29 November 2026, Sundayदैनिक जनमत | निर्भीड पत्रकारिता
दैनिक जनमत
जाहिरातीसाठी जागा • 728 × 90
जिल्हा बातम्याई-पेपरधाराशिवसोलापूरसातारासांगलीपुणेकोल्हापूर
धाराशिव

‘तुतारी और कमल एकीच है’; याची नांदी धाराशिवमधून! नगरपालिका निवडणूक ते डिलिमिटेशन (सीमांकन) विधेयकाचे राजकारण!

राजकारणात प्रत्येक प्रत्येक घटनेचा पुरावा सापडत नसतो काही प्रश्नांची उत्तरं क्रोनालॉजीतून (कालानुक्रमाने)समजून घ्यावी लागतात. देशात सध्या जे घडत आहे त्याची नांदी धाराशिवच्या राजकारणात घडली असे जर कोणी म्हणले तर विश्वास बसणार नाही त्यासाठीच काही घटना समजून घ्याव्या लागतात.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत धाराशिव जिल्ह्यात महाविकास आघाडीला खणखणीत यश मिळाले मतांचा टक्का चांगला होता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत साहजिकपणे तो तसा राहिला असता मात्र राष्ट्रीय राजकारणात जे डाव टाकायचे होते त्याची सुरुवात येथूनच करावी लागणार होती जर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाविकास आघाडी यशस्वी झाली असती तर आजचे देशातले चित्र काहीसे वेगळे असते.

धाराशिव जिल्ह्यात महाविकास आघाडीचा प्रमुख चेहरा होते खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर त्यांना एन डी ए सोबत घेण्यासाठी नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांचा पराभव करणे क्रमप्राप्त होते त्यासाठी भाजपने प्रचंड आर्थिक रसद तर पुरवलीच सोबत ज्या खेळी केल्या गेल्या त्या अनाकलनीय आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष बदलण्यासाठी प्रयत्न केले गेले ती खेळी यशस्वी झाली आणि पुढे महाविकास आघाडीतून राष्ट्रवादी वेगळी कशी राहील, मुस्लिम उमेदवार देणे यासाठी प्रयत्न केले गेले.

इथपर्यंत होत असलेल्या हालचाली कोणाच्याच लक्षात आलेल्या नाहीत मात्र जेव्हा निवडणूक लागते तेव्हा मुस्लिम बहुल भागात आंतरराष्ट्रीय पक्ष असलेला भाजप राष्ट्रवादीच्या समोर उमेदवारच देत नाही इथे पहिला डाव समोर येतो आणि भाजपची आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची छुपी युती आहे हे लक्षात येतं मात्र यावर कोणीच जाहीर बोलत नाही.

यातील सर्वात मोठी घडामोड प्रचार संपण्याच्या काही दिवस आधी घडते ती म्हणजे काँग्रेसचे खासदार इम्रान प्रतापगढी यांची महाविकास आघाडीच्या आणि शिवसेना उद्धव ठाकरेंच्या उमेदवारांसाठी होणारी प्रचार सभा. सभेची तयारी सुरू होते मात्र सभा अचानक रद्द होते कारण राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय नेत्यांनी ही सभा घेऊ नका असे असा मेसेज दिला असल्याने ही सभा रद्द होते अशी चर्चा त्यावेळी होती काँग्रेसवर अप्रत्यक्ष दबाव आणून ही सभा रद्द करायला लावणाऱ्या राष्ट्रीय नेत्या कोण? याचे नाव गुलदस्त्यात आहे मात्र जर ही सभा झाली असती तर शिवसेनेच्या उमेदवाराला फायदा झाला असता. (महाविकास आघाडीला मानणाऱ्या मतदाराने अर्थात शिवसेनेकडे आपला कल दाखवला असता)

नगरपालिका निवडणुकीच्या दरम्यानच राष्ट्रवादीच्या काही नेत्यांचा छोटा व्हिडिओ व्हायरल होतो त्यात ते म्हणतात तुतारी और कमल एकीच है, तर धाराशिव शहरातील राष्ट्रवादीचे काही नेते भाजपच्या प्रचारासाठी नळदुर्ग येथे जाऊन गुप्त बैठक घेतात. (आणि भाजप राष्ट्रवादीचा गुपचूप नांदा सौख्यभरे चा प्रवास येथून सुरू होतो) अश्या रीतीने भविष्यातील राष्ट्रीय राजकारणात मदत करण्यासाठीची जी पायरी होती त्याची नांदी धाराशिव मध्ये वर्षभरापूर्वी झाली होती.

पुढे जिल्हा परिषद निवडणुकीत देखील थोड्या बहुत प्रमाणात महाविकास आघाडीत गडबड होतेच आणि भाजपची सत्ता जिल्ह्यावर येते. यातूनच पुढे खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्यावर अप्रत्यक्षपणे दबाव तयार करण्यात भाजप यशस्वी होते आणि त्यांचा शिंदे गटात प्रवेश होतो (सोबत असलेले कार्यकर्ते सत्तेत जाण्याशिवाय पर्याय नाही अशी भावना व्यक्त करून दाखवतात )जर खा. राजेनिंबाळकर गेले नसते तर इंडिया आघाडी मजबूत राहिली असती (कारण शिंदे गटाच्या दोन तृतीयांश साठी एक खासदार कमी होते)सत्तेची गणिते जुळली नसती मात्र त्यांच्या प्रवेशासाठी भाजपने वर्षभरापूर्वी सुरू केलेली तयारी आणि आज शरद पवार यांची राष्ट्रवादी सीमांकन विधेयकाला देत असलेले समर्थन हे ठरवून केलं गेलेलं राजकारण आहे.

आजही धाराशिवच्या नगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस नागरी समस्येवर ब्र काढत नाही, विरोधात आवाज उठवत नाही. एवढेच काय भाजपाने सत्तेत येऊन विरोधकांचे नगरसेवक फोडले अगदी काँग्रेस आणि शिवसेना (उबाठा चे) मात्र राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना भाजप मध्ये घेण्याचा साधा प्रयत्न देखील केला नाही.

देशात जे घडलं ते धाराशिव जिल्ह्यात पूर्वीच घडलं नव्हे तर त्याची सुरुवात इथूनच झाली आणि राष्ट्रीय राजकारणाच्या कलाटणीला कारणीभूत ठरली. भाजप राजकारण करताना भविष्याचा विचार करून करतं पूर्वी जिल्ह्यात झालेले प्रवेश असतील किंवा भविष्यातील राजकारण असो वर्तमान आणि भूतकाळातील सांगड घातली तरच भाजप समजून घेता येईल. मात्र यात जनतेच्या भावनांचा जो बाजार केला गेला याचा हिशोब जनता घेईल.

लोकशाही टिकेल, लोकशाही टिकेल असे ओरडून सांगणारे संसदीय लोकशाही आहे तशीच राहील असे मात्र सांगताना दिसत नाहीत. धाराशिव जिल्ह्यात जे राजकारण घडलं ते देशात इतर ठिकाणी देखील घडलं असणार यात शंका नाही तिथल्या घटना त्यातील पात्रं वेगळी असतील पण घडलं भाजपच्या बाजूनेच.

लोकशाहीत जनता सर्वोच्च असते याचा विसर राजकीय पक्षांना नेहमी पडतो लोकशाहीत बैल आणि बेडकाची इसापनीतीतील कथा राजकारणालाही लागू पडते. बैलाएवढे मोठे होण्याच्या महत्त्वाकांक्षेपोटी बेडूक स्वतःला फुगवत राहिला आणि अखेर फुटला. राजकीय विस्ताराच्या महत्त्वाकांक्षेपोटी संसदीय लोकशाहीतील संतुलनाकडे दुर्लक्ष करणाऱ्या कोणत्याही राजकीय पक्षाने या कथेचे तात्पर्य लक्षात ठेवावे.

नरोटे आकाश                                                             कार्यकारी संपादक                                                            दैनिक जनमत