धाराशिव – जिल्ह्यात कृषी विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या संगनमताने मोठा घोटाळा केला असून शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या शासनाच्या अनुदान योजनेत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात बनावट शेतकरी दाखवून शासनाच्या निधीची लूट करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे.
काय आहे प्रकरण?
सन २०२३ मध्ये राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी सोयाबीन पिकासाठी अनुदान जाहीर केले होते. शासनाने हे अनुदान थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यांवर जमा केले. मात्र, अनुदान जमा झाल्यानंतर अनेक शेतकऱ्यांच्या निदर्शनास आले की, काही लाभार्थी प्रत्यक्षात शेतकरी नसूनही त्यांच्या खात्यावर रक्कम जमा झाली आहे. यामध्ये अनेक शासकीय जमिनींच्या नावावर अनुदान मंजूर करून ते काही प्रभावशाली व्यक्तींच्या खात्यात वळवण्यात आले.
हिंगळजवाडी (ता. धाराशिव) या गावातही अशाच प्रकारे मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याचे स्पष्ट झाले आहे. वास्तविक शेतकरी असलेले अनेक लाभार्थी या अनुदानापासून वंचित राहिले असताना, बनावट कागदपत्रांच्या आधारे बोगस शेतकऱ्यांनी अनुदान उचलले आहे.
अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप
या प्रकरणात कृषी विभागातील काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी संगनमताने ही फसवणूक केल्याचा आरोप आहे. बनावट कागदपत्रे तयार करून, अनधिकृतपणे खात्यावर अनुदानाची रक्कम वळवण्यात आली. शासनाच्या निधीची ही लूट मोठ्या प्रमाणावर असल्याची शक्यता आहे.
तक्रारदारांची मागणी
मनोज अंकुश खरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्यांनी जिल्हाभरातील अशा प्रकारच्या प्रकरणांची तपासणी करून वास्तविक लाभार्थ्यांना न्याय मिळवून देण्याची विनंती केली आहे. तसेच, दोषींवर कठोर कारवाई करून शासनाच्या निधीची वसुली करण्याची मागणी करण्यात आली आहे.

जिल्हा कृषी अधिक्षक रवींद्र माने यांची प्रतिक्रिया
14 लोकांचे 1,10,000 ग्रामपंचायत हिंगळजवाडी मधील ऑपरेटर ने त्याचे स्वतः चे नातेवाईकांचे आधार टाकून घेतलेले आहेत, ते सर्व वसूल केलेले असून जे शेतकरी आहेत त्यांना देऊन उर्वरित शासन खाती जमा करत आहोत. संबंधित सी.एस.सी.चालक व निष्काळजीपणामुळे संबंधित कृषि साहाय्यक यांचा सहभाग तपासून कारवाई केली जाईल