27 November 2026, Fridayदैनिक जनमत | निर्भीड पत्रकारिता
जाहिरातीसाठी जागा • 728 × 90
जिल्हा बातम्याई-पेपरधाराशिवसोलापूरसातारासांगलीपुणेकोल्हापूर
धाराशिव

धाराशिव पोलिस दलात ‘फोन पे’वरून लाखोंची हप्तेवसुली?

वर्षभरापासून तक्रारी करूनही कारवाई नसल्याचा आरोप; पोलिस अधीक्षकांच्या भूमिकेवरही संशय; पोलिस निरीक्षक शकील शेख यांनी आरोप फेटाळले

धाराशिव (प्रतिनिधी) : अवैध धंदेचालकांकडून पोलिस कर्मचाऱ्यांमार्फत ‘फोन पे’च्या माध्यमातून लाखो रुपयांची हप्तेवसुली करण्यात आल्याचा गंभीर आरोप केशेगाव (ता. धाराशिव) येथील लहू रामा खंडागळे यांनी केला आहे. यासंदर्भात आर्थिक व्यवहारांच्या पुराव्यांसह वर्षभरापूर्वी तक्रारी करूनही संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई झाली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या भूमिकेवरही संशय व्यक्त करीत या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी शुक्रवारी (दि. २७) निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. दरम्यान, पोलिस निरीक्षक शकील शेख यांनी हे आरोप फेटाळले आहेत.

धाराशिव शहर पोलिस ठाण्याचे तत्कालीन पोलिस निरीक्षक शकील शेख यांनी कनिष्ठ पोलिस कर्मचाऱ्यांमार्फत अवैध धंदेचालकांकडून हप्ते वसूल केल्याचा आरोप खंडागळे यांनी निवेदनात केला आहे. संबंधित कर्मचाऱ्यांच्या ‘फोन पे’च्या माध्यमातून ही रक्कम स्वीकारण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्याच पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले सहाय्यक पोलिस निरीक्षक दिनेश उत्तम जाधव यांनी अवैध धंदेचालकांकडून थेट स्वतःच्या बँक खात्यात रक्कम हस्तांतरित करून घेतल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

यासंदर्भात २५ ऑगस्ट व २४ सप्टेंबर २०२५ रोजी जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे, तर २६ सप्टेंबर २०२५ रोजी छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राच्या विशेष पोलिस महानिरीक्षकांकडे तक्रार अर्ज देण्यात आले होते. सहाय्यक पोलिस निरीक्षक जाधव यांच्या बँक खात्याची स्पष्ट माहितीही तक्रारीत देण्यात आली होती. मात्र, वर्षभराहून अधिक कालावधी उलटूनही संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली नसल्याचे खंडागळे यांनी म्हटले आहे. उलट, पोलिस निरीक्षक शकील शेख यांच्याकडे कळंब पोलिस ठाण्याची जबाबदारी सोपविण्यात आल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे.

पुराव्यांसह तक्रारी दाखल करूनही संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यास उदासीनता दाखविली जात असल्याने जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या भूमिकेवरही खंडागळे यांनी संशय व्यक्त केला आहे. वरिष्ठांकडून पाठराखण होत असल्यानेच संबंधित अधिकाऱ्यांचे राजरोसपणे हप्तेवसुली करण्याचे धाडस वाढत असल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे.

राज्याचे पोलिस महासंचालक, छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक आणि धाराशिव जिल्हाधिकारी यांना उद्देशून हे निवेदन देण्यात आले आहे. संपूर्ण गैरप्रकाराची सखोल चौकशी करून दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, तसेच चौकशीचा अहवाल शासनास सादर करावा, अशी मागणी खंडागळे यांनी केली आहे.

दोन हजार अंमलदार, चार हजार ओळखपत्रांची छपाई?

जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयातील खरेदी व्यवहारांवरही खंडागळे यांनी गंभीर आक्षेप घेतले आहेत. कार्यालयातील प्रबंधकांनी निविदा न काढता नियम धाब्यावर बसवून लेखनसामग्री व अन्य साहित्याची खरेदी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. दोन हजार पोलिस अंमलदार असताना चार हजार ओळखपत्रांच्या छपाईचे काम देण्यात आल्याचेही निवेदनात म्हटले आहे. या गैरप्रकारांबाबत तक्रारी दाखल करण्यात आल्या असतानाही त्या कागदोपत्रीच अडकवून ठेवण्यात आल्याचा आरोप खंडागळे यांनी केला आहे.

आरोपांत तथ्य नाही; शकील शेख

निवेदनात करण्यात आलेल्या आरोपांसंदर्भात पोलिस निरीक्षक शकील शेख यांच्याशी ‘दैनिक जनमत’ने संपर्क साधला असता, संबंधित आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नसून अशा प्रकारचा कोणताही आर्थिक व्यवहार झालेला नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

Exit mobile version