26 November 2026, Thursdayदैनिक जनमत | निर्भीड पत्रकारिता
दैनिक जनमत
जाहिरातीसाठी जागा • 728 × 90
जिल्हा बातम्याई-पेपरधाराशिवसोलापूरसातारासांगलीपुणेकोल्हापूर
महाराष्ट्र

मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या मनमानी कर्जवसुलीला लगाम लावा!

स्वतंत्र शासन निर्णय काढण्याची आमदार कैलास पाटील यांची मागणी; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे कार्यवाहीचे आश्वासन

धाराशिव, दि. २६ : दुष्काळी परिस्थितीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकरी, शेतमजूर, महिला व सर्वसामान्य नागरिकांकडून मायक्रो फायनान्स कंपन्या आणि खासगी वित्तीय संस्थांकडून मनमानी पद्धतीने कर्जवसुली केली जात आहे. या बेकायदेशीर कर्जवसुलीला आळा घालण्यासाठी राज्य शासनाने तातडीने ठोस शासन निर्णय निर्गमित करावा, अशी मागणी आमदार कैलास पाटील यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदनाद्वारे केली. या मागणीची दखल घेत शासन निर्णय जारी करण्याबाबत कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन बावनकुळे यांनी दिले.

धाराशिव जिल्ह्यातील ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांपासून मायक्रो फायनान्स कंपन्या आणि खासगी वित्तीय संस्थांच्या वसुली प्रतिनिधींकडून कर्जदारांना वारंवार दूरध्वनी करणे, घरी जाऊन तगादा लावणे, धमकावणे, अपमानास्पद वागणूक देणे, कुटुंबीयांसमोर बदनामी करणे तसेच मानसिक दबाव निर्माण करणे, अशा प्रकारांच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर समोर येत आहेत. विशेषतः महिला बचत गटांच्या सदस्यांना आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे आमदार पाटील यांनी निवेदनात म्हटले आहे.

धाराशिव जिल्ह्याची अर्थव्यवस्था प्रामुख्याने शेतीवर अवलंबून आहे. अनियमित पाऊस, अतिवृष्टी, पिकांचे नुकसान, दुष्काळी परिस्थिती आणि वाढता उत्पादन खर्च यामुळे शेतकरी, शेतमजूर व सर्वसामान्य नागरिक आधीच आर्थिक संकटाचा सामना करीत आहेत. अशा परिस्थितीत कर्जाचे हप्ते वेळेत भरता न आल्याने कर्जदारांना धमकावणे, मानसिक त्रास देणे आणि कुटुंबीयांसमोर अपमानित करून कर्जवसुली करणे ही गंभीर बाब असल्याचे आमदार पाटील यांनी महसूल मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले.

शासनाकडून वेळोवेळी पत्रकार परिषदांच्या माध्यमातून खासगी वित्तीय संस्थांना कर्जवसुलीसाठी तगादा लावू नये, अशा सूचना दिल्या जातात. मात्र, यासंदर्भात ठोस शासन निर्णय अथवा बंधनकारक मार्गदर्शक सूचना नसल्याने काही वित्तीय संस्थांकडून मनमानी पद्धतीने वसुली केली जात आहे. वसुली प्रतिनिधींना जाब विचारल्यास त्यांच्याकडून शासनाचा अधिकृत निर्णय दाखविण्याची मागणी केली जाते. त्यामुळे केवळ तोंडी सूचना देऊन हा प्रश्न सुटणार नसल्याचे आमदार पाटील यांनी स्पष्ट केले.

कोरोना काळात रिझर्व्ह बँकेने कर्जाच्या हप्त्यांना स्थगिती देण्यासंदर्भात परिपत्रके जारी केली होती. हप्ते न भरल्यास दंड आकारणे आणि कर्जदाराच्या पतमानांकनावर परिणाम होण्यासंदर्भातही निर्देश दिले होते. या निर्णयांचा दाखला देत सध्याच्या दुष्काळी परिस्थितीतही शासनाने अधिकृत शासन निर्णय निर्गमित करून वित्तीय संस्थांच्या मनमानी कारभारावर नियंत्रण आणावे, अशी मागणी आमदार पाटील यांनी केली.

नियमांचे उल्लंघन करणाऱ्या संस्थांवर कठोर कारवाई करा

कर्जदारांच्या घरासमोर जाऊन तगादा लावत बेकायदेशीर कर्जवसुली करण्यास प्रतिबंध घालावा, वसुली प्रतिनिधींच्या कामकाजावर नियंत्रण ठेवावे, कर्जदारांना धमकावणे व मानसिक त्रास देण्यास प्रतिबंध करावा, कर्जवसुलीची प्रक्रिया सन्मानपूर्वक आणि नियमबद्ध पद्धतीने राबवावी, नागरिकांसाठी प्रभावी तक्रार निवारण यंत्रणा निर्माण करावी, तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वित्तीय संस्था आणि त्यांच्या प्रतिनिधींवर कठोर कारवाई करण्याबाबत शासनाने स्पष्ट निर्देश द्यावेत, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

या मागणीची दखल घेत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बेकायदेशीर कर्जवसुलीला आळा घालण्यासाठी शासन स्तरावर आवश्यक मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात येतील, तसेच शासन निर्णय जारी करण्याबाबत कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन दिले.