Home Blog Page 26

आरोपी एक, व्यक्ती तीन, 200 कोटींचा घोटाळा करणारे निर्माते रचताहेत वेगवेगळी कहाणी

जिल्हा पुरवठा विभागाच्या कारनाम्यापुढे क्राईम वेब सिरीज सुद्धा फिकी पडेल !


भाग १०

आकाश नरोटे
८४२१५३१९७६

धाराशिव – सध्या मनोरंजन म्हणून ओटीटी प्लॅटफॉर्म वर वेब सीरिज मोठ्या प्रमाणात पाहिल्या जातात. हर्षद मेहता, तेलगी घोटाळा या वेब सिरीज प्रचंड गाजल्या. धाराशिव जिल्ह्यात पुरवठा विभागात देखील प्रचंड मोठा घोटाळा आहे त्यासमोर ओटीटी वर प्रसारीत झालेल्या वेब सिरीज देखील फिक्या पडतील. गोर गरिबांचे धान्य काळाबाजारात विकले जाते हे केवळ ऐकीवात आहे मात्र दैनिक जनमत ने लावून धरलेली वृत्तमालिका हा घोटाळा कसा होतो, कोणते अधिकारी यात सामील असू शकतात, त्यात कंत्राटदाराला हाताशी धरून, शासकीय नियम अक्षरशः पायदळी तुडवून हा घोटाळा केला जात आहे यावर भाष्य केले गेले आहे. सध्या तरी घोटाळ्याची ही वेब सिरीज मध्यंतरापर्यंत येऊन पोहचली असून कारवाई करून जिल्हाधिकारी नायक ठरतात की नाही हे मध्यांतरानंतर समजणार आहे.
सध्या तांदूळ अफरातफर प्रकरणातील आरोपी पकडला गेला असल्याचे सर्वांना माहिती आहे. पोलिसांनी पकडलेला आरोपी अखिल शेख आहे, ज्याच्यावर गुन्हा दाखल झाला तो अलीम शेख आहे.आणि पुरवठा विभागाच्या ट्रान्सपोर्ट पासवर आणखी एक नाव समोर आले ते म्हणजे सलीम शेख. पोलिस अखिलच अलीम आहे आणि पकडलेल्या आरोपीने हा गुन्हा केला आहे असे सांगतात. मात्र मिळालेल्या माहितीनुसार ज्याने गुन्हा केला आणि जो १४ फेब्रुवारी रोजी ट्रक चालवत होता तो अलीम शेख हा अल्पवयीन असून त्याचे वय समोर येऊ नये म्हणून एका बड्या व्यक्तीच्या खडी क्रशरच्या वाहनावर चालक म्हणून अखिल शेख कामाला आहे अशी कुजबुज झाली सुरू असून नेमके सत्य काय आहे हे पोलीस तपासातून समोर येणार आहे. तर सलीम शेख हा अलीम शेखचा जवळचा नातलग आहे अशी देखील दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. ढोकी पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी विलास हजारे यांना आरोपी हा अल्पवयीन आहे का याबाबत विचारले असता त्यांनी तो अल्पवयीन नसल्याचे सांगितले मात्र पोलिसांना संभ्रमित करण्यासाठी कंत्राटदार आणि पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांनी वेगळेच कुंभाड रचले असून अखिल शेख हा आरोपी सांगितला तसा पुरवणी जबाब देखील दिल्याची माहिती आहे. मात्र आरोपी नेमका कोण आहे हे याची शहानिशा पोलिसांनाच करावी लागणार आहे.तत्पूर्वी पोलिसांनी सर्व सीसीटीव्ही फुटेज, अधिकाऱ्यांचे सीडीआर घेतला तरच हा तपास पूर्ण होणार आहे. अन्यथा घोटाळ्याच्या वेब सिरीज मधील ८.९४ क्विंटल तांदूळ अफरातफरचा भाग कायमचा आणि अर्धवट रित्या बंद झालेला असेल.

घोटाळा नेमका कसा?

अनेकांना प्रश्न पडला की हा घोटाळा नेमका कसा होत आहे तर यात महत्वाची गोष्ट आहे ती ट्रक आणि त्यात बसवलेली जीपीएस सिस्टिम. कंत्राटदाराने आतापर्यंत जीपीएस नसलेल्या गाड्या वापरल्याचे बोलले जात आहे. जीपीएस संनियंत्रण कक्षात देखरेखीचे कामकाज होत नसल्याने कंत्राटदार अधिकाऱ्यांशी हातमिळवणी करून अवैध वाहतुकीच्या माध्यमातून हे धान्य काळ्या बाजारात विकायला नेतो अशी चर्चा आहे. तसेच कंत्राटामध्ये ज्या गाड्या आहेत त्याच्या ऐवजी खाजगी गाड्या अगदी नाममात्र भाड्याने लावून बक्कळ नफा यातून कमाई केली जाते आणि हाच तो रू.२०० कोटीपेक्षा अधिकचा घोटाळा आहे.

जिल्हाधिकाऱ्यांची भूमिका गुलदस्त्यात

अफरातफर प्रकरणी डॉ. सचिन ओम्बासे यांच्या कार्यकाळात त्यांनी गुन्हा नोंद करण्याचे आदेश दिले मात्र त्यानंतर त्यांची बदली झाली. नवे जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार जिल्हाधिकारी म्हणून रुजू झाले तेव्हा त्यांच्या समोर हा विषय गेल्यानंतर पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांनी त्यांना संभ्रमात ठेवले तरी देखील त्यांनी गोदामाची पाहणी केली, काही बैठका देखील घेतल्या मात्र कारवाईचं पान त्यांनी अद्याप न हलवल्याने ते हिरो ठरतात की नाही याचा अंदाज कोणालाच नाही. मात्र त्यांची गुलदस्त्यातील भूमिका देखील उलट सुलट चर्चा घडवून आणत आहे.

….तर घोटाळ्याची व्याप्ती वाढणार

दैनिक जनमत ने लावून धरलेल्या वृत्त मालिकेतून जिल्हा पुरवठा विभागाची दैना उडाली असून कारवाई न झाल्याने वेगवेगळी माहिती समोर येत आहे. जिल्ह्यात रेशन दुकानांचे रेकॉर्ड मेन्टेन नसल्याची चर्चा आहे विशेषतः अनेक दुकानांचे युनिट रजिस्टर मेन्टेन नाही हा देखील मोठा घोटाळा बाहेर निघू शकतो याची सखोल चौकशी झाली तर घोटाळ्याचा आकडा १ हजार कोटींच्या पुढे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. युनिट रजिस्टर संदर्भात देखील उलट सुलट चर्चा असून पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांच्या वरदहस्ताने ते मेन्टेन न ठेवता काळ्या बाजारात धान्य पाठवण्याची सोय केली जात असून गेल्या अनेक महिन्यांपासून हे सुरू असल्याचे बोलले जात असल्याने घोटाळ्याचा आकडा वाढला तर नवल वाटायला नको.

आज आरोपीला न्यायालयात हजर करणार !

३० मार्च रोजी आरोपीला कर्जत येथून पकडले. दुसऱ्या दिवशी न्यायालयात हजर देखील केले मात्र आरोपीचे आधार कार्ड नसल्याने त्याला अद्याप जामीन मिळाला नाही. आज ७ एप्रिल रोजी त्याला पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार असल्याने न्यायालय या प्रकरणाकडे कसे पाहते, पोलिसांना कोणते आदेश देते? पुरवठा विभागाच्या कारभाराकडे कसे पाहते? त्यावरच या प्रकरणाची दिशा ठरणार आहे.

विद्यार्थिनीचा अखेरचा निरोप मनोगतातच… ऱ्हदय विकाराच्या धक्क्याने B.Sc. तृतीय वर्षातील वर्षा खरात हिचे निधन

परंडा, दि. ५ एप्रिल – शिक्षण महर्षी रा.गे. शिंदे महाविद्यालय, परंडा येथे निरोप समारंभाच्या कार्यक्रमात हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली. B.Sc. च्या तृतीय वर्षात शिक्षण घेत असलेल्या कु. वर्षा भारत खरात या विद्यार्थिनीने मनोगत व्यक्त करत असताना अचानक स्टेजवर कोसळून अखेरचा श्वास घेतला. डॉक्टरांनी सांगितल्यानुसार, तिला हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यामुळे जागीच मृत्यू झाला. ही अत्यंत दुःखद घटना शुक्रवार, दिनांक ४ एप्रिल रोजी दुपारी घडली.

कु. वर्षा खरात ही मूळची माढा तालुक्यातील नाडी गावच्या रहिवासी होती. १० वी नंतर त्यांनी परंडा येथील शिक्षण महर्षी रा.गे. शिंदे महाविद्यालयात B.Sc. च्या पहिल्या वर्षात प्रवेश घेतला होता. गेली तीन वर्षे त्या अत्यंत मन लावून शिक्षण घेत होती. ५ एप्रिलपासून B.Sc. तृतीय वर्षाच्या परीक्षेला सुरुवात होणार होती. त्याआधी कॉलेजकडून विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता.

कार्यक्रमात सहभागी होत वर्षा खरात आपले मनोगत व्यक्त करत होती. तिने बोलण्यास सुरुवात केल्यानंतर काही क्षणातच त्या अचानक स्टेजवर कोसळली. कार्यक्रमात उपस्थित शिक्षक व विद्यार्थ्यांनी क्षणाचाही विलंब न करता तात्काळ त्यांना शासकीय उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले.

वर्षा हिला बालपणापासूनच हृदयाचा त्रास होता. तिच्यावर सुमारे १५ वर्षांपूर्वी शस्त्रक्रिया करण्यात आली होती, अशी माहिती तिचे वडील भारत खरात यांनी दिली. शिक्षणात प्रगतीशील, मित्रमैत्रिणींसोबत मनमिळावू स्वभाव असलेल्या वर्षा यांच्या अकस्मात निधनाने महाविद्यालयात आणि नाडी गावात शोककळा पसरली आहे.

कॉलेज प्रशासनाच्या वतीने आणि विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत जड अंतःकरणाने कु. वर्षा खरात यांना अखेरचा निरोप देण्यात आला. विद्यार्थिनींच्या अशा आकस्मिक निधनाने महाविद्यालयात एक वेगळेच शोकमय वातावरण निर्माण झाले आहे.

या दुःखद घटनेमुळे वर्षाच्या शिक्षक, वर्गमित्र, मैत्रिणी आणि संपूर्ण महाविद्यालय कुटुंबाने हळहळ व्यक्त केली आहे. तिच्या आठवणी आणि चेहऱ्यावरचं हसू कायम लक्षात राहील, अशी भावना अनेकांनी व्यक्त केली.

धर्मादाय रुग्णालयांनी नियम पाळले नाहीत, तर शिवसेना स्टाईलने कारवाई केली जाईल – शिवसेना जिल्हाप्रमुख मनिष काळजे यांचा इशारा

सोलापूर, ५ एप्रिल – सोलापूर शहर व जिल्ह्यातील धर्मादाय कायद्यांतर्गत नोंदणीकृत रुग्णालयांनी रुग्णांना सवलतीच्या दरात उपचार न दिल्यास शिवसेना स्टाईलने कारवाई केली जाईल, असा कडक इशारा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मनिष काळजे यांनी दिला आहे. धर्मादाय रुग्णालयांकडून रुग्णांची आर्थिक लूट आणि उपचारास टाळाटाळ हे प्रकार आता सहन केले जाणार नाहीत, असा सज्जड दम त्यांनी दिला.

शहरातील अनेक रुग्णालये धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे नोंदणीकृत असून शासनाने निश्चित केलेल्या सवलतीच्या दरानुसार रुग्णांना उपचार देणे त्यांच्यावर बंधनकारक आहे. या रुग्णालयांनी गरजू रुग्णांसाठी ठरवलेला कोटा राखीव ठेवणेही आवश्यक आहे. मात्र, अनेक रुग्णालये या नियमांकडे दुर्लक्ष करून वैद्यकीय सेवेचा व्यवसाय करत आहेत. गरिबांपासून लाखो रुपये उकळणे, उपचार न देणे यासारखे प्रकार वाढीस लागले आहेत. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार न मिळाल्याने एका निष्पाप महिलेचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच मनिष काळजे यांनी सोलापुरात अशा घटना घडू नयेत यासाठी ठोस भूमिका घेतली आहे.

मनिष काळजे यांनी सांगितले की, “रुग्णसेवा ही ईश्वरसेवा आहे, हे विसरून अनेक रुग्णालये लुटीचे साधन बनली आहेत. ही स्थिती बदलण्यासाठी आता रस्त्यावर उतरावे लागणार आहे. धर्मादाय रुग्णालयांनी त्यांच्या मुख्य प्रवेशद्वारावर उपचाराच्या दरांचे डिजिटल फलक किंवा डॅशबोर्ड लावणे बंधनकारक आहे. जे रुग्णालये हे पालन करणार नाहीत त्यांना थेट शिवसेना स्टाईलने उत्तर दिलं जाईल.”

शिवसेनेने सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की, धर्मादाय रुग्णालयांमध्ये जर कोणालाही सवलतीच्या दरात किंवा मोफत उपचार नाकारण्यात आले, तर त्यांनी त्वरित सात रस्ता परिसरातील शिवसेना भवन येथे संपर्क साधावा. अशा हॉस्पिटलविरुद्ध तात्काळ कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

“धर्मादाय कायद्याचा अवमान करणाऱ्या कोणत्याही रुग्णालयाची गय केली जाणार नाही,” असे ठाम शब्दांत सांगत मनिष काळजे यांनी सोलापूरमधील सर्व रुग्णालयांना सजग राहण्याचा इशाराच दिला आहे.

सोलापुरात दूषित पाण्यामुळे दोन शाळकरी मुलींचा मृत्यू, एक गंभीर – नागरिकांमध्ये संतापाची लाट

सोलापूर, प्रतिनिधी: राज्याच्या आरोग्य व्यवस्थेवर आधीच प्रश्नचिन्ह उपस्थित असतानाच सोलापुरातील मोदी परिसरात घडलेल्या धक्कादायक घटनेने पुन्हा एकदा प्रशासनाच्या हलगर्जीपणावर बोट ठेवले आहे. बाबू जगजीवनराम झोपडपट्टी भागात दूषित पाणी प्याल्याने दोन शाळकरी मुलींचा मृत्यू झाला असून, एक मुलगी गंभीर अवस्थेत मृत्यूशी झुंज देत आहे.

मृत्यू झालेल्या मुलींची नावे भाग्यश्री म्हेत्रे (वय १६) आणि जिया महादेव म्हेत्रे (वय १६) अशी आहेत. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, या तिघींनी झोपडपट्टीतील नळाद्वारे मिळालेलं पाणी प्यायलं होतं. त्यानंतर त्यांच्या तब्येती अचानक बिघडल्या. तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्यानंतर दोन मुलींचा मृत्यू झाला. तिसरी विद्यार्थिनी गंभीर अवस्थेत उपचार घेत असून तिची प्रकृती चिंताजनक आहे.

दूषित पाणीपुरवठ्यावर संतप्त प्रतिक्रिया

स्थानिक रहिवाशांनी महापालिकेवर आणि प्रशासनावर थेट आरोप करत, गेल्या अनेक महिन्यांपासून दूषित पाणीपुरवठा सुरू असल्याचे सांगितले. अनेक वेळा तक्रारी करूनही प्रशासनाने दुर्लक्ष केले, अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली. या भागात राहणाऱ्या महिलांनी उद्विग्नतेने सांगितले, “आम्ही झोपडपट्टीत राहतो, काम करून पोट भरतो. विकत पाणी घेण्याची ऐपत नाही, खासगी रुग्णालयात उपचार घेणेही शक्य नाही. तरीही आम्हाला चांगलं, सुरक्षित पाणी मिळालं पाहिजे, हा आमचा मूलभूत अधिकार आहे.”

राजकीय प्रतिक्रिया आणि प्रशासनाची दखल

घटनेची माहिती मिळताच भाजप आमदार देवेंद्र कोठे आणि महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. आमदार कोठे यांनी माध्यमांशी बोलताना दूषित पाणीपुरवठ्याच्या स्थानिकांच्या आरोपांना दुजोरा दिला आणि महापालिकेच्या आरोग्य व पाणीपुरवठा विभागाच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित केले.

दोन निरागस मुलींच्या मृत्यूमुळे महापालिकेतील कामचुकार कर्मचाऱ्यांविरोधात कारवाई केली जाईल, अशी माहितीही प्रशासनाने दिली आहे.

प्रणिती शिंदेंची कुटुंबीयांना भेट

काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी मृत मुलींच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यावेळी तेथील वातावरण अत्यंत हृदयद्रावक होते. कुटुंबीयांचा आक्रोश आणि दुःख काळीज हेलावून टाकणारे होते. शिंदे यांनी प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घ्यावी, आणि दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी केली.

सार्वजनिक आरोग्यावर धोका

ही घटना केवळ एक अपवाद नाही, तर संपूर्ण शहरातील पाणीपुरवठा व्यवस्थेच्या दुरवस्थेचं उदाहरण आहे. दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून, लहान मुलांचे प्राण जाणे ही अत्यंत वेदनादायक बाब आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सुरक्षित आणि शुद्ध पाण्याच्या पुरवठ्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

शासन आणि प्रशासन यांना जागे होण्याची गरज

सोलापूरसारख्या मोठ्या शहरात अशा प्रकारच्या घटनांमुळे शासन व प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. केवळ आश्वासनांनी नव्हे, तर ठोस कृतीनेच अशा दुर्घटनांना आळा बसू शकतो. नागरिकांच्या मूलभूत गरजांकडे प्राधान्याने लक्ष देणे ही काळाची गरज आहे.

रानडुकराच्या हल्ल्यात 63 वर्षीय शेतकरी गंभीर जखमी

माळकरांजा (ता. कळंब) : गावातील 63 वर्षीय आगतराव दत्तात्रय लोमटे हे शेळ्या राखण्यासाठी शेतात गेले असता त्यांच्यावर अचानक भल्या मोठ्या रानडुकराने जीवघेणा हल्ला केला. या धक्कादायक घटनेत त्यांना गंभीर दुखापत झाली असून, एका तासाहून अधिक काळ त्यांनी रानडुकराशी झटापट करत स्वतःचा जीव वाचवला.

ही घटना शुक्रवारी सकाळी ९ च्या सुमारास घडली. रानडुकराच्या हल्ल्यात लोमटे यांच्या उजव्या हाताची दोन बोटे आणि डाव्या हाताची एक बोट तुटली आहे. तसेच डोळ्याच्या वर डुकराने जोरदार पकडल्याने मोठी जखम झाली आहे. त्यांचा उजवा हात पूर्णपणे रक्तबंबाळ झाला असून, अधिक दुखापत झाली आहे.

लोमटे यांनी खचून न जाता धाडसाने प्रतिकार केला आणि अखेर कशीबशी सुटका करून घेतली. त्यानंतर गावकऱ्यांनी तत्काळ मदतीला धाव घेतली. प्राथमिक उपचार ढोकी येथील आरोग्य केंद्रात करण्यात आले असून, पुढील उपचारासाठी त्यांना धाराशिव येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या प्रकारामुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतकरी आणि जनावरे यांची सुरक्षा धोक्यात येत असल्याने वनविभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी गावकऱ्यांकडून केली जात आहे

राष्ट्रीयत्वाचा पुरावा देणाऱ्या पुरवठा विभागाकडे आरोपीचं आधार कार्ड नाही!

आरोपीचं नाव अलीम, अखिल की सलीम शेख?

भाग ९

धाराशिव (आकाश नरोटे)- २०० कोटींचा घोटाळा करणाऱ्या पुरवठा विभागात सध्या प्रचंड अनागोंदी सुरू आहे. ८.९४ क्विंटल तांदूळ अफरातफर प्रकरणी ज्या आरोपीला अटक केली आहे त्याच्या नावाबद्दलचा घोळ मिटत नसून आरोपीचे नेमके नाव अखिल आहे की, अलीम आहे की सलीम आहे हेच कळत नाही.
फूड कॉर्पोरेशन च्या स्लिप वर सलीम अलीम शेख असे नाव आहे तर ट्रान्सपोर्ट पास वर अलीम शेख असे नाव आहे तर पोलिस स्टेशन मध्ये आरोपी स्वतःचे नाव अखिल शेख सांगत आहे.
चालक निवडताना वाहतूक कंत्राटदाराने चालकाची संपूर्ण माहिती घ्यायला हवी होती, त्याच्याकडे वाहन परवाना आहे की नाही हे देखील पाहणे आवश्यक असून त्याची खातरजमा करणे आवश्यक असताना ती न करताच वाहन चालकाच्या हातात देण्यात आले. जर चालकाची सगळी कागदपत्रे उपलब्ध असती तर पुरवठा विभागाने अद्यापपर्यंत ती जमा करून का घेतली नाहीत? आरोपीची कागदपत्रे आणि त्याचा तपास करणे ही पोलिसांची जबाबदारी आहे असे सांगून वाहतूक कंत्राटदाराला एखादी नोटीस काढण्याचे धारिष्ट्य पुरवठा विभाग का दाखवत नसेल? कंत्राटदाराचे पुरवठा विभागात कोणासोबत लागेबांधे आहेत? या प्रश्नाची उत्तरे अद्याप जिल्हा प्रशासन का देत नाही हा चर्चेचा विषय आहे.

पुरवठा विभागाचे पाय खोलात?

रेशन कार्ड हा राष्ट्रीयत्वाचा पुरावा मानला जातो आणि ते देण्याची जबाबदारी खुद्द पुरवठा विभागाची आहे. मात्र आरोपीचे आधार कार्डच उपलब्ध नसल्याची माहिती आहे. त्याच्या अंगठ्याचे ठसे घेऊन देखील आधार कार्ड मिळून आले नाही. प्रत्येक रेशन कार्ड आधार कार्डशी जोडले गेले आहे. आरोपीचा कुठलाच पुरावा नसल्याने आरोपी नेमका कोण आहे याबाबत पुन्हा शंका असून हे कांड पुरवठा विभागाच्या कोणत्या अधिकाऱ्याने रचले आहे याचा शोध जिल्हा प्रशासनाला घ्यावा लागणार आहे.

आधार कार्ड नसेल तर सही कोण केली?

आरोपीच्या नावाबाबत संभ्रम असताना त्याचे आधार कार्डच मिळून न आल्याने तो सुशिक्षित आहे की अशिक्षित आहे हे न उलगडलेले कोडे आहे. ज्याचे आधार कार्ड नाही तो शिकला असेल काय? शिकला असेल तर त्याचे स्वतःचे नाव अखिल असताना ते अलीम शेख नावाने ट्रान्सपोर्ट पास वर सही कसा करू शकतो हा प्रश्न नव्याने निर्माण झाला आहे.

८.९४ क्विंटल तांदूळ अफरातफर प्रकरणातील आरोपी सापडला, २०० कोटींच्या घोटाळ्याचं काय?

भाग ८

धाराशिव (आकाश नरोटे)- तेर येथे १४ फेब्रुवारी रोजी खुल्या बाजारात सरकारी तांदूळ विक्री करणारा आरोपी पोलिसांना दीड महिन्यानंतर सापडला असून त्या प्रकरणाने समोर आणलेल्या २०० कोटींच्या घोटाळ्याबाबत अद्याप कसलीच कारवाई न झाल्याने प्रशासनात गेंड्याची कातडी पांघरुण बसलेले अधिकाऱ्यांना त्याचे काहीच वाटत नाही.
हे प्रकरण घडल्यानंतर पहिल्यांदा ते दाबण्याचा प्रयत्न झाला, त्यानंतर हे खूप प्रकरण खूप छोटे आहे सांगण्याचा प्रयत्न झाला मात्र अद्याप याची निष्पक्ष चौकशी होईल असं आश्वासन किंवा हालचाल जिल्हा प्रशासनाकडून न करण्यात आल्याने यात बड्या अधिकाऱ्यांचा असलेला समावेश आणि त्यांच्या हस्तक्षेपाबद्दल दाट शंका निर्माण होते.
धान्याची वाहतूक करण्यासाठी शासनाने घालून दिलेले नियम जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यानी अक्षरशः पायदळी तुडवले, जी. पी.एस. नसलेल्या गाड्यातून या धान्याची वाहतूक करण्यात आली असल्याबाबत विचारलेल्या प्रश्नाला नेहमीच बगल दिली कारण यातूनच त्यांची खरी कमाई होत असते. गेले अनेक महिने हा घोटाळा राजरोसपणे सुरू असल्याचा आरोप होऊन देखील पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांची साधी चौकशी देखील होत नसल्याने घोटाळा दडपण्यासाठी सुरू असलेले प्रयत्न किती ताकदीनचे आहेत हे लक्षात येते.

कर्जत मध्ये सापडला आरोपी

ज्याच्यावर गुन्हा दाखल केला तो आरोपी अलीम शेख ३० मार्च रोजी कर्जत येथे सापडला, 31 मार्च रोजी त्याला नायलयासमोर हजर करण्यात आले चार दिवसांची पोलिस कोठडी मागितली होती मात्र १ दिवसांची पोलिस कोठडी दिली असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हजारे यांनी सांगितले.
तो अलीम शेख आहे की अखिल शेख, तो नळदुर्ग येथील रहिवासी आहे की धाराशिव येथील रहिवासी आहे आणि त्याचे वय काय? पुरवठा विभागाने तक्रार करताना दिलेली माहिती खरी होती की खोटी हे पोलिस तपासातून निष्पन्न होणार आहे.

पुरवठा विभागाची श्वेतपत्रिका काढा

सरकारी धान्य वितरण करण्यासाठी सरकार कोट्यावधी रुपये खर्च करते. त्यात पारदर्शकता राखणे ही जबाबदारी अधिकाऱ्यांची मात्र त्यांनी ही जबाबदारी पारच पाडली नाही. वाहतूक यंत्रणेचा गाभा असणारी जी. पी. एस. यंत्रणा धाब्यावर बसवून हा खेळ अधिकाऱ्यांनी केला असल्याने या योजनेची, झालेल्या घोटाळ्याची श्वेतपत्रिका काढा अशी मागणी आता होत असून गोर गरिबांचे धान्य त्यांच्या पर्यंत पोहचले की नाही हे त्यातून समोर येणार आहे.

गुढीपाडव्यानिमित्त श्री तुळजाभवानी देवींची विशेष अलंकार महापूजा

तुळजापूर – गुढीपाडव्याच्या पावन पर्वावर आज श्री तुळजाभवानी देवीची विशेष अलंकार महापूजा मोठ्या भक्तिभावाने संपन्न झाली. भारतीय नववर्षाच्या प्रारंभाला साजरे करणारा गुढीपाडवा हा दिवस धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व असलेला मानला जातो. यानिमित्ताने श्री तुळजाभवानी मंदिरात भव्य स्वरूपात पूजाविधी आणि गुढी उभारणी करण्यात आली.

आज पहाटे ५ वाजता मंदिराच्या प्रांगणात महंतांच्या नेतृत्वाखाली पारंपरिक पद्धतीने गुढी उभारण्यात आली. देवीचा गाभारा सुगंधित फुलांनी सजवला गेला होता. देवीला सोन्या-चांदीच्या अलंकारांनी विशेष शृंगार करण्यात आला. यानंतर महापूजा आणि आरतीचा सोहळा संपन्न झाला. मंदिर परिसर भक्तांच्या “जय भवानी” च्या गजराने दुमदुमून गेला.

गुढीपाडव्याच्या निमित्ताने मंदिर प्रशासनाने भव्य महाप्रसादाचे आयोजन केले होते. तसेच, गाभाऱ्यात दर्शनासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती. हजारो भाविकांनी दर्शन घेत श्री तुळजाभवानी देवीचे आशीर्वाद घेतले. मंदिर परिसरात भक्तांसाठी धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमही सादर करण्यात आले.

मंदिराचे प्रमुख महंत यांनी यावेळी उपस्थित भक्तांना मार्गदर्शन केले आणि गुढीपाडव्याचे महत्त्व विषद केले. त्यांनी सांगितले की, गुढीपाडवा हा नवे संकल्प करण्याचा, सकारात्मक विचारांचा आणि भक्तीभावाने जीवन जगण्याचा दिवस आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदाही पोलिस आणि प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मंदिर परिसर स्वच्छ आणि आकर्षक फुलांनी सजवला गेला होता. भाविकांची गर्दी नियंत्रित करण्यासाठी विशेष रांगा लावण्यात आल्या होत्या.

गुढीपाडव्याच्या या पावन प्रसंगी उपस्थित भक्तांनी आपले कुटुंब आणि समाजासाठी समृद्धी, सुख-शांती आणि ऐश्वर्याची प्रार्थना केली. यावेळी संपूर्ण तुळजापूर नगरी भक्तीमय वातावरणाने न्हाऊन निघाली होती.

एक रुपयात पिक विमा योजना बंद होणार, शेतकऱ्यांना दिलेले आश्वासन चुनावी जुमला

मुंबई – राज्य शासनाने एक रुपयात पिक विमा योजना गुंडाळण्याचा निर्णय घेतला असून, यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली 20 मार्च रोजी झालेल्या बैठकीत ही चर्चा करण्यात आली. त्यानंतर 26 मार्च 2025 रोजी राज्याच्या कृषी विभागाने कृषी आयुक्तांना स्पष्ट निर्देश दिले आहेत की, 2025 च्या खरीप हंगामापासून नवीन पिक विमा योजना राबवली जाईल.

चुनावी आश्वासनाची फसवणूक; शेतकऱ्यांना फसवले

महायुती सरकारने सत्तेत येण्यापूर्वी एक रुपयात पिक विमा योजना हे मोठे आश्वासन दिले होते. मात्र, हे आश्वासन आता केवळ जुमलाच ठरले आहे. याआधी “लाडकी बहीण” योजनेसह अनेक आश्वासने पाळली गेली नाहीत. त्याच धर्तीवर एक रुपयात पिक विमा योजना गुंडाळण्यात आली असून, शेतकऱ्यांच्या कोपराला गुळ लावल्याची भावना बळीराजामध्ये निर्माण झाली आहे.

योजना बंद करण्याची कारणे आणि गैरव्यवहाराचे आरोप

सन 2023 पासून राज्यात एक रुपयात पिक विमा योजना राबवण्यात आली. मात्र, योजनेत मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचे उघड झाले आहे. सामूहिक सुविधा केंद्र (CSC) चालकांनी बनावट अर्ज दाखल करून अपात्र व्यक्तींना विम्याचा लाभ दिला. याशिवाय शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष पिकांच्या ऐवजी जास्त विमा रक्कम मिळवण्यासाठी अन्य पिकांची माहिती दर्शवली. शासकीय जमिनी, मंदिरांच्या जमिनी आणि अकृषिक जमिनींवरही विमा काढल्याचे प्रकार समोर आले.

कंपनीला प्रत्येक अर्जावर 40 रुपये मिळतात, याचा गैरफायदा घेत मोठ्या प्रमाणात बनावट अर्ज दाखल करण्यात आले. परिणामी, राज्य शासनाने योजनेतील अडचणी लक्षात घेऊन यास पुन्हा नव्याने संरचित करण्याचा निर्णय घेतला आहे.

शेतकऱ्यांच्या तक्रारी आणि विमा कंपन्यांचा फायदा

सन 2016 ते 2024 या आठ वर्षांत राज्य शासनाने पिक विमा योजनेसाठी 43,201 कोटी रुपये विमा कंपन्यांना दिले. परंतु शेतकऱ्यांना केवळ 32,658 कोटी रुपयांची नुकसान भरपाई मिळाली. परिणामी, विमा कंपन्यांनी तब्बल 10,543 कोटी रुपये नफा मिळवला. याशिवाय, विमा कंपन्यांच्या कार्यपद्धतीबाबत शेतकऱ्यांच्या अनेक तक्रारी असल्याचेही बैठकीत स्पष्ट झाले.

इतर राज्यांचे मॉडेल आणि महाराष्ट्राचा पुढील मार्ग

गुजरातने पिक विमा योजनेतून बाहेर पडून थेट पावसाच्या प्रमाणावर आधारित मदत योजना राबवली आहे. ओडिशामध्ये एक रुपयात पिक विमा केवळ दोन हेक्टरपर्यंतच लागू आहे. आंध्रप्रदेशमध्ये राज्य सरकार 100% पीक पाहणी करून विमा हप्ता भरते. याउलट, राजस्थानमध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्तींसाठी विमा संरक्षण नाही.

महाराष्ट्र राज्याने यापुढे केंद्र शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, खरीप, रब्बी आणि नगदी पिकांसाठी अनुक्रमे 2%, 1.5% आणि 5% विमा हप्ता लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

अनिल जगताप यांची प्रतिक्रिया

पिक विमा अभ्यासक अनिल जगताप यांनी राज्य शासनाच्या निर्णयावर टीका केली आहे. “गैरव्यवहार रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात, परंतु योजना बंद करणे योग्य नाही. शेतकऱ्यांना आर्थिक सुरक्षितता मिळण्यासाठी ही योजना सुरूच ठेवली पाहिजे. सरकारने पीक विमा नुकसान भरपाईच्या प्रक्रियेत सुधारणा करावी. अन्यथा शेतकऱ्यांच्या मनात ही योजना केवळ निवडणुकीसाठी होती, अशी भावना निर्माण होईल.”

अनिल जगताप, पीकविमा अभ्यासक

नवीन धोरणाची अंमलबजावणी

2025 च्या खरीप हंगामापासून नवीन पिक विमा योजना लागू होईल. यामध्ये कापणी प्रयोग आधारित उत्पादनावर विमा रक्कम निश्चित केली जाणार आहे. तसेच, 50% उत्पादनाची माहिती तंत्रज्ञान आधारित पद्धतीने घेतली जाणार आहे. ही योजना राज्यस्तरीय ट्रस्टच्या माध्यमातून राबवण्याचा प्रस्तावही शासनाने दिला आहे.

शेतकऱ्यांसाठी हा निर्णय मोठा धक्का मानला जात असून, सरकारने लवकरच अंतिम निर्णय घेऊन याबाबत स्पष्टता द्यावी, अशी मागणी होत आहे.

धाराशिव येथील महालक्ष्मी लॉन्ड्री आगीच्या भक्ष्यस्थानी, आग विझवताना लॉन्ड्री मालक जखमी

दुकानातील फर्निचर तसेच ग्राहकांचे कपडे आगीत मध्ये जळून झाले खाक,लाखो रुपयांचे नुकसान

धाराशिव- शहरातील समता कॉलनी मध्ये असणाऱ्या नाईकवाडी नगरच्या माने कॉम्प्लेक्स मध्ये नेताजी आबा धोंगडे यांचे महालक्ष्मी लॉन्ड्री या नावाने दुकान आहे. काल सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास नेहमीप्रमाणे दुकान बंद केले होते. पहाटेच्या सुमारास सुमारास दुकानातून अचानकपणे धूर निघत असल्याचे शेजाऱ्यांच्या लक्षात आले. त्यांनी ताबडतोब दुकान मालक नेताजी आबा धोंगडे यांना बोलवून घेतल्यानंतर आग विझवण्याचे प्रयत्न झाले. स्थानिक नागरिकांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. या आगीमध्ये संपूर्ण दुकान जळून खाक झाले आहे. यामध्ये दुकानातील सर्व फर्निचर टेबल कपाट खुर्च्या जळून गेल्या आहेत. महत्त्वाचं म्हणजे ग्राहकांचे लॉन्ड्री साठी आलेले कपडे,ड्रेस, साड्या ही जळून गेलेल्या आहेत,त्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. आग विझवताना फर्निचरचा गरम झालेला काच फुठून लॉन्ड्री मालक नेताजी आबा धोंगडे यांच्या पायाला इजा झाली आहे. त्यांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात ऍडमिट करण्यात आले आहे.
आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असून दुकांनाच्या वरच्या मजल्यावर निवासी फ्लॅट आहेत. सुदैवाने आग तातडीने आटोक्यात आल्याने कोणतीही गंभीर दुर्घटना घडली नाही. जाळीत लॉन्ड्री दुकानाची आनंद नगर पोलिसांनी पाहणी करून पंचनामा केला आहे.