बनावट स्वाक्षऱ्यांद्वारे बँक खात्यातून ६ कोटी ४० लाख रुपये काढल्याचा आरोप; ७२ लाखांच्या यंत्रसामग्रीचाही अपहार
धाराशिव (प्रतिनिधी) : राष्ट्रीय महामार्गाच्या नळदुर्ग बाह्यवळण रस्त्याच्या कामात गुंतवणूक करण्याच्या निमित्ताने विश्वास संपादन करून एका बांधकाम व्यावसायिकाची तब्बल ७ कोटी १२ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. बँक व्यवस्थापकाच्या संगनमताने बनावट स्वाक्षऱ्या आणि कागदपत्रांच्या आधारे कंपनीच्या बँक खात्यातून ६ कोटी ४० लाख रुपये काढून घेतल्याचा, तसेच ७२ लाख रुपये किमतीची यंत्रसामग्री परस्पर नेल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी नळदुर्ग पोलीस ठाण्यात बँक व्यवस्थापकासह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस निरीक्षक रवींद्र शांताराम गायकवाड यांनी तपास हाती घेतला आहे.
कर्नाटकातील विजापूर येथील बांधकाम व्यावसायिक संजू उमलू चव्हाण (वय ३७, रा. महादेव नगर, जालगेरी, विजापूर) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यावरून बालाजी जळबा गायकवाड (रा. परळी, जि. बीड), रफीक अहमद बंदगीसाब काने, मल्लीकार्जुन कोट्टलगी, मौलाली नझरी आणि बँक व्यवस्थापक फैयाद पडवेगार (चौघे रा. विजापूर, कर्नाटक) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
फिर्यादीत नमूद केल्यानुसार, चव्हाण हे २००९ पासून श्री अमोघसिद्धेश्वर सिव्हिल अँड इंजिनिअरिंग वर्क्स या कंपनीच्या माध्यमातून रस्ते, कालवे आदींची बांधकामे करतात. १७ फेब्रुवारी २०२२ रोजी त्यांनी एसयूसी इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी सुरू केली. या कंपनीच्या माध्यमातून महाराष्ट्र आणि कर्नाटकात विविध बांधकामे केली आहेत.
ऑक्टोबर २०२३ मध्ये सोलापूर ते दस्तापूर बाह्यवळण रस्त्याचे अनेक वर्षांपासून रखडलेले काम करण्यासंदर्भात चव्हाण यांनी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. सुमारे ९२ कोटी रुपयांचे हे काम टीएमपीएल कंपनीने घेतले होते. संबंधित कंपनीशी करार करून चव्हाण यांनी हे काम पूर्ण करण्याची जबाबदारी स्वीकारली.
या कामासाठी आवश्यक असलेल्या डांबराच्या खरेदीसाठी चव्हाण यांनी रफीक काने यांच्याशी संपर्क साधला. त्यावेळी काने यांनी मल्लीकार्जुन कोट्टलगी आणि मौलाली नझरी यांची ओळख करून दिली. रस्त्याच्या कामासाठी आवश्यक असलेली संपूर्ण रक्कम गुंतविण्याची तयारी तिघांनी दर्शविली. कामातून मिळणाऱ्या नफ्यापैकी ५१ टक्के हिस्सा चव्हाण यांना, तर ४९ टक्के हिस्सा तिघांना देण्याचे ठरले. गुंतवणुकीच्या सुरक्षिततेसाठी तिघांनाही कंपनीत अतिरिक्त संचालक करण्यात आले. बालाजी गायकवाड याला प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी मदत करण्यासाठी दरमहा दोन लाख रुपये देण्याचे ठरले होते.
कंपनीच्या खात्यात ७६ कोटी ३६ लाख रुपये जमा
नळदुर्ग बाह्यवळण रस्त्याच्या कामासाठी सुरुवातीला विजापूर येथील युनियन बँक ऑफ इंडियाच्या शाखेत कंपनीचे खाते उघडण्यात आले. या खात्यातील आर्थिक व्यवहारांसाठी चव्हाण आणि मल्लीकार्जुन कोट्टलगी या दोघांच्या स्वाक्षऱ्या आवश्यक असल्याचे ठरले होते. त्यानंतर ऑक्टोबर २०२४ मध्ये विजापूर येथील ॲक्सिस बँकेच्या शाखेत कंपनीचे खाते उघडण्यात आले. रस्त्याच्या कामासाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून ८ कोटी ३६ लाख रुपये, तर टीएमपीएल कंपनीकडून ६८ कोटी रुपये, असे एकूण ७६ कोटी ३६ लाख रुपये कंपनीच्या बँक खात्यात जमा झाले होते.
रस्त्याच्या कामासाठी लागणारे साहित्य खरेदी करण्यासह अन्य खर्चासाठी चव्हाण हे नळदुर्ग बाह्यवळण रस्त्यावरील कार्यालयात धनादेश आणि आरटीजीएस अर्जांवर स्वाक्षऱ्या करून ते कोट्टलगी यांच्याकडे देत होते. मात्र, आपल्या परवानगीशिवाय कोणालाही पैसे देऊ नयेत, अशी सूचनाही त्यांनी केली होती.
बनावट स्वाक्षऱ्यांद्वारे दोनदा बदलला ई-मेल पत्ता
जानेवारी २०२६ मध्ये भाडेतत्त्वावर घेतलेल्या यंत्रसामग्रीचे पैसे मिळाले नसल्याच्या तक्रारी चव्हाण यांच्याकडे येऊ लागल्या. त्यामुळे त्यांनी ॲक्सिस बँकेकडे मागील दीड वर्षातील आर्थिक व्यवहारांचा तपशील मागितला. मात्र, तो मिळाला नाही. यासंदर्भात बँक व्यवस्थापकाकडे चौकशी केली असता कंपनीच्या बँक खात्याशी संलग्न असलेला ई-मेल पत्ता दोन वेळा बदलण्यात आल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
ई-मेल पत्ता बदलण्यासाठी बँकेत सादर करण्यात आलेल्या अर्जावरील स्वाक्षरी आपली नसल्याचे चव्हाण यांच्या लक्षात आले. त्यानंतर बँक खात्यातील व्यवहारांची तपासणी केली असता अनेक धनादेश आणि आरटीजीएस अर्जांवर आपण स्वाक्षऱ्याच केलेल्या नसल्याचे त्यांना आढळून आले. संशयास्पद व्यवहारांशी संबंधित धनादेश आणि आरटीजीएस अर्जांची मागणी करूनही बँक व्यवस्थापकाने ते उपलब्ध करून दिले नसल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
साहित्य खरेदी न करताच तीन कोटींचे व्यवहार
बँक खात्यातील आर्थिक व्यवहारांची सविस्तर तपासणी केल्यानंतर कंपनीने ज्या पुरवठादारांकडून कोणतेही साहित्य खरेदी केले नव्हते, अशा १२ पुरवठादारांना सुमारे तीन कोटी रुपये देण्यात आल्याचे चव्हाण यांच्या निदर्शनास आले. याशिवाय काही पुरवठादारांकडून खरेदी केलेल्या साहित्याच्या किमतीपेक्षा तब्बल तीन कोटी ४० लाख रुपये अधिक देण्यात आल्याचेही आढळून आले. अशा प्रकारे बनावट स्वाक्षऱ्या आणि कागदपत्रांच्या आधारे एकूण सहा कोटी ४० लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा आरोप चव्हाण यांनी केला आहे.
७२ लाखांची यंत्रसामग्रीही परस्पर नेली
नळदुर्ग येथील गुंडू पवार यांच्या अतिथिगृहाच्या ठिकाणी कंपनीची बांधकामासाठी लागणारी यंत्रसामग्री ठेवण्यात आली होती. जून २०२६ मध्ये बालाजी गायकवाड याने ३२ लाख रुपये किमतीचा रोलर आणि ४० लाख रुपये किमतीचे पेवरचे सेन्सर परस्पर नेल्याची माहिती कंपनीतील कर्मचारी प्रशांत जाधव याच्याकडून चव्हाण यांना मिळाली. त्यानंतर त्यांनी गुंडू पवार यांच्याकडे चौकशी करून याबाबत खात्री केली.
बँक खात्यातील संशयास्पद व्यवहार आणि परस्पर नेलेल्या यंत्रसामग्रीबाबत संबंधितांकडे वारंवार विचारणा केली. मात्र, त्यांच्याकडून टाळाटाळ करण्यात आली. त्यानंतर संबंधितांनी दूरध्वनी उचलणेही बंद केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
पोलीस निरीक्षक रवींद्र गायकवाड यांच्याकडे तपास
या प्रकरणातील फसवणूक १५ फेब्रुवारी २०२४ ते २५ जून २०२६ या कालावधीत झाल्याचे प्रथम खबर अहवालात नमूद करण्यात आले आहे. चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून २५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजून ४९ मिनिटांनी नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ०५८९/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३(५), ३१६(५), ३१८(४), ३३६(३), ३३८ आणि ३४०(२) नुसार पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नळदुर्ग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र शांताराम गायकवाड यांनी या गुन्ह्याचा तपास हाती घेतला आहे.
- नळदुर्ग बाह्यवळण रस्त्याच्या कामात ७ कोटी १२ लाखांची फसवणूक; बँक व्यवस्थापकासह पाच जणांवर गुन्हा
- मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या मनमानी कर्जवसुलीला लगाम लावा!
- वृक्षतोडीप्रकरणी युवासेना आक्रमक; प्राचार्यांनी दिले सहा फूट उंचीची १०० झाडे लावण्याचे हमीपत्र
- दुष्काळग्रस्तांच्या मदतीला तुळजाभवानी मंदिर संस्थान; मुख्यमंत्री सहाय्यता निधीस तीन कोटींचे योगदान
- मराठवाडा रेल कोच फॅक्टरीत भूमिपुत्रांना रोजगारात प्राधान्य द्या; आमदार डॉ. प्रतापसिंह पाटील यांची ठाम भूमिका
