उस्मानाबाद – जिल्ह्याच्या दृष्टीने अत्यंत जिव्हाळ्याचा तितकाच गंभीर विषय असणाऱ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने मान्यता नाकारल्याने हे महाविद्यालय केव्हा सुरू होईल असा प्रश्न सामान्यांना पडला आहे. मात्र त्यापूर्वी आणखी एक बाब उजेडात आल्याने यात काही राजकारण आहे का अशी शंका उपस्थित केली जात आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी दोन समित्यांनी पाहणी केली. त्यात राज्याच्या एका समितीचा समावेश होता तर दुसरी समिती राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाची होती. राज्याच्या समितीने सकारात्मकता दर्शवली तर राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग समितीने मान्यता नाकारली. मात्र त्यात कोणत्या त्रुटी होत्या त्या समोर आल्या नाहीत. त्या समोर याव्यात अशी सामान्यांची इच्छा आहे. कोणाच्या दिरंगाई मुळे हा प्रश्न मार्गी निघण्यास अडचण झाली याची उकल करायची असेल तर त्रुटी आणि अहवाल समोर येणे महत्वाचे आहे. आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत वैद्यकीय महाविद्यालयाबाबत बोलताना राज्याच्या समितीने सकारात्मकता दर्शवल्याचे सांगितले मात्र राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने मान्यता नाकारण्यासाठी ज्या गंभीर त्रुटी आहेत त्या मात्र सांगितल्या नाहीत. सरकार त्रुटींची पूर्तता करण्यासाठी पाठपुरावा करत आहे. वैद्यकीय महाविद्यालय लवकरात लवकर सुरू व्हावे यासाठी एन एम सी कडे फेर तपासणी करण्याचा आग्रह देखील केला जाणार असल्याचे आ. पाटील यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेतील इतर महत्वाचे मुद्दे पाहण्यासाठी व्हिडिओ पहा….