जिल्हा पुरवठा विभागाच्या कारनाम्यापुढे क्राईम वेब सिरीज सुद्धा फिकी पडेल !
भाग १०
आकाश नरोटे
८४२१५३१९७६
धाराशिव – सध्या मनोरंजन म्हणून ओटीटी प्लॅटफॉर्म वर वेब सीरिज मोठ्या प्रमाणात पाहिल्या जातात. हर्षद मेहता, तेलगी घोटाळा या वेब सिरीज प्रचंड गाजल्या. धाराशिव जिल्ह्यात पुरवठा विभागात देखील प्रचंड मोठा घोटाळा आहे त्यासमोर ओटीटी वर प्रसारीत झालेल्या वेब सिरीज देखील फिक्या पडतील. गोर गरिबांचे धान्य काळाबाजारात विकले जाते हे केवळ ऐकीवात आहे मात्र दैनिक जनमत ने लावून धरलेली वृत्तमालिका हा घोटाळा कसा होतो, कोणते अधिकारी यात सामील असू शकतात, त्यात कंत्राटदाराला हाताशी धरून, शासकीय नियम अक्षरशः पायदळी तुडवून हा घोटाळा केला जात आहे यावर भाष्य केले गेले आहे. सध्या तरी घोटाळ्याची ही वेब सिरीज मध्यंतरापर्यंत येऊन पोहचली असून कारवाई करून जिल्हाधिकारी नायक ठरतात की नाही हे मध्यांतरानंतर समजणार आहे.
सध्या तांदूळ अफरातफर प्रकरणातील आरोपी पकडला गेला असल्याचे सर्वांना माहिती आहे. पोलिसांनी पकडलेला आरोपी अखिल शेख आहे, ज्याच्यावर गुन्हा दाखल झाला तो अलीम शेख आहे.आणि पुरवठा विभागाच्या ट्रान्सपोर्ट पासवर आणखी एक नाव समोर आले ते म्हणजे सलीम शेख. पोलिस अखिलच अलीम आहे आणि पकडलेल्या आरोपीने हा गुन्हा केला आहे असे सांगतात. मात्र मिळालेल्या माहितीनुसार ज्याने गुन्हा केला आणि जो १४ फेब्रुवारी रोजी ट्रक चालवत होता तो अलीम शेख हा अल्पवयीन असून त्याचे वय समोर येऊ नये म्हणून एका बड्या व्यक्तीच्या खडी क्रशरच्या वाहनावर चालक म्हणून अखिल शेख कामाला आहे अशी कुजबुज झाली सुरू असून नेमके सत्य काय आहे हे पोलीस तपासातून समोर येणार आहे. तर सलीम शेख हा अलीम शेखचा जवळचा नातलग आहे अशी देखील दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. ढोकी पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी विलास हजारे यांना आरोपी हा अल्पवयीन आहे का याबाबत विचारले असता त्यांनी तो अल्पवयीन नसल्याचे सांगितले मात्र पोलिसांना संभ्रमित करण्यासाठी कंत्राटदार आणि पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांनी वेगळेच कुंभाड रचले असून अखिल शेख हा आरोपी सांगितला तसा पुरवणी जबाब देखील दिल्याची माहिती आहे. मात्र आरोपी नेमका कोण आहे हे याची शहानिशा पोलिसांनाच करावी लागणार आहे.तत्पूर्वी पोलिसांनी सर्व सीसीटीव्ही फुटेज, अधिकाऱ्यांचे सीडीआर घेतला तरच हा तपास पूर्ण होणार आहे. अन्यथा घोटाळ्याच्या वेब सिरीज मधील ८.९४ क्विंटल तांदूळ अफरातफरचा भाग कायमचा आणि अर्धवट रित्या बंद झालेला असेल.
घोटाळा नेमका कसा?
अनेकांना प्रश्न पडला की हा घोटाळा नेमका कसा होत आहे तर यात महत्वाची गोष्ट आहे ती ट्रक आणि त्यात बसवलेली जीपीएस सिस्टिम. कंत्राटदाराने आतापर्यंत जीपीएस नसलेल्या गाड्या वापरल्याचे बोलले जात आहे. जीपीएस संनियंत्रण कक्षात देखरेखीचे कामकाज होत नसल्याने कंत्राटदार अधिकाऱ्यांशी हातमिळवणी करून अवैध वाहतुकीच्या माध्यमातून हे धान्य काळ्या बाजारात विकायला नेतो अशी चर्चा आहे. तसेच कंत्राटामध्ये ज्या गाड्या आहेत त्याच्या ऐवजी खाजगी गाड्या अगदी नाममात्र भाड्याने लावून बक्कळ नफा यातून कमाई केली जाते आणि हाच तो रू.२०० कोटीपेक्षा अधिकचा घोटाळा आहे.

जिल्हाधिकाऱ्यांची भूमिका गुलदस्त्यात
अफरातफर प्रकरणी डॉ. सचिन ओम्बासे यांच्या कार्यकाळात त्यांनी गुन्हा नोंद करण्याचे आदेश दिले मात्र त्यानंतर त्यांची बदली झाली. नवे जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार जिल्हाधिकारी म्हणून रुजू झाले तेव्हा त्यांच्या समोर हा विषय गेल्यानंतर पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांनी त्यांना संभ्रमात ठेवले तरी देखील त्यांनी गोदामाची पाहणी केली, काही बैठका देखील घेतल्या मात्र कारवाईचं पान त्यांनी अद्याप न हलवल्याने ते हिरो ठरतात की नाही याचा अंदाज कोणालाच नाही. मात्र त्यांची गुलदस्त्यातील भूमिका देखील उलट सुलट चर्चा घडवून आणत आहे.
….तर घोटाळ्याची व्याप्ती वाढणार
दैनिक जनमत ने लावून धरलेल्या वृत्त मालिकेतून जिल्हा पुरवठा विभागाची दैना उडाली असून कारवाई न झाल्याने वेगवेगळी माहिती समोर येत आहे. जिल्ह्यात रेशन दुकानांचे रेकॉर्ड मेन्टेन नसल्याची चर्चा आहे विशेषतः अनेक दुकानांचे युनिट रजिस्टर मेन्टेन नाही हा देखील मोठा घोटाळा बाहेर निघू शकतो याची सखोल चौकशी झाली तर घोटाळ्याचा आकडा १ हजार कोटींच्या पुढे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. युनिट रजिस्टर संदर्भात देखील उलट सुलट चर्चा असून पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांच्या वरदहस्ताने ते मेन्टेन न ठेवता काळ्या बाजारात धान्य पाठवण्याची सोय केली जात असून गेल्या अनेक महिन्यांपासून हे सुरू असल्याचे बोलले जात असल्याने घोटाळ्याचा आकडा वाढला तर नवल वाटायला नको.
आज आरोपीला न्यायालयात हजर करणार !
३० मार्च रोजी आरोपीला कर्जत येथून पकडले. दुसऱ्या दिवशी न्यायालयात हजर देखील केले मात्र आरोपीचे आधार कार्ड नसल्याने त्याला अद्याप जामीन मिळाला नाही. आज ७ एप्रिल रोजी त्याला पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार असल्याने न्यायालय या प्रकरणाकडे कसे पाहते, पोलिसांना कोणते आदेश देते? पुरवठा विभागाच्या कारभाराकडे कसे पाहते? त्यावरच या प्रकरणाची दिशा ठरणार आहे.
- अनुसूचित जाती जमाती आयोगाचा जमीन हस्तांतरण प्रकरणात दणका
- आरोपी एक, व्यक्ती तीन, 200 कोटींचा घोटाळा करणारे निर्माते रचताहेत वेगवेगळी कहाणी
- विद्यार्थिनीचा अखेरचा निरोप मनोगतातच… ऱ्हदय विकाराच्या धक्क्याने B.Sc. तृतीय वर्षातील वर्षा खरात हिचे निधन
- धर्मादाय रुग्णालयांनी नियम पाळले नाहीत, तर शिवसेना स्टाईलने कारवाई केली जाईल – शिवसेना जिल्हाप्रमुख मनिष काळजे यांचा इशारा
- सोलापुरात दूषित पाण्यामुळे दोन शाळकरी मुलींचा मृत्यू, एक गंभीर – नागरिकांमध्ये संतापाची लाट