धाराशिव, १२ फेब्रुवारी (प्रतिनिधी):
धाराशिव जिल्ह्यात १७ फेब्रुवारी २०२५ ते २८ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत प्लाझमा, बीम लाईट आणि लेझर बीम लाईटच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. ही बंदी जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या शिफारशीनुसार आणि भारतीय नागरीक सुरक्षा संहिता, २०२३ च्या कलम १६३ नुसार लागू करण्यात आली आहे.
शिवाजी महाराज जयंतीच्या पार्श्वभूमीवर निर्णय:
या कालावधीत १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती शासकीय पातळीवर साजरी केली जाणार आहे. त्यानंतर विविध संघटना, पक्ष, मंडळांकडून मिरवणुका, रॅली, शोभायात्रा आयोजित केल्या जातील. या कार्यक्रमांमध्ये प्लाझमा लाईट, बीम लाईट व लेझर लाईटचा मोठ्या प्रमाणावर वापर होण्याची शक्यता आहे.
धोके आणि प्रतिबंधाचे कारण:
- या तीव्र प्रकाशामुळे लहान मुले, वृद्ध नागरिकांचे डोळे दुखावू शकतात.
- वाहनचालकांचे नियंत्रण सुटून अपघात होण्याची शक्यता आहे.
- कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.
कायद्याचा आधार:
भारतीय नागरीक सुरक्षा संहिता, २०२३ च्या कलम १६३ (१) नुसार, नागरिकांच्या जीवित किंवा आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता असेल तर प्रशासन प्रतिबंधात्मक आदेश जारी करू शकते.
कायदा मोडल्यास कडक कारवाई:
जिल्ह्यातील नागरिकांनी या आदेशाचे काटेकोर पालन करावे. आदेशाचे उल्लंघन केल्यास कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा अपर जिल्हादंडाधिकारी श्रीमती शोभा जाधव यांनी दिला आहे.