23 November 2026, Mondayदैनिक जनमत | निर्भीड पत्रकारिता
दैनिक जनमत
जाहिरातीसाठी जागा • 728 × 90
ताज्या बातम्या

‘राजकारण कुठल्या स्तराला जाऊ शकतं, हे शिरसाठांच्याच तोंडून आलं!’

‘सुरतच्या सीमेवरून परत आलेला आमदार मी एकटाच होतो, ‘रामनाम सत्य’चा खुलासा व्हावा; गृहमंत्री चौकशी करणार का? आमदार कैलास पाटील यांचा सवाल

शिवसेना फुटीच्या काळातील मंत्री संजय शिरसाठ यांच्या खळबळजनक खुलाशावर आ. कैलास पाटील यांची प्रतिक्रिया; सत्ता मिळवण्यासाठी आमदारांना कोणत्या दबावाखाली नेले, याचे सत्य महाराष्ट्रासमोर आणण्याची मागणी

धाराशिव : ‘सत्ता मिळवण्यासाठी राजकारण कुठल्या स्तराला जाऊ शकतं, हे मंत्री संजय शिरसाठ यांच्याच तोंडून महाराष्ट्राने ऐकलं आहे. आम्ही थांबवलं नसतं तर त्या दिवशी त्याचं रामनाम सत्य झालं असतं, असं ते म्हणाले. मात्र कोणाला थांबवलं, कशासाठी थांबवलं आणि कोणाचं रामनाम सत्य होणार होतं, याचा खुलासा त्यांनी केला पाहिजे. राज्याचे मुख्यमंत्री हेच गृहमंत्री आहेत. ते या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करणार का?’ असा थेट सवाल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार कैलास पाटील यांनी उपस्थित केला आहे. शिवसेनेतील फुटीच्या काळातील घटनांबाबत मंत्री संजय शिरसाठ यांनी एका पॉडकास्टमध्ये केलेल्या खळबळजनक वक्तव्यावर पत्रकारांशी बोलताना आमदार पाटील यांनी ही प्रतिक्रिया दिली.

शिवसेनेत जून २०२२ मध्ये फूट पडली आणि राज्यात सत्तांतराच्या हालचाली सुरू झाल्या. त्या काळातील काही घटनांचा उल्लेख मंत्री संजय शिरसाठ यांनी एका पॉडकास्टमधील मुलाखतीत केला. एकनाथ शिंदे यांचा फोन आल्यानंतर आपण ठाणे येथे गेलो. तेथून सुरतच्या दिशेने जात असताना एका टोलनाक्यावर तीन ते चार किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. सुरतकडे जाणारी वाहने पुढे जाऊ नयेत, यासाठी वाहतूक अडवण्यात आली होती, असा दावा शिरसाठ यांनी केला.

एकनाथ शिंदे यांचे पोलिसांशी चांगले संबंध असल्याने त्यांनी संबंधित पोलीस अधीक्षकांना दूरध्वनी केला. टोलनाक्यावर नेमके काय सुरू आहे, अशी विचारणा केली असता मुख्यमंत्र्यांचे आदेश असल्याचे त्यांना सांगण्यात आले. त्यावर शिंदे यांनी ‘माझा आदेश माहिती आहे ना? वाहतूक सुरळीत करा’, असे सांगितल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली आणि आम्ही पुढे गेलो, असे शिरसाठ यांनी या मुलाखतीत सांगितले.

या संपूर्ण घटनाक्रमाचे वर्णन करताना शिरसाठ यांनी त्या काळातील परिस्थिती एखाद्या चित्रमालिकेसारखी असल्याचे म्हटले. त्यावेळी पाऊस सुरू होता. एक आमदार परत जाण्यासाठी धडपडत होता. ‘पुढचं काही सांगत नाही; मात्र त्या दिवशी त्याचं रामनाम सत्य झालं असतं. आम्ही थांबवलं, त्यांना जाऊ दिलं म्हणून ते परत जाऊ शकले’, असे वक्तव्य शिरसाठ यांनी केले.

शिवसेनेतील फुटीच्या काळात आमदार कैलास पाटील हे सुरतच्या सीमेवरून परत आले होते.यावर प्रतिक्रिया देताना आमदार पाटील म्हणाले की, संजय शिरसाठ हे राज्य सरकारमधील जबाबदार मंत्री आहेत. ते एका पक्षाचे प्रवक्तेदेखील आहेत. त्यामुळे त्यांनी केलेल्या वक्तव्याबाबत स्पष्टीकरण देणे ही त्यांची जबाबदारी आहे. ‘रामनाम सत्य होणार होतं म्हणजे नेमकं काय? कोणाला थांबवलं? कोणत्या कारणासाठी थांबवलं? आणि कोणाचं रामनाम सत्य होणार होतं? या प्रश्नांची उत्तरे त्यांनी महाराष्ट्राला दिली पाहिजेत’, अशी मागणी पाटील यांनी केली.

त्या काळातील परिस्थितीची आपल्याला पूर्ण जाणीव होती, असे सांगताना पाटील म्हणाले की, ‘त्या परिस्थितीत आपल्यासोबत काहीही होऊ शकतं, याची जाणीव मलाही होती. तरीदेखील माझ्यासाठी पक्षनिष्ठा महत्त्वाची होती. आपलं अंतर्मन जे सांगतं, त्याप्रमाणे आपण वागलं पाहिजे, या विचाराने मी परत येण्याचा निर्णय घेतला. आज सर्वसामान्य माणसाच्या आशीर्वादाने आणि आई तुळजाभवानीच्या कृपेने मी व्यवस्थित आहे.’

सत्तेसाठी राजकारण कोणत्या स्तरापर्यंत जाऊ शकते, यावरही आमदार पाटील यांनी भाष्य केले. ‘राजकारण कुठल्या स्तराला जाऊ शकतं, सत्ता मिळवण्यासाठी कोण कुठल्या स्तराला जाऊ शकतं, हे काल त्यांच्याच तोंडून आपण सगळ्यांनी ऐकलं आहे. त्यामुळे या घटनेची चौकशी झाली पाहिजे. नेमकं काय घडणार होतं, कोण कोणाला थांबवत होतं आणि त्यामागे काय कारण होतं, याची सत्यता महाराष्ट्रासमोर आली पाहिजे’, असे ते म्हणाले.

शिरसाठ यांचे वक्तव्य आपल्याबद्दलच होते का, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता पाटील म्हणाले की, ‘सुरतच्या सीमेवरून परत आलेला आमदार मी एकटाच होतो. नितीन बापू देशमुख हे दुसऱ्या ठिकाणाहून परत आले होते. त्यामुळे मंत्री महोदय नेमके कोणाबद्दल बोलत होते, याची अधिक स्पष्टता ते स्वतःच देऊ शकतात.’

मंत्री शिरसाठ यांनी इतक्या वर्षांनंतर अशा प्रकारचे वक्तव्य का केले असावे, या प्रश्नावरही पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. ‘सत्तेचा एवढा अहंकार किंवा आत्मविश्वास निर्माण झाला असेल की, आपण काहीही बोललो, काहीही वागलो तरी आपलं कोणीच काही करू शकत नाही, या भावनेतून त्यांनी हे वक्तव्य केलं असावं’, अशी टीका त्यांनी केली.

या प्रकरणी मुख्यमंत्री तथा गृहमंत्र्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन तक्रार करणार का, असे विचारले असता पाटील म्हणाले की, ‘मला स्वतंत्रपणे तक्रार करायची नाही. हे वक्तव्य स्वतः सरकारमधील एका जबाबदार मंत्र्याकडून आलेलं आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनीच ठरवावं की याची चौकशी करायची की नाही. माझा मुख्यमंत्र्यांना एकच प्रश्न आहे, ते या प्रकरणाची चौकशी करणार का?’

त्या काळात आमदारांना नेमक्या कोणत्या परिस्थितीत आणि कोणत्या दबावाखाली नेण्यात आले होते, याचाही उलगडा होण्याची गरज पाटील यांनी व्यक्त केली. ‘त्यावेळी जे आमदार गेले, ते कोणत्या दबावात होते? त्यांना कुठल्या परिस्थितीत नेण्यात आलं? याबाबतही मंत्री शिरसाठ यांच्या वक्तव्यातून काही गोष्टी समोर येत आहेत. त्यामुळे या संपूर्ण घटनाक्रमाची चौकशी झाली पाहिजे. सत्ता मिळवण्यासाठी राजकारण किती खालच्या स्तराला जाऊ शकतं, याचं सत्य महाराष्ट्रासमोर आलं पाहिजे’, असे पाटील यांनी सांगितले.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात आपण पक्षफुटीच्या काळातही होतो आणि आजही असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. त्या काळातील आपला निर्णय हा पक्षनिष्ठेतून घेतलेला होता आणि त्यावर आपण आजही ठाम असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, मंत्री संजय शिरसाठ यांच्या ‘रामनाम सत्य’ या वक्तव्यामुळे शिवसेनेतील फुटीच्या काळातील घटनांबाबत पुन्हा प्रश्न उपस्थित झाले आहेत. शिरसाठ यांनी आपल्या वक्तव्यात संबंधित आमदाराचे नाव स्पष्टपणे घेतले नसले, तरी सुरतच्या सीमेवरून परत आल्याचा संदर्भ देत आमदार कैलास पाटील यांनी या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे. त्यामुळे शिरसाठ आपल्या वक्तव्याचा नेमका काय खुलासा करतात आणि मुख्यमंत्री तथा गृहमंत्री या मागणीची दखल घेतात का, याकडे लक्ष लागले आहे.