बिल्डरचा विश्वासघात! गृहिणीच्या स्वप्नांचा चक्काचूर

0
50

नवी मुंबई, 22 फेब्रुवारी 2025: घर घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या एका कुटुंबासह इतर तीन लोकांची तब्बल 13.25 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार नवी मुंबईतील पावणेगाव येथे उघडकीस आला आहे. वैशाली अनिल जाधव (वय 29) यांनी दिलेल्या जबाबानुसार, त्यांनी ऋषभ बजरंग मोकल या बिल्डरकडून “भगिरथी निवास” या इमारतीत 1BHK घर खरेदी करण्यासाठी 2,25,000/- रुपये दिले होते. मात्र, बिल्डरने त्यांचे स्वप्नच उद्ध्वस्त केले आणि सदर घर दुसऱ्याच व्यक्तीस विकल्याचे समोर आले आहे. याबाबत पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घर खरेदीचे स्वप्न आणि फसवणुकीची सुरुवात

जानेवारी 2022 मध्ये वैशाली जाधव आणि त्यांच्या पतीने पावणेगाव परिसरात स्वतःसाठी नवीन घर घेण्याचा निर्णय घेतला. शोध घेत असताना त्यांना साईदिप कन्स्ट्रक्शनच्या “भगिरथी निवास” आणि “उमा निवास” या इमारतींबाबत माहिती मिळाली. या इमारतींचे बांधकाम पावणेगावातील ऋषभ मोकल करत असल्याने विश्वास ठेऊन त्यांनी संपर्क साधला.

ऋषभ मोकल याने सदर इमारतींना सर्व शासकीय परवाने व आराखडा मंजूर असल्याचे सांगून लोकांना आकर्षित केले. त्याने 12 लाख रुपयांमध्ये 1BHK रूम विकण्याचा प्रस्ताव दिला. किंमत जास्त वाटल्याने जाधव दाम्पत्याने विचार करून निर्णय घेण्याचे ठरवले. काही दिवसांनी मोकल याने “तुम्ही रूम घेणार की दुसऱ्याला विकू?” अशी विचारणा करत त्यांना लगेच निर्णय घेण्यास भाग पाडले.

करार व रोख रक्कम देण्याचा क्रम

घर घेण्यासाठी वैशाली जाधव यांनी सोन्याचे दागिने विकून व गहाण ठेवून 2.25 लाख रुपये उभे केले. त्या रकमेवर त्यांनी रूम बुकिंग केली आणि 25 फेब्रुवारी 2022 रोजी 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर करारनामा केला. त्यानंतर ऋषभ मोकल याने दोन महिन्यांत घराचा ताबा देण्याचे आश्वासन दिले.

पण दोन महिने उलटून गेले तरीही बांधकाम पूर्ण झाले नाही. सातत्याने विचारणा केल्यानंतर मोकलने पूर्ण पैसे भरण्यास सांगितले. वैशाली जाधव यांनी पुन्हा मंगळसूत्र गहाण ठेवून 1 लाख रुपये आणि रजिस्ट्रेशनसाठी 25,000 रुपये दिले.

एका वर्षानंतर फसवणुकीचा खुलासा

सुमारे एक वर्षानंतर भगिरथी निवासचे बांधकाम पूर्ण झाल्यावर जाधव कुटुंबाने त्यांचा रूम पाहण्यासाठी भेट दिली असता तिथे इतर कोणीतरी राहत असल्याचे दिसले!

यामुळे हादरलेल्या जाधव दाम्पत्याने मोकल याला जाब विचारला असता त्याने “मी ही इमारत दुसऱ्या बिल्डरला विकली आहे, मी तुम्हाला दुसऱ्या ठिकाणी छोटी रूम देतो किंवा तुमचे पैसे परत देतो” असे सांगून टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. मात्र, पुढे जाधव यांनी अनेकदा संपर्क केला तरीही त्यांचे पैसे परत मिळाले नाहीत.

इतर तक्रारदारांचीही लाखोंची फसवणूक

फसवणुकीचे हे एक प्रकरण नसून, इतर तिघांच्याही लाखो रुपयांचा घोटाळा झाल्याचे उघड झाले आहे.

  1. रामनारायण हरिलाल गुप्ता – 5,00,000 रुपये (भगिरथी निवास, रूम नं. 201)
  2. महानंदा चंद्रशेखर गुडीमनी – 4,00,000 रुपये (उमा निवास, रूम नं. 201)
  3. प्रकाश मोतीराम पवार – 2,00,000 रुपये (उमा निवास, रूम नं. 202)

बिल्डरविरोधात कायदेशीर तक्रार दाखल

जाधव आणि इतर तक्रारदारांनी ऋषभ मोकल याच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. 13.25 लाख रुपये घेऊन ना घराचा ताबा दिला, ना पैसे परत केले, उलट इमारतच विकून टाकली!

शासनाच्या गृहनिर्माण विभागाकडून कारवाईची मागणी

गृहनिर्माण क्षेत्रातील अशा फसवणुकीच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. त्यामुळे सरकारने बिल्डर आणि कन्स्ट्रक्शन कंपन्यांवर कडक कारवाई करण्याची गरज आहे. जाधव कुटुंब आणि अन्य तक्रारदारांनी गृहनिर्माण विभाग आणि पोलीस प्रशासनाकडे गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

हे प्रकरण लक्षात घेता, नागरिकांनी घर खरेदी करताना योग्य ती काळजी घ्यावी, सर्व शासकीय परवाने तपासावेत आणि फसवणूक होणार नाही याची खात्री करावी. अशा भोंगळ बिल्डरांच्या जाळ्यात अडकण्याआधी सर्व कागदपत्रे नीट तपासण्याची गरज आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here