वर्षभर झोपलेले प्रशासन जागे झाले! मार्च मध्ये सुटीच्या दिवशीही जिल्हा परिषद व ग्रामपंचायत कार्यालये सुरू राहणार

0
18

धाराशिव, दि. 4 मार्च 2025: वर्षभर निधी खर्चाचा वेग संथ असतानाच आता आर्थिक वर्षाच्या अखेरीस प्रशासनाला कामाची आठवण झाली आहे. जिल्हा परिषदेने मार्च महिन्यात येणाऱ्या सर्व सुट्यांच्या दिवशीही कार्यालये सुरू ठेवण्याचा आदेश जारी केला आहे. वर्षभर दुर्लक्षित राहिलेल्या योजनांचा निधी आता गडबडीने खर्च करण्यासाठी ही धावपळ सुरू असल्याची चर्चा आहे.

मार्चमध्येच आठवण का झाली?

सन 2024-25 या आर्थिक वर्षातील विविध योजना, जिल्हा वार्षिक योजना आणि इतर निधी मार्च संपण्यापूर्वी खर्च करण्याचे दडपण जिल्हा प्रशासनावर आले आहे. त्यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायतींच्या सर्व कार्यालयांना सुटीच्या दिवशीही सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

अधिकारी-कर्मचाऱ्यांना सुटी नाही!

मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनाक घोष (भा.प्र.से.) यांच्या स्वाक्षरीने जारी आदेशानुसार, खाते प्रमुख, विभाग प्रमुख, गट विकास अधिकारी आणि अधिनस्त कर्मचारी हे सुटीच्या दिवशीही कार्यालयात उपस्थित राहणार आहेत. योजनांची कार्यवाही त्वरित पूर्ण करण्यासाठी हे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे.

तपासणीसाठी विशेष नियुक्ती

या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी श्री. दिपक देशपांडे आणि श्री. विक्रांत त्रिवेदी या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते दररोज सकाळी ११:०० आणि दुपारी ०४:३० वाजता अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीचा अहवाल सादर करणार आहेत.

अनुपस्थित राहिल्यास कारवाईचा इशारा

जर कोणी अधिकारी किंवा कर्मचारी अनुपस्थित आढळला, तर संबंधित विभाग प्रमुखांवर प्रशासकीय कारवाई केली जाणार आहे. तसेच निधी न खर्च झाल्यास जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई होईल, असा स्पष्ट इशारा आदेशात देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here