पनवेल बस स्थानक परिसरात 39.5 ग्रॅम सोन्याची लगड चोरीला

0
19

पनवेल: पनवेल बस स्थानक परिसरात एका ज्वेलर्स व्यावसायिकाची 39 ग्रॅम 500 मिली सोन्याची लगड चोरीला गेल्याची घटना घडली आहे. ही चोरी दिनांक 20 फेब्रुवारी 2025 रोजी रात्री 08:40 वाजण्याच्या सुमारास घडली.

संजय रतिकंशत प्रधान (वय 47, रा. खोपोली) हे सोन्याचे दागिने घडविण्याचा व्यवसाय करतात. ते खोपोलीतील जसराज ज्वेलर्सकडून 60 ग्रॅम दागिने पॉलिशसाठी व 25 ग्रॅम सोन्याची लगड सोन्याचे दागिने बनवण्यासाठी घेऊन पनवेल येथे आले होते. त्यांनी सोन्याची लगड श्री कृपा टेस्टिंग टंच आणि बुलियन (पनवेल) येथे शुद्ध सोन्यात रूपांतर करून घेतली.

यानंतर त्यांनी एकूण 91 ग्रॅम 630 मिली सोन्याचे दागिने व लगड दोन वेगवेगळ्या बॅगांमध्ये ठेवले. त्यातील 39 ग्रॅम 500 मिली सोन्याची लगड एका बॅगेत भरून उजव्या खिशात ठेवली. त्यांनी पनवेल बस स्थानकाजवळून खोपोलीला जाणारी एन.एम.टी बस पकडली. मात्र, पळस्पे येथे तिकीट काढण्यासाठी हात खिशात घातला असता सोन्याची लगड असलेली बॅग चोरीला गेल्याचे लक्षात आले.

प्रधान यांनी बसमध्ये शोध घेतला व प्रवाशांना विचारले, मात्र ती सापडली नाही. त्यानंतर त्यांनी तातडीने आपल्या परिचितांना फोन करून माहिती घेतली, परंतु कुठेही सोन्याचा मागमूस लागला नाही.

या प्रकरणी संजय प्रधान यांनी पनवेल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरीस गेलेल्या सोन्याची अंदाजे किंमत 3,20,000 रुपये असल्याचे सांगितले जात आहे. पोलीस सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे पुढील तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here