वन विभाग व कपिलापुरी ग्रामस्थांच्या प्रयत्नांना यश – चार महिन्यांपासून धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर जाळ्यात अडकला

0
46

परंडा, २० मार्च – परंडा तालुक्यात चार महिन्यांपासून धुमाकूळ घालून २० ते २५ जनावरांचा फडशा पाडणारा बिबट्या अखेर वन विभागाच्या पिंजऱ्यात अडकला. कपिलापुरी येथे हा बिबट्या यशस्वीरित्या पकडण्यात आला.

मागील दोन दिवसांपासून बिबट्याने कपिलापुरी गावात दहशत निर्माण केली होती. दि. १८ मार्च रोजी कपिलापुरी येथील दत्तू मसगुडे यांच्या शेळीवर भरदिवसा हल्ला केला. त्याच रात्री १२.३० च्या सुमारास वर्धमान जैन यांच्या महेशीच्या दोन रेड्यांवर बिबट्याने हल्ला चढवला. या घटनांमुळे कपिलापुरीसह परिसरातील गावांमध्ये भीतीचे वातावरण पसरले.

बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाची मोहिम

घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी वन विभागाला तत्काळ कळवले. वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्यात आला. मात्र, १९ मार्च रोजी सायंकाळी ८ वाजण्याच्या सुमारास बिबट्याने पिंजऱ्याचे गज तोडून आत ठेवलेला बोकड घेऊन पसार झाला. या घटनेमुळे वन विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले.

दुसऱ्या दिवशी बिबट्या अखेर जाळ्यात

दि. २० मार्च रोजी वन विभाग आणि ग्रामस्थांनी त्वरित परिस्थिती हाताळत पिंजऱ्याची दुरुस्ती केली. सुरक्षाव्यवस्था वाढवून पुन्हा पिंजरा लावण्यात आला. अखेर २० मार्च रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास बिबट्या पिंजऱ्यात अडकला.

गावकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

बिबट्याला पकडल्याची बातमी गावात वाऱ्याच्या वेगाने पसरली. बिबट्याला पाहण्यासाठी मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी कपिलापुरी येथे गर्दी केली. ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास सोडत वन विभागाचे आभार मानले.

पुढील कार्यवाही सुरू

वन विभागाने बिबट्याच्या सुरक्षिततेची काळजी घेत त्याला जंगलात पुनर्वसन करण्याच्या दृष्टीने पुढील प्रक्रिया सुरू केली आहे.

बिबट्याला पाहण्यासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख रणजित पाटील, हभप बालाजी महाराज बोराडे, माजी नगरसेवक डॉ. अब्बास मुजावर, पत्रकार निसार मुजावर आणि अशितोष बनसोडे यांनी कपिलापुरी येथे भेट दिली. त्यांनी वन विभागाच्या यशस्वी मोहिमेचे कौतुक केले.

वन विभागाचा उल्लेखनीय प्रयत्न

वन विभाग आणि ग्रामस्थांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे बिबट्याला अखेर जेरबंद करता आले. या यशस्वी कारवाईमुळे कपिलापुरी गावासह संपूर्ण परंडा तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here