तोतया पोलिसाने फसवले ; अर्ध्या तोळ्याची अंगठी लंपास
उस्मानाबाद – जिल्ह्यात तोतया पोलिसांचे पेव फुटले आहे. उस्मानाबाद शहरातील एम आय डी सी परिसरात वयस्कर व्यक्तीला पोलीस आहे सांगून, गांजा ची तस्करी केली आहे का ते तपासण्यासाठी झडती घेऊन अंगठी लंपास करून फसवणूक केल्याची घटना घडली आहे.
याबाबत माहिती अशी की, वकील कॉलनी, उस्मानाबाद येथील पुरोहीत- चंद्रकांत रामचंद्र महाजन हे दि. 13.01.2022 रोजी 13.00 वा. सु. उस्मानाबाद एमआयडीसी मधील एका रस्त्याने जात होते. यावेळी एका मोटारसायकलवरील एका अनोळखी पुरुषाने पोलीस असल्याची बतावणी करुन चंद्रकांत यांना त्यांच्या हातातील अंगठी रुमालात बांधून खीशात ठेवण्यास सांगीतले. यावर चंद्रकांत यांनी त्या पुरुषास आपली 5 ग्रॅम वजनाची सुवर्ण अंगठी व रुमाल दिला असता त्याने ती अंगठी रुमालात गुंडाळल्याची हातचलाखी करुन फक्त गुंडाळलेला रुमाल चंद्रकांत यांना देउन ती अंगठी घेउन निघून गेला. थोड्या वेळाने चंद्रकांत यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. अशा मजकुराच्या चंद्रकांत महाजन यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 419, 170 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
रक्तदान शिबिरात ५५ रक्तदात्यांनी केले रक्तदान
सलगरा,दि.१२(प्रतिनिधी)
तुळजापूर तालुक्यातील गंधोरा येथे कै.आनंदा भोसले यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त तसेच राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीचे औचित्य साधत दि.१२ जानेवारी रोजी आयोजक मनोज भोसले, आणि नेताजी एकंडे मित्र परिवार यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सध्या कोरोना च्या वाढत्या संसर्गामुळे विविध रुग्णालयांमध्ये आज काही प्रमाणात रक्तपेढींमधील साठा कमी पडू लागला आहे. ‘रक्तदान हेच जीवनदान, रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान‘ असे समजले जाते. म्हणुन त्याच अनुषंगाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. अशा प्रकारे या शिबिरामध्ये ५५ रक्तदात्यांनी रक्तदान करून शिबिर यशस्वी केले.