धाराशिव जिल्ह्यातील ढोकी येथे बर्ड फ्लू (Avian Influenza H5N1) चा प्रादुर्भाव झाल्याचे निष्पन्न झाले आहे. 21 फेब्रुवारी रोजी ढोकी पोलीस स्टेशन परिसरात चार-पाच कावळे मृत अवस्थेत आढळल्यानंतर जिल्हा प्रशासन सतर्क झाले. वनविभाग, आरोग्य विभाग आणि ग्रामपंचायतीच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी करून संपूर्ण परिसराचे निर्जंतुकीकरण केले. यानंतर आणखी 16 कावळ्यांचे नमुने तपासणीसाठी पुणे आणि भोपाळ येथील प्रयोगशाळांमध्ये पाठवण्यात आले होते. शुक्रवारी आलेल्या अहवालानुसार हे सर्व नमुने बर्ड फ्लूसाठी पॉझिटिव्ह आढळले.
जिल्हाधिकाऱ्यांचे महत्त्वाचे आदेश
बर्ड फ्लूचा प्रसार रोखण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी प्रकाश अहिरराव यांनी कठोर प्रतिबंधात्मक उपाययोजना लागू करण्याचे आदेश दिले आहेत. “प्राण्यांमधील संक्रामक व सांसर्गिक रोग प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम, 2009” आणि “Action Plan for Prevention, Control & Containment of Avian Influenza (Revised, 2021)” च्या तरतुदीनुसार ढोकी गावाच्या 10 किमी त्रिज्येतील क्षेत्र ‘सतर्क भाग’ (Alert Zone) म्हणून घोषित करण्यात आले आहे.
महत्वाचे निर्बंध आणि उपाययोजना:
- बाधित क्षेत्रात नागरिकांच्या हालचाली व प्राण्यांच्या वाहतुकीवर निर्बंध – बाधित परिसरातील खाजगी वाहने बाहेर लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
- संपूर्ण परिसर निर्जंतुक करणे – 2% सोडियम हायपोक्लोराईट (NaOH) किंवा पोटॅशियम परमॅग्नेट (KMnO4) ने निर्जंतुकीकरण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच परिसरात चुन्याची फवारणी करण्याच्या सूचना आहेत.
- कुक्कुटपालन केंद्रांचे सर्वेक्षण – 10 किमी त्रिज्यातील कुक्कुट पक्ष्यांचे संपूर्ण सर्वेक्षण करून संशयित नमुने प्रयोगशाळेत पाठवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
- अनेक विभागांची संयुक्त कारवाई – ग्रामपंचायत, आरोग्य विभाग, महसूल विभाग, पशुसंवर्धन विभाग, वनविभाग, जलसंपदा विभाग, पोलिस प्रशासन व इतर संबंधित यंत्रणांना संसर्ग रोखण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ आणि साधनसामग्री पुरवण्याचा आदेश देण्यात आला आहे.
- आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत कठोर अंमलबजावणी – आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 आणि साथरोग प्रतिबंधक अधिनियम 1897 अंतर्गत कडक उपाययोजना राबविण्यात येणार आहेत. 0 ते 1 किमी त्रिज्येतील बाधित क्षेत्रात आणि 1 ते 10 किमी त्रिज्यातील सर्वेक्षण क्षेत्रात तात्काळ प्रतिबंधात्मक कारवाई केली जाणार आहे.
स्थानिक प्रशासन सतर्क, नागरिकांना घाबरू नये – प्रशासनाची सूचना
बर्ड फ्लूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासन युद्धपातळीवर काम करत आहे. नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे आणि घरगुती कुक्कुटपालन करणाऱ्यांनी विशेष खबरदारी घ्यावी. आजूबाजूला कोणत्याही पक्ष्यांचा संशयास्पद मृत्यू आढळल्यास तात्काळ वनविभाग किंवा आरोग्य विभागाला कळवावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
बर्ड फ्लू म्हणजे काय?
बर्ड फ्लू (Avian Influenza H5N1) हा एक विषाणूजन्य संसर्ग असून तो मुख्यतः पक्ष्यांमध्ये पसरतो. अत्यंत घातक प्रकारांमुळे मोठ्या प्रमाणात पक्षी मृत्यू होऊ शकतात. क्वचित प्रसंगी हा विषाणू माणसांमध्येही संसर्ग पसरवू शकतो, त्यामुळे अत्यंत काळजी घेणे आवश्यक आहे.
नागरिकांनी घ्यायची काळजी:
- कच्च्या किंवा अपूर्ण शिजवलेल्या कोंबडीच्या मांसाचा वापर टाळावा.
- जिवंत पक्षी किंवा मृत पक्ष्यांना हात न लावणे.
- परिसर स्वच्छ ठेवणे आणि शासनाच्या सूचनांचे पालन करणे.
- पक्ष्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर मृत्यू झाल्यास तात्काळ स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधावा.
ढोकी परिसरात बर्ड फ्लूचा संसर्ग आढळल्याने संपूर्ण धाराशिव जिल्हा सतर्क झाला आहे. जिल्हा प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना कडक केल्या असून नागरिकांनीही दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पुढील काही दिवस प्रशासनाच्या सूचनांचे पालन करणे अत्यावश्यक आहे, जेणेकरून रोगाचा प्रसार रोखता येईल.