Home Blog Page 18

ट्रॅप मध्ये अडकलेल्या पोलिस निरीक्षकाचे पलायन, सिने स्टाईल पाठलाग करत पकडले

नावात ‘मारुती’ असल्यानं कोणी उड्डाण घेतलं, तर त्यात नवल नाही! पण वर्दीतला माणूस जर खाकीच्या शपथेऐवजी लाचखोरीच्या वाटेवर निघाला, तर तो दिवस दूर नसतो, जेव्हा त्याच्या मागे हातात बडगा घेऊन आपलेच सहकारी धावत असतात! धाराशिव ग्रामीणचे पोलीस निरीक्षक मारोती शेळके यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडलं, पण पकडलं तरी काय झालं? शेळके साहेबांनी आपली इज्जत वाचवण्यासाठी थेट पळ काढला! मात्र पळून सुटावं तर शप्पथ! खाकीवाल्यांनी पाठलाग करत शेवटी लेडीज क्लबपर्यंत त्यांचा पाठलाग करून त्यांना पकडलंच!

खरं तर प्रकरण काही साधं नव्हतं. आत्महत्या प्रकरणात आरोपीवर कारवाई न करण्यासाठी १ लाखाची लाच मागितल्याचा आरोप होता. पैशांची डील झाली – थेट ९५ हजारांवर! आणि त्यातही धक्कादायक गोष्ट म्हणजे, ही लाच घेतली गेली एका महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या हस्ते! हो, सहकारी महिला अंमलदार मुक्ता लोखंडे यांचाही यात सहभाग होता. एकीकडे आत्महत्येसारखा संवेदनशील गुन्हा, दुसरीकडे त्यात लाचखोरीचा काळा हात – हे सगळं ऐकूनच सामान्य माणसाच्या अंगावर शहारे यायला हवेत!

लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी कारवाई केली. मारोती शेळके आणि मुक्ता लोखंडे या दोघांना रंगेहात पकडून त्यांना कार्यालयात आणण्यात आलं. इथवर सगळं ठिक होतं. पण खरी ड्रामा सुरुवात झाली त्यानंतर! लाचलुचपत कार्यालयात आणल्यानंतर काही क्षणातच शेळके यांनी संधी साधली आणि नजर चुकवत थेट पळ काढला. छत्रपती संभाजी महाराज चौक, आर. पी. कॉलेज रोड, अगदी लेडीज क्लबपर्यंत – धावपळ सुरू झाली. आरडाओरड, सायरन, आणि लोकांची गर्दी… संपूर्ण परिसरात गोष्टी एखाद्या मराठी सिनेमातल्या क्लायमॅक्स सीनसारख्या घडत होत्या!

शेवटी पोलिसांनी त्याला पकडलं आणि दुचाकीवरून पुन्हा कार्यालयात आणलं. भररस्त्यात, सगळ्या शहराच्या नजरेसमोर खाकीचा माज उतरलेला दिसला! ‘उतनार नाही, मातनार नाही’ म्हणणाऱ्याने, शपथ विसरली की काय, असाच प्रश्न शहरवासीयांना पडलाय. सध्या या संपूर्ण घटनेचा सीसीटीव्ही फुटेजही समोर आलाय आणि सोशल मीडियावर याची जोरदार चर्चा सुरू आहे.

श्री तुळजाभवानी सैनिक शाळेतील भ्रष्टाचार व मारहाणीप्रकरणी चौकशी करा – शिवसेना तालुकाप्रमुख अमोल जाधव यांची मागणी

तुळजापूर – श्री तुळजाभवानी सैनिक शाळेमध्ये आर्थिक गैरव्यवहार आणि विद्यार्थ्यांवरील अमानुष मारहाणीच्या घटना घडत असल्याच्या पार्श्वभूमीवर, या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेचे तुळजापूर तालुकाप्रमुख अमोल शिवाजीराव जाधव यांनी प्रशासनाकडे केली आहे.

श्री जाधव यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांकडून विविध वस्तू व सोयी-सुविधांच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर – ३५,०००, १५,००० आणि ८,५०० रुपये – रक्कम वसूल करण्यात आली आहे. या वसुलीबाबत कोणतीही अधिकृत पावती देण्यात आलेली नाही, तसेच ती रक्कम शाळेच्या अधिकृत खात्यात जमा झाल्याचा पुरावा उपलब्ध नाही. काही पालकांनी प्रत्यक्षरित्या ही रक्कम दिल्याचे कबूल केले असल्याने हा गंभीर आर्थिक भ्रष्टाचार असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

तसेच, शाळेत शिकणाऱ्या इयत्ता आठवीच्या एका विद्यार्थ्यावर शिक्षकाने बेदम मारहाण केल्याने तो बेशुद्ध पडल्याची घटना घडली असून, संबंधित पालकांनी यासंदर्भात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या प्रकारामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे, असे श्री जाधव यांनी स्पष्ट केले.

या दोन्ही प्रकारांची तातडीने व पारदर्शक चौकशी करण्यासाठी स्वतंत्र चौकशी समितीची स्थापना करावी व दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. अन्यथा, शिवसेना या अन्यायाविरोधात तीव्र आंदोलन छेडेल आणि त्यातून निर्माण होणाऱ्या कायदा-सुव्यवस्थेच्या परिस्थितीला प्रशासन जबाबदार राहील, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

शिवसेनेच्या या मागणीनंतर पालक आणि सामाजिक कार्यकर्त्यांमध्येही संतप्त प्रतिक्रिया उमटत असून, लवकरात लवकर कारवाई न झाल्यास जनआंदोलन होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी – पोलिस निरीक्षक व महिला पोलीस कर्मचाऱ्या विरोधात ए.सी.बी.ची कारवाई

धाराशिव | प्रतिनिधी

धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस निरीक्षक आणि महिला पोलीस कर्मचाऱ्याविरोधात लाच मागणीप्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाने (लाप्रवि) सापळा कारवाई करत ठोस पावले उचलली आहेत. एका ४८ वर्षीय महिलेकडून त्यांच्या मुलाच्या गुन्ह्यात मदत करण्याच्या मोबदल्यात एकूण १ लाख रुपयांची लाच मागितल्याचे उघड झाले आहे.

याप्रकरणी आरोपींमध्ये

  1. मारोती निवृत्ती शेळके (वय ५४ वर्षे), पोलीस निरीक्षक, पो.स्टे. धाराशिव ग्रामीण
  2. मुक्ता प्रकाश लोखंडे (वय ३४ वर्षे), महिला पोलीस नाईक, पो.स्टे. धाराशिव ग्रामीण
    यांचा समावेश आहे.

तक्रारीची खातरजमा झाल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धाराशिव यांनी पोलीस उपअधीक्षक श्री. योगेश वेळापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली आज दिनांक २५ जून २०२५ रोजी शासकीय विश्रामगृहाजवळ सापळा कारवाई केली.

तक्रारदाराने सुमारे ९५,००० रुपयांची रक्कम दिली असता, ती महिला पोलीस नाईक मुक्ता लोखंडे हिने स्वीकारली. पंचासमक्ष झालेल्या या कारवाईत ती रंगेहाथ पकडली गेली. यानंतर दोघा आरोपींची अंगझडती घेण्यात आली असून, त्यांच्याकडून मोबाईल फोन्स, मोटारसायकल, ओळखपत्र इत्यादी साहित्य जप्त करण्यात आले आहे. या सापळ्यात अद्याप कोणतीही अटक करण्यात आलेली नसून, फौजदारी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ अंतर्गत

  • मुक्ता लोखंडे यांच्याविरोधात कलम ७ व ७अ
  • तर मारोती शेळके यांच्याविरोधात कलम १२ नुसार कारवाई प्रस्तावित आहे.

सदर कारवाईत सहाय्यक सापळा अधिकारी पो.नि. बाळासाहेब नरवटे, मार्गदर्शक पोलीस अधीक्षक संदीप आटोळे व अपर पोलीस अधीक्षक मुकुंद अघाव यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. सापळा पथकात पोलीस अंमलदार नागेश शेरकर आणि शशीकांत हजारे सहभागी होते.

नागरिकांना आवाहन
कोणताही शासकीय अधिकारी किंवा त्यांच्या वतीने खाजगी व्यक्ती शासकीय कामासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त लाचेची मागणी करत असल्यास नागरिकांनी खालील क्रमांकांवर तात्काळ संपर्क साधावा:
📞 टोल फ्री क्रमांक: 1064
📞 पोलीस उपअधीक्षक, लाप्रवि, धाराशिव: 02472-222879

पारगाव हायवेवरील सोनसाखळी चोरी उघडकीस — वाशी पोलिसांचा आठ तासांत तपास, दोन आरोपी अटकेत

वाशी (प्रतिनिधी – राहुल शेळके):
पारगाव (ता. वाशी) हायवेवर झालेल्या सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यात वाशी पोलिसांनी अवघ्या आठ तासांत तपास पूर्ण करून दोन आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून चार तोळ्यांची सोन्याची चैन (किंमत सुमारे २.८० लाख रुपये) हस्तगत करण्यात आली आहे.

ही घटना २० जून २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली. फिर्यादी दीपक भारत यादव (वय. ३५, व्यवसाय – शेती, रा. धनकवडी, ता. धारूर, जि. बीड) हे आपल्या दोन मित्रांसह तुळजापूर-येरमाळा येथे दर्शनासाठी गेले होते. दर्शन करून बीडकडे परतताना, पारगाव टोलनाका ओलांडल्यावर सुमारे ५०० मीटर अंतरावर लघुशंकेसाठी थांबले असता, दोन अनोळखी इसमांनी “दादा, कुठले आहात?” असे विचारत त्यांच्या गळ्यातील चार तोळ्यांची सोन्याची साखळी हिसकावून पळ काढला.

या प्रकरणी वाशी पोलिस ठाण्यात गुन्हा क्र. २०८/२०२५ नुसार भारतीय न्याय संहिता कलम ३०४(२), ३(५) अंतर्गत २१ जून रोजी पहाटे १:१६ वाजता गुन्हा नोंदवण्यात आला. तपास पो.हे.कॉ. १५२९ आर.बी. लाटे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाला.

घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक (धाराशिव), अपर पोलीस अधीक्षक, उपविभागीय अधिकारी  स्वप्नील राठोड (भूम चार्ज) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक एस.आर. थोरात, सहाय्यक पोलीस निरीक्षक एस.व्ही. सावंत, परि. पो.नि. ए.वी. भाळे तसेच अन्य कर्मचाऱ्यांनी तातडीने तपास सुरू केला.

गुप्त माहितीदाराच्या सहाय्याने व आरसीपी प्लाटूनच्या मदतीने वाशी पोलीस ठाणे हद्दीत कॉम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आले. यामध्ये नवनाथ ऊर्फ बाळू कल्याण पवारनिमा छन्नू पवार, (दोघे रा. लोनखस पारधी पिढी, ता. वाशी) यांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.

पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून चोरीस गेलेली चार तोळ्यांची सोन्याची चैन (किंमत ₹२.८० लाख) जप्त केली असून आरोपींना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सुरु आहे.

पोलीस पथक:
पो.हे.कॉ. लाटे (१५२९), यादव (१५१६), पो.ना. औताडे (१५९८), पो.कॉ. सय्यद (१७०२), मलंगनेर (१७८१), साठे (४२८), गिराम (२६४), नरवडे (३५९), पवार (१६१६) यांचा तपासात सक्रिय सहभाग होता.


टोकण यंत्र, बीजप्रक्रिया ड्रमसाठी अर्ज ; २३ जून अंतिम मुदत,परंडा तालुक्यात ‘ONGC’ च्या CSR निधीतून शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी

परंडा (दि. २२ जून) – ONGC कंपनीच्या सीएसआर (CSR) निधीतून परंडा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी टोकण यंत्र, मानवचलीत बीजप्रक्रिया ड्रम आणि मोटारचलीत बीजप्रक्रिया ड्रम उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. इच्छुक शेतकऱ्यांनी दिनांक २३ जून २०२५ पर्यंत ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करावेत, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी नानासाहेब लांडगे यांनी केले आहे.

या योजनेअंतर्गत टोकण यंत्र – १३, मानवचलीत बीजप्रक्रिया ड्रम – १३ आणि मोटारचलीत बीजप्रक्रिया ड्रम – ३ असे एकूण लक्षांक ठरविण्यात आले आहेत. अर्जांची संख्या लक्षांकाशी जास्त झाल्यास २४ जून रोजी तालुका कृषी अधिकारी कार्यालयात लॉटरी पद्धतीने सोडत काढण्यात येईल, असेही लांडगे यांनी स्पष्ट केले.

अनुदानाचे स्वरूप खालील प्रमाणे आहे:

  • टोकण यंत्रासाठी ९०% अनुदान किंवा कमाल ₹९,००० (यापैकी जे कमी असेल)
  • मानवचलीत बीजप्रक्रिया ड्रमसाठी ९०% अनुदान किंवा कमाल ₹९,०००
  • मोटारचलीत बीजप्रक्रिया ड्रमसाठी ९०% अनुदान किंवा कमाल ₹३५,५५०

टोकण यंत्राच्या वापरामुळे बियाण्यांची बचत आणि उत्पादनक्षमता वाढते, तर बीजप्रक्रिया ड्रमद्वारे अल्प कालावधीत कीटकनाशके व बुरशीनाशके मिसळून बीजप्रक्रिया करणे शक्य होते. त्यामुळे ही साधने शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत.

अर्ज सादर करताना तालुका कृषी अधिकारी, सहायक कृषी अधिकारी, उप कृषी अधिकारी किंवा मंडळ कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

टेक्निकल टेक्सटाइल पार्क, नजरेआड गेलेल्या विषयावर काल्पनिक पात्रांची चर्चा

धाराशिव जिल्ह्यात शेतीचा हंगाम सुरु असल्याने शेतीची कामे जोरात सुरू आहेत, पेरणीसारखा पाऊस झाल्याने समाधान व्यक्त केले जात असून शेतीच्या कामातून वेळ मिळाला की एका खेडेगावातील दोन मित्र रावसाहेब आणि आबासाहेब त्याच टपरीवर भेटतात आणि त्यांची चर्चा सुरू होते.

रावश्या – (गाणं गुणगुणत असलेल्या आबाश्याच्या गाण्याकडे कान टवकारून बोलतो) जरा मोठ्यानं तरी म्हण आमाला बी कळू दे कोणत गाणं हाय ते

आबाश्या – (जरा उच्च स्वरात ) गं कुणी तरी येणार येणार गं

रावश्या – (आबाश्याला थांबवत) आरे ही डोहाळजेवणात ल गाणं, ते बी बायाचं अन् तू म्हणायलास व्हय

आबाश्या – सकाळ सकाळी बनवाबनवी पाहिला, लक्ष्या अशोक सराफ, सचिन पिळगावकर यांचा

रावश्या –  झोपेतून उठल्या उठल्या टीव्ही नको लावत जाऊ, कामं धंद्याचं बघ जरा

आबाश्या –  जित्राबाचं आई आणि तात्या बघत्यात,शेतातली थोडी कामं असत्यात ती झाली की मोकळा असतो

रावश्या – कुठं तर कामाला जा, मोकळ्या येळेत टग्यागत फिरू नको

आबाश्या – (दुर्लक्ष करत पुन्हा तेच बनवाबनवी चित्रपटामधलं गाणं गुणगुणायला सुरू करतो) गं कुणी तरी….

रावश्या – (थोडं गंभीर होत) लेका तुला काय कळतं का मी कशाबद्दल बोलतोय, तू कुठलं गाणं म्हणतोय

आबाश्या – व्हय कळतंय म्हणूनच हे गाणं म्हणतोय

रावश्या – याला काय अर्थ हाय जरा इस्कटून सांग

आबाश्या – आपली परिस्थिती बनवाबनवितल्या कथेपेक्षा वाईट झालीय जिल्ह्याला परिवर्तनाचे डोहाळे तर लागलेत पण विकास होईल की भकास होईल हेच कळना झालंय, म्हणून हे गाणं गुणगुणत होतो

रावश्या – जरा स्पष्ट बोल अन् नीट सांग

आबाश्या – ते कौडगाव एम.आय.डी.सी त ते टेक्निकल टेक्सटाइल पार्क होणार हाय त्याच्याबद्दल हाय हे

रावश्या – केंद्रात आणि राज्यात युतीचं सरकार त्यामुळं हे होणारच, उद्योगमंत्र्यांनी विधानसभेत सांगितलं ना हे होणार आहे म्हणून तू बिनधास्त रहा, राणा दादा पाठपुरावा करायल्यात

आबाश्या – काय म्हणले होते उद्योगमंत्री ध्यानात हाय का तुझ्या

रावश्या – नाही ध्यानात

आबाश्या – लक्षवेधीला उत्तर देताना त्यांनी एक समिती स्थापन करू आणि ही समिती एक महिन्यात अहवाल देईल असं सांगितलं व्हतं…

रावश्या – व्हय व्हय सांगितलं व्हतं पण त्याला दोन वरीस झालं

आबाश्या – व्हय २० मार्च २०२३ ला त्यांनी हे सांगितलं

रावश्या – मग ते खरच हाय की आता ते उद्योजकांना काय कसली ती अभिरुची दाखवून अर्ज करायला सांगितलं हाय एम.आय.डी.सी. नं

आबाश्या – मग त्या समितीचा अहवाल कुठाय? समितीचे अध्यक्ष कोण? किती जणांची समिती?

रावश्या – लय खोलात नको जाऊ जरा सकारात्मक वाग आज योगा डे आहे, सकारात्मक इचार कर

आबाश्या – आरं प्रश्न पडला पाहिजे, इचारलं पाहिजे कोपराला लागलेला गुळ चाटता बी येत नाय अन् खाता बी येत नाय

रावश्या – कुणाला इचरणार तू? आज शनिवार जिल्हा कचेरी बंद..मंत्रालय बंद.. कुणाला इचारणार

आबाश्या – आपल्या मन की बात या विकासाच्या गप्पा करणाऱ्या नेत्यांना कधी समजणार रं?

रावश्या – समजल समजल…

आबाश्या – तुझ्या वळखीचे पत्रकार हायत त्यांना तर इचार समिती स्थापन झाली का? समितीचा अहवाल आला का? कौडगाव एम.आय. डी.सी. त टेक्निकल टेक्स्टाईल पार्क होईल का? कधीपर्यंत होईल? इचार लगा मला बी त्यात काही तरी काम मिळालं तर बरं होईल

रावश्या – मला वाटतंय त्यांच्याकडं बी ही माहिती नसल मग त्या अभिरुचीच काय? आपण किती दिवस उद्योग येणार येणार हे ऐकत बसायचं?

आबाश्या – म्हणून तर म्हणतो मग म्हण तू बी ही गाणं…. गं कुणी तरी येणार येणार गं….

आकाश महादेव नरोटे

कार्यकारी संपादक

कार्यकारी संपादक

दैनिक जनमत ८४२१५३१९७६

धाराशिव जिल्ह्यात दुसऱ्या वाघाची एन्ट्री? सांगवी परिसरात वाघाचे दर्शन, प्रत्यक्षदर्शी व्यक्तीची तब्येत बिघडली!

धाराशिव | प्रतिनिधी

येडशी अभयारण्यात नुकताच टिपेश्वर अभयारण्यातून स्थलांतरित झालेल्या वाघाने धुमाकूळ घातलेला असतानाच, आता धाराशिव जिल्ह्यात दुसऱ्या वाघाच्या उपस्थितीची जोरदार चर्चा सुरू आहे. तुळजापूर तालुक्यातील नंदगाव आणि धाराशिव तालुक्यातील सांगवी परिसरात दिसलेला वाघ हा आधीच ओळखलेला वाघ आहे की दुसरा नवा वाघ आहे, याबाबत वनविभागात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.

वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, सांगवी आणि नंदगाव परिसरात दिसलेला वाघ हा टिपेश्वर येथून आलेलाच आहे. मात्र, बार्शी वनविभागाचे अधिकारी म्हणतात की टिपेश्वरचा वाघ सध्या बार्शी तालुक्यातच आहे. त्यामुळे धाराशिव जिल्ह्यात दिसलेला वाघ हा दुसरा असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

वनविभाग माहिती लपवत आहे का?

येडशी अभयारण्यात स्थायिक झालेला वाघ, अचानक तुळजापूर तालुक्यात कसा गेला, हा मोठा प्रश्न आहे. कारण, यामध्ये नागरी वस्त्या, ग्रामीण भाग तसेच दोन राष्ट्रीय महामार्ग पार करावे लागतात. ही हालचाल शक्य नसल्याने नागरिकांत संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे वनविभाग माहिती लपवत असल्याचा आरोप देखील होत आहे. नागरिकांनी वनविभागाने यासंदर्भात अधिकृत आणि स्पष्ट माहिती देण्याची मागणी केली आहे.

प्रत्यक्षदर्शी व्यक्तीची तब्येत बिघडली

१६ जून रोजी सांगवी शिवारात वाघाचे प्रत्यक्ष दर्शन झाल्याचे काही नागरिकांनी सांगितले. भक्तराज दहीभाते या नागरिकाने वाघ पाहिल्यानंतर प्रचंड घाबराटीतून त्यांची तब्येत बिघडली असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे वनविभागासोबतच आरोग्य विभागानेही समुपदेशन आणि उपचार करण्याची गरज आहे, अशी मागणी होत आहे.

वाघ जागजी परिसरात शिरला, शिकार केल्याची शंका

वाघ सांगवी परिसरातून रेल्वे लाइन ओलांडून जागजी भागात शिरल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे. तेथील काही लोकांनी त्या परिसरात वाघाने एका प्राण्याची शिकार केल्याचेही सांगितले. या वाघाची वस्तीतील हालचाल पाहता तो मॅनहिटर असण्याची शंका व्यक्त केली जात असून, संभाव्य धोका लक्षात घेता वनविभागाने तातडीने योग्य त्या उपाययोजना करण्याची गरज आहे.

सामाजिक कार्यकर्त्यांचा आंदोलनाचा इशारा

शेतीचा हंगाम सुरू असून शेतकरी रात्री शेतात मुक्काम करत आहेत. अशा वेळी वाघ मोकाट फिरत असल्यामुळे त्याच्या हल्ल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे वनविभागाने त्वरीत वाघाचा बंदोबस्त करावा, अन्यथा मागील काळात स्थगित केलेले आंदोलन कोणतीही पूर्वसूचना न देता पुन्हा सुरू करण्यात येईल, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते मनोज जाधव यांनी दिला आहे.



धाराशिव जिल्ह्यात वाघाच्या वाढत्या हालचालींमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वनविभागाने पारदर्शकता ठेवून जनतेच्या सुरक्षेसाठी तातडीने ठोस पावले उचलावीत, हीच वेळेची गरज आहे.

दरोड्याच्या तयारीत असलेले तीन आरोपी अटकेत; गावठी पिस्तूल व पाच लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त

धाराशिव : धाराशिव जिल्ह्यात दरोड्याच्या तयारीत असलेले तीन संशयित इसम स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाच्या कारवाईत अटकेत आले. त्यांच्या ताब्यातून गावठी बनावटीचे पिस्तूल, कोयता, जिवंत काडतुसे, चारचाकी व दुचाकी वाहनांसह सुमारे ५ लाख ५ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

मा. पोलीस अधीक्षक रितु खोखर व अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या आदेशानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे, सचिन खटके व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.

दि. १७ जून रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास पथक पेट्रोलिंग करीत असताना तेरणा कॉलेजजवळील विमानतळ रस्त्यावर काही संशयित इसम एका कार व तीन दुचाक्यांसह थांबले असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने घटनास्थळी जाऊन शासकीय वाहन काही अंतरावर थांबवून पायी तपासणी सुरू केली. पोलिसांना पाहताच दोघे इसम दुचाकीवरून पळून गेले. मात्र, उरलेले तीन संशयित ताब्यात घेतले.

त्यांची नावे पुढीलप्रमाणे :

  1. धुपकिरण उर्फ अनिलशेट रामलगन चौधरी (वय 47, रा. अरिवला, ता. भानपुर, जि. बस्ती, उत्तर प्रदेश)
  2. निलेश उर्फ कांचन संभाजी चव्हाण (वय 32, रा. काकानगर, धाराशिव)
  3. मुकेश शाम शिंदे (वय 24, रा. शिंगोली, धाराशिव)

त्यांच्याकडून ७५ हजार रुपये किमतीचे गावठी पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे, लोखंडी कोयता, २.३० लाख किमतीची ह्युंडाई सॅंट्रो कार, १.५५ लाख किमतीची बुलेट मोटरसायकल आणि ४५ हजार किमतीची होंडा ॲक्टीवा स्कूटर असा एकूण ५ लाख ५ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

अटक केलेल्या तिघांविरुद्ध धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई पोहेकॉ विनोद जानराव, समाधान वाघमारे, नितीन जाधवर, पोलीस नाईक बबन जाधवर, चालक पोहेकॉ महेबुब अरब, पोलीस का. विनायक दहीहांडे व प्रकाश बोईनवाड यांच्या सहभागातून पार पडली.

येत्या नवरात्र उत्सवात तुळजापूर विकास प्रकल्पाचे भूमिपूजन -परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

विकास आराखड्याच्या संदर्भात अधिकृत माहिती अध्यक्षांच्या अनुमतीने देण्याच्या सूचना

मुंबई :या श्री क्षेत्र तुळजापूर येथील कुलस्वामिनी तुळजाभवानी मंदिर परिसराच्या विकास प्रकल्पाचे भूमिपूजन सन्माननीय मुख्यमंत्री श्री . देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते आणि उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे आणि श्री .अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये करण्याचा मानस असून हा प्रकल्प पुढील तीन – साडेतीन वर्षात पूर्ण करण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. असे प्रतिपादन परिवहन मंत्री व धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. प्रताप सरनाईक यांनी केले .ते या अनुषंगाने मंत्रालयात बोलावलेल्या बैठकीमध्ये बोलत होते. या बैठकीला छ.संभाजीनगर विभागाचे विभागिय आयुक्त जितेंद्र पापळकर,आमदार कैलास पाटील, आमदार प्रवीण स्वामी यांच्या सह धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार जिल्हा परिषद मुख्याधिकारी डॉ मैनाक घोष, अतिरिक्त पोलीस अधीक्षक शफाकत आमना व संबंधित अधिकारी वृंद उपस्थित होते.
या वेळी बोलताना मंत्री सरनाईक म्हणाले महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठां पैकी श्री. तुळजाभवानी देवी, तुळजापूर हे पूर्ण शक्तिपीठ आहे. तसेच आई तुळजाभवानी क्षात्रतेजाची स्फूर्ती देवता, प्रेरणाशक्ती व हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री. छत्रपती शिवाजी महाराज यांचे कुलस्वामिनी आहे. देशभरातून दरवर्षी सुमारे १ ते १.५ कोटी भाविक श्रीक्षेत्र तुळजापूरला भेट देत असतात. त्यांना भविष्यात चांगल्या सुख- सुविधा मिळाव्यात तसेच तुळजापूर शहराचा सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने १८६५ कोटी रुपये खर्चाचा तुळजापूर विकास आराखडा बनवला. या प्रकल्पामध्ये तुळजाभवानी मंदिर परिसर आणि संपूर्ण शहराचा सर्वांगीण विकास करण्याच्या सर्व गोष्टी अंतर्भूत करण्यात आलेले आहेत.
हा प्रकल्प गतीने मार्गी लागण्यासाठी भूसंपादन, तांत्रिक मान्यता आणि विविध निविदा प्रक्रिया या तिन्ही गोष्टी समांतर पातळीवर करण्यात याव्यात अशा सूचना यावेळी मंत्री सरनाईक यांनी जिल्हाधिकारी धाराशिव यांना दिल्या. तसेच प्रत्यक्ष काम सुरू होण्यापूर्वी भक्तगण व पुजारी मंडळ यांच्याकडून तेथील धार्मिक प्रथा -परंपरांचा आदर राखत त्यांच्या सूचना अंमलात आणाव्यात अशा सूचना मंत्री सरनाईक यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

अष्टभुजा प्रतिमेला भक्तगणांचा विरोध

श्री क्षेत्र तुळजापूर विकास आराखड्यांतर्गत १०८ फुटाचे शिल्प उभारले जाणार आहे. या शिल्पामध्ये श्री. तुळजाभवानी माता छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी तलवार देत असल्याचे दाखवण्यात आले आहे. परंतु हे दाखवत असताना श्री. तुळजाभवानी मातेची प्रतिमा ही अष्टभुजाकृती दाखवण्यात आलेली आहे. याला अनेक भक्तगण व पुजारी मंडळांनी आक्षेप नोंदवलेला आहे. त्यांच्या भावनांचा आदर राखत संकेतस्थळावरील विकास आराखड्याच्या संकल्प चित्रातून ही प्रतिमा काढून टाकण्यात यावी, तसेच शिल्प तयार करताना पुरातत्व विभाग, इतिहास तज्ञ व अनुषंगिक घटकांशी चर्चा करून देवीची प्रतिमा कशी असावी याबाबत निर्णय घ्यावा असे निर्देश पालकमंत्री व तुळजापूर विकास प्रकल्पाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी संबंधितांना दिले. याबरोबरच यापुढे विकास आराखडा संदर्भात प्रसिद्धी साठी द्यावयाची पत्रे , परिपत्रके ही परस्पर न देता अध्यक्षांच्या अनुमतीनेच देण्यात यावीत ,असे निर्देश त्यांनी यावेळी जिल्हाधिकारी धाराशिव यांना दिले.

महाळुंग येथील अपघातात हुंडाई कंपनीच्या वेणीव गाडीचा चक्काचूर

अपुर्ण कामामुळे पालखी महामार्गावरती अपघात सत्र सुरूच प्रवाशांचा जीव धोक्यात

संग्रामनगर दि.१५ (प्रतिनिधी)
महाळुंग (ता.माळशिरस) येथून जाणाऱ्या संत तुकाराम महाराज पालखी महामार्गावरती आज मोठा अपघात घडलेला आहे. हुंडाई कंपनीची वेणू चार चाकीगाडी पालखी महामार्गावरील अपुर्ण कामामुळे रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या लाईटच्या ट्रान्सफार्मरवरती जाऊन आदळली आहे.गाडी समोरून चक्काचूर झालेली आहे.सुदैवाने सर्व प्रवासी सुखरूप आहेत.
या गाडीमध्ये सांगोला तालुक्यातील कोळागाव मधील पाच प्रवासी होते.तीन प्रवासी किरकोळ जखमी आहेत. तात्काळ स्थानिकांनी लाईटचा ट्रांन्सफार्मर बंद केल्यामुळे व प्रवाशांना बाहेर काढून स्थानिक दवाखान्यामध्ये नेऊन प्रथम उपचार करण्यात आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार सांगोला तालुक्यातील दहा ते बारा एलआयसी काम करणारे अधिकारी कर्मचारी मनाली या ठिकाणी दहा दिवसांपूर्वी फिरण्यासाठी गेले होते.रात्री दिल्लीहून पहाटे पुण्याच्या दिशेने विमानाने प्रवास करून पुणे एअरपोर्टवरती सर्व प्रवासी सकाळी सात वाजता पोहोचले. त्या ठिकाणी तीन फोर व्हीलर गाड्या त्यांनी पार्किंग केल्या होत्या.दुपारचे जेवण रस्त्यामध्येच उरकून ते सर्वजण आपल्या घरी सांगोल्याच्या दिशेने येत असताना इंदापूर-माळीनगर मार्गे महाळुंगमधील डांगे वस्ती या ठिकाणी दुपारी तीनच्या दरम्याने रस्त्याचे काम अपुर्ण राहिल्यामुळे व डाव्या साईडची एक लेन्थचे काम पूर्ण नसल्यामुळे सदर गाडी बाजूच्या लाईटच्या ट्रान्सफरवरती जाऊन आदळली आणि भला मोठा आवाज झाला.एकंदरीत गेले तीन वर्षापासून या ठिकाणी पालखी महामार्गाचे काम अपुरे राहिल्यामुळे आणि वेळेत काम पूर्ण न केल्यामुळे अशा प्रकारचे अनेक अपघात महाळुंगमधील डांगे वस्ती या ठिकाणी होत आहेत.संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग इंदापूर, माळीनगर,महाळुंग,श्रीपूर, तोंडले-बोंडले मार्गे पंढरपूरच्या दिशेने जातो.परंतु माळीनगर- महाळुंग-श्रीपूर तोंडले-बोंडले पर्यंत अनेक ठिकाणी या महामार्गाची कामे अपुर्ण असल्यामुळे या रोडवरती अनेक अपघात होत आहेत.मागच्याच आठवड्यामध्ये एकाला जीव गमवावा लागला आहे.
येत्या १८ जूनला तुकाराम महाराज पालखीचे देहू येथून प्रस्थान होणार आहे आणि २ जून रोजी लाखोच्या संख्येने वारकरी आणि त्यांचे वाहने याच महामार्गावरून प्रवास करणार आहेत.या वेळेत हे काम पूर्ण न झाल्यास स्थानिक नागरिकांना वारकऱ्यांना या ठिकाणी अपघाताला सामोरे जावे लागणार आहे असे येथील स्थानिक नागरिकांनी सांगितले आहे.