अक्षय ढोबळे यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त पदासाठी निवडणूक; शहरातील राजकीय समीकरणांकडे सर्वांचे लक्ष
धाराशिव : धाराशिव नगरपरिषदेच्या रिक्त उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम निश्चित झाला असून, गुरुवार, दि. ३ डिसेंबर रोजी उपनगराध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. या पदावर कोणाची वर्णी लागणार, याकडे आता शहरवासीयांचे लक्ष लागले आहे. राष्ट्रीय स्तरावर सीमांकन विधेयकाच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष इंडिया आघाडीपेक्षा वेगळी भूमिका घेताना दिसत असताना, धाराशिव नगरपरिषदेच्या निवडणुकीत गाजलेल्या ‘कमल और तुतारी एकीच है’ या संवादाची पुन्हा एकदा चर्चा होऊ लागली आहे.
धाराशिव नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीदरम्यान ‘कमल और तुतारी एकीच है’ हा संवाद चांगलाच गाजला होता. निवडणुकीनंतरच्या काळात शहरातील विविध नागरी समस्यांवरून तुतारीच्या नगरसेवकांनी सत्ताधाऱ्यांना सभागृहात आक्रमकपणे घेरल्याचे किंवा रस्त्यावर उतरून ठोस आंदोलन केल्याचे फारसे पाहायला मिळाले नाही. त्यामुळे तुतारीच्या विरोधी पक्षाच्या भूमिकेबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत. आता उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने ‘कमल और तुतारी एकीच है’ हा संवाद प्रत्यक्षात उतरून तुतारीच्या नगरसेवकाची उपनगराध्यक्षपदी वर्णी लागणार का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
दुसरीकडे, भाजपमध्येही उपनगराध्यक्षपदासाठी अनेक नगरसेवक इच्छुक आहेत. मात्र, पक्षश्रेष्ठी नेमकी कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब करणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. भाजप उपनगराध्यक्षपद स्वतःकडेच कायम ठेवणार की नव्या राजकीय समीकरणातून तुतारीला संधी देणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
धाराशिव नगरपरिषदेचे तत्कालीन उपनगराध्यक्ष अक्षय संजीव ढोबळे यांनी २४ सप्टेंबर २०२६ रोजी नगराध्यक्षांकडे आपल्या पदाचा राजीनामा सादर केला होता. त्यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी नगराध्यक्षा तथा पीठासीन अधिकारी नेहा राहुल काकडे यांनी सर्वसाधारण सभेची विषयपत्रिका जारी केली आहे. त्यानुसार ३ डिसेंबर रोजी दुपारी १ वाजता नगरपरिषदेच्या सभागृहात निवडणूक होणार आहे.
महाराष्ट्र नगरपरिषद (उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक घेणे) नियम, २००५, सुधारणा नियम २००६ तसेच महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ मधील तरतुदींनुसार ही निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे.
निवडणुकीच्या दिवशी सकाळी १० ते दुपारी १२ वाजेपर्यंत मुख्याधिकाऱ्यांकडे उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. दुपारी १२ ते १२.३० वाजेपर्यंत अर्जांची छाननी करण्यात येणार असून, दुपारी १२.३० ते १२.४५ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर दुपारी १ वाजता प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रियेला सुरुवात होणार आहे.
हात उंचावून मतदान; सभा तहकूब करता येणार नाही
उपनगराध्यक्षपदासाठी एकापेक्षा अधिक उमेदवार निवडणूक रिंगणात असल्यास मतदान करण्यास इच्छुक असलेल्या प्रत्येक नगरसेवकाला हात उंचावून मतदान करावे लागणार आहे. त्याची नोंद सभेच्या कार्यवृत्तांतात घेतली जाणार असून, निवडणूक प्रक्रियेचे चित्रीकरणही करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, ही सभा कोणत्याही परिस्थितीत तहकूब करता येणार नसल्याचे विषयपत्रिकेत स्पष्ट करण्यात आले आहे.
उपनगराध्यक्षपदाची ही निवडणूक केवळ रिक्त पद भरण्यापुरती मर्यादित न राहता धाराशिव शहरातील सत्ताधारी आणि विरोधकांच्या राजकीय समीकरणांचीही परीक्षा ठरणार आहे. त्यामुळे ‘कमल और तुतारी एकीच है’ या संवादाला पुन्हा राजकीय अर्थ प्राप्त होणार की भाजपच्याच नगरसेवकाच्या गळ्यात उपनगराध्यक्षपदाची माळ पडणार, याचे उत्तर ३ डिसेंबर रोजी मिळणार आहे.
- उपनगराध्यक्षपदासाठी ३ डिसेंबरला निवडणूक; ‘कमल और तुतारी एकीच है’ की भाजपचाच होणार उपनगराध्यक्ष?
- धाराशिव शहरात पुन्हा चोरट्यांचा वावर? पोलिसांची गस्त वाढवण्याची नागरिकांची मागणी
- धाराशिव पोलिस दलात ‘फोन पे’वरून लाखोंची हप्तेवसुली?
- दुष्काळ २०२६ मधला अन् चारा छावणीच्या चाऱ्याचा पुरवठा दर २०१९चा? अजब सरकार!
- नळदुर्ग बाह्यवळण रस्त्याच्या कामात ७ कोटी १२ लाखांची फसवणूक; बँक व्यवस्थापकासह पाच जणांवर गुन्हा
