पनवेल: साई मंदिरात दर्शनासाठी आलेल्या इसमाने विश्वास संपादन करून एका डॉक्टर महिलेची तब्बल ₹10,13,717 ची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. पीडित महिलेने पनवेल शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून, संशयित राजेश शेट्टी, त्याची पत्नी अस्मीता शेट्टी आणि मुलगा तेजस शेट्टी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फसवणुकीची कथा
फिर्यादी ममता देविदास भुयारे (वय 40) या उपजिल्हा रुग्णालयातील 108 अँब्युलन्स सेवा येथे डॉक्टर म्हणून कार्यरत आहेत. त्या आपल्या सहा वर्षीय मुलीसह पनवेलमध्ये राहतात. आरोपी राजेश शेट्टी याची ओळख मे 2023 मध्ये साई मंदिरात झाली. त्याने सुरुवातीला पीडितेच्या मुलीशी ओळख वाढवली आणि त्यानंतर विश्वास संपादन करून स्वतःची आणि पत्नीची एनजीओ असल्याचे सांगितले. या एनजीओच्या माध्यमातून मेडिकल कॅम्प आयोजित केल्या जात असल्याचे सांगून डॉक्टर ममताला सहभागी होण्याचे आमिष दाखवले.
टप्प्याटप्प्याने पैसे उकळले
त्याने गुंतवणुकीसाठी सुरुवातीला ₹1,25,000 ऑनलाईन घेतले. त्यानंतर ₹5,93,818 चे लोन काढण्यासाठी भाग पाडले. त्याच्या पत्नी अस्मीता शेट्टी हिने ₹51,000 गुंतवणुकीसाठी मागितले आणि त्याचा मुलगा तेजस शेट्टी याने घरी फोन करून रडारड करून ₹60,000 उकळले. हे पैसे घेण्यासाठी पीडितेने आपले सोन्याचे दागिने मुथूट फायनान्समध्ये गहाण ठेवले होते, परंतु राजेश शेट्टी याने हे दागिने तिथून काढून F6 गोल्ड लोन कंपनीत गहाण ठेवून ₹97,000 चे नवे लोन घेतले.
त्यानंतर आरोपीने पीडितेच्या नावाने मोबाईल लोन घेतले, ज्यात ₹74,900 किमतीचा आयफोन 15, ₹21,999 आणि ₹63,000 किमतीचे विवो कंपनीचे मोबाईल घेतले. हा सर्व खर्च आरोपी भरणार असल्याचे सांगून तो गायब झाला.
फसवणूक उघडकीस कशी आली?
ऑगस्ट 2024 मध्ये पीडितेला गोल्ड लोन कंपन्यांकडून नोटिसा आल्या. चौकशी केल्यावर कळले की तिचे गहाण ठेवलेले दागिने अन्य ठिकाणी ठेऊन लोन घेतले गेले आहे. तिने तातडीने राजेश शेट्टी याला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. अखेर फसवणूक झाल्याची खात्री पटल्यावर पीडितेने पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
पोलिसांचा तपास सुरू
पोलीसांनी राजेश शेट्टी, अस्मीता शेट्टी आणि तेजस शेट्टी यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास सुरू आहे.