25 November 2026, Wednesdayदैनिक जनमत | निर्भीड पत्रकारिता
दैनिक जनमत
जाहिरातीसाठी जागा • 728 × 90
जिल्हा बातम्याई-पेपरधाराशिवसोलापूरसातारासांगलीपुणेकोल्हापूर
ताज्या बातम्या

संविधान दिनी नागपुरात अभिजित दीपकेंची ‘संविधान बचाव’ सभा

आशुतोष रांकाही राहणार उपस्थित; निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेचा मुद्दा गाजणार

नागपूर : संविधान दिनाचे औचित्य साधून कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दीपके यांच्या नेतृत्वाखाली उद्या, गुरुवारी (दि. २६ नोव्हेंबर) नागपुरात ‘संविधान बचाव’ आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. नागपुरातील संविधान चौकात होणाऱ्या या सभेला आशुतोष रांकाही उपस्थित राहणार आहेत. लोकशाही आणि संविधानिक मूल्यांच्या संरक्षणासाठी या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

संविधान चौकात दुपारी चार ते रात्री आठ या वेळेत हा कार्यक्रम होणार आहे. संविधानाच्या उद्देशिकेच्या सामूहिक वाचनाने कार्यक्रमाला सुरुवात होणार असून, त्यानंतर अभिजित दीपके आणि आशुतोष रांका उपस्थितांना संबोधित करणार आहेत. विविध वक्त्यांसह कलाकारही या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

छत्रपती संभाजीनगर येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना दीपके यांनी केंद्र सरकारच्या कारभारावर टीका केली. निवडणूक आयोगाची निष्पक्षता, लोकशाही संस्थांचे स्वातंत्र्य आणि उत्तरदायित्व यासंदर्भातील प्रश्न नागपूरच्या सभेत उपस्थित केले जाणार आहेत.

निवडणुकीच्या काळात धार्मिक मुद्द्यांऐवजी युवकांचा रोजगार, शिक्षण आणि भवितव्य यावर चर्चा झाली पाहिजे, अशी भूमिका दीपके यांनी मांडली आहे. महाराष्ट्रासह विविध राज्यांतील निवडणुकांमध्ये मतदानाच्या शेवटच्या तासातील आकडेवारीवरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले असून, निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आणण्याची मागणी केली आहे.

दरम्यान, नागपूर दौऱ्यात दीपके विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांच्या भेटी घेणार आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असलेल्या नागपुरात संविधान दिनी आयोजित करण्यात आलेल्या या आंदोलनात दीपके नेमकी कोणती भूमिका मांडणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.