दिवसा घरफोडी करणारा आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

0
83

येरमाळा (दि. 12 फेब्रुवारी 2025) – येरमाळा पोलीस ठाणे हद्दीतील वडगाव येथे भरदिवसा घरफोडी करून 15.79 लाखांचा ऐवज लंपास करणाऱ्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे.

दि. 7 फेब्रुवारी रोजी वडगाव येथील रामभाऊ गहिनीनाथ नवले हे शेतातील कामासाठी गेले असता अज्ञात इसमाने त्यांच्या घराचा लोखंडी कडीकोयंडा तोडून आत प्रवेश केला. कपाटातील 18 तोळे सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण 15,79,600 रुपये किमतीचा मुद्देमाल चोरीला गेला. येरमाळा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी स्थानिक गुन्हे शाखेला या प्रकरणाचा तातडीने तपास करण्याचे आदेश दिले. तपासादरम्यान तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयित सुरज दादासाहेब शिनगारे (रा. शेलगाव, ता. कळंब, जि. धाराशिव) याचे नाव समोर आले. पोलिसांनी त्याला अत्यंत शिताफीने ताब्यात घेतले. चौकशीत सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली व चोरी केलेल्या ऐवजाबाबत माहिती दिली.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपीकडून 18 तोळे सोन्याचे दागिने, 40,000 रुपये रोख रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल असा एकूण 15,09,600 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. आरोपीला पुढील कारवाईसाठी येरमाळा पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक संजय जाधव, अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि सुदर्शन कासार, सपोफौ वलीउल्ला काझी, पोलीस हवालदार शौकत पठाण, प्रकाश औताडे, फहरान पठाण, मपोशैला टेळे, पोअं योगेश कोळी, चालक रत्नदिप डोंगरे आणि नितीन भोसले यांच्या पथकाने केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here