उस्मानाबाद (प्रतिनिधी)-
कोरोना काळात आई किंवा वडीलांचे तसेच दोघांचेही छत्र हरवलेल्या मुला, मुलींना मोफत शिक्षण देण्यासाठी भारतीय जैन संघटना दत्तक घेणार आहे. याची नाव नोंदणी सुरू असून पुणे येथील वाघोली प्रकल्पात शिक्षणासह सर्व प्रकारच्या भौतिक गरजा विद्यार्थ्यांना मोफत पुरवण्यात येणार आहेत.
राज्यात कोविडमुळे अनाथ झालेल्या सुमारे ७०० विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पुनर्वसन करण्याचा निर्णय भारतीय जैन संघटनेने घेतला आहे. या विद्यार्थ्यांचा इयत्ता १२ वीपर्यंतचा शिक्षणाचा संपूर्ण खर्च संघटनेकडून केला जाणार आहे. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातून माहिती मागवण्यात येत आहे. जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना आई किंवा वडील तर काही जणांना दोघांनाही गमवावे लागले आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या उदरनिर्वाहासोबतच पुढील शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा अनाथ झालेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पुनर्वसन करण्याचा निर्णय भारतीय जैन संघटनेने घेतला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनाही संघटना दत्तक घेणार आहे. इयत्ता पाचवी ते सातवी वर्गात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना संघटनेच्या वाघोली (पुणे) येथील शैक्षणिक पुनर्वसन प्रकल्पातील वसतिगृहात व्यवस्था केली जाणार आहे. एका कुटुंबातील एक किंवा दोन विद्यार्थ्यांनाच प्रवेश दिला जाणार असून त्यांना पुनर्वसन वसतिगृहात पाठविण्यासाठी त्यांच्या कायदेशीर पालकांची संमती बंधनकारक करण्यात आली आहे. जिल्ह्यातील इच्छुकांनी संघटनेचे अॅड. शांतीलाल कोचेटा, कंचनमाला संगवे, अॅड. रोहन कोचेटा, पत्रकार उपेंद्र कटके यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दिशा समितीच्या बैठकीत खासदारांचे निर्देश
सोमवारी झालेल्या दिशा समितीच्या बैठकीत समितीच्या सदस्या कंचनमाला संगवे यांनी याची माहिती दिली. यावेळी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर व आमदार कैलास पाटील यांनी गटविकास अधिकाऱ्यांना उपक्रमासाठी सहकार्य करण्याच्या सूचना दिल्या. प्रत्येक गावाच्या ग्रामसेवकांनी गावात माहिती देऊन अशा विद्यार्थ्यांच्या नोंदी घेण्याबाबत सांगण्यात आले आहे. संबंधितांनीही ग्रामसेवकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
वैद्यकीय अधिकाऱ्यांचेही पत्र ग्राह्य
कोरोनात अनाथ झालेल्या सर्वच विद्यार्थ्यांची नोंदणी शासनदरबारी नाही. तांत्रिक अडचणी येत असल्याने नोंदी झाल्या नाहीत. यामुळे आता संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कोरोना काळात पालकांचा मृत्यू झाल्याचे पत्र दिले तरीही ते ग्राह्य धरणार असल्याचे संगवे यांनी बैठकीत सांगितले. याबाबत अंतिम निर्णय संघटनेने राखून ठेवला आहे.