तुळजाभवानी मंदिरात सापडलेला प्राचीन ग्रंथ गायब! गावभर चर्चा मात्र प्रशासनाला साधी कुणकुण देखील नाही

0
50

तुळजापूर – गेल्या काही महिन्यापासून तुळजाभवानी मंदिर संस्थान वेगवेगळ्या कारणाने चर्चेत आहे. सोने, चांदी, मौल्यवान वस्तू नंतर मंदिरातील प्राचीन ग्रंथ देखील गायब होत आहेत. तुळजाभवानी मंदिरात जिर्णोद्धाराचे काम सुरू आहे. होमाच्या जवळा एक प्राचीन पिंपळाचे झाड असून त्याखाली प्राचीन पार आहे. या प्राचीन पाराच्या जवळ एक प्राचीन ग्रंथ गेल्या पंधरा दिवसांखाली सापडला मात्र तो प्राचीन ग्रंथ काही लोकांनी परस्पर गायब केला. तो कुठे गेला, कोणाला दिला, का दिला, मंदिरातील अधिकारी त्यात सामील आहेत का याबाबत शहरात उलट सुलट चर्चा सुरू आहेत. ग्रंथ गायब झाला याची साधी खबर मंदिर प्रशासनातील वरिष्ठांना नाही हे अजब आहे. तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या व्यवस्थापक माया माने यांना याबाबत विचारणा केली असता त्यांनी काम करत असलेले कंत्राटदार आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांना याबाबत विचारणा केली मात्र त्यांनी असा ग्रंथ सापडला नसल्याचे सांगितले. तसेच भवानीशंकर मंदिराजवळ मोडी भाषेत शब्द असलेली शिळा सापडली असून त्याचा फोटो पुरातत्व विभाग संभाजीनगर ला पाठवला असल्याचे सांगितले. त्यामुळे ग्रंथ कुठे गेला आणि कोणी गायब केला हा प्रश्न कायम आहे. जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थान चे अध्यक्ष डॉ. सचिन ओम्बासे या प्रकरणी काय कार्यवाही करतात याकडे लक्ष लागले आहे.

प्रतिक्रिया –

मंदिरातील अनेक प्राचीन वस्तू, साहित्य यापूर्वीही गायब झाले असून भ्रष्टाचाराने मंदिर प्रशासनातील अधिकाऱ्यांचे हात बरबटलेले असल्याने तक्रारी अर्ज करून देखील त्याची दखल घेतली जात नाही.

किशोर गंगणे पुजारी मंडळाचे माजी अध्यक्ष

प्रतिक्रिया

श्री तुळजा भवानी मंदिरात मागील अनेक वर्षापासून गहाळ कारभार पहायला मिळत आहे. ज्या निजाम कायद्यानुसार मंदिरचा प्रशासकीय कारभार चालत आहे तोच देऊळ ए कवायत उर्दुतील कायद्याचे शासन मान्य भाषांतरांकडून आजपर्यंत मराठी भाषंतर करून घेतलेले नाही.
मंदिरात जी कवायत कायदा वापरला जातो तो दुस-या व्यक्तींनी त्यांच्या उपयोगाप्रमाणे घुसवलेली आहे.आता नुकतेच मंदिरातील पिंपळपारा नुतनीकरण करत असताना खोदकामात एक जुना ग्रंथ सापडला असे कळते.पण यात देखील कुणी तरी स्वत:च्या फायद्यासाठी बोगस कागदपत्रे घुसविण्यासाठी केलेला प्रयत्न असेल असे आम्हास वाटते.सध्या मंदिरात नविन नविन इतिहास तयार करून कागदपत्रे घुसविण्याचे काम जोरात चालू आहे.जर एखादे कागदपत्रे व ग्रंथ सापडली असतील तर त्याचा रितसर पंचनामा होणे गरजेचे होते तसे न करता पुरातन विभाग परस्पर ते साहित्य घेऊन जात असेल तर तो गुन्हाच आहे.


अमरराजे कदम-अध्यक्ष श्री तुळजा भवानी भोपे पुजारी मंडळ तुळजापूर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here