Home Blog Page 29

धाराशिव येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची यशस्वी कारवाई – तलाठी रंगेहाथ पकडली

धाराशिव – जिल्ह्यातील लोहारा तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ला.प्र.वि.) पथकाने केलेल्या कारवाईत एका तलाठ्यास 3,500 रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

तक्रारीचा तपशील

तक्रारदार, वय 35 वर्षे, यांनी त्यांच्या वडिलांच्या नावावर असलेली जमीन स्वतःच्या नावावर फेरफार करण्यासाठी तलाठी अश्विनी बालाजी देवनाळे यांच्याकडे अर्ज केला होता. तलाठ्याने अर्जावर नोटीस काढून पुढील कार्यवाहीसाठी मंडळ अधिकाऱ्याकडे पाठवण्यासाठी 8,000 रुपयांची लाच मागितली. तडजोडीनंतर ही रक्कम 3,500 रुपयांवर ठरली.

सापळा कारवाई

तक्रारदाराने 5 मार्च 2025 रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून तक्रार दिली. 6 मार्च रोजी लोहारा तालुक्यातील पेठसांगवी येथे तलाठ्याच्या कार्यालयात पडताळणी करण्यात आली. यावेळी तलाठ्याने पंचासमक्ष 8,000 रुपयांची मागणी करत 3,500 रुपये स्वीकारण्यास सहमती दर्शवली. सापळा रचून लाच स्वीकारतानाच तिला रंगेहाथ पकडण्यात आले.

आरोपीकडून जप्त करण्यात आलेल्या वस्तू

  1. लाच रक्कम – 3,500 रुपये
  2. इतर रोख रक्कम – 2,760 रुपये
  3. अंदाजे 5 ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी
  4. सोनाटा कंपनीचे मनगटी घड्याळ
  5. सॅमसंग कंपनीचा मोबाईल

आरोपीची चौकशी व पुढील कारवाई

तलाठ्याच्या घराची झडती सुरू असून, तिच्या मोबाईलचा तपास करण्यात येणार आहे. आरोपी महिला असल्याने अटक करण्यासाठी न्यायालयाची परवानगी घेण्यात आली आहे. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

सापळा पथकातील अधिकारी

  • सापळा अधिकारी: पोलीस निरीक्षक विकास राठोड
  • पर्यवेक्षण अधिकारी: पोलीस उपअधीक्षक सिध्दाराम म्हेत्रे
  • मार्गदर्शक अधिकारी: पोलीस अधीक्षक संदीप आटोळे, अपर पोलीस अधीक्षक मुकुंद आघाव

तांदळाची अफरातफर प्रकरण गुन्हा नोंद होऊन 15 दिवस उलटले, आरोपी मोकाट 

धाराशिव – लातूर येथून धाराशिवकडे आलेला प्राधान्य योजनेचा तांदूळ तेर येथे विकल्या प्रकरणी ढोकी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद असताना १५ दिवस उलटूनही अद्याप आरोपी सापडला नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

१४ फेब्रुवारी रोजी तेर येथे ८.९४ क्विंटल तांदूळ खुल्या बाजारात विकल्याप्रकरणी ढोकी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद केला असून एम. एच. ४० एन ७५१३ या ट्रक चा चालक अलीम शेख याच्यावर हा गुन्हा नोंद आहे. हा तांदूळ अलीम शेख यानेच विकला होता की पुरवठा विभागातील कोणी कर्मचारी त्या ट्रक मध्ये बसला होता हा पोलिस तपासाचा भाग आहे. अद्याप आरोपी पकडला नाही की शोधला नाही हा संशोधनाचा भाग आहे. याबाबत  गुन्ह्याचे तपास अधिकारी सपोनी हजारे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी तपास सुरू असल्याचे सांगितले. मात्र तपास कधी संपणार आणि यातील नेमके आरोपी कधी सापडणार हा प्रश्न अनुत्तरित आहे.

जबाबदारी कोणाची? 

सार्वजनिक वितरण व्यवस्था ही गोरगरिबांच्या जीवनाशी संबंधित आहे. नागरिकांना वेळेत धान्य उपलब्ध करून देण्याची जबाबदारी संबंधित कंत्राटदाराची आहे. त्यासाठी विश्वासू व्यक्ती चालक म्हणून नेमणे ही जबाबदारी देखील कंत्राटदाराची असताना जर चालक पोलिसांना सापडत नसेल तर दाल कुछ तो काला है म्हणण्यासाठी वाव आहे.

अलीम शेख कोण?

ज्याच्यावर गुन्हा नोंद केला तो अलीम शेख कोण? त्याचे वय किती? तो कुठे राहतो हे प्रश्न अनुत्तरित आहेत कारण तक्रारीत जो पत्ता आहे तो केवळ नळदुर्ग असा आहे. ज्या गोदाम पालाच्या अहवाला आधारे सहायक पुरवठा अधिकाऱ्यांनी तक्रार दाखल केली त्यात चालकाचा पूर्ण पत्ता का दिला गेला नाही हा प्रश्न या निमित्ताने निर्माण होतो आहे. गुन्हा नोंद केल्या नंतर नळदुर्ग मध्ये अलीम शेख नावाचा ट्रक ड्रायव्हर कोण आहे का याची चौकशी केली असता असा कोणी ड्रायव्हर नसल्याचे सांगतात. याबाबत पोलिसांनी अद्याप चौकशी न केल्याने सगळे प्रश्न अनुत्तरित आहेत.

धाराशिव जिल्ह्यात बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव वाढला

प्रतिबंधासाठी तालुकानिहाय समित्या गठीत

धाराशिव, दि. ५ मार्च (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील ढोकी गावात मृत कावळ्यांमध्ये बर्ड फ्लू (H5N1) आढळल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. चिकन सेंटर आणि परिसरातील कुक्कुट पक्ष्यांचे अहवालही सकारात्मक आल्याने संसर्गाचा धोका वाढला आहे.

या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी तालुकानिहाय प्रतिबंधात्मक समित्या गठीत करण्याचे आदेश दिले आहेत. बाधित भागात पोलिस बंदोबस्त, निर्जंतुकीकरण आणि कुक्कुट पक्ष्यांच्या विल्हेवाटीची प्रक्रिया वेगाने सुरू करण्यात आली आहे.

प्रमुख उपाययोजना:

  • तहसीलदार (अध्यक्ष) – नियंत्रण व प्रतिबंधात्मक उपाययोजना.
  • गटविकास अधिकारी – आवश्यक साहित्य पुरवठा व समन्वय.
  • पशुधन विकास अधिकारी – निर्जंतुकीकरण व दैनंदिन अहवाल संकलन.
  • पोलीस निरीक्षक – बाधित परिसरात नागरिकांच्या हालचालींवर नियंत्रण.
  • तालुका आरोग्य अधिकारी – जलद कृती दलाची आरोग्य तपासणी व PPE किट पुरवठा.
  • सार्वजनिक बांधकाम विभाग – मृत पक्ष्यांच्या विल्हेवाटीसाठी यंत्रसामग्री उपलब्ध करणे.
  • वन विभाग व भूमी अभिलेख विभाग – स्थलांतरित पक्ष्यांवर देखरेख व योग्य विल्हेवाट प्रक्रियेसाठी सहकार्य.

प्रशासनाने बर्ड फ्लूचा प्रसार रोखण्यासाठी तातडीच्या उपाययोजना राबवण्याचे निर्देश दिले आहेत. नागरिकांनी घबराट न करता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

वर्षभर झोपलेले प्रशासन जागे झाले! मार्च मध्ये सुटीच्या दिवशीही जिल्हा परिषद व ग्रामपंचायत कार्यालये सुरू राहणार

धाराशिव, दि. 4 मार्च 2025: वर्षभर निधी खर्चाचा वेग संथ असतानाच आता आर्थिक वर्षाच्या अखेरीस प्रशासनाला कामाची आठवण झाली आहे. जिल्हा परिषदेने मार्च महिन्यात येणाऱ्या सर्व सुट्यांच्या दिवशीही कार्यालये सुरू ठेवण्याचा आदेश जारी केला आहे. वर्षभर दुर्लक्षित राहिलेल्या योजनांचा निधी आता गडबडीने खर्च करण्यासाठी ही धावपळ सुरू असल्याची चर्चा आहे.

मार्चमध्येच आठवण का झाली?

सन 2024-25 या आर्थिक वर्षातील विविध योजना, जिल्हा वार्षिक योजना आणि इतर निधी मार्च संपण्यापूर्वी खर्च करण्याचे दडपण जिल्हा प्रशासनावर आले आहे. त्यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायतींच्या सर्व कार्यालयांना सुटीच्या दिवशीही सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

अधिकारी-कर्मचाऱ्यांना सुटी नाही!

मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनाक घोष (भा.प्र.से.) यांच्या स्वाक्षरीने जारी आदेशानुसार, खाते प्रमुख, विभाग प्रमुख, गट विकास अधिकारी आणि अधिनस्त कर्मचारी हे सुटीच्या दिवशीही कार्यालयात उपस्थित राहणार आहेत. योजनांची कार्यवाही त्वरित पूर्ण करण्यासाठी हे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे.

तपासणीसाठी विशेष नियुक्ती

या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी श्री. दिपक देशपांडे आणि श्री. विक्रांत त्रिवेदी या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते दररोज सकाळी ११:०० आणि दुपारी ०४:३० वाजता अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीचा अहवाल सादर करणार आहेत.

अनुपस्थित राहिल्यास कारवाईचा इशारा

जर कोणी अधिकारी किंवा कर्मचारी अनुपस्थित आढळला, तर संबंधित विभाग प्रमुखांवर प्रशासकीय कारवाई केली जाणार आहे. तसेच निधी न खर्च झाल्यास जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई होईल, असा स्पष्ट इशारा आदेशात देण्यात आला आहे.

वर्ग २ च्या जमिनींचा कितीही वेळा शर्तभंग झाला तरी एकदाच शुल्क भरण्याचा शासन आदेश निर्गमित

धाराशिव: महाराष्ट्र शासनाने हैद्राबाद इनामे व रोख अनुदाने रद्द करण्याबाबत (सुधारणा) अधिनियम, २०२४ अंतर्गत मोठा निर्णय घेतला आहे. या सुधारित कायद्यानुसार, वर्ग २ च्या जमिनींवरील कितीही वेळा शर्तभंग झाला तरी एकदाच शुल्क आकारले जाणार आहे. त्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील तसेच मराठवाड्यातील अनेक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सुधारणा

पूर्वीच्या कायद्यानुसार, वर्ग २ च्या जमिनींच्या हस्तांतरणासाठी आणि वापर बदलासाठी सरकारच्या परवानगीची आवश्यकता होती. तसेच, शर्तभंग झाल्यास प्रत्येकी वेगळे शुल्क द्यावे लागत होते. यामुळे शेतकरी आणि जमिनीचे धारक आर्थिक अडचणीत सापडत होते. मात्र, सुधारित कायद्यानुसार एकदाच शुल्क भरल्यानंतर पुन्हा शर्तभंगाचा दंड लागू होणार नाही.

५०% ऐवजी फक्त ५% नजराणा शुल्क

मदतमाश इनाम जमिनींच्या हस्तांतरणावर पूर्वी ५०% नजराणा शुल्क आकारले जात होते. मात्र, सुधारित अधिनियमानुसार हे शुल्क फक्त ५% करण्यात आले आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळेल.

न्यायालयीन प्रकरणांमध्ये स्पष्टता

जर इनाम जमिनी संदर्भातील वाद उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयात गेले असतील, तर त्या न्यायालयाच्या निर्णयानुसार संबंधित जिल्हाधिकारी योग्य ती कारवाई करतील. तसेच, जर कोणतीही जमीन वक्फ मालमत्ता म्हणून घोषित केली असेल, तर वक्फ बोर्डाने ती यादीतून वगळल्याशिवाय महसूल विभागाने तशी नोंद घेऊ नये, असा स्पष्ट निर्देशही देण्यात आला आहे.

शासनाच्या या निर्णयामुळे होणारे फायदे:

  • शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनींच्या हस्तांतरणावरचा आर्थिक बोजा कमी होणार.
  • शेतकऱ्यांच्या जमिनींवरील निर्बंध कमी होऊन त्याचा उपयोग कृषी आणि अन्य विकासकामांसाठी करता येणार.
  • वर्ग २ जमिनींबाबत चालणाऱ्या वादांना मर्यादा येऊन, न्यायालयीन प्रकरणांमध्ये स्पष्टता राहील.
  • शासन परवानगीशिवाय झालेल्या हस्तांतरणांची नियमितता आणण्यासाठी मोठा फायदा होणार.

मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा

धाराशिव जिल्ह्यासह मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांकडे इनाम जमिनी आहेत. अनेकांनी गेल्या काही दशकांत या जमिनी विकत घेतल्या किंवा उपयोग बदल केला. मात्र, जुन्या कायद्यामुळे अनेकांना अडचणी येत होत्या. आता सुधारित कायद्यामुळे शेतकऱ्यांच्या मालकीच्या जमिनी अधिकृतरित्या नियमित होतील आणि त्यांचा उपयोग विकासासाठी करता येईल.

शासन निर्णयाचा दूरगामी परिणाम

हा निर्णय शेतकरी आणि जमिनीच्या कायदेशीर अडचणीत सापडलेल्या नागरिकांसाठी मोठा दिलासा आहे. महाराष्ट्र सरकारचा हा निर्णय जमिनींच्या हस्तांतरण आणि नियमिततेसंदर्भात ऐतिहासिक पाऊल ठरणार आहे.

पानबुडी मोटर चोरीप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई – आरोपी गजाआड

धाराशिव जिल्ह्यातील रामवाडी शिवारात पानबुडी मोटर चोरी झाल्याच्या प्रकरणी ढोकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास करत गुन्ह्यातील आरोपीला अटक केली आहे.

पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास गुन्ह्याचा तपास लावण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, 3 मार्च 2025 रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार आणि त्यांच्या पथकाने तपासाच्या अनुषंगाने तांत्रिक विश्लेषणातून काही संशयितांची नावे शोधून काढली. त्यानंतर पथकाने लातूर जिल्ह्यातील मुरुड पोलीस ठाण्याच्या हद्दीत जाऊन संशयिताला ताब्यात घेतले.

चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून, चोरीस गेलेली दोन पानबुडी मोटर (किंमत 35,000 रुपये), चोरीसाठी वापरलेले चारचाकी वाहन (8,00,000 रुपये) आणि दुचाकी (90,000 रुपये) असा एकूण 9,25,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर मुद्देमाल ढोकी पोलीस ठाण्यातील गुन्हा क्रमांक 75/2025 अंतर्गत जप्त करण्यात आला.

या गुन्ह्यात आरोपी आकाश पप्पू कसबे (रा. दत्तनगर, मुरुड, जि. लातूर) याला अटक करण्यात आली असून, पुढील कारवाईसाठी त्याला ढोकी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक संजय जाधव आणि अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली. या पथकात पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार, पोलीस हवालदार शौकत पठाण, प्रकाश औताडे, जावेद काझी, फहरान पठाण, चालक रत्नदीप डोंगरे आणि नितीन भोसले यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

PM किसान योजनेच्या बनावट APK लिंकवर क्लिक करताच शेतकऱ्यांची फसवणूक!

धाराशिव: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-Kisan) योजनेच्या नावाने शेतकऱ्यांना बनावट PM Kisan List APK किंवा PM Kisan APK लिंक पाठवून फसवणुकीचे प्रकार समोर येत आहेत. या लिंकवर क्लिक करताच शेतकऱ्यांच्या बँक खात्यातील रक्कम गायब होत असल्याच्या अनेक तक्रारी दाखल झाल्या आहेत.

शासन निर्णय क्र.- किसनि २०२३/प्र.क्र. ४२/११-अ दिनांक १५ जून २०२३ अन्वये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना कृषि विभागामार्फत राबविली जाते. मात्र, सायबर गुन्हेगारांनी या योजनेच्या नावाखाली शेतकऱ्यांना बनावट लिंक पाठवून त्यांची फसवणूक सुरू केली आहे.

शेतकऱ्यांनी घ्यावयाची खबरदारी:

  • PM Kisan List APK किंवा PM Kisan APK नावाच्या कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नये.
  • अधिकृत माहितीसाठी फक्त PM Kisan च्या अधिकृत वेबसाईटवर (https://pmkisan.gov.in/) भेट द्यावी.
  • अशा फसवणुकीस त्वरित सायबर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवावी.

या संदर्भात जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, धाराशिव श्री. रविंद्र माने यांनी शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

चोरट्यांचा हल्ला: शेतकऱ्याचा मृत्यू, ग्रामस्थांचा रास्ता रोको

धाराशिव – तालुक्यातील हिंगळजवाडी येथे चोरीस विरोध करणाऱ्या शेतकऱ्यावर चोरट्यांनी जीवघेणा हल्ला करून त्यांचा निर्दयीपणे खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन करून आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली.

प्राप्त माहितीनुसार, हिंगळजवाडी गावालगतच्या गायराण शेतजमिनीतील शेडमध्ये बांधलेल्या शेळ्या चोरताना चोरट्यांनी शेडसमोर झोपलेल्या तानाजी भगवान मुळे (वय 65) यांना अडथळा समजून डोक्यात दगड मारून गंभीर जखमी केले.  ही घटना दिनांक ०३ मार्च रोजी मध्य रात्री १२.३० च्या नंतर घडली.या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

या प्रकरणी संजय राजेंद्र पवार, जितेंद्र प्रभू पवार (रा. तेर, धाराशिव), अमोल ईश्वर काळे आणि ईश्वर रामा काळे (रा. हिंगळजवाडी, धाराशिव) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकरणाचा तपास सपोनि हजारे करत आहेत.

या निर्घृण हत्येच्या घटनेमुळे गावात तीव्र संतापाची लाट उसळली असून ग्रामस्थांनी दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. प्रशासनाने तातडीने लक्ष घालून आरोपींना अटक करावी, अशी जोरदार मागणी केली जात आहे.

मराठवाडा मुक्तिसंग्राम लढ्यात गावातील कोणीच सहभागी नसताना केशेगाव येथे बांधला शौर्यस्तंभ

तत्कालीन जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रामपंचायत यांच्या संगनमताचा आरोप

विभागीय आयुक्तांकडे लहू खंडागळे यांची तक्रार

ज्या गावात मराठवाडा मुक्ती संग्राम लढ्यात कोणीच सहभागी झाले नाही कोणी शहीदही झाले नाही अशा गावांमध्ये स्मृती स्तंभ बांधून शासकीय निधीचा अपव्यव केला गेला आहे. धाराशिव जिल्ह्यातील केशेगाव येथे मराठवाडा मुक्तिसंग्राम युद्धातील शहीद वीर जवानांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेल्या स्मृती स्तंभावर मोठा वाद निर्माण झाला आहे. तक्रारदार लहू रामा खंडागळे यांनी तत्कालीन जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी, तसेच ग्रामपंचायत पदाधिकारी व इतर अधिकाऱ्यांवर शासकीय निधीच्या गैरवापराचे गंभीर आरोप केले आहेत. या संपूर्ण प्रकरणाची विभागीय चौकशी व्हावी व दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

काय आहे नेमके प्रकरण

धाराशिव जिल्ह्यातील केशेगाव येथे 2023-24 या आर्थिक वर्षात स्मृती स्तंभ उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, या गावातील एकही जवान मराठवाडा मुक्तिसंग्राम युद्धात शहीद झालेला नाही. तरीही, प्रशासनाने योग्य ती खातरजमा न करता लाखो रुपयांची शासकीय तिजोरी वाया घालवली, असा आरोप तक्रारदारांनी केला आहे.

हे प्रकरण उघडे पडू नये म्हणून तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी नव्यानेच केशेगाव (ता. तुळजापूर, जि. धाराशिव) येथे स्मृती स्तंभ उभारण्याची प्रशासकीय मान्यता दिली. यामध्ये सुद्धा भौगोलिक ठिकाण न पाहता प्रशासनाने चुकीच्या ठिकाणी स्मृती स्तंभ उभारण्याचा निर्णय घेतला.

गैरव्यवहार कसा झाला? – महत्त्वाचे मुद्दे

  1. स्मृती स्तंभ उभारण्याचा निर्णय चुकीच्या गावात
    • धाराशिव तालुक्यातील केशेगाव येथे एकही जवान शहीद नसताना स्मृती स्तंभ उभारण्यात आला.
    • केशेगाव ग्रामपंचायतीने हे सत्य लपवून ठेवले आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना चुकीची माहिती दिली.
    • तत्कालीन जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनीही चौकशी न करता निर्णय घेतला.
  2. प्रशासनाचा अधिकाराचा गैरवापर
    • जिल्हा नियोजन समितीने 17 ऑगस्ट 2023 रोजी केशेगाव येथे स्मृती स्तंभ उभारण्यास मंजुरी दिली.
    • हा निर्णय चुकीचा असल्याचे स्पष्ट झाल्यानंतरही 28 नोव्हेंबर 2023 रोजी केशेगाव (ता. तुळजापूर) येथे पुन्हा स्मृती स्तंभ उभारण्याची मंजुरी देण्यात आली.
  3. ग्रामपंचायतीने बेकायदेशीर ठराव मंजूर केला
    • ग्रामपंचायतीच्या ठरावाला क्रमांक नव्हता.
    • ठराव अध्यक्ष अनुपस्थित असताना मंजूर केला गेला.
    • 14 ऑगस्ट 2023 रोजी झालेली मासिक सभा दाखवण्यात आली, पण त्याचा पुरावा नाही.
  4. नियम डावलून कामकाज
    • 17 सप्टेंबर 2023 ला स्मृती स्तंभाचे उद्घाटन करण्यात आले, पण कामाचे आदेश 18 सप्टेंबरला दिले गेले!
    • म्हणजेच कार्यादेश मिळण्याच्या आधीच काम पूर्ण झाले.
    • शौर्य स्तंभावर कोनशिला कोणाच्या नावाने लावायची हा मोठा प्रश्न निर्माण झाला.
  5. दुहेरी निधी मंजूर करून आर्थिक गैरव्यवहार
    • केशेगाव (ता. धाराशिव) येथे चुकीच्या स्मृती स्तंभासाठी निधी खर्च केला गेला.
    • त्यानंतर पुन्हा केशेगाव (ता. तुळजापूर) येथे स्मृती स्तंभासाठी नवीन निधी मंजूर केला गेला.
    • म्हणजेच, एकाच कामासाठी दोनदा निधी मंजूर करून शासनाच्या पैशांचा अपव्यय केला गेला.

कोणकोणते अधिकारी व कर्मचारी दोषी?

तक्रारदारांनी खालील अधिकाऱ्यांवर आरोप केले आहेत:

  1. तत्कालीन जिल्हाधिकारी सचिन ओंबासे
  2. मुख्य कार्यकारी अधिकारी (जि.प. धाराशिव)
  3. उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.प. विभाग, जि.प. धाराशिव)
  4. गटविकास अधिकारी (पंचायत समिती, धाराशिव)
  5. कार्यकारी अभियंता (सा. बा. विभाग, जि.प. धाराशिव)
  6. केशेगाव ग्रामपंचायतीचे सरपंच आणि ग्रामसेवक

प्रकरणाचा परिणाम आणि तक्रारदारांची मागणी

तक्रारदार लहू खंडागळे यांनी या संपूर्ण प्रकरणाची विभागीय चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच, नियमबाह्य खर्च झालेली संपूर्ण रक्कम संबंधित अधिकाऱ्यांकडून वसूल करण्यात यावी, अशीही मागणी केली आहे.

सरकार आणि प्रशासनाची भूमिका काय?

या गंभीर आरोपांवर सरकार आणि प्रशासनाने कोणती भूमिका घेणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. शासकीय निधीचा अपव्यय, अधिकारांचा गैरवापर, बेकायदेशीर ठराव मंजूर करणे आणि नियम धाब्यावर बसवणे या आरोपांची खातरजमा करण्यासाठी सखोल चौकशी आवश्यक आहे.

तक्रारदार लहू रामा खंडागळे

धाराशिव जिल्ह्यातील या संपूर्ण प्रकरणावरुन प्रशासनातील अनागोंदी व भ्रष्टाचाराचे गंभीर चित्र उभे राहते. शहीद जवानांच्या सन्मानासाठी उभारल्या जाणाऱ्या स्मृती स्तंभावरच शासन आणि प्रशासनाने गैरव्यवहार केला असल्याचा आरोप झाल्याने जनतेमध्ये संतापाची भावना आहे.

या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई केली जात नाही, तर भविष्यातही अशा प्रकारच्या आर्थिक गैरव्यवहारांना उत्तेजन मिळेल. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे.

करजखेडा येथे जलजीवन मिशन योजनेच्या पाईप चोरीची घटना

धाराशिव, 28 फेब्रुवारी 2025: करजखेडा येथील जलजीवन मिशन योजनेअंतर्गत साठवून ठेवण्यात आलेले सुमारे 5.74 लाख रुपये किमतीचे लोखंडी पाईप अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी धाराशिव येथील ठेकेदार राजाभाऊ शिवाजी गडकर (वय 60, व्यवसाय – शासकीय ठेकेदार) यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

पाणीपुरवठा योजनेतील महत्त्वाचे साहित्य चोरीला

राजाभाऊ गडकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या आदेशानुसार संतोष मुरकुटे यांच्या एस.टी.एम. इन्फ्रा. हायटेक प्रा. लि., नांदेड या कंपनीला कानेगाव व करजखेडा संयुक्त पाणीपुरवठा योजनेचे काम मिळाले होते. सदर योजनेतील काही भागाचे काम गडकर यांच्या राज कन्स्ट्रक्शन फर्म मार्फत सुरू होते.

योजनेच्या अंतर्गत माकणी येथील निम्न तेरणा धरणातून कानेगाव व करजखेडा गावांना पाणीपुरवठ्यासाठी पाइपलाइन टाकण्याचे व इतर कामे करण्यात येत होती. यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने DI व HDPE पाईप्स पुरवले होते. हे पाईप विविध ठिकाणी साठवून ठेवण्यात आले होते, त्यापैकी काही करजखेडा आठवडा बाजार येथील पाण्याच्या टाकीजवळ साठवण्यात आले होते.

चोरीला गेलेले साहित्य:

150 मिमी व्यासाचे 35 लोखंडी पाईप (किंमत – ₹3,57,665)

100 मिमी व्यासाचे 30 लोखंडी पाईप (किंमत – ₹2,17,140)

एकूण नुकसान – ₹5,74,805

चोरीचा प्रकार कसा उघडकीस आला?

गडकर यांनी सांगितले की, सदर पाणीपुरवठा योजनेसाठी 18 डिसेंबर 2024 रोजी करजखेडा येथे 100 मिमी व्यासाचे 286 पाईप, 23 जानेवारी 2025 रोजी कानेगाव येथे 150 मिमी व्यासाचे 165 पाईप, तसेच 25 जानेवारी 2025 रोजी करजखेडा येथे 150 मिमी व्यासाचे 165 पाईप उतरवले गेले होते. हे पाईप टप्प्याटप्प्याने योजनेसाठी वापरण्यात येत होते.

30 जानेवारी ते 5 फेब्रुवारी 2025 या कालावधीत गडकर प्रकृती अस्वस्थतेमुळे कामावर हजर राहू शकले नाहीत. त्यानंतर इतर कामांमुळे करजखेडा येथे लक्ष देता आले नाही. मात्र, 22 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी 4 वाजता गडकर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचे शाखा अभियंता किरण जाधव आणि चॉईस कन्सल्टन्सी सर्व्हिसेस प्रा. लि., अंधेरीचे अभियंता पंकज गुंड यांच्यासह पाहणीसाठी गेले असता पाईप कमी असल्याचे निदर्शनास आले.

त्यांनी योजनेच्या इतर ठिकाणी कामाची तपासणी केली असता अनेक पाईप योजनेसाठी वापरण्यात आल्याचे दिसले, मात्र करजखेडा येथील काही पाईपांचा हिशोब लागत नव्हता. त्यानंतर त्यांनी करजखेडा येथे पुन्हा जाऊन बारकाईने पाहणी केली असता खालील वर्णनाचे आणि किमतीचे पाईप चोरीला गेलेले असल्याचे स्पष्ट झाले.

चोरीला गेलेले साहित्य व अंदाजित नुकसान:

26 जानेवारी ते 22 फेब्रुवारी दरम्यान चोरी

गडकर यांच्या म्हणण्यानुसार, ही चोरी 26 जानेवारी 2025 दुपारी 2 वाजल्यापासून 22 फेब्रुवारी 2025 दुपारी 4 वाजेच्या दरम्यान घडली असावी. कोणीतरी अज्ञात व्यक्तीने करजखेडा आठवडी बाजारातील पाण्याच्या टाकीजवळ साठवलेले 65 पाईप चोरून नेले आहेत.

पोलिसांत गुन्हा दाखल, पुढील तपास सुरू

या प्रकरणी बेंबळी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गडकर यांनी या चोरीची सविस्तर चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.