Home Blog Page 37

गंधोरा शिवारात शेतीच्या वादातून मारहाण;15 जणांवर गुन्हे दाखल

सलगरा,दि.19 (प्रतिनिधी) – तालुक्यातील नळदुर्ग पोलीस ठाणे हद्दीतील गंधोरा शिवारात शेतीच्या वादातून झालेल्या मारहाणीत सलगरा-गंधोरा या दोन्ही गावातील मिळून एकूण 15 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणी गंधोरा येथील फिर्यादी-सविता राठोड,(वय 38 वर्षे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नळदुर्ग पोलीस ठाण्यात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बाबत मिळालेल्या माहितीनुसार आरोपी नामे – बाळु नागनाथ पाटील,सतिश शहाजी पाटील, दयानंद सतिश पाटील,नवनाथ शहाजी पाटील,लक्ष्मण नवनाथ पाटील, नागनाथ शहाजी पाटील, संतोष धनाजी मुसळे, हणुमंत जाधव, प्रविण पदम भोसले, कल्याण हनुमंत जाधव, ज्ञानु हनुमंत जाधव, सर्व रा.गंधोरा ता.तुळजापूर, सागर मनिष मुळे,बाळु नामदेव मुळे, अमर अनिल मुळे, सर्व रा.सलगरा (दि.) ता.तुळजापूर, यांनी (दि.18ऑक्टोबर) रोजी 12.30 वा.सु.गंधोरा येथे फिर्यादी नामे-सविता नामदेव राठोड, (वय 38 वर्षे) रा.गंधोरा, यांना व त्यांचे आई, वडील, भाऊ व भावजय यांना आरोपींनी शेतीच्या वादाच्या कारणावरुन गैरकायद्याची मंडळी जमवून शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, दगड, काठी व कोयत्याने मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-सविता राठोड यांनी (दि.18ऑक्टोबर) रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पोलीस ठाण्यात भा.न्या.सं.कलम 118(1),74, 115(2),352, 351(2),189(2), 191(2), 191(3), 190, 324(4) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सावधान!सोनारी परिसरात वाघ आलाय? सोनारी परिसरात वाघ सदृश प्राणी दिसल्याने परिसरात भीतीचे वातावरण


सोनारी (अशोक माने)
सोनारी कौडगाव रस्त्यालगत शेतातून घरी येत असताना सोनारी येथील केतन साळुंके व दत्ता साळुंके यांना वाघ सदृश प्राणी हरणाची शिकार करुन तुरीच्या शेतातून ऊसाच्या शेतात जाताना निदर्शनास आले. हि घटना दि. १७ रोजी सायंकाळी ५ ते ५:३० च्या दरम्यान घडली. अचानक समोरुन जानार्या भला मोठा वाघ सदृश प्राणी दिसल्याने दोघेही घाबरुन शेतातून पळ काढत जवळीलच जगताप वस्तीवर येऊन तेथील नागरीकांना सदीरल घटनाक्रम सांगीतला. यावेळी संबंधीत वन विभाग अधिकारी यांना फोन द्वारे कल्पना दिल्यावर वन मजूर यांनी रात्री ७:३० च्या दरम्यान येऊन पाहणी केली असता तरस किंवा चिता असण्याची शक्यता असल्याचे सांगितले. सकाळी वन विभाग अधिकारी येऊन पाहणी करतील तोपर्यंत नागरिकांना सतर्क राहण्याची सूचना दिल्या आहेत.

कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाचा महायुती सरकारने प्राधान्यक्रम बदलल्याचा जिल्हाप्रमुखांचा अजब दावा

कैलास पाटील यांच्या आरोपांना प्रत्युत्तर मात्र मुळ प्रश्न कायम

धाराशिव –
कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाचा महायुती सरकारने प्राधान्यक्रम बदलल्याचा अजब दावा शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांनी केला. मात्र महाविकास आघाडी सरकारच्या काळात हा प्राधान्यक्रम बदलल्याचा दावा पालकमंत्री तानाजी सावंत यांनी केला होता त्यामुळे नेमकं खरं कोण हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.
कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाबाबत जिल्ह्यात सध्या पाणीबाणी सुरू असून यंदाची निवडणूक या पाण्याभोवतीच राहिल अशी शक्यता आहे. आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या पाहणी दौऱ्यात जो गोंधळ घातला तेव्हापासून सुरू झालेले नेत्यांच्या आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरूच आहेत. शिवसेना जिल्हाप्रमुख सूरज साळुंके यांनी पत्रकार परिषद घेत आ. कैलास पाटील यांच्या पत्रकार परिषदेला प्रत्युत्तर दिले मुद्दे खोडून काढण्यासाठी ही पत्रकार परिषद असल्याचे ते म्हणाले मात्र आ. कैलास पाटील यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांना केवळ राजकीय उत्तरे दिल्याने मुळ प्रश्न कायम आहेत. धाराशिव कळंब मतदारसंघात कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाचे पाणी आणण्याबाबत आ. कैलास पाटील यांनी कोणते प्रयत्न केले असा सवाल सूरज साळुंके यांनी केला मात्र धाराशिव कळंब मतदारसंघात येणारे पाणी उपसा सिंचन क्र.१ मधून येणार की क्र. 2 मधून येणार याबाबत प्रश्न विचारला असता त्याबाबत माहिती घेऊन सांगतो असे उत्तर त्यांनी दिले.
आ. कैलास पाटील यांनी सरकारने निधी कमी दिला याबाबत पत्रकार परिषदेत आकडेवारी दिली महाविकास आघाडीच्या काळात केलेली तरतूद आणि वितरीत झालेला निधी याबाबत देखील स्पष्टपणे माहिती दिली मात्र सूरज साळुंके यांनी विद्यमान सरकारने केलेली तरतूद आणि वितरीत केलेला निधी याबाबत लेखी माहिती द्यायला तयार असल्याचे म्हटले मात्र आकडेवारी दिली नाही. आमदार आणि खासदार खोटी माहिती देत असून खोटे बोल पण रेटून बोल अशी त्यांची अवस्था असल्याचे सूरज साळुंके म्हणाले.

सूरज साळुंके एकाकी?

नवं सरकार स्थापन झाल्यापासून आ.कैलास पाटील, खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांच्या पत्रकार परिषदेला सूरज साळुंके एकाकी पत्रकार परिषद घेऊन उत्तर देत आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वी महायुतीमध्ये समन्वय समिती स्थापन झाली होती त्या समितीमधील कोणीही त्यांच्या पत्रकार परिषदेला उपस्थित राहत नाहीत त्यामुळे माजी उपनगराध्यक्ष सूरज साळुंके एकटे पडले आहेत का हा प्रश्न उपस्थित होत आहे.

श्री तुळजाभवानी देवीजींची शेषशाही अलंकार महापूजा ;वाघ वाहनातून काढली छबिना मिरवणूक

धाराशिव दि.०९ (प्रतिनिधी) शारदीय नवरात्र महोत्सवात आज ०९ ऑक्टोबर रोजी बुधवारी सातव्या माळेच्या दिवशी श्री तुळजाभवानी देवीजींची शेषशाही अलंकार महापूजा मांडण्यात आली.  

श्री तुळजाभवानी देवीजींच्या आज नित्योपचार पुजा आणि अभिषेक पूजेनंतर शेषशाही अलंकार महापूजा मांडण्यात आली. 

या दिवसाचे महत्व भगवान विष्णू क्षिरसागरामध्ये शेष शैयावरती विश्राम घेत असताना मातेने यांचे नेत्र कमलात जावून विश्राम घेतला. यावेळी भगवान विष्णू यांच्या दोन्ही कानातून निघालेल्या मला (मळ) पासून दोन दैत्य उत्पन्न झाले.त्यांची नावे शुंभ व निशुंभ आहेत.ते उत्पन्न होताच शेष शैयावरील विष्णूवरती आक्रमण करण्यास जाऊ लागले.  त्यावेळी नाभी कमलात विराजमान असलेल्या ब्रम्हदेव यांनी विष्णूच्या नेत्र कमलात विश्राम घेणाऱ्या देवीची स्तूती करुन देवीला जागविले व विष्णूवरती आक्रमण करणाऱ्या दैत्यांचा वध श्री तुळजाभवानी मातेने केला म्हणून विष्णूने आपले शेष शैया देवीला विश्राम करण्यासाठी दिले.त्यामुळे ही शेषशाही अलंकार महापूजा मांडण्यात येते.अशी आख्यायिका सांगितली जाते.

शारदीय नवरात्र महोत्सवात दररोज नियमित श्री तुळजाभवानी देवीजींचे विविध धार्मिक विधी विधीवत पार पाडले जातात.यात उद्या १०  ऑक्टोबर रोजी भवानी तलवार अलंकार महापूजा आणि ११  ऑक्टोबर रोजी महिषासूर मर्दिनी अलंकार महापूजा होणार आहेत.    

काल ८ ऑक्टोबर रोजी मंगळवारी रात्री श्री देवीजींची वाघ वाहनावरून छबिना मिरवणूक काढण्यात आली.मोठया संख्येने भाविक या मिरवणुकीत सहभागी झाले होते.

मराठवाड्यातील सर्व गुळ पावडर उत्पादक कारखाने प्रती टन ऊसास देणार ₹२५०० दर

इनोव्हीटीव जागरी मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन च्या बैठकीत निर्णय

धाराशिव –
इनोव्हीटीव जागरी मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनची ०६ ऑक्टोबर रोजी मराठवाडा विभागामधील सर्व गुळ पावडर उत्पादक कारखानदारांची बैठक धाराशिव येथे संपन्न झाली. यात काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले.

या बैठकीस बीड, छत्रपती संभाजी नगर, धाराशिव, लातूर व मराठवाड्यातील सर्व (जागरी) गुळ उत्पादक उपस्थित होते.

चालू ऊस गाळप हंगाम सन २०२४-२५ मध्ये सुरु होणाऱ्या हंगामाबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली असून उद्योगा समोरील – अडचणी, आव्हाने या विषयी चर्चा करण्यात आली. गुळ पावडरचा मागील सहा/आठ महिन्यापासून सातत्त्याने कमी होत असल्याने यावर उपाय योजना – करणे, यावर चर्चा देखील करण्यात आली.

चालू हंगाम २०२४-२५ या हंगामामध्ये मराठवाड्यातील सर्वच गुळ पावडर उत्पादक कारखान्यांनी गाळपास आलेल्या ऊसास प्रती टन २५००/- रु. ऊस दर देण्याचे सर्वानुमते ठरले. सदरील २५००/- रु. कारखाना आपल्या क्षमतेनुसार एक रकमी किंवा दोन हप्त्यामध्ये हा ऊस दर देऊ शकतील.

तसेच चालू हंगाम ०५ नोहेंबर ते १० नोहेंबरच्या दरम्यान सुरु करावा असे सर्वानुमते ठरले. ऊस दराबाबत कोणत्याही कारखान्याने स्वतंत्र परिपत्रक काढून दर जाहीर करू नये तसेच या दरात बदल करू नये असे सर्वानुमते ठरले.

या बैठकीस अध्यक्षस्थानी व्यंकटराव गुंड, हनुमंत मडके, सुरेश पाटील, रवींद्र काळे, विजय नाडे,दत्ता कुलकर्णी, अनिल काळे, ओंकार खुर्पे, अगरवाल साहेब, सुदाम वाभळे, दगडे साहेब, नानासाहेब पाटील,सतीश दंडनाईक, श्री. संजय खरात, अभिराम पाटील, आकाश तावडे, चाळक साहेब,गोविंद थोरबोले, कुणाल राठी, औदुंबर डिसले, व मराठवाडा विभागातील गुळ पावडर उत्पादक उपस्थित होते.

दुष्काळी तालुका हा कलंक पुसण्यासाठी पुन्हा एकदा अवताडे यांना आशीर्वाद द्या- देवेंद्र फडणवीस

पंढरपूर (बालम मुलाणी )
पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाने पोटनिवडणुकीमध्ये माझ्या शब्दाला मान देऊन समाधान आवताडे यांना विधानसभेत पाठवलं मी मतदार संघाला दिलेल्या शब्दाप्रमाणे  सरकारचा करेक्ट कार्यक्रम केला आणि मंगळवेढा उपसा सिंचन योजनेला निधीही दिला मी जे बोलतो ते करतोच समाधान आवताडे यांनी मोठ्या प्रमाणात या मतदारसंघाला निधी मंजूर करून घेतला आहे हा विकासाचा रथ यापुढे असाच सुरू ठेवण्यासाठी पुन्हा एकदा समाधान आवताडे यांच्या पाठीशी उभे राहा असे आवाहन राज्याची उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंधळगाव येथे बोलताना केले ते मंगळवेढा उपसा सिंचन योजनेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते या उद्घाटन प्रसंगी पंढरपूर एमआयडीसी, कर्जाळ कात्राळ ते नॅशनल हायवे रस्ता व तामदर्डी बंधारा या कामाचे उद्घाटन डिजिटल प्रणाली द्वारे करण्यात आले.                यावेळी व्यासपीठावर माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आमदार सुभाष बापू देशमुख, आमदार राजेंद्र राऊत, आमदार सचिन कल्याणशेट्टी, चेतनसिंह केदार, उद्योगपती संजय आवताडे दामाजी मंदिर समितीचे अध्यक्ष विष्णुपंत आवताडे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य प्रदीप खांडेकर बाजार समितीचे माजी सभापती सोमनाथ अवताडे, विजयसिंह देशमुख अप्पर सचिव दीपक कपूर, गोणेवाडी चे सरपंच रामेश्वर मासाळ  सरपंच विजय माने, विनायक यादव, चांगदेव कांबळे, तानाजी काकडे ,धनंजय पाटील, सुरेश भाकरे दीपक सुडके यांचे सह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की समाधान दादांना निवडून द्या तुम्हाला आश्वासने अनेक मिळाली असतील पण मी मंगळवेढ्याच्या शिवारात पाणी आणून दाखवीन असं आश्वासन दिलं होतं ते आश्वासन मी पूर्ण केलं असून तुम्ही तुमचं एक मत समाधान ला दिल त्या समाधान आवताडेनी तुमच समाधान करून दाखविले आहे.ज्या गोष्टी अशक्य वाटत होत्या त्या गोष्टी आम्ही शक्य करून दाखवल्या आहेत या मतदार संघावर पडलेला दुष्काळाचा कलंक पुसून हा मतदार संघ नंबर एक वर आणल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. विकासासाठी पाणी हे फार महत्त्वाचा असून पाण्याने शेती उद्योग या सर्व गोष्टी होत असतात त्यामुळे शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून आमच्या सरकारने शेतकऱ्यांच्या सर्व अडचणी दूर करण्याचे प्रयत्न केले आहेत सध्या आम्ही शेतकऱ्यांना वीज मोफत दिली आहे येत्या काही महिन्यात शेतकऱ्यांना दिवसा 12 तास शेतीपंपाचे वीज मोफत देण्याचे आम्ही नियोजन केले आहे एक रुपयात विमा सुरू केला आहे लाडक्या बहिणींना महिना दीड हजार रुपये या सरकारने दिले आहेत हे सर्वसामान्यांचे सरकार असून या सरकारच्या पाठीशी तुम्ही रहा या मतदारसंघाचे आणि नंदनवन करून दाखवू असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित यांना दिला .
यावेळी प्रास्ताविक प्रास्ताविक भाषणात बोलताना आमदार समाधान आवताडे म्हणाले की मी जे जे मागेल ते तुम्ही मंजूर करून दिले आहे विज बिल माफीचा निर्णय तुम्ही घेतल्यामुळे या मतदारसंघातील 48 हजार लोकांना याचा लाभ झाला आहे म्हैसाळ योजनेसाठी तुम्ही केंद्र व राज्याकडून 13 हजार कोटी रुपये दिल्यामुळे या मतदारसंघातील 19 गावांच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे उपसा सिंचन योजनेलाही 700 कोटी रुपये देत आज प्रत्यक्षात या कामाला तुमच्यामुळे सुरुवात होत आहे भूगोलाच्या पुस्तकांमध्ये हा तालुका दुष्काळी तालुका म्हणून नोंद होती मात्र तुमच्या या निर्णयामुळे आगामी काळात शेती क्षेत्रात अग्रेसर तालुका म्हणून या तालुक्याची नोंद होईल या अगोदरच्या काळात चाळीसगावची प्रादेशिक योजना अस्तित्वात आली मात्र निकृष्ट कामामुळे तीन वर्षापासून खर्च करून ही योजना व्यवस्थित चालत नाही सध्या ही योजना शिखर समितीकडे असून समितीला ही योजना चालवणे शक्य नाही पुन्हा ती योजना एमजीबी कडे देत दुरुस्तीसाठी निधीची आवश्यकता आहे पंढरपूर एमआयडीसी मंजूर केल्यामुळे येथील तरुणांना आता बाहेरच्या शहरात न जाता इथेच काम मिळणार आहे आम्ही मागायला कमी पडत नाही तुम्ही द्यायला कमी पडू नका असे म्हणत आमदार अवताडे यांनी भरघोस निधी दिल्याबद्दल फडणवीस यांचे आभार मानले. या कार्यक्रम प्रसंगी विनोद लटके,अशोक चौंडे विकास पुजारी,प्राजक्ता बेणारे,प्रसाद कळसे, अनिल यांनीही आपली मनोगते व्यक्त केली यावेळी भाजपा जिल्हा संघटन सरचिटणीस शशिकांत चव्हाण, राजेंद्र सुरवसे, शिवाजीराव नागणे, नवनाथ पवार, दिलीप चव्हाण, सचिन शिवशरण, रामेश्वर मासाळ, माजी संचालक बापूसाहेब काकेकर, चंद्रकांत पडवळे, जगन्नाथ रेवे, राजन पाटील, वृषाली पाटील बी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष मिसाळ व भारत मुढे यांनी केले.


 मंगळवेढा तालुक्यातील सर्व ग्रामदैवतांच्या पालख्या कार्यक्रम स्थळी आणून ग्रामस्थांनी फडणवीस यांच्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती त्याचबरोबर 24 गावातील माती गोळा करून कळस पूजन ही करण्यात आले

माजी नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांना पितृ शोक,हाजी ईस्माईल सौदागर यांचे ८२ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन

परंडा ( दि ५ ऑक्टोबर )परंडा नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष जकीर सौदागर यांचे वडील हाजी ईस्माईल सौदागर यांचे ५ ऑक्टोंबर रोजी पाहाटे वयाच्या ८२ व्या वर्षी वृद्धप काळाने निधन झाले आहे.
संध्याकाळी साडेपाच वाजता परंडा येथिल हजरत खाँजा बद्रोद्दीन दर्गाह येथिल कब्रस्तान येथे त्यांचा दफन विधी करण्यात आला.
ईस्माईल सौदागर यांच्या पश्चात माजी नगराध्यक्ष जाकीर सौदागर,माजी नगर सेवक शाबीर सौदागर,वाहेद सौदागर जुबेर सौदागर,अब्दूल सौदागर, फाजील सौदागर हि ६ मुले विवाहीत आसून दोन विवाहीत मुली,नातवंडे असा मोठा सौदागर परिवार आहे.
दफण विधी दरम्यान परंडा शहरासह ग्रामीन भागातील राजकीय,सामाजीक,शैक्षणीक क्षेत्रातील,व्यापारी,शेतकरी मोठया संख्यांने उपस्थित होते.

दत्ता कुलकर्णी यांच्याकडे मराठवाड्यातील सहकार विभागाची जबाबदारी

विधानसभा निवडणूक संचालन समिती अंतर्गत सहकार क्षेत्र संपर्क समितीमध्ये मराठवाड्याची जबाबदारी

धाराशिव – विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने जोरदार तयारी केली असून नव्या चेहऱ्यांना मोठी जबाबदारी दिली आहे. विधानसभा प्रदेश निवडणूक संचलन समिती मध्ये धाराशिव जिल्ह्यातून भाजपचे दत्ताभाऊ कुलकर्णी यांची निवड करण्यात आली आहे.दत्ताभाऊ कुलकर्णी यांना सहकार विभागाची जबाबदारी जबाबदारी देण्यात आली आहे. माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे पाटील यांचा अध्यक्षतेखालील समितीत धाराशिव जिल्ह्यातून दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या नावाचा समावेश आहे या समितीमध्ये विशेष आमंत्रित सदस्य म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पियुष गोयल, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रीय महामंत्री विनोद तावडे, माजी मंत्री नारायण राणे, यांच्यासह राज्यातील मातब्बर नेते मंडळींचा समावेश आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला पुन्हा सत्तेत आणण्यासाठी व्यूहरचना अखून काम करायचा आहे. सहकार क्षेत्र संपर्क समितीमध्ये विधान परिषद गटनेते प्रवीण दरेकर, मराठवाड्यातून दत्ताभाऊ कुलकर्णी, अशोकराव जगताप उत्तर महाराष्ट्रातून रोहित निकम, केदा आहेर, मुंबई विभागातून नितीन बनकर तर विदर्भ मधून योगेश बन यांची निवड करण्यात आलेली आहे.

मुरगूडमधे कौटुंबिक वादातून शिक्षक पतीकडून  पत्नीच्या डोक्यात वरवंटा घालून खून

मुरगूड(जोतीराम कुंभार) मुरगूड येथील एका शिक्षकाने कौटुंबिक वादातून शिक्षक पत्नीचा डोक्यात वरवंटा घालून खून केला. आज सकाळी साडे नऊ वाजता ही घटना घडली. या घटनेने मुरगूडमधे एकच खळबळ उडाली असून या घटनेची नोद मुरगूड पोलीसात झाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की येथील साई कॉलनीत राहत असलेल्या शिक्षक परशराम पांडूरंग लोकरे वय 53 यांचे आपली पत्नी सौ. सविता लोकरे वय 45 हिच्याशी कौंटुबिक कारणातून वारंवार भांडण होत होते. आज त्या भांडणाचे पर्यावसन खुणात झाले या दोघात वाद सुरु असताना त्यावेळी त्यांच्या मुलांनी वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. पण शेवटी वाद विकोपाला गेला शिक्षक पतीने राग अनावर झाल्याने वखंटा घेऊन सौ. पत्नी सविताच्या डोक्यात घातला यात त्या गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाल्या. ही घटना सकाळी साडे नऊ च्या दरम्यान घडली या प्रकरणाने खळबळ उडाली आहे.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले त्यांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मुरगूड ग्रामीण रुग्णालयात हलविला. अप्पर जिल्हा पोलीस प्रमुख जयश्री देसाई यांनीही दुपारी घटनास्थळी भेट देऊन घटनेची माहिती घेतली. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी करे करीत आहेत.
दरम्यान अपूर्वा परशराम लोकरे वय 25 हिने आपल्या आईच्या या दुर्दैवी घटने संबंधी मुरगूड पोलीसात फिर्याद दिली असून या घटनेची नोंद झाली आहे. शिक्षक पती परशराम पांडूरंग लोकरे वय 53 यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

वायफळे ता. तासगाव च्या मंडल अधिकारी वैशाली वाले ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात

सात हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले : नोंद घालण्यासाठी मागितली होती लाच : एक खासगी इसमही ताब्यात


तासगाव( प्रतिनिधी) तासगाव तालुक्यातील वायफळे येथील मंडळ अधिकारी वैशाली प्रवीण वाले यांना सात हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. वाले यांनी बस्तवडे येथील एका व्यक्तीची एक नोंद घालण्यासाठी दहा हजार रुपयांची मागणी केली होती. दरम्यान तडजोडीनंतर सात हजार रुपये देण्याचे ठरले होते. हे पैसे घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज त्यांना रंगेहाथ पकडले. त्यांच्यासोबत बस्तवडे येथील एका खासगी इसमालाही ताब्यात घेण्यात आले आहे.

      वायफळे येथे मंडल अधिकारी म्हणून रुजू झाल्यापासून वैशाली वाले यांच्याबाबत अनेक तक्रारी होत्या. पैसे दिल्याशिवाय नोंद केली जात नव्हती. अनेक सामान्य लोक वाले यांच्या या छळाला कंटाळले होते. वायफळे येथील तलाठी कार्यालयासह मंडळातील इतर तलाठी कार्यालयात पैसे दिल्याशिवाय कामच होत नव्हते. बारीक-सारीक कामासाठीही पैशाची मागणी केली जात होती. त्यामुळे सामान्य लोकांची आर्थिक लुबाडणूक होत होती.

      याप्रकरणी मंडळ अधिकारी वाले यांना काही लोकप्रतिनिधींनी सूचनाही केल्या होत्या. सामान्य लोकांची कामे तातडीने करा. लोकांना आर्थिक भुर्दंड लावू नका. अनावश्यक पैसे घेऊन त्यांची लुबाडणूक करू नका, अशा सूचना वेळोवेळी देण्यात आले होत्या. मात्र वैशाली वाले यांच्या कारभारात कसलीही सुधारणा होत नव्हती. पैसे दिल्याशिवाय त्या कोणत्याही कामाला हात लावत नव्हत्या. एकाही कागदावर सही करत नव्हत्या, अशा तक्रारी होत्या.

       त्यांच्या कारभाराला सामान्य लोक अक्षरशः कंटाळले होते. दरम्यान, बस्तवडे येथील एका व्यक्तीच्या व्यवहाराची नोंद घालण्यासाठी वाले यांनी दहा हजार रुपयांची लाच मागितली होती. संबंधित व्यक्तीने इतक्या पैशांची जुळणी होणार नाही, असे सांगितले होते. दरम्यान चर्चेनंतर सात हजार रुपये देण्याचे ठरले. यानंतर संबंधित तक्रारदाराने सांगली येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला. वाले यांच्या विरोधात रीतसर तक्रार दिली. तक्रारीनंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने वाले यांच्या विरोधात वायफळे येथे सापळा लावला.

      तक्रारदाराला पैसे घेऊन वाले यांच्याकडे पाठवण्यात आले. यावेळी वाले यांनी संबंधित कामासाठी सात हजार रुपये मागितले व घेतले. यावेळी सापळा लावून थांबलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने वाले यांना रंगेहाथ पकडले. वाले यांच्यासह एका खासगी व्यक्तीलाही ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्यावर तासगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपाधीक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

     या कारवाईमुळे तासगाव तालुक्यातील महसूल प्रशासनातील भ्रष्ट कारभार चव्हाट्यावर आला आहे. वाले यांच्या कारभाराची यानिमित्ताने पोलखोल झाली आहे. वाले यांच्या संपूर्ण कारभाराची चौकशी करावी. त्यांच्या मालमत्तेची चौकशी करावी, अशी मागणी यानिमित्ताने जोर धरू लागली आहे. दरम्यान वाले यांच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मुसक्या आवळल्याने वायफळे मंडळात आनंदाचे वातावरण आहे.