केलेल्या कामाचा पाढा वाचून दाखवला.

गोरगरिबांच्या हक्काचा रेशनाचा गहू व तांदूळ चोरीचे गुन्हे ज्यांच्यावर आहेत त्यांना तालुकाप्रमुख का केलं? आमदार,खासदारांनी उत्तर द्यावे- अभय इंगळे

गोरगरिब नागरिकांना पोटभर अन्न मिळावे यासाठी सरकारने दिलेला रेशनचा तांदूळ व गहू चोरून त्याची विक्री करण्याचे ज्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत अशा व्यक्तीला स्वच्छ चारित्र्याचा नेता म्हणून राज्यभर ओळख असलेल्या राणा दादांवर बोलण्याचा अधिकार आहे का..? हे सगळं माहिती असताना सोमानींना तालुका प्रमुख करण्यामागे खासदार व आमदारांना नेमकं कोणाचं हित साधायचं होत याच त्यांनी उत्तर द्यावे असा घणाघात भाजपचे शहर अध्यक्ष अभय इंगळे यांनी केला आहे.

सोमाणी यांनी पत्र परिषदेत केलेल्या आरोपांना उत्तर देताना इंगळे यांनी त्यांच्यावर रेशनचा माल चोरीचे असलेल्या गुन्ह्याची उजळणी करून देऊन जोरदार प्रतिहल्ला केला आहे.अधिकारी,कंत्राटदार यांच्याकडून टक्केवारी घेणे ही तुमची संस्कृती आहे म्हणत इंगळे यांनी येणाऱ्या निवडणुकीत भाजपाचा सामान्य कार्यकर्ता तुम्हाला तुमची जागा दाखवेल अस म्हटले आहे.

पाच वर्षात धाराशिव शहरात भ्रष्ट कारभार केल्याने शहरातील नागरिकांचे होणाऱ्या हालअपेष्टाला तुमचे नेते जबाबदार असून तुमच्या पक्षाचे मुख्यमंत्री असताना जिल्ह्यातील महत्त्वाचे प्रकल्पांना एक रुपया आणू शकला नाहीत हे तुमचे कर्तृत्व सगळ्या जिल्ह्याला माहीत आहे.तुमच्या नेत्यांनी कोणाकडून किती वसुली केली याची पुराव्यानिशी माहिती लवकरच जनतेसमोर आणली जाईल.

चालू तेरणा कारखाना बंद पाडणे, चालू जिल्हा बँक डबघाईला आणणे हे तुमच्या नेत्यांचे कार्य संबंध जिल्ह्यातील जनतेला माहिती आहे.या पापात तुम्ही देखील भागीदार आहात.महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर जिल्ह्यातील महत्वाचे सर्वच विषय मार्गि लागत आहेत,मोठ्या प्रमाणात सरकार निधी उपलब्ध करून देत आहे म्हणून तुमचा पोटशूळ उठला आहे हे सर्वश्रुत आहे.त्यामुळे इथून पुढे तोंड सांभाळून बोला अन्यथा तुमचे व तुमच्या नेत्यांचे काळे कारनामे लवकरच बाहेर काढले जातील असा इशारा अभय इंगळे यांनी दिला आहे. 

श्रीराम सार्वजनिक वाचनालय भोंजा यांच्या वतीने जि.प. शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

परंडा प्रतिनिधी -भोंजा येथील श्रीराम सार्वजनिक वाचनालय यांच्या वतीने शिवजयंतीचे औचित्य साधून भोंजा जि.प.शाळेतील विद्यार्थ्याना वाचनालयाचे चालक कृष्णा मांजरे सर यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
शिवजयंती निमित्त भोजा जि.प.शाळेतील विद्यार्थ्याच्या विविध स्पर्धा ठेवण्यात आल्या होत्या यात वकृत्व स्पर्धा,पाढे पाठांतर स्पर्धा,रांगोळी स्पर्धा, इंग्रजी शब्द पाठांतर स्पर्धा, शिवजयंती सजावट स्पर्धा या स्पर्धेत विजेत्यां विद्यार्थ्याना कृष्णा मांजरे सर यांच्या वतीने पॅड,कंपास,पेन्सिल,रजिस्टर आदी साहित्याचे वाटप करण्यात आले.पारितोशीक स्विकारल्या नंतर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासारखा होता. मार्गदर्शन पुस्तकाचे उपस्थित पालकांना वाटप करण्यात आले.
यावेळी भोंजा ग्रामपंचायतीच्या सरपंच राणी समाधान कोळी,उपाध्यक्ष नवनाथ नेटके,बिरमल कोंडलकर,खंडू मोरे,हनुमंत जगताप,महादेव काशीद,बाळासाहेब नेटके, पल्लवी सावंत,रणजित नेटके, राजू सुतार आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळासाहेब घोगरे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन अधीकराव शेळवणे सर यांनी कले.कार्यक्रम यशस्वितेसाठी शिक्षिका ज्योती माळी,राऊत मॅडम,सोमनाथ पवार परिश्रम घेतले.

उदघटना नंतरचे उद्घाटन,बारा वाजले तरी उद्घाटन नाही

धाराशिव – केंद्रीय मंत्र्यांनी एखाद्या कामाचे उद्घाटन केले असेल आणि नंतर त्याच कामाचे श्रेय घेण्यासाठी एखादे उद्घाटन करण्याचा प्रकार क्वचितच घडला असेल.
धाराशिव शहरात डी मार्ट जवळ राष्ट्रीय महामार्गावर अंडर पास मंजूर झाला त्याचे आणि इतर कामाचे असे १७४ कोटींच्या कामाचे भूमिपूजन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काल लातूर येथून केले. मात्र शिवसेनेच्या वतीने आज पुन्हा याच कामाचे उद्घाटन करण्याचा घाट घालण्यात आला आहे मात्र बारा वाजले तरी देखील या कामाचे उद्घाटन करण्यासाठी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर आणि त्यांचे सहकारी न आल्याने परिसरातून बोलावलेल्या नागरिकांचा हिरमोड झाला आहे.
खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांना कालच्या कार्यक्रमाचे निमंत्रण होते, कार्यक्रम पत्रिकेवर त्यांचे नाव देखील होते मात्र शहरात असून देखील त्यांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली होती.

शिवसैनिक पुरवतात हट्ट

येणारी लोकसभा त्यापूर्वी सरकारने जनतेच्या मान्य केलेल्या मागण्या यावरून भाजप सरकारने मागणी मान्य केली मात्र याचे श्रेय भाजपाला मिळत आहेत या उद्विग्नेतून खासदारांच्या समर्थकांनी हा कार्यक्रम घेत हट्ट पूर्ण केल्याचे कार्यक्रम स्थळी बोलले जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मिळाले तुतारी चिन्ह

मुंबई – राष्ट्रवादीतील फुटी नंतर अपेक्षित पणे घड्याळ हे चिन्ह अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला मिळाले मात्र ज्यांनी पक्ष स्थापन केला त्या शरद पवार यांच्या पक्षाला कोणते चिन्ह मिळते याची उत्सुकता अनेकांना होती. अखेर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला निवडणूक आयोगाने तुतारी हे चिन्ह दिले आहे. पक्षाच्या वतीने फेसबुक वरील ऑफशियल पेजवर एक पोस्ट करत हे चिन्ह मिळाल्याचे सांगितले आहे.
पोस्ट मध्ये म्हटले आहे की,

“एक तुतारी द्या मज आणुनि
फुंकिन मी जी स्वप्राणाने
भेदुनि टाकिन सगळी गगने
दीर्घ जिच्या त्या किंकाळीने
अशी तुतारी द्या मजलागुनी!”

“महाराष्ट्राच्या इतिहासात छत्रपती शिवरायांच्या शौर्यानं ज्या तुतारीने दिल्लीच्या तख्ताच्याही कानठळ्या बसवल्या होत्या, तीच ‘तुतारी’ आज निवडणूक चिन्ह म्हणून निश्चित होणं ही ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार’साठी गौरवास्पद बाब आहे. महाराष्ट्राचं आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू, आंबेडकरांच्या पुरोगामी विचारांनी, आदरणीय खा. शरदचंद्र पवार साहेबांच्या साथीने दिल्लीच्या तख्ताला हादरवून सोडण्यासाठी हीच ‘तुतारी’ पुन्हा एकदा रणशिंग फुंकण्याकरिता सज्ज आहे!”

चक्काजाम करणाऱ्या ३४ जणांवर गुन्हा दाखल, जमावबंदी शस्त्रबंदीचे उल्लंघन

धाराशिव – छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सुरू असलेल्या चक्काजाम करणाऱ्या सांजा येथील आंदोलकांवर पोलीस प्रशासनाने गुन्हे नोंदवले आहेत.
-बाजीराव बप्पा सुर्यवंशी, रा. सांजा 2) ओम भुजंग सुर्यवंशी, 3)संतोष सुर्यवंशी, 4) अभिजीत काका सुर्यवंशी, 5) सतिश मोहिते, 6) संताजी सुर्यवंशी, 7) बालाजी बप्पा सुर्यवंशी, 8)विशाल मोन्या सुर्यवंशी, 9) सतिश बप्पा सुर्यवंशी, 10) सोहम सुर्यवंशी, 11) काका पाटील, 12) बाळू कदम, 13) सुनिल नाना सुर्यवंशी, 14) नंदु पाटील, 15) प्रशांत सुर्यवंशी, 16) प्रविण कदम, 17) बालाजी सुर्यवंशी, 18) अक्षय पौळे, 19) ज्ञानेश्वर चंद्रकांत सावंत, 20) धर्मराज  आण्णासाहेब सुर्यवंशी, 21) सागर शेळके, 22) अजय सुर्यवंशी, 23) नागेश शिंदे, 24) जिवन जाधव सर्व रा. सांजा, 25) बलराज श्रीमंतराव रणदिवे, रा. म.गांधीनगर, 26) सत्यजित पडवळ, रा. शाहुनगर, 27) निखील जगताप रा. इंगळे गल्ली, 28) मनोज जाधव, रा. मेडसिंगा, 29) अमोल जाधव रा. कारी, 30) अक्षय अंकुश नाईकवाडी, रा कौडगाव, 31) धैर्यशिल बाळासाहेब सस्ते, रा. धाराशिव, 32 हनुमंत यादव, रा. गणेश नगर, 33) अविनाश खानापुरे रा. तांबरी विभाग, 34) व्यंकटेश पडिले रा. बालाजीनगर व इतर 30 ते 40 इसमांनी दि. 15.02.2024 रोजी 11.00 वा. सु. छत्रपती शिवाजी महाराज चौक धाराशिव येथे मराठा समाजाच्या आरक्षाणासाठी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे येणारे जाणारे रोडवर बैलगाडी व ट्रॅक्टर उभे करुन तसेच बैलांना डांबरी रस्त्यावर तिन दिवस उन्हात बांधून त्यांना वेदना होतील असा छळ करुन क्रुरतेने वागणुक देवून बैलगाड्या आडव्या लावून येणारे जाणारे वाहनाना अटकाव करुन मानवाच्या जिवीतास धोका निर्माध होईल अशा स्थितीत बैल रिकामे सोडून सर्व रोड बंद करुन चक्का जाम आंदोलन सुरुच ठेवून मा. जिल्हा अधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी धाराशिव यांचे जमावबंदी व शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन केले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-हनुमंत जालींदर म्हेत्रे, वय 36 पोलीस नाईक 1474 नेमणुक पोलीस ठाणे आनंदनगर यांनी दि.18.02.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो. ठाणे येथे कलम 341,283,188 भा.दं.वि.सं. सह म.पो.का. 119,135 सह कलम 11(1)(क) प्राण्यांना क्रुरतेने वागवण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम 1960 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

रिधोरे येथे रास्ता रोको;टायर पेटवून व्यक्त केला निषेध

रिधोरे/प्रतिनिधी: मराठा आरक्षण मागणीसाठी उपोषणास बसलेल्या मनोज जरांगे-पाटील यांची तब्येत खालावल्याने आता आंदोलन अधिक तीव्र झाले आहे.त्यामुळे बार्शी-कुर्डूवाडी रोडवर रिधोरे येथील सिना नदी पुलावर टायर जाळून सकल मराठा समाजाच्या वतीने निषेध व्यक्त करत रास्ता रोको करण्यात आला.यावेळी रस्त्याच्या दुतर्फा वाहनाच्या लांब रांगा लागल्या होत्या.
मराठा आरक्षणासाठी मराठा समाज अधिक आक्रमक झाला असून सरकारने सगेसोयरे यांचा अध्यादेश पारित करण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावून तत्काळ अंमलबजावणी करावी यासाठी दि.१० फेब्रुवारी पासून मनोज जरांगे पाटील उपोषणास बसलेले आहेत.दरम्यान त्यांची तब्येत खालावली असून या पार्श्वभूमीवर येथील आंदोलकांनी बार्शी- कुर्डूवाडी रोडवर रिधोरे येथे दि.१६ रोजी रात्री ९:३० वा.सिना नदी पुलावर टायर जाळून निषेध व्यक्त केला.

मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठीचा सर्वेक्षणाचा अहवाल मुख्यमंत्र्यांना सुपूर्द

विक्रमी वेळेत, अहोरात्र काम करून सर्वेक्षण पूर्ण केल्याबद्धल कौतुक

इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता कायद्याच्या चौकटीत बसणारे आरक्षण मराठा समाजाला मिळेल-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विश्वास

मुंबई दिनांक १६: राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांनी आज मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठी राज्यभरात घेण्यात आलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुपूर्द केला.
यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. वर्षा येथे आज सकाळी हा अहवाल सुपूर्द करतेवेळी आयोगाचे सदस्य देखील उपस्थित होते. यावेळी आयोगासह संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा अशा साडे तीन ते चार लाख अधिकारी, कर्मचाऱ्यांनी विक्रमी वेळेत सर्वेक्षण केल्याबद्धल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे कौतूक केले. या सर्वेक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांनी बैठका घेऊन युद्ध पातळीवर हे सर्वेक्षण पूर्ण करण्याच्या सुचना दिल्या होत्या.

मराठा समाजाचे सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक मागासलेपण तपासण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगामार्फत २३ जानेवारीपासून राज्यात युद्धपातळीवर मराठा व खुला प्रवर्गाचे सर्वेक्षण करण्यात आले. हे सर्वेक्षण २ फेब्रुवारी रोजी पूर्ण करण्यात आले. राज्यातील अंदाजे अडीच कोटी कुटूंबांचे सर्वेक्षण करण्यात आले. याकामी गोखले इन्स्टिट्युट, आयआयपीएस या नामांकित संस्थेची मदत झाली. विशेष अशा सॉफ्टवेअर प्रणालीच्या माध्यमातून हे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले

मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार प्रत्येक गावात दवंडी पिटवून सर्वेक्षणास नागरिकांनी माहिती देऊन सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले होते, त्यामुळे हे सर्वेक्षण अत्यंत जलदगतीने पार पडले.

या कामकाजाकारिता राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महानगर पालिका आयुक्त यांना नोडल अधिकारी म्हणून नेमण्यात आले होते. तसेच राज्यातील जमीन अधिग्रहण, जमीन धारणा, जमाबंदी, भूमी अभिलेख, तसेच शासकीय व निमशासकीय नोकरीमध्ये समाजाचे प्रमाण व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रमाण इत्यदी बाबींची प्रत्यक्ष माहिती मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखालील सर्व विभागांच्या सचिवानी आयोगाला माहिती उपलब्ध करून दिली. तसेच शारीरिक कष्ट करणाऱ्या कामगारांची माहिती सुद्धा आयोगास उपलब्ध करून देण्यात आली. याव्यतिरिक्त राज्यात मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने मराठा तरुणांच्या आत्महत्याविषयीची सुद्धा माहिती आयोगास उपलब्ध करून देण्यात आली.

कोणत्याही समाजावर अन्याय होणार नाही

यावेळी बोलतांना मुख्यमंत्री म्हणाले की, मराठा समाजाचे सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक मागासलेपण तपासण्यासाठी राज्य शासनाने मागासवर्ग आयोगाला सांगितले होते. साडेतीन ते चार लाख लोक यासाठी दिवसरात्र काम करीत होते. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतांना त्यांनी केलेल्या प्रयत्नांनी मराठा आरक्षण उच्च न्यायालयात टिकले मात्र दुर्दैवाने सर्वोच्च न्यायालयात ते टिकले नव्हते. आज सादर करण्यात आलेला अहवाल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडण्यात येऊन त्यावर चर्चा होईल असेही मुख्यमंत्री म्हणाले.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी अगदी पहिल्यापासून आम्ही सकारात्मक असून तशी पाऊले वेळोवेळी उचलली आहेत. आयोगाने विक्रमी वेळेत सर्वेक्षण पूर्ण केले असून मला विश्वास वाटतो की, कायद्याच्या चौकटीत बसणारे आणि टिकणारे असे आरक्षण ओबीसी किंवा इतर कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न बसता आम्हाला देता येईल.

आंदोलन मागे घेण्याचे आवाहन

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य शासन सर्वोतोपरी प्रामाणिक प्रयत्न करीत आहे. आम्ही सत्तेवर आल्यापासून अनेक ठोस पाऊले उचलली आहे. आयोगाने आज विक्रमी वेळेत आपला अहवालही सादर केला आहे. २० फेब्रुवारीला विधिमंडळाचे विशेष अधिवेशन देखील आम्ही बोलाविले आहे. हे सर्व पाहता आपले आंदोलन आंदोलनकर्त्यांनी मागे घ्यावे असे आवाहन देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.

आज अहवाल देतेवेळी मुख्य सचिव डॉ नितीन करीर, सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे, आयोगाचे सदस्य अंबादास मोहिते, ओमप्रकाश जाधव, मच्छिंद्रनाथ तांबे, ज्योतिराम चव्हाण, मारुती शिंकारे, डॉ गोविंद काळे, डॉ गजानन खराटे, नीलिमा सरप(लखाडे), सदस्य सचिव आ.उ. पाटील उपस्थित होते.

धाराशिव जिल्ह्यात 15 फेब्रुवारी ते 15 मार्च या कालावधीत जमावबंदी व शस्त्रबंदी

धाराशिव – जिल्ह्यात 15 फेब्रुवारी ते 15 मार्च या कालावधीत जमावबंदी व शस्त्रबंदी लागू करण्यात आली असून अपर जिल्हा दंडाधिकारी महेंद्रकुमार कांबळे यांनी याबाबत आदेश काढले आहेत.
याबाबत माहिती अशी की धाराशिव जिल्ह्यात विविध पक्ष संघटना यांचे वतीने त्यांचे मागणी संदर्भात धरणे, मोर्चे, बंद, संप, रस्तारोको, इत्यादी आंदोलनात्मक कार्यक्रम आयोजित आहेत. धाराशिव जिल्ह्यात दिनांक १९ फेब्रुवारी रोजी श्री. छत्रपती शिवाजी महाराज जयंती (शासकीय) उत्सव साजरा होणार आहे. दिनांक २४ फेब्रुवारी रोजी श्री. रोहीदास महाराज जयंती उत्सव साजरा होणार आहे. दिनांक २५ फेब्रुवारी रोजी शब-ए-बरात (बडीरात) हे सण साजरा होणार आहे. दिनांक २७ फेब्रुवारी रोजी श्री महालक्ष्मी देवी मंदिर मोजे चिवरी ता. तुळजापूर येथे यात्रा साजरी होणार आहे, दिनांक ८ मार्च रोजी महाशिवरात्री हे सण / उत्सव साजरा होणार आहे. दिनांक २१ फेब्रुवारी ते दिनांक १९ मार्च या कालावधीत धाराशिव जिल्हयात उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (HSC) परीक्षा फेब्रवारी मार्च 2024 आयोजित आहेत. दिनांक ०१ मार्च ते दिनांक २६ मार्च या कालावधीत धाराशिव जिल्हयात माध्यमिक प्रमाणपत्र (SSC) परीक्षा फेब्रवारी / मार्च-2024 आयोजित आहेत. मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण मिळावे या मागणीसाठी विविध पक्ष / संघटना यांचे कडून आंदोलनात्मक कार्यक्रम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पिकविमा व नुकसान भरपाईची देय रक्कम मिळावी आणि इतर मागण्या अनुषंगाने शेतकरी तसेच विविध पक्ष / संघटना यांच कडून धरणे, मोर्चे, उपोषण, आत्मदहन, बंद, निदर्शने, तालाढोको व रास्तारोको इत्यादी प्रकारचे आंदोलनात्मक कार्यक्रम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्हयात पर्जन्यमान कमी झाल्याने विविध पक्ष / संघटना व शेतकरी संघटना यांचे कडून धाराशिव जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा या मागणीकरीता आंदोलने होत आहेत. धाराशिव जिल्हयात ग्रामीण / शहरी भागात विविध ठिकाणी यात्रा / जत्रा / ऊरुस लहान मोठ्या स्वरुपात साजरे करण्यात येतात. व्यक्ती, व्यक्ती समुह तसेच विविध पक्ष / संघटना यांचे वतीने त्यांच्या विविध मागण्यासाठी अचानकपणे आंदोलनात्मक कार्यक्रम होण्याची शक्यता नाकारता येत नाही तरी वरील प्रमाणे संपन्न होणारे धार्मिक सण उत्सव, कार्यकम व यात्रा जत्रा ऊरुस तसेच आंदोलनात्मक कार्यक्रम धाराशिव जिल्ह्यात शांततेत पार पाडण्याकरिता तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी दिनांक 15 फेब्रुवारी रोजीचे 00:01 पासून ते दिनांक १५ मार्च रोजी 24:00 वाजेपर्यंत जमावबंदी व शस्त्रवंदी आदेश संपुर्ण धाराशिव जिल्ह्यात लागू असणार आहेत

खालील बाबी करण्यास मनाई करण्यात येत आहे

1) शस्त्र, सोटे, काठी, तलवार, बंदूक जवळ बाळगणार नाहीत.

2) लाठ्या, काठ्या, शारिरीक इजा होण्यास कारणीभूत ठरतील, सहज हाताळता येतील, अशा वस्तु
3) बाळगणार नाहीत. कोणतेही दाहक पदार्थ, किंवा स्फोटके जवळ बाळगणार नाहीत.

4) दगड किंवा इतर क्षेत्रपणास्त्रे किंवा फोडवयाची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधे गोळे करुन

ठेवणार नाहीत किंवा बाळगणार नाहीत किंवा तयार करणार नाहीत.

5) आवेशी भाषणे, अंगविक्षेपण, विडंबनात्मक नकला करणार नाही सभ्यता, नितिमत्ता यास बाधा येईल किंवा ज्यामुळे राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा अराजकता माजेल अशी चित्रे, निशाणी, घोषणा फलक किंवा इतर कोणत्याही वस्तु जवळ बाळगणार नाहीत.

6) जाहिरपणे घोषणा करणे, गाणी म्हणने, वाद्य वाजविणे किंवा कोणतीही कृती जे देशाच्या संविधानातील मुल्यांच्या विरुध्द असेल किंवा देशाचा मान व सार्वभौमत्व यांना इजा पोहचवणारी असेल किंवा सार्वजनिक सुरक्षा आणि सामाजिक सलोखा यांना हानी पोहचवणारी असेल आणि जाहिरपणे प्रक्षोभक भाषण व

7) असभ्य वर्तन करणार नाहीत व्यक्तींच्या किंवा शवांच्या किंवा प्रेते किंवा आकृती किंवा त्याच्या प्रतिमा यांचे प्रदर्शन करणार नाहीत.

8) पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तीचा समावेश असलेल्या कोणत्याही जमावास परवानगी शिवाय एकत्र येता येणार नाही किंवा मिरवणुक / मोर्चा काढता येणार नाही,नाहीत.

प्रतिबंधात्मक आदेश हे खालील बाबींकरीता लागू होणार

1 धार्मिक विधी, लग्न सोहळा, सामाजिक सण, शासकीय कार्यक्रम इत्यादी

2) अंत्ययात्रा

3) शासकीय सेवेत तैनात कर्मचारी

4) सार्वजनिक करमणुकीची सिनेमागृह, रंगमंच इत्यादी प्रतिबंधात्मक आदेशाचे काळात कोणताही मोर्चा, मिरवणुका तसेच सभा निवडणूक प्रचार सभेचे

आयोजन करावयाचे झाल्यास संबंधित उपविभागीय दंडाधिकारी यांची लेखी परवानगी घेणे आवश्यक आहे व अशी परवानगी घेतल्यानंतरच उपरोक्त प्रतिबंधात्मक आदेश लागू होणार नाही.