धाराशिव – १० हजाराची लाच घेतल्याप्रकरणी वाशी दुय्यम निबंधक कार्यालयातील संजय भीमराव गडकर, वय-51 वर्षे, यांस धाराशिव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले आहे.
याबाबत माहिती अशी की, तक्रारदार हे वकिल असुन ते बॅांड रायटर म्हणुन काम करतात. तक्रारदार यांचे अशील यांचे कडकनाथवाडी, तालुका वाशी येथील 02 ठिकाणच्या जमिनीचे खरेदीखत करुन दस्त नोंदणी करुन देण्यासाठी आलोसे संजय भीमराव गडकर, वय-51 वर्षे, धंदा-नोकरी, पद-कनिष्ठ लिपीक प्रभारी दुय्यम निबंधक, दुय्यम निबंधक कार्यालय, वाशी, जिल्हा-धाराशीव याने तक्रारदार यांच्याकडे पंचांसमक्ष 02 दस्तचे प्रत्येकी 5000/- रुपये प्रमाणे एकुण 10,000/- रुपये लाचेची मागणी करून 10,000/- रु. लाच रक्कम स्वतः स्वीकारली असता आलोसे यास ताब्यात घेण्यात आले असुन पोलीस स्टेशन वाशी, ज़िल्हा धाराशिव येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालु आहे.
सापळा पथकात पोलीस अमलदार स.फौ. इफ्तेकार शेख, दिनकर उगलमुगले, सचिन शेवाळे यांचा समावेश होता तर सापळा अधिकारी सिध्दाराम म्हेत्रे, पोलीस उप- अधीक्षक हे होते.
१० हजाराची लाच घेतली, दुय्यम निबंधक कार्यालयातील प्रभारी कनिष्ठ लिपिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या ताब्यात
जात पडताळणी प्रमाणपत्राची डिजिटल ऑनलाईन सही असलेली प्रिंट देण्याकरीता ३२०० लाच घेतली, दोघांवर कारवाई
धाराशिव –
जात पडताळणी प्रमाणपत्राची डिजिटल ऑनलाईन सही असलेली प्रिंट देण्याकरीता ३२०० घेतल्याप्रकरणी,
जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालय, धाराशिव येथील प्रकल्प सहाय्यक आणि एका खाजगी इसमावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे. याबाबत माहिती अशी कीयातील तक्रारदार यांनी त्यांचे मुलाचे जात पडताळणी प्रमाणपत्र मिळणेकरीता जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालय, धाराशीव येथे अर्ज दिला होता. यातील इलोसे, बुध्दभुषण दिलीपराव माने, प्रकल्प सहाय्यक, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालय, धाराशीव यांनी तक्रारदार यांचे मुलाचे जात पडताळणी प्रमाणपत्राची डिजिटल ऑनलाईन सही असलेली प्रिंट देण्याकरीता तक्रारदार यांच्याकडे पंचांसमक्ष 3200/- रुपये लाचेची मागणी करून सदरची लाच रक्कम खाजगी इसम शाहबाज शफीक सय्यद, यांचे मार्फतीने स्वीकारली असता इलोसे व खाजगी इसम यांना ताब्यात घेण्यात आले असुन पोलीस स्टेशन आनंदनगर, ज़िल्हा धाराशिव येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालु आहे.
सापळा पथकात पोलीस अमलदार मधुकर जाधव , विशाल डोके, सचिन शेवाळे, अविनाश आचार्य, नागेश शेरकर यांचा समावेश होता तर सापळा अधिकारी म्हणून -विकास राठोड, पोलिस निरीक्षक, ला. प्र. वि. धाराशिव यांनी काम पाहिले.
अमृत 2.0 योजनेअंतर्गत उमरगा शहरातील नवीन पाणीपुरवठासाठी 185 कोटी रू. मंजुर आमदार ज्ञानराज चौगुले यांची माहिती
उमरगा शहरातील नागरिकांना माकणी धरणातून पाइपलाइन द्वारे पाणी येते. परंतु मागील काही वर्षांपासून ही पाईपलाईन फुटल्यामुळे जागोजागी पाणी वाया जात होते. व पाइपलाइन फुटली की शहरातील नागरिकांना पाणीपुरवठा करण्यासाठी उशीर होत होता.
यामुळे आमदार ज्ञानराज चौगुले हे उमरगा शहराला नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर व्हावी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सतत पाठपुरावा करत होते. अखेर या पाठपुराव्यास यश आले असून
महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाने दि.15 रोजी या प्रकल्पास प्रशासकीय मान्यता दिली आहे. या केंद्र शासन पुरस्कृत अटल 2.0 अमृत अभियान अंतर्गत उमरगा शहरातील पाणीपुरवठा प्रकल्पासाठी सुमारे 185 कोटी रुपयांचा निधी झालं आहे. यामध्ये प्रकल्प किमतीच्या 50 टक्के हिस्सा केंद्र शासन, 45 टक्के हिस्सा राज्य शासन व 5 टक्के हिस्सा नगर परिषद भरणार आहे. सदर निधीतून माकणी ते उमरगा नव्याने पाइपलाइन व शहरात अंतर्गत नवीन पाइपलाइनची कामे होणार आहेत. यामुळे उमरगा शहरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असुन भविष्यात उमरगेकरांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार नाही. उमरगा शहरातील हद्दवाढ भागातील नागरिकांना याचा मोठा लाभ होणार आहे.
सदर कामासाठी निधी मंजुर केल्याबद्दल आमदार ज्ञानराज चौगुले यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार , पालकमंत्री तानाजी सावंत तसेच सदरकामी वेळोवेळी मार्गदर्शन केल्याबद्दल मा.खासदार प्रा. रविंद्र गायकवाड सर यांचे आभार मानले आहेत.
येडेश्वरी यात्रेच्या तयारीसाठी उपविभागीय अधिकारी संजय पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न

येरमाळा प्रतिनिधी :अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत आई तुळजाभवानी ची धाकटी बहीण म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र येरमाळा येथील आई येडेश्वरी देवीची चैत्र यात्रा महोत्सव ता. २२ एप्रिल पासून सुरू होत असून महाराष्ट्रासह पर राज्यातून लाखो भाविक येरमळ्यात दाखल होतात. भाविक यात्रा काळात येरमळ्यात मुक्कामी असून यांच्या सोयीसुविधा साठी देवस्थान ट्रस्ट, ग्रामपंचायत कार्यालाय व विविध विभगांच्या प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यासाठी आढावा बैठक घेण्यात आली.
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेची धाकटी बहीण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री येडेश्वरी देवीची चैत्र यात्रा २२ एप्रिल पासून सुरू होत असून या यात्रा दरम्यान देवीच्या दर्शनासाठी तसेच चुन्याच्या रानातली चुनखडी वेचण्यासाठी महाराष्ट्रासह कर्नाटक व परराज्यातून जवळपास १० ते १५ लाख भाविक येरमाळा नगरीत दाखल होतात.
या यात्रेच्या पूर्ववत तयारीच्या अनुषंगाने येडेश्वरी मंदिर ट्रस्ट. ग्रामपंचायत कार्यालय. पोलीस प्रशासन, महावितरण व आरोग्य विभागाची तयारी करण्यासाठी येणाऱ्या यात्रा काळात सर्व सुखसोयीयुक्त यात्रा पार पाडण्यासाठी, तसेच सध्याची दुष्काळ सदृश्य परिस्थिती पाहता भाविकांना पिण्याच्या पाण्याची कमतरता भासू नये यासाठी जिल्हा परीषद पाणी पुरवठा विभाग टँकर ने पाणी पुरवठा करणार असून चोराखळी साठवण तलाव, मलकापूर साठवण तलाव येथून पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. तसेच काही खाजगी टँकर मालक, समाजसेवी संस्था, सामाजिक बांधिलकी जोपासनारे व्यक्ती, व गावकरी यांच्या मार्फत देखील पाण्याची सोय करण्यात येणार आहे.
यात्रेच्या सुरक्षते च्या दृष्टीने चोख बंदोबस्त ठेवण्यासाठी पोलीस अधिकारी यांनीही सर्व तयारी करण्यात येणार आहे असे सांगितले.
देवस्थान ट्रस्ट कडून देखील यात्रेची तयारी करण्यात येत असून देवस्थान ट्रस्ट च्या विहिरीचे पाणी भाविकांना पीण्यासाठी वापरन्यात येणार आहे. तसेच मलकापूर साठवण तलावाचे पाणी मंदिरा जवळ असलेल्या दत्त कल्लोळ यामध्ये सोडण्यात येणार आहे.
चैत्र पौर्णिमा यात्रेच्या निमित्ताने उपविभागीय दंडाधिकारी संजय पाटील साहेब यांच्या अध्यक्षतेखाली येरमाळा ग्रामपंचायत येथे प्रशासकीय आढावा बैठक पार पडली.
चैत्र पौर्णिमेच्या २२ एप्रिल पासून सुरु होणाऱ्या यात्रेनिमित्त संबंधित सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते व यात्रा नियोजनबद्ध पार पाडण्यासाठी आणखीन दोन-तीन मीटिंग घेण्याचे उपविभागीय अधिकारी पाटील साहेब यांनी संबंधित प्रशासनास सांगितले, यावेळी तहसीलदार अवधाने साहेब, बीडिओ चकोर साहेब नैसर्गिक आपत्ती जिल्हा व्यवस्थापन अधिकारी व सर्व विभागाचे संबंधित अधिकारी, ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच,प्रशासन, पत्रकार व गावातील नागरिक उपस्थित होते.
भाजपा अध्यात्मिक समन्वय आघाडीच्या संयोजकपदी ज्ञानेश्वर बोधणे
सलगरा,दि.१४ (प्रतिनिधी) – भारतीय जनता पार्टी अध्यात्मिक समन्वय आघाडीची धाराशिव जिल्हा कार्यकारिणी नुकतीच जाहीर झाली आहे. या मध्ये सलगरा दिवटी येथील ज्ञानेश्वर शरणाप्पा बोधणे यांची अध्यात्मिक समन्वय आघाडीच्या संयोजक पदी निवड करण्यात आली आहे. कार्यकारिणी पुढीलप्रमाणे १) संयोजक – ज्ञानेश्वर शरणाप्पा बोधणे, (सलगरा दिवटी, ता.तुळजापूर), २) सहसंयोजक – प्रशांत विलास घोडके, (बलसूर, ता.उमरगा), ३) सहसंयोजक – लखन शहाजी वाघमारे,(बाभळगाव, ता.कळंब) ४) सदस्य – राजेंद्र जाधव, (उमरा, ता.कळंब), ५) सदस्य – भिम सुरवसे,( मुळज,ता.उमरगा), ६) सदस्य – गणपत भोरे, (कार्ला, ता.परंडा), ७) सदस्य – रामभाऊ गुरव, (तांदूळवाडी, ता.परंडा), ८) सदस्य – हरिदास लोखंडे, (तोरंबा, ता.धाराशिव), ९) सदस्य – श्रावण आदटराव (करजखेडा, ता.धाराशिव), १०) सदस्य – जिवनसिंह ठाकूर (मांडवा, ता.वाशी), ११) सदस्य – विष्णुपंत मुंडे, (अणदूर,ता.तुळजापूर), १२) सदस्य – महावीर कासार, (तुळजापूर) १३) सदस्य – प्रभाकर नेलवडे (कोंडजीगड, ता.लोहारा) विशेष म्हणजे येत्या काही दिवसात येऊ घातलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आपल्याला चांगले काम करून दाखविण्याची संधी मिळाली आहे, या संधीचे सोने करण्याची जबाबदारी या कार्यकारिणीवर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विचार सर्वत्र पोहोचवण्याबरोबरच जनजागृती करत आपण सर्व मिळून एकजुटीने खूप चांगले उपक्रम, कार्यक्रम घडवून आणण्याचा प्रयत्न करूया, असे ज्ञानेश्वर बोधणे हे बोलताना म्हणाले.
या झालेल्या निवडीबद्दल आमदार राणाजगजितसिंह पाटील, मा.आ.सुजितसिंह ठाकूर, जिल्हा अध्यक्ष संताजीराव चालुक्य, मिलिंद पाटील, नितीन काळे, प्रवीण पाठक, रामचंद्र कुलकर्णी, विकास कुलकर्णी, संतोष बोबडे, प्रभाकर मुळे यांनी सर्व नुतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
ईव्हीएम मशिनचे क्षमतेपेक्षा जास्त उमेदवारी अर्ज प्राप्त झाल्यास EVM मशिनद्वारे निवडणूक घेणे अडचणीचे ठरणार जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी निवडणूक आयोगाला मागविले मार्गदर्शन
धाराशिव – जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीची पूर्वतयारी झालेली असतानाच संभाव्य अडचणीच्या स्थितीबाबत जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी एस.चोक्कलिंगम यांना पत्र लिहीत मार्गदर्शन मागविले आहे.
सद्यस्थितीत महाराष्ट्रात मराठा समाजास इतर मागासवर्ग संवर्गातून आरक्षण देणेचे अनुषंगाने उपोषण, रास्ता रोको आयोजित केले जात आहेत, त्यातच मराठा समाजास इतर मागासवर्ग संवर्गातून आरक्षण दिले जात नसल्याने मराठा समाजातील नागरीक नाराजीने आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ मध्ये जास्तीत जास्त लोकसभा सदस्य पदासाठी नामनिर्देशन दाखल करण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे झाल्यास EVM मशिनचे क्षमतेपेक्षा जास्त उमेदवारी अर्ज प्राप्त झाल्यास EVM मशिनद्वारे निवडणूक घेणे अडचणीचे ठरणार आहे.
मतपत्रीका व मतपेट्यांचा वापर करुन निवडणुक घ्यावयाची झाल्यास त्यासाठी अपुरे मनुष्यबळ, मतपेट्या अनुपलब्धता अशा प्रकारच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागणार आहे. त्याशिवाय मतपत्रीकेवर उमेदवारांच्या संख्या वाढल्यास मतपत्रीकाही तीतकीच मोठ्या आकाराची होणार आहे व त्याची घडी घातल्यानंतर मतपेटीमध्ये जास्त जागा व्यापली जाणार आहे व त्यामुळे मतपेट्या देखील मोठ्या प्रमाणात लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. मतपेट्यांची संख्या वाढल्यास मतदान केंद्रात नियुक्त करावयाचे मतदान अधिकारी/कर्मचारी यांचे संख्येत तसेच सदर निवडणूक साहित्य मतदान केंद्रावर पाठविणे व स्ट्रॉग रुम मध्ये जमा करणेसाठी अतिरिक्त वाहनांची आवश्यक्ता भासणार आहे. त्याच प्रमाणे निवडणूका झाल्यास मतमोजणी पावेतो मतपेट्या सुरक्षित ठेवणेकामी जागा देखील अपुरी पडणार आहे.
तरी परिस्थितीचे अनुषंगाने आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ ची निवडणूक प्रक्रिया अंमलबजावणी करण्यास येणा-या अडचणी निदर्शनास आणून देत असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी पत्रात म्हटले आहे.
उद्धव ठाकरे यांची धाराशिव जिल्ह्यात जनसंवाद यात्रा;औसा, उमरगा, तुळजापुर,कळंब व भुम येथे धडाडणार तोफ
धाराशिव –
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे धाराशिव लोकसभा मतदार संघात जनसंवाद यात्रा करणार असून या यात्रेत ते 5 ठिकाणी जाहिर सभाव्दारे जनतेस संवाद साधणार आहे या जनसंवाद यात्रेचा दौरा खालील प्रमाणे आहे.
दिनांक 07 मार्च 2024 रोजी खाजगी विमानाने लातूर एअरपोर्ट येथे 12 वाजता पोहोचणार असून त्यानंतर 12.30 वाजता औसा येथे विजय मंगल कार्यालयात सभा घेणार आहेत व त्यानंतर लामजना, किल्लारी, नारंगवाडी पाटी, नाईचाकुर, कासारशिरसी, मुळज मार्गे उमरगा असा प्रवास करणार आहेत दिनांक 07 मार्च रोजी सायं. 4 वाजता उमरगा येथे कै. शिवाजी दादा मोरे क्रीडा संकुल, छत्रपती शिवाजी कॉलेज येथे सभा होणार आहे. यानंतर तुळजापूर येथे संध्याकाळी 7 वाजता डॉ आंबेडकर चौक, तुळजापुर येथे सभा होणार आहे त्यानंतर तुळजापुरची सभा संपल्यानंतर पुष्पक मंगल पार्क, धाराशिव येथे मुक्काम राहणार आहेत.
त्यानंतर दुसऱ्या दिवशी दिनांक 08 मार्च रोजी पुष्पक पार्क, धाराशिव येथून आळणी फाटा, ढोकी येथे स्वागत होणार असून ते कळंबकडे प्रवास करणार असून कळंब येथील मार्केट यार्ड येथे 08 मार्च रोजी सकाळी 11 वाजता सभा होणार आहे व त्यानंतर कळंबहून येरमाळा येथे स्वागत होणार असून कुसळंब, बार्शी बायपास मार्गे परंडा कडे प्रवास करणार आहेत परंडा येथे तालुक्यातील पदाधिकाऱ्यांच्या वतीने स्वागत होणार असून ते परंडयाहून सोनारी कडे प्रवास करणार आहेत त्यानंतर अनाळा ,वालवड मार्गे भूम कडे प्रवास करणार आहेत व भूम येथे दि. 08 मार्च रोजी सायं. 04.00 वा. नगर पालीकच्या समोर चौकात सभा होणार आहे व सभा संपल्यानंतर भुमहून छत्रपती संभाजी नगर एअरपोर्ट कडे प्रवास करणार आहेत अशा प्रकारचा दौरा आहे.
शालेय पोषण आहारावर शाळेचा डल्ला, शासनाची फसवणूक केल्याची तक्रार
शाळेतील विद्यार्थ्यांच्या पटनोंदणी व उपस्थितीचे प्रमाण वाढविण्यासाठी आणि शाळेतील विद्यार्थ्यांची गळती थांबविण्याकरीता सुरू झालेल्या शालेय पोषण आहारावर शाळेनेच डल्ला मारला असून शासनाची फसवणूक केल्याची तक्रार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.
महात्मा गांधी विद्यालय केसर जवळगा ता. उमरगा या शाळेत हा प्रकार घडला असून राजशेखर सिद्रामप्पा चिंचोरे यांनी याबाबत तक्रार केली आहे.
या प्रकरणात भ्रष्टाचार झालेला असल्याने आणि लहान मुलांच्या पोषण आहारावर डल्ला मारून स्वतःच्या स्वार्थासाठी, पैसे मिळवण्यासाठी, लाभासाठी, शासनाला -वरिष्ठांना खोटे अहवाल पाठवून, खोटे पटसंख्या दाखवून, बँकेतील स्टेटमेंट कोणतेही जुळत नसताना देखील त्याबाबतची बिले काढून, स्वतःच्या लाभासाठी संबंधित मुख्याध्यापक, संबंधित गटशिक्षणाधिकारी, संबंधित गटविकास अधिकारी आणि शालेय पोषण आहार व तद संबंधित अधिकारी व कर्मचारी यांनी संघटित रित्या गुन्हेगारी स्वरूपाचा कट आखून शासनाचे नुकसान केले आहे. त्याचप्रमाणे शासनाचे आर्थिक नुकसान केलेले आहे, तसेच लहान मुलांच्या मूलभूत हक्काचा शालेय पोषण आहार त्यांना दिला गेला नाही असे तक्रारीत म्हटले आहे.
भाजपने लोकसभा निवडणुकीचा शड्डू ठोकला, १९५ उमेदवार केले जाहीर, नरेंद्र मोदी वाराणसीतूनच लढणार
लोकसभेच्या निवडणुकीत भाजपने पहिला डाव टाकला असून तब्बल १९५ उमेदवार जाहीर केले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा वाराणासीतून लढणार आहेत, अशी घोषणा भाजपकडून करण्यात आली. भाजपच्या पहिल्या यादीत 34 केंद्रीय आणि राज्यमंत्र्यांची नावे आहेत. दोन माजी मंत्र्यांनाही तिकीट देण्यात आलं आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनाही तिकीट देण्यात आलं आहे. 28 महिलांना यावेळी लोकसभेचं तिकीट देण्यात आल्याची घोषणाही भाजपचे महासचिव विनोद तावडे यांनी केली आहे. भाजपने पहिल्या यादीत सोशल इंजिनिअरींगवर भर दिला आहे. भाजपने वेगवेगळ्या माध्यमातून प्रचाराला यापूर्वीच सुरुवात केली आहे. विरोधकांच्या आघाडीचे जागा वाटप निश्चित होण्यापूर्वी उमेदवार जाहीर करून भाजपने खेळी खेळली आहे.
भाजपचे महासचिव विनोद तावडे, राष्ट्रीय उपाध्यक्ष वैजंत पांडा आणि माध्यम प्रमूख अनिल बलोनी यांनी पत्रकार परिषद घेऊन उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. 16 राज्य आणि 2 केंद्रशासित प्रदेशांतील 195 उमेदवारांची यादी आज घोषित करण्यात येत असल्याचं विनोद तावडे यांनी सांगितलं. या यादीत एकूण 34 केंद्रीय आणि राज्यमंत्र्यांना तिकीट देण्यात आलं आहे. पहिल्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव आहे. मोदींना वाराणासीतून उमेदवारी देण्यात आली आहे. तर अमित शाह हे गांधीनगरमधून लढणार आहेत. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लाही लोकसभा निवडणूक लढणार आहेत. अंदमान निकोबारमधून विष्णू पडारे, अरुणाचल प्रदेश वेस्टमधून किरण रिजीजू, अरुणाचल ईस्टमधून तापीर गांवता निवडणूक लढणार आहेत.
भाजपच्या पहिल्या यादीत विविध राज्यांच्या उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. मात्र, महाराष्ट्रातील उमेदवारांची यादी अद्याप जाहीर झालेली नाही. पहिल्या यादीत उत्तर प्रदेशातील 51, पश्चिम बंगालमधील 26, मध्यप्रदेशातील 24, गुजरातमधील 15, राजस्थानमधील 15, केरळमधील 12, तेलंगनातील 9, आसाममधील 14, झारखंडमधील 11, छत्तीसगडमधील 11, दिल्लीतील 5, जम्मू-काश्मीरमधील दोन, उत्तराखंडमधील तीन, अरुणाचल प्रदेशातील दोन, गोवा, त्रिपुरा, अंदमान आणि निकोबारमधील प्रत्येकी एका उमेदवाराचं नाव आहे.
आरोग्यमंत्री डॉ.तानाजीराव सावंत यांच्या संकल्पनेतून शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना दुसऱ्या टप्पातील सायकलचे वाटप
जिल्हा परिषदेचे मा.उपाध्यक्ष धनंजय सावंत यांच्या हस्ते विद्यार्थीनीना चारशे सायकलचे वाटप
सायकलीमुळे विद्यार्थीनींची शाळेत उपस्थिती वाढून मुलीच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीस मदत होणार आहे – गटशिक्षण अधिकारी अर्जून जाधव
परंडा प्रतिनिधी -आरोग्यमंत्री डॉ.तानाजीराव सावंत यांच्या संकल्पनेतील दुसऱ्या टप्पातील गरजू चारशे विद्यार्थीनीना जिल्हा परिषदेचे मा.उपाध्यक्ष धनंजय सावंत यांच्या हस्ते दि.२ मार्च रोजी गटशिक्षण कार्यालय परंडा येथे सायकलीचे वाटप करण्यात आले.
आरोग्यमंत्री डॉ.तानाजीराव सावंत यांच्या प्रयत्नामुळे परंडा, भूम,वाशी या तीन तालुक्यातील शालेय शिक्षण घेणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांना १००० सायकलीचे वाटप करण्यात येत आसुन यातील पहिल्या टप्प्यात २०० सायकलीचे २५ जानेवारी रोजी विद्यार्थीनीना आरोग्यमंत्री डॉ. तानाजीराव सावंत यांच्या हस्ते वाटप करण्यात आले होते.
उर्वरित आठशे सायकली वाटपास प्रारंभ झाला असून दुसऱ्या टप्प्यात परंडा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या व खाजगी शाळेतील ४०० गरजू विद्यार्थ्यांना सायकली वाटपाला जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांच्या हस्ते सुरुवात करण्यात आली आहे.
सदर सायकली मुळे शाळेत विद्यार्थिनींची उपस्थिती वाढून,मुलींच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीस त्यांच्या चांगला परिणाम होणार असल्याचे गटशिक्षणा धिकारी अर्जुन जाधव यांनी बोलताना सांगितले.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता साळुके,पंचायत समितीचे मा.सभापती गौतम लटके, मा. नगराध्यक्ष जाकीर भाई सौदागर, जयदेव गोपणे,गुलाब शिंदे,विष्णू सांगडे,बालाजी नेटके,मोल नलावडे यांच्या सह पात्र शाळेचे मुख्याध्यापक,केंद्रप्रमुख,पालक व लाभार्थी विद्यार्थ्यांनी उपस्थिती होत्या.