26 November 2026, Thursdayदैनिक जनमत | निर्भीड पत्रकारिता
दैनिक जनमत
जाहिरातीसाठी जागा • 728 × 90
जिल्हा बातम्याई-पेपरधाराशिवसोलापूरसातारासांगलीपुणेकोल्हापूर
ताज्या बातम्या

न्याय हक्क ट्रॅक्टर मोर्चाच्या नियोजनासाठी उद्या लातुरात बैठक; आमदार रोहित पवार राहणार उपस्थित

धाराशिव, लातूर, बीड आणि नांदेड जिल्ह्यांतील समविचारी पक्ष व संघटनांना उपस्थित राहण्याचे रोहित बागल यांचे आवाहन

धाराशिव : राज्यातील गंभीर दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी आणि शेतमजुरांच्या १४ विविध न्याय्य मागण्यांसाठी ७ नोव्हेंबर ते ९ डिसेंबर या कालावधीत शेगाव ते नागपूर विधानभवन असा ‘न्याय हक्क ट्रॅक्टर मोर्चा’ आयोजित करण्यात आला आहे. या मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी तसेच पुढील आंदोलनाच्या नियोजनासाठी शुक्रवार, दि. २७ नोव्हेंबर रोजी लातूर येथे महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. आमदार रोहित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत दुपारी चार वाजता जयक्रांती महाविद्यालयात ही बैठक पार पडणार आहे.

या बैठकीसाठी धाराशिव, लातूर, बीड आणि नांदेड जिल्ह्यांतील सर्व समविचारी राजकीय पक्ष, सामाजिक व राजकीय संघटना, शेतकरी आणि शेतमजुरांना निमंत्रित करण्यात आले आहे. बैठकीत न्याय हक्क ट्रॅक्टर मोर्चाचे नियोजन तसेच आगामी आंदोलनाची दिशा ठरविण्यात येणार आहे.

यंदाचा दुष्काळ १९७२ च्या दुष्काळापेक्षाही भयावह असून शेतकरी आणि शेतमजूर पूर्णतः उद्ध्वस्त झाले आहेत. दुष्काळाचे संकट केवळ शेतीपुरते मर्यादित राहिले नसून ते गंभीर सामाजिक आणि आर्थिक संकट बनले आहे. आगामी काळात ही परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता असल्याने शासन आणि प्रशासनाने दुष्काळाचा विषय केंद्रस्थानी ठेवून तातडीने उपाययोजना करणे आवश्यक असल्याची भूमिका संयोजकांनी मांडली आहे.

शेतकरी आणि शेतमजुरांना त्यांचे न्याय्य हक्क मिळवून देण्यासाठी तसेच दुष्काळाच्या प्रश्नावर सरकारला जागे करण्यासाठी हा लढा उभारण्यात येत आहे. हा लढा कोणत्याही एका व्यक्तीचा नसून संपूर्ण राज्यातील शेतकरी, शेतमजूर आणि सर्वसामान्य जनतेचा आहे. शासनाने शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला वठणीवर आणण्याचा इशाराही संयोजकांनी दिला आहे.

दुष्काळाच्या फेऱ्यात अडकलेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी धाराशिव जिल्ह्यातील सर्व समविचारी राजकीय पक्ष, विविध सामाजिक संघटना, शेतकरी आणि शेतमजुरांनी २७ नोव्हेंबर रोजी लातूर येथे आयोजित बैठकीला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन न्याय हक्क मोर्चाचे धाराशिव जिल्हा समन्वयक रोहित बागल यांनी केले आहे.